Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

Nana Patekar एक्स गर्लफ्रेंड मनिषा कोईरालाबद्दल काय म्हणाले?

Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

अनुराधा : Hrishikesh Mukherjee यांची भावरम्य कविता!

Amitabh Bachchan यांचं खरं नाव ‘हे’ असतं; भाऊ अजिताभने केला

Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!

Bappi Lahiri ने संगीत दिलेल्या गाण्याला किशोर कुमारने कसे इम्प्रोवाइज केले?

‘मनाचे श्लोक’मधून Leena Bhagwat – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

सेन्ट्रल प्लाझा: जेव्हा मैत्रिणींसोबत गेलेल्या जयश्री गडकर यांना थिएटरमध्ये प्रवेश मिळाला नाही 

 सेन्ट्रल प्लाझा: जेव्हा मैत्रिणींसोबत गेलेल्या जयश्री गडकर यांना थिएटरमध्ये प्रवेश मिळाला नाही 
टॉकीजची गोष्ट

सेन्ट्रल प्लाझा: जेव्हा मैत्रिणींसोबत गेलेल्या जयश्री गडकर यांना थिएटरमध्ये प्रवेश मिळाला नाही 

by दिलीप ठाकूर 21/04/2022

लहान मुलं जस जसं मोठं होत जातं तस तसं त्याला आजूबाजूचं जग अधिक प्रमाणात दिसू लागतं. मॅजेस्टिक सिनेमाच्या अगदी जवळचंच सेन्ट्रल सिनेमा थिएटर. आताचं नाव ‘सेन्ट्रल प्लाझा’ (central plaza cinema). तरी मूळ नाव जास्त ओळखीचं. गिरगावातून चर्नी रोड स्टेशनकडे जाताना उजवीकडे पटकन असलेल्या या सिनेमागृहाची पूर्वीची रचना सिनेमाप्रेमींना विशेष आवडणारी. 

पूर्वी सिनेमा थिएटरमधील शो कार्ड पाहण्यास फिल्म दीवाने कायमच उत्सुक असत आणि सेन्ट्रल थिएटरमध्ये ती पाहता येत असत. आजच्या पिढीला त्यात विशेष उल्लेखनीय असं काही वाटणार नाही. पण फार पूर्वी अशी ‘थिएटरमधील शो कार्ड’ पाहण्यासाठी थिएटरवर चकरा मारणारे फिल्म दीवाने होते. त्यात एक वेगळाच आनंद मिळे. 

सेन्ट्रलमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित होत, त्यामुळे तेथे मी लहानपणी पाहिलेला पहिला सिनेमा होता व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ (१९७२). त्या वयात सिनेमाची गोष्ट पाहणे आणि गीत संगीत नृत्य यात रमून जाणे, म्हणजेच सिनेमा पाहणे अशी समज होती आणि त्यानुसार ‘पिंजरा’ पाहिला आणि आवडला. पण अनेक वर्षांनंतर भारतमाता थिएटरमध्ये एक आठवड्यासाठी रिपिट रनला तो लागला असता आवर्जून पाहिला तेव्हा समजला. 

Pinjara

सिनेमा समजायचा प्रवास हळूहळू आकार घेत सुरुच राहतो. वयपरत्वे दृष्टिकोन बदलतो आणि सिनेमागृहाची आपली एक स्वतंत्र संस्कृती असते, हेही समजून यायला वेळ लागतो. 

फार पूर्वी सेन्ट्रल थिएटरमध्ये फक्त रविवारी सकाळी नऊ वाजता लहान मुलांसाठी ‘धन्य ते संताजी धनाजी’, ‘श्यामची आई’ यासारख्या बालसिनेमांचे आयोजन केले जात असे आणि अनेकदा गिरगावातील एकादी शाळा तो सगळा खेळ आपल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करीत असे. 

नेहमी कुटुंबासोबत थिएटरमध्ये सिनेमा पाहायला जाणारी आम्ही मुलं अशावेळी शाळेतील मित्रांसोबत सिनेमा पाहायला मिळतोय म्हणून आनंदी असायचो. तो एक वेगळा अनुभव असे. मग काही दिवस शाळेत त्याच आदर्शवादी सिनेमावर गप्पा रंगायच्या. 

ऐंशीच्या दशकात मी मिडियात आल्यावर जयश्री गडकर यांच्या मुलाखतीचा योग आला. हाजीअली येथील शिवतीर्थ या भव्य इमारतीतील त्यांच्या निवासस्थानी मी त्यांना भेटत होतो. त्या मुळच्या गिरगावातील त्रिभुवन रोड परिसरातील रहिवाशी. त्यामुळे त्यांची गिरगावातील एकादी जुनी आठवण मी जाणून घेऊ लागलो. तेव्हा त्यांनी एक अगदी छान आठवण सांगितली. 

Jayshree Gadkar

‘गाठ पडली ठका ठका’ (१९५६) या अगदी त्यांच्या यशस्वी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील सिनेमाच्या वेळची सेन्ट्रल थिएटरची आठवण… (central plaza cinema)

या सिनेमाच्या प्रीमियरला पंधरा दिवस राहिले असताना आपल्या मैत्रीणींवर भाव मारावा म्हणून आपल्या राममोहन शाळेतील मैत्रिणींना घेऊन जयश्री गडकर मधल्या सुट्टीत आपले या सिनेमातील फोटो दाखवण्यासाठी घेऊन गेल्या (हा सिनेमा निर्माण होईपर्यंत जयश्री गडकर शालेय वयात होत्या). सगळ्या जणी शाळेच्या युनिफॉर्ममध्ये असल्या तरी जयश्री गडकर यांना विश्वास होता की, त्या या सिनेमाच्या नायिका असल्याने त्यांना थिएटरवर ओळखले जाऊन सोडले जाईल. पण झाले उलटेच. त्या शाळेच्या ड्रेसमध्ये असल्याने थिएटरवरच्या सुरक्षा रक्षकाने या सगळ्या जणींना साॅलीड दम भरला.

प्रत्यक्षात प्रीमियरच्या दिवशी तर, सकाळपासूनच जयश्रीजींची धकधक वाढत गेली. आई वडील त्यांना समजवत होते तरी प्रेक्षक आपल्याला कसे स्वीकारतील याची त्यांना धाकधूक होती. खरं तर सेन्ट्रल सिनेमा त्यांच्या घरापासून अवघ्या पाच सात मिनिटावर, पण आपण अभिनेत्री आहोत म्हणून त्या गाडीने गेल्या आणि बाल्कनीतून जेव्हा त्यांनी पडद्यावर पहिल्यांदा आपले नाव वाचले तेव्हा त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. 

सेन्ट्रल थिएटर मला असे विविध स्तरांवर ‘दिसू’ लागले. आपले वय वाढत जाते तस तसा अनेक वास्तूंकडे पाहण्याचाही दृष्टिकोन बदलत जातो. असेच जुन्या वळणाची रचना असलेले हे सेन्ट्रल थिएटर (नंतरचे सेन्ट्रल प्लाझा थिएटर – central plaza cinema) ज्याने अनेक सिनेमांना हाऊसफुल्लचे यश, तर काही सिनेमांना अपयशाचा पडदा दाखवला. 

याच सेन्ट्रल सिनेमासमोर सुंदर भवन (पूर्वीची रामचंद्र बिल्डिंग) मध्ये जितेंद्र राहायचा, हे शालेय वयात समजले. गिरगावातच राजेश खन्ना, सीमा देव, रिमा लागू, गणेश सोळंकी, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय पाटकर, जयवंत वाडकर असे अनेक कलाकार लहानाचे मोठे होताना त्यांनी याच सेन्ट्रलमध्ये अनेक सिनेमा पाहिले आणि कालांतराने त्यांचेच सिनेमा तेथे रिलीज झाले या योगायोगाचे मला विशेष कौतुक वाटले. 

आजही मला आठवतेय, सेन्ट्रलमध्ये सत्तरच्या दशकात मॅटीनी शोला स्टाॅल तिकीट एक रुपया पाच पैसे होते आणि बरेच जुने सिनेमा तेथे पाहायला मिळाले. देव आनंद, शम्मी कपूर, त्याचप्रमाणे जुने संगीतमय सिनेमा मॅटीनी शोला रिलीज होत, तर डेली शोचे तिकीट स्टाॅल तिकीट एक रुपया पासष्ट पैसे, अप्पर स्टाॅल दोन रुपये वीस पैसे, तर बाल्कनी तीन रुपये तीस पैसे असे होते. 

खिशात मोजून स्टाॅलच्या तिकीटासाठी चिल्लर असे. ती मुठीत पकडून छोट्या खिडकीतून आत टाकून तिकीट मिळवण्यात थ्रील असे. गोरेगावकर लेनच्या बाजूने ही स्टाॅलच्या तिकीटाची करंट बुकिंगसाठी रांग लागे. म्हणजे त्या बाजूने आत गेल्यावर एका बाजूला भिंत, तर दुसरी बाजू जाळीचा अडथळा असलेली. त्या निमूळत्या जागेतून स्टाॅलच्या तिकीट खिडकीपर्यंत जाईपर्यंत अनेकदा तरी तिकिटं संपत. 

सेन्ट्रल थिएटरमध्येही (central plaza cinema) स्टाॅलच्या तिकीटासाठी महिलांची वेगळी रांग ही इंग्रजकालीन परंपरा. पण महिला आपल्या पतीचे आणि एकूणच कुटुंबाचे तिकीट अगोदर काढू शकत होत्या. या खिडकीपर्यंत जाण्याचा प्रवास एक वेगळा अनुभव असे. 

संजीवकुमार आणि लीना चंदावरकर यांच्या ‘अनहोनी’च्या तिकीटासाठी मी खिडकीत हात घातला असता बुकिंग क्लार्कने म्हटलं, तिकिटं संपली! एकाच वेळेस रागावलो आणि हळहळलो. त्यानंतर सहाच्या  शोच्या तिकीटासाठी पाच वाजता जाऊन पहिला नंबर लावला. शाळेत कधीच पहिला नंबर काढू शकलो नाही हे विशेष उल्लेखनीय. 

आजूबाजूला मराठी वस्ती असल्याने इथे सातत्याने मराठी सिनेमा येत. फार पूर्वी गोपाळ कृष्ण, माणूस, शेजारी, रामशास्त्री, अमृत, पहिली मंगळागौर, चूल आणि मूल, वहिनीच्या बांगड्या, शिकलेली बायको, क्षण आला भाग्याचा, बाळा गाऊ कशी अंगाई, थापाड्या, सगे सोयरे, सामना, सुगंधी कट्टा, फटाकडी, भालू, ज्योतीबाचा नवस, माझा पती करोडपती असे अनेक मराठी सिनेमा प्रदर्शित झाले. 

दादा कोंडके यांच्या ‘एकटा जीव सदाशिव’ पासूनचे सर्व मराठी आणि तेरे मेरे बीच मे, आगे की सोच वगैरे हिंदी सिनेमा याच पडद्यावर.(दादा कोंडके यांनी आपल्याच मराठी सिनेमाची हिंदीत रिमेक केली आणि त्यासाठी मेन थिएटर काॅमन ठेवले.) महेश कोठारेचा नायक म्हणून पहिला सिनेमा ‘प्रीत तुझी माझी’ तर दिग्दर्शक म्हणून ‘धूमधडाका’पासून बरेचसे सिनेमा इथेच रिलीज झाले आहेत. 

आहुती, वजीर, लपंडाव या मराठी सिनेमांचे प्रीमियर इथेच अनुभवले. वजीरच्या प्रीमियरच्या वेळी सेन्ट्रलला पब्लिकचा जबरा गराडा पडला होता. त्यांना विक्रम गोखले, अशोक सराफ, अश्विनी भावे असे ‘आपले स्टार’ पाहायचे होते. त्यात एक प्रकारचे आपलेपण होते.  

 Vazir Movie

सेन्ट्रलला मॅटीनी शोला अनेक मराठी सिनेमाही प्रदर्शित झाले. ‘शांतता! खून झाला आहे’, ‘धाकटी मेव्हणी’, २२ जून १८९७, अष्टविनायक ही नावे आवर्जून घ्यायला हवीत. या प्रत्येक सिनेमाचे व्यक्तिमत्व अथवा स्वरुप अगदी भिन्न आहे. 

सेन्ट्रलला हिंदी सिनेमाही यश मिळवत. वह कौन थी, प्यार का मौसम, परवरीश, चाचा भतिजा येथेच ज्युबिली हिट. तसेच अमिताभचा ‘संजोग’, संजीवकुमार – राखीचा पारस, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘बटाटा वडा…’ गाणे असलेला ‘हिफाजत’ असे अनेक सिनेमा तर, तुलसी विवाह, अलख निरंजन वगैरे पौराणिक सिनेमाही इथेच इथे रिलीज झाले. 

‘तुलसी विवाह’साठी इथे शंकराची मोठी मूर्ती उभारली होती आणि मग इथेच प्रीमियर रंगला. बचपन, कहानी घर घर की, सबूत, दो हवालदार (हा पांडू हवालदारची रिमेक. योगायोगाने हे दोन्ही सिनेमा दोन वर्षाच्या अंतराने इथेच झळकले), और कौन, गुंज, पगली, काली घटा, मन तेरा तन मेरा, ठोकर  वगैरे वगैरे बरीच नावं घेता येतील. 

सगळेच सिनेमा चांगले नसतात, त्यामुळे असे अनेक सिनेमा तीन चार आठवड्यात गाशा गुंडाळत आणि मग आम्ही गिरगावकर आता नवीन सिनेमा कोणता येतोय याची वाट पाहायचो. विजय आनंद आणि लीना चंदावरकर यांच्या भूमिका असलेला गीतविरहीत ‘चोर चोर’ हा इथे प्रदर्शित झालेला वेगळा रहस्यरंजक सिनेमा होता. भले या सिनेमाचा दिग्दर्शक विजय आनंद नसेल, पण हीरो तर आहे, मग गाणे नको का? पण हा सिनेमा निर्मितीवस्थेत असताना नेमका वादकांचा संप झाला आणि रेकाॅर्डिंग ठप्प झाले. 

अशोककुमार, ए. के. हनगल आणि उत्पल दत्त यांच्या ‘हिरवे’पणाची खुसखुशीत रंगत असलेला बासू चटर्जी दिग्दर्शित ‘शौकिन’ इथेच हिट ठरला. रति अग्निहोत्रीने या सिनेमामध्ये छान रंग भरला होता. फार पूर्वी एखाद्या आठवड्यात एकाच हिरोचे दररोज एक याप्रमाणे सिनेमा लागायचे. म्हणजे राजेश खन्नाचे आराधना, अमर प्रेम, कटी पतंग, आन मिलो सजना, सच्चा झूठा वगैरे सिनेमा एक एक दिवस असायचा आणि त्यातील पाहायचा राहिलेला तरी पाहणे होई अथवा आवडलेला पिक्चर पुन्हा एकदा पाहणे होई. रिपीट रनची हीच तर विशेष पुण्याई होती. 

असे आमच्या गिरगावातील हे सेन्ट्रल थिएटर नेमके सुरु कधी झाले याचा शोध घेताना समजले, १२ डिसेंबर १९३६ रोजी प्रभात फिल्म कंपनीचा ‘संत तुकाराम’ या सिनेमाने या थिएटरच्या प्रवासाची सुरुवात झाली. आणि या पहिल्याच सिनेमाने इथे ५७ आठवडे मुक्काम केला. 

विष्णुपंत दामले आणि साहेबमामा फत्तेलाल दिग्दर्शित हा सिनेमा व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवात दाखल झालेला पहिला मराठी सिनेमा ठरला. म्हणजे, सेन्ट्रल थिएटरचा पायगुण चांगला म्हणायचा. 

कालांतराने सेन्ट्रलचे सेन्ट्रल प्लाझा (central plaza cinema) झाले. मूळ हाॅल कायम ठेवून त्याबाहेर बंधिस्तपण आले आणि शो कार्ड आतच राहिली आणि ती आता केवळ तिकीट काढल्यावर पाह्यला मिळू लागली. ॲडव्हास आणि करंट बुकिंगची खिडकी बाहेर आली आणि आता मराठी व हिंदीसह इंग्रजी आणि गुजराती सिनेमेही प्रदर्शित होऊ लागले. गिरगावातील मराठी टक्का कमी कमी होत गेला हे यावरुनही स्पष्ट होऊ लागले. ते काही असो, पण आता स्टाॅलची खिडकी बंद होऊनही त्याची आठवण मनात कायम राहिली. 

=====

हे देखील वाचा – मॅजेस्टिक थिएटरमधला पाणीवाला….
=====

कालांतराने एकीकडे मल्टीप्लेक्सचे युग आले, तर दुसरीकडे मेन थिएटर ही काॅन्स्पेटच मागे पडली. इतकी की, असे काही ‘मेन थिएटर’ खूप महत्वाचे होते हेच आजच्या ग्लोबल युगातील रसिकांना माहिती नाही. आणि त्यातच एकेक करत मुंबई तर झालेच, पण एकूणच देशभरातील एकपडदा सिनेमागृहे अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद होताना पाडलीही गेली. मागे राहतात त्या अशा आठवणी! 

मी याबाबत स्वतःला खूप नशीबवान समजतो. ज्या गिरगावात मी लहानाचा मोठा झालो त्या एकूणच परिसरातील सिंगल स्क्रीन थिएटर्सचा चित्रपटसृष्टीच्या इतिहासात खूपच महत्वाचा वाटा आहे आणि त्याच अनेक थिएटरमध्ये मी अगणित सिनेमा एन्जाॅय केले.    

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Exclusive Article Marathi Movie Marathi Theater News Talkies Theatre
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.