भारतीय बोलपटाची ९१ वर्ष – आलम आरा सिनेमासाठी अभिनेते विठ्ठल यांनी मोडला होता करार
१४ मार्च १९३१ सिनेमाच्या इतिहासातील सोनियाचा दिनु! कारण याच दिवशी भारतातील पहिला बोलपट आलम आरा (Alam Ara) प्रदर्शित झाला होता. आज सिनेमा ही देशातील मोठी इंडस्ट्री बनली आहे. आपला सिनेमा हा जगात मोठे मार्केट निर्माण करताना दिसतो आहे. त्यामुळे बोलपटाच्या या वाढदिवसाचे अनन्य साधारण महत्व आहे.
हा सिनेमा तयार होण्याची प्रक्रिया मोठी रंजक होती. मूकपटाच्या आगमनानंतर देशात सगळीकडे स्टुडिओजचा उदय झाला. लाहोर, कलकत्ता, मद्रास, मुंबई, कोल्हापूर, पुणे इथं सिनेमे बनू लागले. ऐतिहासिक, सामाजिक, पौराणीक विषय हाताळले जाऊ लागले.
बोलपटाचे जनक अर्देशर इराणी (५ डिसेंबर १८८६ – १४ ऑक्टोबर १९६९) यांचा जन्म पुण्यातला! विसाव्या वर्षीच ते ‘युनिर्व्हसल मूव्हीज’चे भारतातील प्रतिनिधी बनले. मुंबईच्या अलेक्झांडर थिएटरचे ते मालक होते. १९२० साली त्यांनी पहिला मूकपट बनविला ‘नल दमयंती’. त्यानंतर जवळपास १५० हून अधिक मूकपटांची त्यांनी निर्मिती केली.
भारतातील पहिला मूकपट दादासाहेब फाळके यांनी (राजा हरीश्चंद्र) १९१३ साली बनवला होता. त्यानंतर १८ वर्षांनी अर्देशर इराणी यांनी बोलपट बनविला. जागतिक पातळीवर पहिला बोलपट ऑक्टोबर १९२७ साली ’द जाझ सिंगर’ नावाने आला. ‘आलम आरा (Alam Ara)’ सिनेमात मा. विठ्ठल, पृथ्वीराज कपूर, जुबैदा यांच्या भूमिका होत्या.
या सिनेमाच्या मेकिंगच्या कथा देखील भन्नाट आहेत.हा चित्रपट म्हणजे जोसेफ डेव्हीड यांच्या पारशी नाटकाचे चित्रपटात रुपांतरण होते. त्या काळी साउंड प्रुफ स्टुडीओ नसल्याने या सिनेमाचे चित्रीकरण ग्रांट रोड जवळच्या रेल्वे लाईन च्या शेजारी शेवटची लोकल पास झाल्यानंतर आणि पहिली लोकल येण्यापूर्वी म्हणजे रात्री १ ते पहाटे ४ च्या दरम्यान केले गेले.
तोवर फक्त मूकपट बनत असल्याने हा प्रश्न यापूर्वी कधी पडला नव्हता. प्लेबॅक तंत्र विकसित नसल्याने कलाकारांना स्वत:च गाणी चित्रीकरणाच्या वेळी गावी लागत. वादकांना मग कुठे झाडाच्या मागे वगैरे लपवले जाई! या सिनेमाला फिरोजशहा मिस्त्री यांनी संगीत दिलं होतं. यात एकून ७ गाणी होती. ‘दे दे खुदाके नाम हे गाणे त्या काळी खूप लोकप्रिय झाले होते.
या सिनेमात काम करायला मिळणार म्हणून मा. विठ्ठल यांनी त्यांचा ‘शारदा स्टुडिओ’ सोबतचा करार मोडला. त्यामुळे त्यांना कोर्टाकडून समन्स मिळाला. त्यांची केस कोर्टात मांडून जिंकून दिली पुढे स्वतंत्र पाकीस्तानचे वजीर-ए-आजम झालेल्या बॅरीस्टर जीना यांनी!
शुक्रवार १४ मार्च १९३१ रोजी मुंबईच्या मॅजेस्टीक सिनेमात ‘आलम आरा’ प्रदर्शित झाला आणि एकच झुंबड उडाली. २५ पैशाचे तिकीट काळ्या बाजारात चक्क ५ रुपयाला विकले जात होते. अनावर झालेल्या गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.
====
हे देखील वाचा: चित्रपटसृष्टीला व्यापून राहिलेला कवी…साहिर लुधियानवी!
====
यातील टायटल भूमिका करणारी अभिनेत्री जुबेदा पुढे १९८२ साली मुंबईत झालेल्या ‘मर्त्य मानव अमर्त्य संगीत’ या कार्यक्रमाला उपस्थित होती. या सिनेमातूनच गाण्यांचा मोठा वापर सुरू झाला. पुढच्याच वर्षी आलेल्या ‘इंद्रसभा’त तब्बल ७१ गाणी होती. आलम आराच्या रिलीजची दखल १४ मार्च २०११ रोजी गुगलने देखील ‘गुगल डुडल’ने घेतली होती.
====
हे देखील वाचा: विनोदाचा बादशहा ‘मेहमूद’
====
आपण इतिहासाबाबत जितके जागरूक व अभिमानी असतो तितके त्याचे जतन करण्याबाबत अजिबात नसतो. कारण पहिला बोलपट ‘आलम आरा (Alam Ara)’ आता खरोखरच इतिहास जमा झालाय कारण या सिनेमाची एकही प्रिंट उपलब्ध नाही.