दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘जयंती’ साकारणारा महत्त्वाकांक्षी कॅप्टन…
“डॉन का इंतजार तो ग्यारह मुल्कों की पुलिस कर रही हैं, लेकिन डॉन को पकडना मुश्किल ही नही, नामुमकीन भी हैं…”, पडद्यावर महानायक अमिताभ डायलॉगवर डायलॉग फेकत होता. त्याच्या प्रत्येक ॲक्शनवर टाळ्या पडत होत्या, शिट्ट्या वाजत होत्या. त्याच गर्दीत शैलेशही होता. बाबांसोबत सिनेमा पाहायला तो आला होता. त्यावेळी त्याच्या बालसुलभ मनात काही प्रश्न होते.
“अरे, मागे पाहिलेल्या सिनेमात तर अमिताभचा मृत्यू दाखविण्यात आला होता. इथं पुन्हा तो जिवंत कसा झाला?” मग हळूहळू कळत गेलं, सिनेमा हे वेगळंच तंत्र आहे. त्याचे काही गणितं असतात. तो लिहिला जातो, वगैरे वगैरे. इथंच फिल्ममेकिंगचं बीज रुजलं असावं.
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘जयंती’ चित्रपटानं भरघोस यश मिळवलं. यात नायक असलेल्या ऋतुराज वानखेडे याला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. महापुरुषांची नुसती जयंती साजरी करून चालत नाही, तर त्यांचे व्यापक विचार आत्मसात करायला हवेत. हा या चित्रपटातील मूळ संदेश प्रेक्षकांच्या मनावर जादू करून गेला. मात्र, या चित्रपटाची निर्मिती सोपी नव्हतीच. अनेक अडचणी पार करून तो बनला. यामागे दिग्दर्शक शैलेश नरवडे आणि त्यांच्या टीमची प्रचंड मेहनत आहे.
लेखन आणि दिग्दर्शनाचा नेमका प्रवास कसा सुरू झाला, असं विचारल्यानंतर शैलेश नरवडे सांगतात, “खरंतर बाबांनी सिनेमाचं खूळ डोक्यात टाकलं, असं म्हणता येईल. माझे बाबा बळीराम नरवडे एमएसईबीत चालक पदावर कार्यरत होते. त्यांना सिनेमांची प्रचंड आवड. त्यातल्या त्यात अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, रजनीकांत हे त्यांचे आवडते अभिनेते.
कुठलाही नवा सिनेमा लागला तर तो पाहायचाच, हा त्यांचा शिरस्ता. ते मलाही सोबत घेऊन जायचे. सिनेमा म्हटलं की मलाही खूप ‘एक्साइटमेंट’ असायची. ‘डॉन’, ‘लावारिस’, त्याकाळी थ्रीडी असलेला ‘छोटा चेतन’ यांसारख्या चित्रपटांनी मनावर विशेष जादू केली होती.
खूप सिनेमे पाहिलेत त्या काळात. तेव्हापासूनच मनात पालवी फुटत गेली, आपणही असंच काहीतरी करावं. एका सामान्य कुटुंबातील मुलाला स्वप्नपूर्ती करताना काही मर्यादा येतात. मात्र, कसंही करून महत्त्वाकांक्षेला ‘अंजाम’ द्यायचा होताच.”
शाळेत शिकत असतानाच शैलेश सिनेमा हे तंत्र बघून बघून अवगत करण्याचा प्रयत्न करीत होते. नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये पदवीला असतानाच नाट्यस्पर्धा, लिखाण असे सुरू होते. बऱ्याच एकांकिका केल्या. ‘महत्कृत्य’ या नाटकाला राज्य नाट्यस्पर्धेत पहिलं पारितोषिक मिळालं. हे सगळं करत असताना ‘सिनेमा करायचाच’, हे लक्ष्य ठेवलं होतं. त्यासाठीचं तांत्रिक शिक्षण वगैरे नव्हतं. वाचून, पाहून ही कला आत्मसात करण्यावर भर दिला.
मध्यंतरी काही काळ पत्रकारिता केली, मुंबईत जाऊन नोकरीही केली. पण, सिनेमाचा किडा डोक्यातून जात नव्हता. काही वर्षे नोकरी केल्यानंतर शैलेश नागपूरला परतले. पुन्हा कलाप्रवास सुरू झाला. याचदरम्यान ‘जयंती’ची कथा डोक्यात आकार घेत होती.
“२०१६ला ‘जयंती’चं लिखाण सुरू केलं. पहिला चित्रपट म्हटल्यावर काहीतरी वेगळंच करायचं, असं ठरवलं. रोमान्स, ॲक्शन अशा पठडीबाहेर जाऊन हाताळणी करायची होती. कारण, तीच पठडी पकडली असती, तर प्रेक्षकांपुढं अनेक पर्याय आहेत. मग मी वेगळं काय देणार, हाही विचार मनात होताच. प्रयोग यशस्वी झाला”, असं शैलेश सांगतात.
२०१९ला नागपुरात चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं. ते आटोपल्यानंतर करोनाचं लॉकडाऊन सुरू झालं. पोस्ट प्रॉडक्शनला अडचणी येऊ लागल्या. शूटिंगच्या वेळीही स्थायी असा पैसा नव्हताच. जसजसा पैसा येत होता, तसतसं शूट होत होतं. आता पोस्ट प्रॉडक्शन कसं करायचं, हा प्रश्न होताच. अशावेळी ‘क्राउड फंडिंग’चा पर्याय पुढं आला.
सामाजिक जाणीव म्हणून ज्यांनी ज्यांनी पैसे देऊ केले, त्यांना शैलेश नरवडे यांनी सांगितलं, “ही तुमच्याकडून मदत नव्हे, तर तुमची गुंतवणूक आहे. जसजशी कमाई होत जाईल, तसतसा तुम्हाला परतावा देईन. चित्रपट चालला नाही, तर मग उपाय नाही.” पैसे येत गेले, चित्रपट तयार झाला आणि चांगला चाललाही.
कुटुंबानं दिली साथ…
शैलेश बारा वर्षांचेच होते, त्यावेळी दुर्दैवानं वडील बळीराम यांचं अपघाती निधन झालं. कुटुंबावर हा मोठा आघात होता. चार भावंडं होती. अशावेळी सुदैवानं आई पुष्पा यांना अनुकंपा तत्त्वावर एमएसईबीत नोकरी मिळाली. त्यामुळे आधार निर्माण झाला.
“आईनं माझ्या स्वप्नांना बळ दिलं. कलाक्षेत्र तसं असुरक्षिततेचं. मात्र, कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय प्रवास शक्य नव्हता. पत्नी गीता यांनीही चांगली साथ दिली. त्यांची मुलगी सान्निध्या अठरा वर्षांची, तर मुलगा सार्थ दहा वर्षांचा आहे. हे सर्वजण माझ्या या प्रवासात चांगली सोबत करताहेत”, असं शैलेश सांगतात.
सातत्य ठेवणं गरजेचं…
कुठलीही मजल गाठायची असेल, तर सातत्य गरजेचं आहे. तुमची कुठलीही कला ‘दिसली’ पाहिजे, तेव्हाच लोक तुम्हाला गांभीर्यानं घेतात, असं शैलेश नरवडे यांचं म्हणणं आहे. या क्षेत्रात येण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणाऱ्यांनी आपल्यातील टॅलेंट अधिक गडद करायला हवे. समोरच्याला काय हवे, त्यानुसार स्वत:त बदल करून घ्यायला हवेत. कठोर मेहनतीची तयारी असली पाहिजे, असा संदेशही ते देतात. सध्या त्यांचे एका चित्रपटावर काम सुरू आहे. लवकरच त्याची घोषणा करणार असल्याचं, शैलेश यांनी सांगितलं.