डॉक्युमेंटरी… गरज आहे प्रेक्षकांच्या प्रतिसादाची!
डॉक्युमेंटरी! मनोरंजन विश्वाचा काहीसा दुर्लक्षित म्हणावा असा भाग. डॉक्युमेंटरी बनवणारा आणि तो बघणारा एक खास असा वर्ग असतो. डॉक्युमेंटरी या वास्तववादी किंवा सत्यघटनेवर आधारित असतात. सामान्यतः डॉक्युमेंटरी कुठल्याही थिएटरमध्ये प्रदर्शित केल्या जात नाहीत. त्या तयार करण्यामागचा उद्देश केवळ करमणूक हा नसतो, तर सर्वसामान्यांपर्यंत वास्तव पोचवणं, त्यांना माहिती देणं हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉक्युमेंटरी तयार केल्या जातात.
जॉन गियरसन या स्कॉटिश शिक्षणतज्ज्ञाने १९२० च्या मध्यात ‘डॉक्युमेंटेअर’ या फ्रेंच शब्दापासून डॉक्युमेंटरी (Documentary) या शब्दाची निर्मिती केली. डॉक्युमेंटरी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, माहितीपट. हा प्रकार चित्रपट निर्मितीच्याही आधीपासून लोकप्रिय होता.
तसं बघायला गेलं तर, सन १८८८ मध्ये कुस्तीपटू पुंडलिक दादा आणि कृष्णा नवी यांचा बॉम्बे हँगिंग गार्डन्सवरील लघुपट हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर यांनी चित्रित केला होता. ही पहिली रेकॉर्डेड डॉक्युमेंटरी मानली जाते. परंतु, तेव्हा डॉक्युमेंटरी या शब्दाचा शोध लागलेला नसल्याने असेल कदाचित, पण या डॉक्युमेंटरीला पहिली डॉक्युमेंटरी म्हणून अधिकृत मान्यता मिळाली नसावी.
त्यानंतर, रशियामध्ये १९१७-१९८ मध्ये बोल्शेविक सत्तेवर आल्याच्या घटना चित्रित करून त्यांचा वापर प्रचार करण्यासाठी करण्यात आला होता. परंतु, यालाही डॉक्युमेंटरी म्हणून अधीकृत मान्यता दिली गेली नाही. १९२२ मध्ये अमेरिकन दिग्दर्शक रॉबर्ट फ्लेहर्टी यांनी तयार केलेली ‘नॅनूक ऑफ द नॉर्थ’ ही जगातील पहिली डॉक्युमेंटरी (Documentary) समजली जाते. या वैयक्तिक निरीक्षणावर आधारित डॉक्युमेंटरीमध्ये त्यांनी एस्किमो लोकांची जीवनशैली मांडायचा प्रयत्न केला होता. त्याच दरम्यान ब्रिटीश दिग्दर्शक एच. ब्रुस वुल्फ यांनी पहिल्या महायुद्धातील लढायांचे केलेले संकलन प्रकाशित केले होते. ही एक प्रकारची डॉक्युमेंटरीच होती.
डॉक्युमेंटरीच्या निर्मितीला खऱ्या अर्थाने चालना मिळाली ती दुसऱ्या महायुद्धामुळे. त्याकाळी जर्मनीच्या नाझी सरकारने आपला प्रचार करण्यासाठी राष्ट्रीयीकृत चित्रपट उद्योगाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर डॉक्युमेंटरी तयार केल्या होत्या.
शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, खेळ, इ अनेक विषयांवर डॉक्युमेंटरी (Documentary) तयार केल्या जातात. डॉक्युमेंटरीला वेळेची मर्यादा नसते. अगदी २ मिनिटांपासून ते २ तासांपर्यंत कितीही वेळेची डॉक्युमेंटरी बनवता येते. बहुतांश डॉक्युमेंटरी टीव्ही चॅनेल आणि सध्याच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केल्या जातात. डॉक्युमेंटरी हा चित्रपटाचाच एक प्रकार आहे. परंतु, दोघांमध्ये मूलभूत फरक असतो, तो उद्देशाचा.
डॉक्युमेंटरी (Documentary) किंवा माहितीपटाचा उद्देश असतो प्रेक्षकांना शिक्षित करणं, माहिती देणं आणि प्रेरित करणं, तर चित्रपटांचा उद्देश असतो प्रेक्षकांचे मनोरंजन करणं. वास्तववादी विषयांवर आधारित चित्रपट हे माहितीपट नसतात कारण माहितीपट बनवताना नाव, स्थळ, घटना, पात्रं यामध्ये कोणतेही बदल केले जात नाहीत. ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ हा प्रकार त्यामध्ये नसतो. जे घडत असतं किंवा घडलेलं असतं ते तसंच्या तसं दाखवलं जातं.
एखाद्या विषयावरील डॉक्युमेंटरी (Documentary) जरी कथा स्वरूपात बनविण्यात आली असेल, तरी त्यामागचा उद्देश लोकांना शिक्षित करणं, माहिती देणं हा असल्याने कथेला निवेदनाची जोड दिली जाते. उदा. नेटफ्लिक्सवरील सोशल डायलेमा (The Social Dilemma) ही डॉक्युमेंटरी. एका कहाणीच्या माध्यमातून सोशल मीडिया, त्याचे अल्गोरिदम, त्याचा सर्वसामान्य मानवी जीवनवरचा प्रभाव, तंत्रज्ञानाचा अति वापर आणि धोक्यात येणारी प्रायव्हसी, अशा अनेक गोष्टींबद्दलची माहिती यामध्ये देण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या ऑस्कर अवॉर्डमध्ये भारतामधील ‘रायटिंग विथ फायर (Writing with Fire)’ या डॉक्युमेंटरीला ‘सर्वोत्कृष्ट माहितीपट’ या श्रेणीमध्ये नामांकन मिळालं होतं. दुर्दैवाने पुरस्कार मिळाला नसला, तरीही ऑस्करसारख्या पुरस्कारासाठी मानांकन मिळणं ही नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे.
डॉक्युमेंटरी (Documentary) म्हणजे फक्त अभ्यास करणाऱ्या लोकांसाठीच असते किंवा डॉक्युमेंटरी म्हणजे कंटाळवाणे सामाजिक विषय, अशा अनेक गैरसमजुती सर्वसामान्यांमध्ये आहेत. पूर्वीच्या काळात डॉक्युमेंटरीचं स्वरूप तसं असेलही, परंतु आता मात्र ओटीटीच्या आगमनानंतर डॉक्युमेंटरींचं स्वरूप बदलत चाललं आहे.
‘द सोशल डायलेमा’ सारखीच अजून एक डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे ती म्हणजे, ‘द ग्रेट हॅक (The Great Hack)’. या डॉक्युमेंटरीला जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळाली. गूगल, फेसबुक, अमेझॉन आदि जगातील सर्व मोठ्या कंपन्यांचे भांडवल म्हणजे त्यांच्याकडे उपलब्ध असणारा डेटा. एकूणच सर्वसामान्यांची वैयक्तिक माहिती आणि त्याचा अमेरिकेतील २०१६ च्या निवडणूका आणि ब्रिटनमधील ब्रेग्झिट मधील डेटा विश्लेषण याच्याशी संबंधित असणारी कंपनी केम्ब्रिज ॲनलिटीका (CA) आणि तिचं अचानक गायब होणं, या विषयाशी निगडित असणाऱ्या डॉक्युमेंटरीचा विषय ‘आय ओपनर’ ठरला होता.
====
हे ही वाचा: बॉलिवूडमध्ये दाखल होणार ६ नवे दाक्षिणात्य चेहरे… या महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये साकारणार आहेत मुख्य भूमिका
====
काही दिवसांपूर्वी यु ट्यूब वर रिलीज झालेली ‘द सायलेन्स ऑफ स्वस्तिक’ ही डॉक्युमेंटरीही भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या डॉक्युमेंटरीमध्ये नाझी जर्मन हुकूमशहा हिटलरने वापरलेले चिन्ह प्रत्यक्षात स्वस्तिक आहे की नाही याचे विश्लेषण आणि पाश्चिमात्य माध्यमे याचा स्वस्तिकशी जोडत असणारा संबंध, अशा ज्वलंत मुद्द्यावर बनविण्यात आली आहे.
याचप्रमाणे नेटफ्लिक्सवरील ‘हाऊस ऑफ सीक्रेट्स: बुरारी डेथ’ ही डॉक्युमेंटरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. यामध्ये दिल्लीमधील बुरारी हत्याकांडाचा तपास दाखविण्यात आला होता.
अशा अनेक डॉक्युमेंटरीबद्दल लिहिता येईल. परंतु, निवडक अपवाद वगळता या डॉक्युमेंटरी (Documentary) सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचण्यात कमी पडत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रेक्षकांच्या मनात डॉक्युमेंटरी बद्दल असणारी अनास्था.
====
हे देखील वाचा: भारतातील बहुतांश वेबसिरीज नेहमी या 3 ‘स’ वरच आधारित का असतात?
===
वेबसिरीजच्या दुनियेला ज्या वेगाने प्रसिद्धी आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळाले त्या प्रमाणात डॉक्युमेंटरी या प्रकाराला मिळत नाहीये. वास्तववादी आणि तथ्ये उलगडून सांगणाऱ्या, माहिती आणि रंजन एकत्रित करणाऱ्या ‘डॉक्युमेंटरी’ या प्रकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यास प्रेक्षकांना मनोरंजन विश्वात एक उकृष्ट पर्याय उपलब्ध होऊ शकतो.