मीनाकुमारीने हॉस्पिटलच्या बेडवर दिला होता शेवटचा शॉट
कलावंताची त्याच्या कलेबाबतची निष्ठा, कलेत स्वत:ला झोकून देणं, कलेसाठी सर्वस्व पणाला लावणं सर्व सामान्यांना अचंबित करणारे असते. मीना कुमारीने (meena kumari) आपल्या कला आयुष्यातील शेवटचा शॉट मरणाच्या दारात असताना हॉस्पिटलच्या बेडवर दिला होता. त्याचाच हा काळजाला चटका लावणारा किस्सा.
महान अभिनेत्री मीनाकुमारी (meena kumari) वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी या दुनियेला अलविदा करून निघून गेली. तिच्या चित्रपट कारकिर्दीतील अनेक भूमिकांनी तिने हिंदी सिनेमातील नायिकेच्या प्रतिमेला उंचावर नेले. तिच्या अप्रतिम अभिनयाने रंगलेल्या कितीतरी भूमिकांवर रसिकांनी मनापासून प्रेम केले.
‘बैजू बावरा’, ‘दिल अपना और प्रीत पराई’, ‘बहू बेगम’, ‘बेनझीर’, ‘पाकीजा’, ‘चिराग कहा रोशनी कहा’, ‘दिल एक मंदिर….’ या सर्व चित्रपटातून मीनाकुमारीने (meena kumari) आपल्या अभिनयाने भारतीय सिनेमा समृद्ध केला. तिच्या अभिनयातील दर्द रसिकांना आतून हेलावून टाकतो. तिच्या शायरीतून तिच्या अंतर्मनातील दु:ख स्पष्टपणे दिसत होते.
सच्च्या प्रेमाला ती कायम पारखी राहिली. एक अधुरी कहाणी जगली असेच म्हणावे वाटते. तिच्या बाबतच्या अनेक वदंता आहेत ज्या आजही सिनेसृष्टीत सांगितल्या जातात. वैयक्तिक दु:खाचे सोल्युशन तिने शायरी आणि ‘एकच प्याल्या’त शोधले.
साठच्या दशकाच्या उत्तरार्धात मीना कुमारीची (meena kumari) तब्येत मद्याच्या बेसुमार सेवनाने पुरती बिघडली. तिला लिवर सिरॉसिस या आजाराने घेरले. याच काळात बंद पडलेल्या ‘पाकिजा’चे चित्रीकरण पुन्हा सुरू झाले. ‘पाकिजा’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी ती प्रचंड अशक्त झाली होती. साधे चालण्याचे त्राण देखील तिच्या पायात नव्हते. यातील नृत्याचे लॉंग शॉटस मीना कुमारीच्या ऐवजी पद्मा खन्नावर चित्रित केले, तर क्लोजअपमध्ये आपल्याला मीनाकुमारी दिसते.
अखेरच्या दिवसात ज्यावेळी तिला आपला ‘पैलतीर’ दिसू लागला त्यावेळी तिने अर्धवट राहिलेल्या सिनेमाचे शूटिंग करण्याचा धडाकाच लावला. प्रकृती बरी नसतानाही ती चित्रीकरणात भाग घेऊ लागली. ‘मेरे अपने’, ‘पाकीजा’, ‘गोमती के किनारे’ आणि ‘दुश्मन’ या चित्रपटात तिच्या भूमिका होत्या. या सर्व धावपळीचा परिणाम तिच्या गंभीर आजारपणात झाला आणि तिला मुंबईच्या एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी तिचे सर्व चित्रपटांचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झाले होते. अपवाद होता तो फक्त ‘दुश्मन’ या चित्रपटाचा. यातील काही शॉट्स चित्रित व्हायचे राहिले होते. एकदा निर्माते प्रेमजी आणि दिग्दर्शक दुलाल गुहा मीनाकुमारीला (meena kumari) भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळी देखील मीनाने आपल्या अर्धवट राहिलेल्या चित्रीकरणाचा विषय काढला त्यावेळी दिग्दर्शकाने “तुम्ही आधी बऱ्या व्हा, मग आपण चित्रीकरण करू” असे सांगितले. पण मीनाकुमारीला आपल्या एकंदरीतच प्रकृतीचा अंदाज आला होता.
ती म्हणाली “हाय अल्ला, कल का क्या भरोसा” आणि तिने राहिलेले चित्रीकरण हॉस्पिटलमध्येच पूर्ण करुयात असे सांगितले. निर्मात्यांनी याला विरोध केला “तुमची प्रकृती सर्वात महत्त्वाची आहे. शूटिंग काय पुन्हा होईल”, असे सांगितले. पण मीनाकुमारी हट्ट धरून बसली.
=======
हे देखील वाचा – शशी कपूरने अमिताभ बच्चन यांची त्याच्या सिनेमातील भूमिका का ‘डिलीट’ केली?
=======
आपण राहिलेले चित्रीकरण हॉस्पिटलमध्येच पूर्ण करू. तिने हॉस्पिटलच्या प्रशासनाला तशी विनंती केली. प्रशासनाला मीनाकुमारीच्या अभिनयाची आणि तिच्या कारकिर्दीची कल्पना होती. त्यांनी चित्रीकरणाला करा परवानगी दिली.
दिग्दर्शक दुलाल गुहा शूटिंगचे संपूर्ण युनिट घेऊन हॉस्पिटलला पोहोचले. या शॉटमध्ये मीनाकुमारीला नववधूच्या गेटअप दाखवायचे होते. मीनाकुमारीला नववधू सारखे सजवले गेले आणि तिथेच हॉस्पिटलच्या बेडवर तिने चित्रीकरण पूर्ण केले. दुलाल गुहांनी तिचे आभार मानले. पुढे काही महिन्यातच याच बेडवर मीनाकुमारीने शेवटचा श्वास घेतला.