‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
गणपत पाटील : प्रतिभा आणि प्रतिमेत अडकलेल्या मुखवट्यामागचे दु:ख!
कलावंतांना शाप असतो त्यांच्या ठराविक चौकटीत जगण्याचा! प्रेक्षकांना सुद्धा कलाकाराला त्याच प्रतिमेच्या चौकटीत/ त्याच भूमिकेत कायम पाहायचे असते. मराठीतील ज्येष्ठ कलावंत निळू फुले खलनायकाच्या इमेजच्या चौकटीत असे अडकले की, इच्छा असूनही त्यांच्या इतर भूमिका प्रेक्षक स्वीकारत नव्हते. त्यांची रुपेरी पडद्यावरील इमेज लोक खरी समजत होते.
पूर्वी धर्मिक/ पौराणिक सिनेमातील कलाकारांना त्यांच्या भूमिकेचे नैतिक बंधन सार्वजनिक जीवनात पाळावे लागे. प्रेक्षकांचे कलाकाराच्या प्रतिमेचे प्रेम दक्षिणेत तर हे प्रचंड आहे. पण याच प्रतिमेमुळे कधीकधी खऱ्या आयुष्यात देखील कटू प्रसंगाला सामोरे जावं लागतं. कलावंताचं ‘रील लाइफ’ आणि ‘रिअल लाईफ’ वेगवेगळं असतं, हे बऱ्याचदा त्यांचे प्रेक्षक समजून घेत नाहीत.
अर्थात, हा प्रकार अलिकडे बदललेला दिसतो पण साधारण तीस चाळीस वर्षांपूर्वी कलाकाराची पडद्यावरची प्रतिमा हीच त्याची खरी प्रतिमा समजून रसिक त्याच्याशी कनेक्ट होत होते. ज्येष्ठ अभिनेते गणपत पाटील हे अशाच एका प्रतिमेत अडकले आणि त्यांची प्रतिमा त्यांच्या आयुष्याची शोकांतिका बनली.
मराठी सिनेमातून सोंगाड्या/ नाच्याची भूमिका करत करत गणपत पाटील यांनी त्या भूमिकेवर आपला एक स्वत:चा ट्रेडमार्क बनवला. तमाशातील ‘नाच्या’ म्हणजे गणपत पाटील असे समीकरणच बनले.
गणपत पाटील यांचा रुपेरी पडद्यावर प्रवेश चाळीसच्या दशकात झाला. भालजी पेंढारकर यांच्या ‘मीठ भाकर’ या सिनेमात गणपत पाटील चक्क खलनायक होते. त्या काळात जयशंकर दानवे दिग्दर्शित काही नाटकातून त्यानी सोंगाड्याची भूमिका केली. नंतर सिनेमात ही त्यांच्याकडे अशाच भूमिका येवू लागल्या.
1964 साठी आलेल्या ‘वाघ्या मुरळी’ या चित्रपटापासून गणपत पाटील यांनी मराठी सिनेमा ‘नाच्याची’ भूमिका करायला सुरुवात केली आणि गणपत पाटील काय परफेक्ट भूमिका वठवत असे. आज तुम्ही जेव्हा जुन्या मराठी सिनेमातील तमाशातील लावण्या पहाता तेव्हा त्यातील लावणी सादर करणारी अभिनेत्री तिचे लटके झटके आणि तिच्या पाठीमागे असलेला गणपत पाटील आणि त्याच्या भावमुद्रा तुम्हाला खिळवून टाकतात.
‘बाई मी पतंग उडवीत होते’ या लावणीत जितकी आपल्याला जयश्री गडकर आठवते तितकाच आठवतो त्यात गणपत पाटील यांनी उभा केलेला नाच्या! आपल्या टिपिकल ‘बायकी’ चिरक्या आवाजात ओरडत बोलताना उजव्या हाताची तर्जनी हनुवटीवर आपटीत आणि डावा हात कमरेवर ठेवून बोलताना अंगाला लचके, झटके देत ‘आता गं बया…’ असं म्हणणारी गणपत पाटलांची भूमिका मराठी सिनेमांमध्ये बेहद लोकप्रिय ठरली.
प्रेक्षक गणपत पाटलाच्या या रूपावर प्रचंड प्रेम करू लागले. नायिका कुणी ही असो, म्हणजे जयश्री गडकर, लीला गांधी, सीमा, उषा नाईक, उषा चव्हाण यांच्यापैकी कुणीही असो, तिच्या मागे असणारा नाच्या हा कायम गणपत पाटीलच असायचा!
साठच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरच्या दशकात गणपत पाटील मराठी सिनेमातील हुकुमाचा एक्का होता. या काळात आलेल्या सर्व तमाशा पटात गणपत पाटील आवर्जून दिसायचा. १९६५ मध्ये आलेल्या ‘केला इशारा जाता जाता’ या चित्रपटाने त्यांच्या इमेजला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
साठच्या दशकात मराठी सिनेमाला तमाशापटाने ग्रासून टाकले. ‘मल्हारी मार्तंड’ ‘रायगडचा राजबंदी’, ‘बाई मी भोळी’ ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’, ‘सांगू मी कशी’, ‘सुरंगा म्हनत्यात मला’, ‘छंद प्रीतिचा’, ‘धन्य ते संताजी धनाजी’ ‘एक गाव बारा भानगडी’ ‘खंडोबाची आण’, ‘गणगौळण’,’ गणानं घुंगरू हरवलं’ या सिनेमांतून गणपत पाटलांची नाच्याची भूमिका अधिकाधिक लोकप्रिय होत गेली. पण याच भूमिकेने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा मात्र ‘तमाशा ‘ झाला
गणपत पाटलांच्या या इमेजचा त्याच्या कुटुंबीयांना त्रास होऊ लागला. त्याच्या मुली जेव्हा शाळेत जाऊ लागल्या तेव्हा समाजातून त्यांच्यावर कुचकट टीका होऊ लागली. गणपत पाटील यांची पत्नी जेव्हा सार्वजनिक कार्यक्रमात जाऊ लागली तेव्हा इतर बायकांकडून तिच्यावर शेरेबाजी करण्यात येऊ लागली.
सुरुवातीला गणपत पाटलांनी याकडे दुर्लक्ष केले पण नंतर त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना याचा खूप त्रास होऊ लागला पण दुर्दैवाने विदूषकाला आपले चाकोरी सोडता येत नाही. त्याप्रमाणे गणपत पाटलांना या नाच्या भूमिकेतून मुक्तता मिळत नव्हती. त्यांचे गुरु भालजी पेंढारकर यांच्याकडे त्यांनी एकदा व्यथा बोलून दाखवली. मग भालजींनी त्यांच्यासाठी ‘सख्या सजना’ हा चित्रपट बनवला ज्यात गणपत पाटलांची नायकाची भूमिका होती.
याच काळात (१९७१-७२) त्यांच्याकडे शांताराम बापूंच्या ‘पिंजरा’ या चित्रपटातील नाच्याची भूमिका देखील आली होती परंतु गणपत पाटील यांनी ‘पिंजरा’ मधील भूमिका नाकारून ‘सख्या सजना’ मध्ये अभिनय केला. पण दुर्दैवाने प्रेक्षकांनी गणपत पाटलांच्या या भूमिकेला स्वीकारले नाही आणि पुन्हा त्यांना त्यांच्या नाच्याच्या भूमिकेकडे वळावे लागले.
पुढे गणपत पाटलांच्या मुली मोठ्या झाल्या त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली त्यावेळी मात्र हद्द झाली. आलेले प्रत्येक स्थळ गणपत पाटलांच्या पडद्यावरील इमेज असा विचार करून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू लागले. इतकं की ‘ही तुमची मुलगी कशी काय असू शकते? तुम्हाला मुलगी कशी काय होऊ शकते? हे असले मुर्खासारखा प्रश्न विचारू लागले. गणपत पाटील आणि त्यांचे कुटुंबीय हतबलपणे हा सगळा त्रास सहन करत होती.
सिनेमा या माध्यमाची समाजात साक्षरता कमी असल्यामुळे आपल्याकडे अनेक गैरसमज आजही पसरलेले दिसतात. गणपत पाटील यांनी चित्रपटाप्रमाणेच लोकनाट्यातून देखील भूमिका केल्या. परंतु, या भूमिकादेखील पुन्हा याच टाईपच्या होत्या. नाच्याची भूमिका काय त्याची पाठ सोडत नव्हते.
फार वर्षांपूर्वी मराठवाड्यात एकदा गणपत पाटील यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला होता. त्यावेळी त्यांनी अक्षरशः रडत रडत आपले दुःख आम्हाला सांगितलं होतं .मुखवट्यामागचं दुःख काय असतं, याचा पहिल्यांदाच आम्ही अनुभव घेत होतो. नंतर बऱ्याच वर्षांनी त्यांची दूरदर्शनवर मुलाखत झाली त्यावेळी गणपत पाटील आपल्या आठवणी सांगताना; पडद्यावरची प्रतिमा त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात किती त्रास देणारी ठरली याबद्दल बोलताना अक्षरश: धाय मोकलून रडले होते. नंतर त्यांनी स्वत:चे आत्मचरित्र देखील लिहिले.(रंग नटेश्वराचे)
====
हे देखील वाचा: महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांचं पहिलं गाणं…
====
२०१० साली रवी जाधव यांचा ‘नटरंग’ चित्रपट प्रदर्शित झाला. यात थोड्या फार प्रमाणात हीच समस्या दाखवली होती. पण आता प्रेक्षक समंजस आणि प्रगल्भ झाला होता. अतुल कुलकर्णी यांच्या भूमिकेचं कौतुक झालं. गणपत पाटील जर या वेळी हयात असते, तर त्याना नक्कीच आवडलं असतं. पण २३ मार्च २००८ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
====
हे देखील वाचा: हा अभिनेता करीत असे स्वतःच्याच चित्रपटांची तिकीट विक्री!
====
२००५ साली त्यांचा झी गौरव पुरस्कार देवून सत्कार केला होता. त्या कार्यक्रमात सुलोचना बाईंच्या हातून पुरस्कार स्वीकारताना ते रडले होते. नाच्याच्या भूमिकेने त्यांच्या भाकर तुकड्याची सोय केली पण हीच इमेज त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध करपवून गेली.