जेव्हा अशोककुमार यांनी त्यांच्या पहिल्या नायिकेला ओळखले नाही…
भारतीय सिनेमात महिलांच योगदान मूकपटापासून आहे. आज संपूर्ण मनोरंजनाची दुनिया महिलांनी आपल्या सक्षम खांद्यावर उचलून घेतलेली दिसते. सुरूवातीला महिलांनी सिनेमात काम करणं हे समाजमनाच्या पचनी पडत नव्हतं. त्यामुळे फाळकेंना त्यांच्या सिनेमात पुरूषांकडूनच स्त्री भूमिका करून घ्याव्या लागत, हा इतिहास आहे. पण ही कोंडी फोडली देविका राणी (Devika Rani) या अभिनेत्रीने.
देविका राणी (Devika Rani) ही भारतीय सिनेमातील पहिली उच्च विद्याविभूषित, सुसंस्कृत व देखणी कलावंत होती. ३० मार्च १९०७ रोजी जन्मलेली देविका राणी (Devika Rani) गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतणीची मुलगी, म्हणजे त्यांची नातच होती.
तीसच्या दशकात देविकाने सिनेमाला एक नवा आयाम दिला. आपले पती हिमांशू रॉय यांच्यासोबत त्यांनी बॉम्बे टॉकीज या चित्रसंस्थेची निर्मिती करून दर्जेदार सिनेमांची परंपरा सुरू केली. (हिमांशू रॉय सोबत १९३६ साली आलेल्या कर्म या सिनेमात देविका राणी आणि हिमांशू रॉय यांचे प्रदीर्घ चुंबन दृश्य होते).
तिचा रूपेरी पडद्यावरील वावर १०-१५ वर्षांचा, पण तिची महत्वकांक्षा, कलेविषयीची प्रेम आणि सिनेमा या माध्यमाविषयीची जाणीव अफाट होती.अछूत कन्या, सावित्री, इज्जत, जन्मभूमी, निर्मला, अंजान या सिनेमातून त्यांनी स्त्री वादी भूमिका सशक्तपणे पडद्यावर मांडल्या. त्यामुळेच देविका राणीला ‘फर्स्ट लेडी ऑफ इंडीयन स्क्रीन’, असे म्हणतात.
अछूत कन्या सिनेमातून ब्राह्मण मुलगा व हरीजन मुलगी यांची हळवी प्रेमकहाणी दाखवण्यात आली होती. हा सिनेमा पं.जवाहरलाल नेहरू यांना इतका आवडला की, त्यांनी चक्क देविकाला पत्र पाठवून तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. २५ ऑगस्ट १९३६ साली मुंबईतील कॉंग्रेस अधिवेशनाच्या वेळी रॉक्सी चित्रपटगृहात या सिनेमाचा ‘विशेष शो’ आयोजित करण्यात आला होता.
====
हे देखील वाचा: हा अभिनेता करीत असे स्वतःच्याच चित्रपटांची तिकीट विक्री!
====
यावेळी हा सिनेमा पहायला नेहरूंच्या सोबत वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, आचार्य नरेंद्र देव असे मान्यवर उपस्थित होते. सिनेमातून एक्झिट घेतल्यानंतर देखील देविका राणीचा अनेक सांस्कृतिक कार्यात सक्रीय सहभाग होता.
१९५८ साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार १९७० साली देविका राणीला मिळाला. भारतीय नारीला रूपेरी पडद्यावर निर्भिडपणे वावरण्याचा आदर्श ’बेंच मार्क’ त्यांनी तयार केला.
मायानगरीपासून दूर बंगलोरला त्यांनी आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत केला. १९८१ साली बोलपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. या कार्यक्रमात एक गंमत घडली. जिचे बोट धरून रूपेरी पडद्यावर प्रवेश केला त्या अशोककुमारने तिला चक्क ओळखलेच नाही.
====
हे देखील वाचा: महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांचं पहिलं गाणं…
====
जीवनातील प्रत्येक घटनांशी प्रामाणिक राहून तृप्त आयुष्य जगलेल्या देविका राणी (Devika Rani) यांचे ९ मार्च १९९४ रोजी निधन झाले.