‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
मॅजेस्टिक थिएटरमधला पाणीवाला….
आज जन्माला येत असलेल्या मुलांना थोडी थोडी समज येऊ लागताना आपल्या आई बाबांच्या हाती मोबाईल आणि घरातला टी. व्ही. संच दिसतो आणि दोन्हीत चालती फिरती बोलती चित्र दिसतात. (मोबाईल आणि दूरचित्रवाणी संच नसलेली एक दोन टक्के कुटुंबे अगदी मोठ्या शहरातही आहेत तो भाग वेगळा.) ती हलणारी चित्र म्हणजे सिनेमा आहे, याची समज यायला वेळ जातो हे अगदी स्वाभाविक आहे.
माझ्या लहानपणी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात रेडिओदेखिल नव्हता. साठच्या दशकात जन्माला आलेली माझी पिढी जस जशी समज येत गेली तस तशी घरात रोज सकाळी येत असलेल्या वृत्तपत्रातील छायाचित्र पाहू लागली. त्यावरुन पालकांना प्रश्न करु लागली.
शाळेत होत असलेली अक्षरओळख मग हळूहळू वृत्तपत्रातील बातम्यांची शीर्षक वाचू लागली. ही एक जडणघडणीची प्रक्रिया सुरु असते. मी गिरगावातील खोताची वाडीतील दहा बाय दहाच्या खोलीत लहानाचा मोठा झालो (तेव्हा मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय यांच्या जीवनात चाळ संस्कृती महत्वाची होती. आयुष्याची साथ संगत होती.)
मला आजही आठवतेय माझ्या वडिलांनी घरी रेडिओ आणला तेव्हा गल्लीतील पोरं आमच्या त्या छोट्याश्या खोलीत रेडिओ पाहायला जमली आणि आईने त्यांच्यासह शेजारीपाजारी चिमूटभर साखर वाटली.
गिरगावातील म्युनिसीपालटीच्या शाळेत जाताना आणि कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाताना खोताची वाडी, आंबे वाडी, कुडाळेश्वर वाडी (पेंडसे वाडी म्हणून प्रसिद्ध आहे) यांच्यासमोर आयुष्यातील पहिले सिनेमा थिएटर मी पाहू लागलो. ते होते मॅजेस्टिक सिनेमा! (Majestic cinema)
आई बाबा अथवा आजी आजोबा यांचा हात धरुन आम्ही तिघे भाऊ जात असताना मॅजेस्टिक सिनेमावरचे डेकोरेशन आमचं लक्ष वेधून घेई आणि मग त्या शालेय वयात हळूहळू कुटुंबासोबत या मॅजेस्टिक सिनेमामध्ये मराठी चित्रपट आणि हिंदी पौराणिक चित्रपट पाहिला जाऊ लागलो. एक नवा प्रवास सुरु झाला.
मला आजही स्पष्ट आठवतेय, थिएटरच्या उजव्या तर, आपल्या डाव्या बाजूला स्टाॅलच्या करंट बुकिंगसाठी जाळी लावलेल्या मार्गाने तिकीट खिडकीपर्यंत जावे लागे. त्यात गुदमरायला होत नसेल काय, असा प्रश्न मला पडे. तर महिलांना स्वतंत्र रांग असे. आजी आणि आईसोबत गेल्यावर हा फरक लक्षात येई. पण सिनेमा थिएटरवर महिलांसाठी स्वतंत्र रांग ही फार जुनी पध्दत होती. त्या काळाशी सुसंगत होती.
शालेय वयात मॅजेस्टिकमध्ये मी पाहिलेले मराठी चित्रपट असे, पवनकाठचा धोंडी (१९६६), थांब लक्ष्मी कुंकु लावते ( १९६७), आम्ही जातो अमुच्या गावा ( १९६८), मुंबईचा जावई ( १९७०), सोंगाड्या ( १९७१), अशीच एक रात्र होती ( १९७१), सख्या सजना ( १९७२), तर येथेच पाहिलेले हिंदी पौराणिक चित्रपट म्हणजे श्रीकृष्ण लीला, बलराम श्रीकृष्ण.
यातील ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग आमच्या खोताची वाडीतील खंडेराव ब्लाॅक येथील चाळीत झाले आणि मी आयुष्यात पाहिलेले ते सिनेमाचे पहिले शूटिंग होय. तेव्हा मी नऊ दहा वर्षांचा असेन.
शाळेत येता जाता मॅजेस्टिक थिएटरवर नजर पडायचीच. इकडे तिकडे नजर पडत राहणं व्हायला हवेच असते. कधी तेथे ‘झेप ‘ तर कधी ‘अपराध ‘ या मराठी, तर कधी ‘कंगन’ अथवा ‘वापस’ या हिंदी चित्रपटाची पोस्टर्स दिसत.
मध्यमवर्गीय कुटुंबात त्या काळात आपण कोणत्या चित्रपटाला थिएटरमध्ये जायचे यावर पालकांमध्ये चर्चा होई आणि मग थिएटरमध्ये सहकुटुंब पाऊल पडे. महिन्यातून एकाद दुसरा सिनेमा पाहणे होई. तेवढंच आर्थिकदृष्ट्या परवडणारे होते.
मॅजेस्टिक थिएटरचे लांबलचक डेकोरेशन पाहण्यात विशेष आनंद होई. कधी पौराणिक चित्रपटासाठी आतल्या बाजूला देखावे उभे केलेले असत. ते पाहून सिनेमा पाहायची भावना जागी होणारच. थिएटरच्या उजव्या बाजूने स्टाॅलसाठी प्रवेश असे. अगदी लहानपणी स्टाॅलचे तिकीट दर एक रुपया असे होते, हे आठवतेय.
मध्यभागी ॲडव्हास बुकिंगसाठी खिडकी असे. तेथे अप्पर स्टाॅल आणि बाल्कनीचे तिकीट मिळे, तर आपल्या उजव्या बाजूला म्हणजे थिएटरच्या डाव्या बाजूला याच दोन्हीकडे जाण्यासाठी प्रवेशद्वार असे. तर त्या बाहेर या दोन्हीची तिकीट शिल्लक असतील, तर करंट बुकिंगसाठी खिडकी होती. त्या भिंतीवर सिनेमाचा फोटो सेट असे. आम्ही कुटुंबाने कायमच स्टाॅलचीच तिकीटे काढून चित्रपट पाहिले आणि ते करताना अप्पर स्टाॅल आणि बाल्कनीच्या पब्लिककडे ते अधिक पैसेवाले, या दृष्टीने पाहत असे.
थिएटरमध्ये प्रवेश करताच मधोमध छोटेसे गार्डन होते. मग मुख्य हाॅल. त्याबाहेर फोटो सेट असे. तो पाहताना अमूक दृश्य चित्रपटात नेमके कधी असेल, कसे असेल याची उत्सुकता असे. (Majestic cinema)
अशा या मॅजेस्टिक थिएटरमध्ये १९७२ साली ‘तुलसी विवाह’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीचा एक भाग म्हणून शंकराची भली मोठी मूर्ती उभी केली जात असताना आम्हा गिरगावकरांचे ते विशेष आकर्षण होते आणि अशातच हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या दिवशी “मॅजेस्टिकमध्ये मराठी चित्रपटालाच स्थान मिळायला हवे” अशा मागणीसाठी शिवसेनेने जोरदार आंदोलन केले. तेव्हा मला राजकारण आणि समाजकारण म्हणजे काय हे समजत नव्हते. (राजकारणातील आजही समजत नाही, हे चांगले की वाईट?) पण घरात अथवा आजूबाजूला जे काही बोलले जायचे ते कानावर पडे.
अखेर ‘तुलसी विवाह ‘ हा चित्रपट मॅजेस्टिकऐवजी जवळच्या सेन्ट्रल थिएटरमध्ये रिलीज झाला. लोकसत्तात याची बातमी आल्याचे आठवतेय. एव्हाना माझे वृत्तपत्र वाचन हळूहळू वाढत होते. (Majestic cinema)
त्यानंतर ‘माय माऊली’ हा चित्रपट दोन आठवडे चालल्यावर समजले की, मॅजेस्टिक थिएटर बंद झाले….. ते पाडून तेथे उभारण्यात येत असलेल्या उंच इमारतीत मागील बाजूस मॅजेस्टिक थिएटरची नवीन इमारत असेल, असे म्हटले जात होते. जरी प्रत्यक्षात तशी इमारत उभी राहिली तरी मॅजेस्टिक आठवणीत उरले . अगदी आजही गिरगावात गेल्यावर हा सगळा पट माझ्या डोळ्यासमोर येतोच… १९७२ च्या उत्तरार्धात हे थिएटर बंद झाले ते कायमचेच! (Majestic cinema)
शाळेत वरच्या वर्गात जाताना खोताची वाडीच्या नाक्यावरच्या ‘डिंग डाँग बुक काॅर्नर’ लायब्ररीतून माझे वडील रसरंग, मार्मिक, प्रभंजन, मनोहर वगैरे साप्ताहिके, मासिक आणि दिवाळी अंक आणू लागले ते ‘वाचता वाचता’ त्यात मला मॅजेस्टिक थिएटरचा इतिहास समजू लागला आणि त्याचे ऐतिहासिक मूल्य लक्षात येत गेलं. माझी उत्सुकता वाढत राहिली.
मूकपटाच्या काळात १९१८ साली ते सुरु झाले असे समजले आणि मग मी मॅजेस्टिक थिएटरबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. चित्रपट बोलू लागला तेव्हा मराठीतील पहिला बोलपट चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित आणि प्रभात फिल्म कंपनी निर्मित “अयोध्येचा राजा” याच मॅजेस्टिक थिएटरमध्ये ६ फेब्रुवारी १९३१ रोजी प्रदर्शित झाल्याचे समजले आणि ‘मी गिरगावकर’ असल्याचा अभिमान वाढला. (Majestic cinema)
‘अयोध्येचा राजा’ साठी मॅजेस्टिकमध्ये तिकीट दर होते, लोअर स्टाॅल पाच आणे, अप्पर स्टाॅल दहा आणे, ड्रेस सर्कल चौदा आणे, तर बाल्कनी दोन रुपये. तर आर्देशीर इराणी दिग्दर्शित पहिला हिंदी बोलपट ‘आलम आरा’ हा याच मॅजेस्टिकमध्ये १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित झाल्याचे समजले आणि तोच अभिमान बळकट होत गेला.
हळूहळू माझा चित्रपटाच्या एकूणच वाटचालीबाबत जाणून घेण्याचा उत्साह वाढताना मॅजेस्टिकबाबत आवर्जून जाणून घेण्यासाठी प्रयत्न वाढवले. मग समजले की, मा. विनायक अभिनित आणि दिग्दर्शित “ब्रह्मचारी” या चित्रपटात “यमुनाजळी खेळू खेळ कन्हय्या” या गाण्यात मीनाक्षी शिरोडकर यांनी बेदिंग सूटात दर्शन घडवल्याने वृत्तपत्रांतून भरपूर उलटसुलट प्रतिक्रिया उमटली. तसेच तात्कालिक संस्कृती रक्षकानी याच मॅजेस्टिक थिएटरवर निदर्शने केली. (कालांतराने याच मीनाक्षी शिरोडकर यांच्या नाती नम्रता आणि शिल्पा यांच्याशी माझा अतिशय उत्तम परिचय झाला. मीनाक्षी शिरोडकर यांच्या निधनानंतर या दोघींना भेटायला मी त्यांच्या खार येथील निवासस्थानी गेलो. तेव्हा नकळतपणे मॅजेस्टिक आठवत होते).
मॅजेस्टिकमध्ये दर रविवारी सकाळी नऊ वाजता काऊबाय, टारझन याचे लहान मुलांसाठी चित्रपट असत. तेही कमी केलेल्या दरात. मी स्वतः ‘मुन्ना’ नावाचा बालचित्रपट पाहिला होता. तेव्हा आई अथवा वडील घेऊन गेले आणि मला तिकीट काढून देत आत पाठवले आणि स्वतः सिनेमा संपेपर्यंत बाहेर थाबले. असे चित्रपट लहान मुलांवर चांगले संस्कार करतात असे त्या काळात मानले जाई आणि त्यात तत्थही आहे.
मॅजेस्टिक थिएटरमध्ये फार पूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटात ब्रह्मचारी (३२ आठवडे मुक्काम), भरत भेट (रौप्यमहोत्सवी यश), अमर भूपाळी (२० आठवडे), तसेच जय मल्हार, मानाचे पान, सांगते ऐका, पुढचं पाऊल, कांचनगंगा, जिवाचा सखा, चिमणी पाखरं, जगाच्या पाठीवर, बोलाविता धनी, लाखाची गोष्ट, आधी कळस मग पाया, हा माझा मार्ग एकला, पाठलाग, जुनं ते सोनं, वादळ, वाट चुकलेले नवरे, अति शहाणा त्याचा, शेवटचा मालुसरा, पवनकाठचा धोंडी, घरकुल, चला उठा लग्न करा, एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, संपूर्ण रामायण, जीवन प्रभात, ज्वार भाटा (हा दिलीपकुमारचा पहिला चित्रपट), कृष्ण कन्हैय्या, पुनर्मिलन, भरत मिलाप, अनमोल घडी, सीमा वगैरे वगैरे….
मॅजेस्टिक थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांची नावे जस जशी समजत गेली तसा मी सुखावलो. दिलीप कुमारचा पहिला चित्रपट ‘ज्वार भाटा’ या मॅजेस्टिकमध्ये रिलीज झाल्याचे समजल्याने मी प्रचंड सुखावलो. कालांतराने चित्रपती व्ही. शांताराम फाऊंडेशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘शतक महोत्सवी मराठी चित्रपट’ या सूचीचे संपादन करताना याच मॅजेस्टिक थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या मूकपटाची माहिती मिळाली. माझ्या ज्ञानाची भूक अशी वाढत होती.
‘राम वनवास’ (१९१८), कृष्ण जन्म (१९१८ – हा चित्रपट सात आठवडे दाखवला गेला. हा त्या काळात मोठाच विक्रम होता), ‘कच देवयानी’ (१९१९), सुरेखा हरण (१९२१), चित्रपती व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मूकपट ‘गोपाल कृष्ण’ (१९२९) हे मूकपट आमच्या गिरगावातील मॅजेस्टिक थिएटरमध्ये प्रदर्शित झाले हे समजल्याने माझा अभिमान अधिकाधिक प्रमाणात वाढला. (Majestic cinema)
प्रत्येक चित्रपटगृहाचे स्वतःचे असे व्यक्तीमत्व असते. त्याची प्रतिमा डोक्यात फिट बसत जाते. जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहाला प्रत्येकाला आपली एक स्वतंत्र ओळख होती. मॅजेस्टिक आडवे थिएटर होते, पण त्याने अनेक फिल्मवाल्यांचे करियर ‘उभे’ केले.
चित्रपटगृहात चित्रपट लागतो, काहींना हाऊसफुल्ल गर्दी पाहते, काही चित्रपट रिकाम्या खुर्च्यांना दाखवावे लागतात. पण त्याही पलीकडे जाऊन या वास्तूची ओळख आणि वैशिष्ट्य असते. त्यातील एक मॅजेस्टिक. अशा या विशेष महत्त्व असलेल्या मॅजेस्टिक थिएटरचा फोटो मात्र मला जंग जंग पछडूनही मिळाला नाही; अजून मिळत नाही, याचे खूप वाईट वाटते. त्या काळात उठसूठ कोणाचाही, कशाचाही फोटो काढण्याची पध्दत नव्हती. (Majestic cinema)
मॅजेस्टिक थिएटरच्या अशा आठवणीत रमताना माझ्या डोळ्यासमोर तेथील छोट्याश्या गार्डनमध्ये मोठ्या माठात पाणी घेऊन बसलेला विक्रेता आठवतो. त्यावेळी “पाच पैसे ग्लास” या दराने पाणी मिळत असे. तो या सगळ्यात लक्ष वेधून घेत असे. (Majestic cinema)
माझ्या आजी आणि आईला मात्र सिनेमाला जाताना घरच्या प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी न्यायची सवय (पाणी विकत घेऊन प्यायचे असते हे त्या काळात मध्यमवर्गीय मानसिकेत अजिबात नसे आणि ते अगदी योग्यच होते.)
मॅजेस्टिक सिनेमा थिएटरने माझे बालविश्व, तेव्हाचे भावविश्व व्यापले होते. हे लिहिताना मला माझे ते शालेय वयातील दिवस आठवताहेत. मॅजेस्टिक थिएटरमध्ये मी हळूहळू सिनेमा पाहायला शिकलो…. आजही ते शिक्षण सुरु आहे. दरम्यान अनेक चित्रपटगृहातून प्रवास करत करत येथेपर्यंत आलो आहे.