‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
हे आहेत भारतामधील विवादित टॉप १० चित्रपट ज्यांच्यावर सेन्सॉरने बंदी घातली…
सध्या चर्चा आहे ती आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटाची. हा चित्रपट अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणास्तव आमिर विरोधात कोर्टात केस दाखल झाली आहे. यापूर्वीही त्याच्या ‘पिके’ चित्रपटावरही याच कारणास्तव केस दाखल करण्यात आली होती. असो. पण दोन्ही चित्रपट किमान प्रदर्शित झाले. भारतात तयार झालेल्या काही चित्रपटांच्या बाबतीत विवाद झाल्यामुळे प्रदर्शनावरच बंदी घालण्यात आली होती, तर काही चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ते बंद करण्यात आले. अशाच काही चित्रपटांविषयी (Uncensored Bollywood Movies)
१. बँडिट क्वीन (१९९४)
शेखर कपूर दिग्दर्शित ‘बँडिट क्वीन’ हा चित्रपट डाकू फुलनदेवीच्या आयुष्यावर आधारित होता. वयाच्या १५ व्या वर्षी आई वडिलांसमोर झालेला बलात्कार आणि त्यांनतरचा तिचा सर्व प्रवास या चित्रपटामध्ये दाखविण्यात आला होता. कथानकाला अनुसरून यामध्ये लैगिक दृश्य आणि आक्षेपार्ह संवादांचा भडीमार होता. तसंच काही गटांनी केलेल्या आंदोलनामुळे सेन्सॉरने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली.
२. फायर (१९९६)
फायर हा चित्रपट समलैगिक संबंधांवर आधारित होता. आजच्या काळातही जिथे हा विषय विवादित ठरतो तिथे १९९६ सालात यावरून उठलेला वादंग, ही काही विशेष गोष्ट नव्हती. वैवाहिक आयुष्यात स्त्रीची होणारी लैगिक कुचंबणा आणि त्यातून निर्माण झालेले समलैंगिक संबंध हा नाजूक विषय या चित्रपटात हाताळण्यात आला होता.
खरंतर ‘फायर’ या चित्रपटाची जगभरातील समीक्षकांची प्रशंसा केली होती. परंतु, भारतात मात्र सांस्कृतिक संघटनांनी व काही राजकीय पक्षांनी यावर आक्षेप घेतला. इतकंच नाही, तर चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होता. सेन्सॉर बोर्डाने शेवटी चित्रपटावर बंदी घातल्यावर वातावरण निवळलं. (Uncensored Bollywood Movies)
३. कामसूत्र – अ टेल ऑफ लव्ह (१९९६)
“कामसूत्र – अ टेल ऑफ लव्ह” या चित्रपटाच्या नावावरूनच लक्षात आलं असेल की, यावर बंदी का घालण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन मीरा नायर यांनी केलं होतं. भारतातील १६व्या शतकातील चार प्रेमी युगुलांच्या जीवनाचे चित्रण असणाऱ्या या चित्रपटाचं समीक्षकांनी तोंड भरून कौतुक केलं होतं. सेन्सॉर बोर्डाने मात्र या चित्रपटावर हरकत घेत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली.
४. Urf प्रोफेसर (२०००)
मनोज पाहवा, अंतरा माळी आणि शर्मन जोशी अभिनीत पंकज अडवाणीचा Urf प्रोफेसर या चित्रपटाचा विषय हरकत घेण्यासारखा अजिबातच नव्हता. एका हिट-मॅनची कार आणि त्याने जिंकलेलं लॉटरीचं तिकीट गहाळ होतं. यानंतर झालेला गोंधळ या चित्रपटात दाखवण्यता आला आहे. परंतु, चित्रपटात कॉमेडीच्या नावाखाली वापरण्यात आलेले ‘बोल्ड’ संवाद आणि दाखविण्यात आलेली ‘अश्लील दृश्य’ यावर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाने चित्रपटावर बंदी घातली. (Uncensored Bollywood Movies)
५. पाच (२००३)
अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘पाच’ या थ्रिलर चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने जोरदार आक्षेप घेतला. हा चित्रपट १९९७ सालच्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर आधारित होता. हिंसक दृश्ये, शिवराळ आणि असभ्य भाषा आणि अंमली पदार्थांचा गैरवापर यामध्ये दाखविण्यात आला होता. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. परंतु, या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. त्यामुळे चित्रपटाच्या रिलीजच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रेक्षकांनी या चित्रपटाची पायरेटेड आवृत्ती बघितल्याचा चर्चा रंगल्या होत्या.
६.ब्लॅक फ्रायडे (२००४)
अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘ब्लॅक फ्रायडे’ हा चित्रपट ‘ब्लॅक फ्रायडे – द ट्रू स्टोरी ऑफ द बॉम्बे’ या पुस्तकावर आधारित होता. हे पुस्तक १९९३ च्या मुंबई बॉम्ब ब्लास्ट्सवर आधारित असून चित्रपट सुरुवातीपासूनच विवादित होता. या चित्रपटाला मुंबई उच्च न्यायालयाने, खटला पूर्ण होईपर्यंत रिलीज करता येणार नाही, असं म्हणत स्थगिती दिली होती.
७. पर्झानिया (२००५)
पर्झानिया या चित्रपटाचे कथानक २००२ सालची गुजरात दंगल आणि त्यामध्ये बेपत्ता झालेला ‘अझहर’ नावाचा मुलगा यावर आधारित होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. परंतु, राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपांमुळे हा चित्रपट प्रदर्शित न झाल्याचे बोललं जातं. (Uncensored Bollywood Movies)
८. सिन्स (२००५)
सिन्स या चित्रपटाची कहाणी एका प्रिस्टची आहे. केरळमधील एक प्रिस्ट एका स्त्रीकडे आकर्षित होतो आणि तिच्याशी लैंगिक संबंध ठेवतो. इच्छा, वासना आणि सामाजिक बांधिलकीची चौकट यामध्ये अडकलेल्या प्रीस्टची मनस्थिती यामध्ये दाखविण्यात आली आहे. या चित्रपटावर कॅथलिक समाजाने जोरदार आक्षेप घेतला, तसंच चित्रपटात अश्लील आणि नग्न दृश्य असल्याने सेन्सॉर बोर्डानेही यावर आक्षेप घेतला. हा चित्रपट पुढे प्रदर्शित झाला नाही.
९. वॉटर (२००५)
अनुराग कश्यप लिखित व दीपा मेहता दिग्दर्शित ‘वॉटर’मध्ये एका विधवेच्या आयुष्याची कहाणी दाखवण्यात आली होती. या चित्रपटावर धार्मिक संस्थांकडून जोरदार हरकत घेण्यात आली. चित्रपटात काही धार्मिक भावना दुखावणारी व भडकवणारी दृश्ये असल्यामुळे सेन्सॉरने यावर बंदी घातली. (Uncensored Bollywood Movies)
====
हे ही वाचा: बॉलिवूडमध्ये दाखल होणार ६ नवे दाक्षिणात्य चेहरे… या महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये साकारणार आहेत मुख्य भूमिका
====
१०.अनफ्रीडम (२०१५)
भारतातील बंदी घातलेल्या चित्रपटांच्या या लांबलचक यादीत सामील होणारा हा सर्वात अलीकडील चित्रपट आहे. या चित्रपटात इस्लामिक दहशतवादाशी संबंधित असणारी लेस्बियन प्रेमकहाणी दाखविण्यात आली होती. सेन्सॉर बोर्डाने यामधील न्यूड आणि इंटिमेट सीन्सवर जोरदार हरकत घेतली. काही राज्ये वगळता भारतात या चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यात आले.
====
हे देखील वाचा: भारतातील बहुतांश वेबसिरीज नेहमी या 3 ‘स’ वरच आधारित का असतात?
===
याव्यतिरिक्त ट्रान्सजेंडर संबंधांवर आधारित चित्रपट ‘द पिंक मिरर’ (२००३), गुजरात दंगलीवर आधारित फिराक (२००८), गांडू (२०१०), इन्शाअल्लाह फुटबॉल (२०१०) या चित्रपटांवरही सेन्सॉरमार्फत बंदी घालण्यात आली होती.
– भाग्यश्री बर्वे