दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
द काश्मीर फाईल्स, आमीर, अनुपम आणि आपण…
गेल्या अनेक महिन्यांपासून वाटत होतं की, आता आपली इंडस्ट्री दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. मी हिंदी इंडस्ट्रीबद्दल बोलतोय. एक डावा आणि एक उजवा असं ढोबळ अर्थाने म्हणता येईल. त्याही पलिकडे बोलायचं तर, एक सत्ताधारी पक्षाच्या बाजूचा आणि एक विरोधी गटातला, याचा अधूनमधून प्रत्यय यायचा. तरी आपण ठामपणे हे ‘पोलरायझेशन’ झालं आहे असं म्हणू शकत नव्हतो. पण आता गेल्या काही दिवसांपासून मात्र ही झालेली दुफळी स्पष्टपणे समोर येते आहे. याला कारणीभूत ठरला आहे काश्मीर फाईल्स. आणि त्यात समोर आलेलं उदाहरण आहे ते म्हणजे आमीर खान आणि अनुपम खेर यांच्या कमेंट्सचं.
आता आमीर आणि अनुपम खेर यांच्यात काय झालं ते सगळ्या जगाला माहीत आहे. हवं तर तुम्ही ते गुगलही करू शकता. आमीरला एका पत्रकारने काश्मीर फाईल्सबद्दल विचारलं. त्यावर आमीर म्हणाला की, ही फिल्म सगळ्यांनी पाहायला हवी. त्यावर दुसरीकडे कुठेतरी अनुपम खेर यांना एका पत्रकाराने छेडलं असता, अनुपम खेर म्हणाले, “तो आता या सिनेमाचं कौतुक करणारच. कारण, त्याची फिल्मही रिलीजवर आहे.”
आता या कमेंटमुळे निष्कारण सिनेसृष्टीतलं वातावरण गढूळ झालं आहे. आज नाही म्हटलं तरी अनुपम खेर आणि आमीर खान हे दोघेही महत्त्वाचे नट मानले जातात. अनुपम खेर यांनी नेहमीच हिंदूत्ववादाचा पुरस्कार केला आहे. इतकंच नव्हे, तर त्यांनी उघड उघड भाजपच्या विचारसरणीला पाठिंबा दर्शवला आहे. त्याला हरकत नाही. ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे.
अनुपम खेर यांच्याप्रमाणे इतर कलाकारही बॉलिवूडमध्ये आहेतच. यात अक्षयकुमारपासून अनेकांचा नंबर लागतो. पण ती ज्याची त्याची मर्जी. त्याचप्रमाणे भाजपच्या विचारसरणीला कडाडून विरोध करणारेही कलाकार इंडस्ट्रीत आहेत. यात नासिरुद्दीन शाह, जावेद अख्तर, आमीर खान आदींचा समावेश होतो.
आता कोणत्या विचारसरणीला कुणी विरोध करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याचा प्रत्येकाला आदरही असायला हवा. पण आता गेल्या काही दिवसांपासून समाजामधली तेढ आता क्रिमी लेअरमध्ये आलेली पाहायला मिळते आहे.
कोणताही सिनेमा एकतर आपल्याला आवडतो किंवा नावडतो. ज्याला तो आवडतो तो प्रत्येकजण आपल्याला सिनेमा का आवडला, हे या ना त्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आपलं मत दुसऱ्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्यानेही तो सिनेमा पाहावा असा आग्रह धरत असतो. एखाद्याला तोच सिनेमा आवडला नाही, तर तो आपल्याल हा सिनेमा का आवडला नाही हे तो सांगत असतो. अर्थात, ज्याला सिनेमा आवडला नाही, असा माणूस दुसऱ्याला सिनेमा न पाहण्याचा केवळ सल्ला देत असतो.
नावडता सिनेमा न पाहण्याचा आग्रह सहसा धरला जात नाही. कारण, तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो. या दोन्ही प्रकारात आग्रह धरणे, यात गैर काही नाही. पण आपलं मत दुसऱ्यावर लादणं आणि समोरच्याला आपलं मत पटत नसेल, तर त्या व्यक्तीवर धर्मद्रोह्याचा किंवा राष्ट्रद्रोह्याचा शिक्का मारणं, हा प्रकार अलिकडे जास्त होताना दिसत आहे.
सिनेमा आवडण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात तशी सिनेमा नावडण्याची कारणंही वेगवेगळी असूच शकतात. पण अलिकडे द काश्मीर फाईल्स कसा चांगला आहे आणि तो न आवडणारा कसा विशिष्ट धर्माचा धार्जिणा आहे किंवा देशात कसा राहण्यालायक नाहीये हे ठसण्याचा प्रयत्न समाजाच्या तृतीय किंवा चौय्यम श्रेणीत पाहायला मिळत होता. ही श्रेणी आर्थिक स्तराशी निगडित आहे हे कृपया ध्यानात घ्यायला हवं.
हळूहळू हा द्वेष आता दुय्यम वर्गात पाहायला मिळतोय. आता तर अनुपम आणि आमीर यांच्या या कमेंट्समुळे श्रीमंत आणि अतिश्रीमंत वर्गामध्ये ही दुफळी दिसू लागली आहे. काश्मीर फाईल्सबद्दल वेडं वाकडं बोलणं खपवून घेतलं न जाणं, हे जरा डेंजर काम आहे.
====
हे देखील वाचा: The Kashmir Files Review – काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची मन हेलावून टाकणारी कहाणी
====
आता आमीर आणि अनुपमबद्दल बोलायचं तर हे दोघेही मोठी माणसं आहेत. विवेकी आहेत. त्यांनी आपल्या सिनेमातून रंजन केलं आहेच. पण त्यापुरतं न थांबता दोघांनीही सामाजिक पातळीवर बरंच चांगलं काम केलं आहे.
आमीर खानने तर पाणी फौंडेशनद्वारे महाराष्ट्राच्या गावागावात पाणी आणलं. अनुपम खेर यांनीही फार महत्त्वाचे सिनेमे दिले. अशावेळी जेव्हा विनाकारण वाकयुद्ध भडकतं तेव्हा त्याची झळ दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गाला आधी बसते. याला कारण ठरतं ते सोशल मीडिया.
आयटी सेलवाल्यांना हे आयतं कोलित हाती मिळतं. आता एका अर्थाने विचार केला, तर आमीर खानचा सिनेमा येणार आहेच. पण म्हणून त्याने सिनेमाला चांगलं म्हटलं असेल का, हा विचार खरंतर सामांन्यांच्या मनातही येणार नाही. पण अनुपम यांनी तो विचार पेरला. सोशल मीडियावर आमीर खान ट्रोल व्हायला सुरूवात खरंतर अनुपम यांच्या विधानाआधीपासून झाली होती का, यापेक्षा अनुपम यांंनी हे विधान केल्यामुळं ट्रोलर्सना बळ मिळालं आणि त्या विद्वेषी विचारसरणीला खत मिळाल्यासारखं झालं.
आपण सगळ्यांनी एक लक्षात घ्यायला हवं, कोणताही माणूस उगीचंच कोणतंही कृत्य करत नाही. त्यामागे काहीतरी कारण असतं. कधीकधी ते आर्थिक असतं. कधी ते वैचारिक असतं. कधी समाधान देणारं असतं. असे अनेक प्रकारचे मोबदले त्यातून मिळत असतात. आमीर खानचा सिनेमा येणार म्हणून त्याला काश्मीर फाईल्स आवडायचा प्रश्न नाही. किंवा कदाचित त्याला खरंच सिनेमा आवडला असेल, तर त्यावर आपण पूर्वाग्रहाने बोट ठेवणंही योग्य नाही.
अत्यंत प्रायव्हेटली तो हा सिनेमा पाहू शकला असता आणि माध्यमांना सांगताना आपण हा सिनेमा अद्याप पाहिलेला नाही, असंही तो म्हणूच शकला असता. पण त्याने काय केलं असतं किंवा काय केलं नसतं यावर कांड्या पिकवण्यापेक्षा त्याला सिनेमा आवडलाय, असं तो म्हणतो तर तिथे विषय संपायला हवा.
आता सिनेमा आवडणं यालाही ट्रोल केलं जाणार असेल तर मग अवघड आहे. अर्थात त्याला ट्रोल का केलं जातंय ते सगळ्या गावाला माहीत आहे. हेच विधान जर अक्षयकुमार, रणबीर कपूर, रणवीर सिंग, विकी कौशल यापैकी कुणी केलं असतं तर आपल्याला चाललं असतं. पण इथे धर्म आडवा आला आहे.
हे आता कोणत्या थराला जाईल याची शाश्वती नाही. पण त्याने फार वरचा थर गाठू नये असं वाटत असेल, तर तातडीने नवा सिनेमा थिएटरवर झळकणं अत्यावश्यक आहे. लोक जितक्या त्वेषाने सध्या सोशल मीडियावर बोलतायत तेवढ्याच जलदगतीने हा मुद्दा विसरुन जाणार आहेत. पण त्यासाठी नवा सिनेमा यायला हवा. किंबहुना देशात नवा मुद्दा चर्चेत यायला हवा.
द काश्मीर फाईल्स येऊन तो केंद्राने नेटाने प्रमोट केला. आता का केला, याचीही काही कारणं आहेतच. ती सुदैवाने सगळ्यांना माहीतही आहेत. खरंतर सिनेमे प्रमोट कोणते करायला हवेत हेही ठरवण्याची वेळ आली आहे. द काश्मीर फाईल्स प्रमोट करण्याला ना नाहीच. पण इतरही सिनेमे आहेतच. ज्यातून देशासमोरचे अनेक प्रश्न मांडले जातायत. अर्थात सिनेमा आणि प्रमोशन हा वेगळा मुद्दा आहे. तो नंतर कधीतरी बोलू.
====
हे देखील वाचा: पावनखिंड -झुंड वाद हा निव्वळ वेडेपणा – चिन्मय मांडलेकर
====
आजचा मुद्दा हा, कुठल्या मुद्द्याला किती भुलायचं हे आपण ठरवायला हवं. आपण काय बोलतो.. आपण कुठं बोलतो आणि आपण कुणाबद्दल बोलतो यातून आपला वैचारिक स्तर ठरत असतो. हा स्तर आपण आपला ठरवलेला बरा. आणखी एक, काश्मीर फाईल्सच्या चिखलफेकीत न उतरलेलं बरं. काश्मीर फाईल्स आवडला? आनंद आहे. नाही आवडला? हरकत नाही. हा मुद्दा इतक्यावरच ठेवायला हवा. विषय संपला.
टीप: या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. कलाकृती मीडिया याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.