‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
इकडे ‘खिंड’ तिकडे ‘झुंड’… नेमकी लढत कोणाची कोणाशी?
शाळेतल्या तीन मुलांसमोर एक शाळेत आलेला पाहुणा उभा होता. त्यानं तिघांना एकेक रुपया दिला आणि तिघांनाही विचारलं की, “तुम्ही या एक रुपयाचं काय कराल?”
पहिला म्हणाला, “मी चॉकलेट घेणार.” दुसरा म्हणाला, “मी हे पैसे बॅंकेत ठेवणार” आणि तिसरा म्हणाला, “या एका रुपयाचे दोन रुपये कसे होतील ते मी बघणार.”
तिसऱ्या मुलाकडे पाहून पाहुण्याने टाळ्या पिटल्या.
आता हा पाहुणा कोण होता… ती तीन मुलं कोण होती… हे जाणून घ्यायची आवश्यकता नाही. या लेखाची ती गरजही नाही. आपल्याला या लेखातला तिसरा मुलगा महत्वाचा आहे. हा तिसरा मुलगा आपल्याला कसं होता येईल किंवा ‘या’ प्रकारच्या मुलांची टक्केवारी कशी वाढेल, हे आपण पाहाणं महत्वाचं आहे. कारण एकाचे दोन.. दोनाचे चार.. चारचे.. आठ. असं होत जाणं महत्वाचं आहे.
आता सगळ्यात महत्वाची टीप. तुम्हाला काय वाटतं हे फक्त पैशापुरतं लागू आहे? नो वे!!
सगळ्या चांगल्या, गुणात्मक बाबतीत हे लागू आहे. एकाचे दोन, दोनाचे चार कसे होतील हे आपण पाहायला हवं. आपण म्हणजे आपणच. म्हणजे असे आपण जे सोशल मीडियावर दिमाखात दुसऱ्याला मापतअसतात… बसल्याजागी बसून एखाद्याला नामोहरम करतात. आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतो आहोत त्याने यापूर्वी काय केलंय, हे न पाहता त्याची यथेच्छ टिंगल टवाळी करतात, अशाही सगळ्यांना हे लागू आहे. आणि त्याचबरोबर एखाद्या चांगल्या, गुणात्मक व्यक्तीला विनाकरण बोल लावणाऱ्यांना आपल्या परीने चाप लावू न पाहणाऱ्या, मूग गिळून गप्प राहणाऱ्या सगळ्यांना ते लागू आहे.
आता सगळ्यात महत्वाचं! ही गोष्ट, जी मी सुरूवातीला सांगितली ती आठवण्याचं कारण काय? तर ती आठवण्याचं कारण ठरले दोन सिनेमे. एक पावनखिंड आणि एक झुंड. एक सिनेमा १८ फेब्रुवारीला आला आणि दुसरा ४ मार्चला.
झुंड सिनेमा थिएटरमध्ये यायच्या आदल्या दिवशीपासून झुंड व्हर्सेस पावनखिंड असं चित्र दिसू लागलं. सरळ सरळ दोन गट पडले. एक झुंडचे समर्थक आणि दुसरे पावनखिंडचे समर्थक. प्रकरण थेट जातीवर गेलं. कोण कुठल्या जातीचा… मग अमुक कसा आमच्या जातीचा.. तमुक कसा तुमच्या जाातीचा.. पार इथून सुरूवात झाली आणि आता हे गट सोशल मीडियावर आपआपल्या बाजू लढवताना दिसायत. काही महाभागांनी तर हे सिनेमे बनवणारे दिग्दर्शक आणि मराठीतले इतर दिग्दर्शक (दिग्दर्शकांच्या आडनावांसकट) कसे कोणते सिनेमे बनवतात, असं सांगायला सुरूवात केली आहे.
आता प्रश्न मनात हा उरला आहे की, इकडचे आमचे.. तिकडचे तुमचे.. असं आपण करत असताना, आपण कुठले? हा प्रश्न आता आपण स्वत: ला विचारायची वेळ आली आहे. न भूतो.. अशी सुवर्णवेळ महाराष्ट्रावर आली होती. लॉकडाऊननंतर हिंदी, तामीळ, इंग्रजी सिनेमांचं आक्रमण महाराष्ट्रातल्या थिएटर्सवर होत असताना, एक पावनखिंडसारखा चित्रपट सलग दोन आठवडे हाऊसफुल्ल जाताना दिसतो. कोट्यवधींची कमाई करतो. त्याचवेळी हिंदीत सगळं सामसूम असताना, आपल्या एका गुणवाान दिग्दर्शकाचा पहिला हिंदी चित्रपट झुंड थिएटरवर धडकतो. ही किती किती अभिमानाची बाब होती.
सगळी आपलीच माणसं. एक सिनेमा महाराष्ट्र गाजवतो आहे आणि दुसरा देश गाजवायला सज्ज झाला आहे. अस्सल मराठी मातीतून अत्यंत कष्टातून पुढे आलेले दोन दिग्दर्शक आपली चित्रकृती घेऊन सज्ज झाले होते आणि आपण काय केलं? आपण या दोघांना विलग केलं. या दोघांमध्ये गडद तिरकी रेष मारून मोकळे झालो.
खरंतर आपण मराठी माणूस या नात्याने या दोघांमध्ये येणाऱ्या प्रत्येक रेषा पुसून टाकायला हव्या होत्या. आज पावनखिंड आणि झुंड हे दोन्ही सिनेमे चालणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीसाठी… गावागावातून जी मुलं चंदेरी दुनियेत आपलं नशीब आजमावण्यासाठी मेहनत घेतायत त्यांच्यासाठी. कारण, आज ही दोन माणसं पुढे गेली तर त्यांच्या मागे कैक शेकडो नवोदित नागराज आणि दिग्पाल पुढे येणार आहेत. त्यांचा धीर वाढणार आहे.
आपल्याकडे आज झुंड आणि पावनखिंड या दोन टीम्स आपल्या आहेत, असं मानलं तर या दोन गटांचे चार गट कसे होतील, चारांचे आठ गट कसे होतील, जे उत्तमोत्तम सिनेमे महाराष्ट्राला आणि भारताला देतील याकडे आपण पाहायचं की, या दोन्ही गटांना वर्षानुवर्ष जखडून ठेवणाऱ्या जातीपातीच्या राजकारणात गोवायचं हे आता ज्यानं त्यानं ठरवायचं आहे.
आम्ही पावनखिंडच बघणार.. आम्ही झुंडच बघणार.. अशी थेट शेरेबाजी करून आपला पाठिंबा आपण सोशल मिडियावर खुलेआम दाखवत आहोत खरं. पण हे चित्र आपल्या संपूर्ण समाजाला अशक्त बनवणारं आहे. झुंड आणि पावनखिंड हे सिनेमे बनवणारी माणसं.. त्यांनी बनवलेले सिनेमे.. त्यांची कथानकं.. त्यांची बजेटं.. त्यांचे निर्माते.. हे सगळं पूर्ण पूर्ण वेगळं आहे. एक आहे तो फक्त या दोघांचा उद्देश.. तो म्हणजे रंजन करण्याचा आणि केवळ रंजन नाही, तर ते करत करत समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचं त्यांनी घेतलेलं व्रत.
नागराज का ग्रेट आहे? तो सिनेमे उत्तम करतो.. त्याने केलेले सिनेमे तिकीट खिडकीवर गाजले म्हणून तो ग्रेट ठरत नाही. तसे तर कधी काळी डेव्हिड धवनने केलेले सिनेमेही गाजले होते. नागराज वेगळा आहे कारण, तो त्याला हवा तो विषय घेतो आणि कोणतीही तडजोड न करता सिनेमा बनवतो. तो केवळ सिनेमा बनवत नाही, तर सिनेमा या माध्यमाचा उपयोग तो समाजहितासाठी करतो आहे. म्हणून नागराज वेगळा आहे.
फॅंड्री, सैराट, वैकुंठ, झुंड… हे सिनेमे काय सांगतात? माणसाच्या जगण्याचा उभा छेद तो आपल्या सिनेमातून दाखवतो. इथे समाज नंतर येतो. आधी येतो तो माणूस. म्हणूनच गोष्ट जब्याची असली तरी विविध जाती-धर्माचे तरूण स्वत:ला त्यात बघू लागतात. सैराटमधली आर्ची अनेक मुलींचं प्रतिनिधित्व करते आणि झुंडसारख्या सिनेमातून अत्यंत सामान्य मुलांचा हिरो होणाऱ्या विजय बारसेंचं जगणं नागराज सिनेमातून मांडतो.
अशीच बाब दिग्पालची. दिग्पाल लांजेकर अचानक कुठून तरी टपकलेला नाही. अत्यंत कष्टपूर्वक.. पडेल ते काम करत दिग्पाल आज पुढे आलेला आहे. त्याला शिवरायांचा ध्यास आहे. शिवरायांच्या आठ गोष्टी सिनेमातून मांडायचा ध्यास त्याने घेतला आहे. पैकी फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड हे तीन सिनेमे त्यानं केले आहेत. आता त्याचा चौथा चित्रपटही जवळपास तयार आहे. त्याचं सातत्य घेण्यासारखं आहे.
शिवरायांचे सिनेमे पदरी असलेल्या बजेटमध्ये बसवणं हे खायचं काम नाही. इतकंच नव्हे, तर त्यासाठी आपल्याला हवी तशी टीम गोळा करणं.. ती मेंटेन करणं हेही त्यानं जमवून दाखवलं आहे. अर्थात शिवाजी महाराज ही कुठल्या विशिष्ट समाजाची जहांगिरी नाही. छत्रपती हे महाराष्ट्राचं दैवत आहे. दिग्पालच्या साधनेतून शिवराय जर समाजाभिमुख होणार असतील तर अडचण काय आहे? सर्वात महत्वाचं, त्याचेही सिनेमे फक्त रंजन करत नाहीत. तर त्यातूनही समाजात सकारात्मकता यावी अशीच त्याची मनीषा आहे. हे तो वेळोवेळी बोलूनही दाखवतो.
नागराज असो वा दिग्पाल.. लोकांचं रंजन आणि डोळ्यात थोडं अंजन हे ब्रीदवाक्य घेऊन हेे दोन तरूण आपआपली कलाकृती घेऊन थिएटरवर येत असतील, तर त्यांना दोन समाजात, दोन परस्पर विरोधी गटांत वाटून घेण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिलाय? आणि कशासाठी? यातून काय सिद्ध करायचंय आपल्याला?
पावनखिंड चालतोय ही आपल्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे आणि झुंडही चालायलाच हवा.. महाराष्ट्रासाठी ते फार महत्वाचं आहे. अन्यथा, आपण आयुष्यभर सोशल मीडियावर बॉलिवूड आणि त्यातल्या घराणेशाहीवर लांबून थुंकत राहू आणि हीच थुंकी आपल्या तोंडावर उडते आहे, हे आपल्या लक्षातही येणार नाही.
आपण जर सिनेरसिक असू तर आपल्याला सिनेमाशी देणंघेणं आहे. सिनेमा बनवणाऱ्यांच्या जातीशी.. ते कोणत्या देवाला-व्यक्तीला मानतात हा त्याचा पूर्णत: व्यक्तीगत प्रश्न आहे आणि त्याचं ते स्वातंत्र्य आपण आबाधित राखलं पाहिजे. तुम्ही सिनेमा पहा. नाही आवडला तर जरूर व्यक्त व्हा. पण ते सिनेमापुरतं असायला हवं.
उद्या, अशा नामवंत दिग्दर्शकाने समजा धरून चाला, की अत्यंत टुकार चित्रपट जरी बनवला, तरी ती टीका केवळ त्या चित्रपटापुरती हवी. कारण, या दिग्दर्शकाने यापूर्वी केलेलं काम आपण लक्षात घेणार आहोत की नाही?
शेन वॉर्न महान गोलंदाज होताच. पण याचा अर्थ त्याच्या एकाही बॉलवर षटकार माला गेला नाही असं नाही. आणि तो षटकार मारला म्हणून शेन कुचकामी ठरवला गेला असंही नाही. कारण तो खेळ आहे. येस.. देअर यू आर..! तो खेळ असतो आणि आपल्याकडे चित्रपटाचेही खेळच असतात. इट्स अ गेम. म्हणून माणूस कुचकामी ठरत नाही बॉस!
====
हे ही वाचा: गोष्ट अमिताभ बच्चन यांच्या कधीही न बनलेल्या ऐतिहासिक चित्रपटाची!
====
आपल्याकडच्या चांगल्या चित्रपटांना, चांगल्या दिग्दर्शकांना, चांगल्या कलाकारांना प्रोत्साहन देणं ही आपलीच जबाबदारी आहे. जी सक्ती इंडस्ट्रीला तीच इतरांना. कारण, व्यवसाय वाढायला हवा. कोणतीही इंडस्ट्री माणसाला मोठं करत नाही. इंडस्ट्रीतली माणसं ती इंडस्ट्री वाढवतात.. उंच करतात.
ही जबाबदारी आपलीही आहे. सोशल मीडियावरून शेरेबाजी करायला डोकं लागत नाही. असभ्य.. हिडीस भाषेला तर ऊत आला आहे. अर्थात ती वापरणाऱ्याचं नागवेपण यातून दिसतं. आपण त्यापैकी एक व्हायचं की, आपआपल्या परीने माणसांना जोडणाऱ्या कडीत स्वत:ला अडकवून ती शृंखला मोठी आणि बळकट करायची हे आता ज्यानं त्यानं ठरवायचं.
====
हे देखील वाचा: २०२२ मध्येही प्रतीक्षा आहे १९९७ सालातल्या तरुण तडफदार ‘दामिनी’ची!
====
बाय द वे, हे जे काही ठरवाल ते सोशल मीडियासाठी नाहीये बरं. ते आपण आपल्या मनाशी ठरवायचं. ते ज्या क्षणी ठरवाल त्या क्षणी सोशल मीडियावरचा कचरा कमी व्हायला सुरूवात होईल. आज एवढंच पुरे!