‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूच्या दु:खाने ‘या’ गायिकेचा गाता गळा कायमचा स्तब्ध झाला?
आयुष्य किती अनाकलनीय अशा घटनांनी भरून गेलेलं असतं! आपल्याला कल्पना नसते की, आपल्या नियतीमध्ये काय वाढून ठेवले आहे. कलावंतांच्या बाबतीत तर ही गोष्ट खूप प्रकर्षाने सामोरी येते. कलाकारांच्या संवेदनशील आणि सृजनशील मनाला अशा अनपेक्षित टोकदार प्रसंगाच्या क्षणी हतबलतेची प्रचीती येते.
आज एका गुणी कलावंताच्या आयुष्यात अनपेक्षितपणे आलेल्या शोकांतिकेची चर्चा करूयात. असं काय घडलं की, एका गायिकेने आपल्या एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्युनंतर गाणं कायमचं बंद करून टाकलं?
आज ही गायिका प्रसिद्धीच्या झगमगाटापासून कोसो दूर आहे. मागच्या तब्बल ३२ वर्षांपासून तिने आजवर एकही गाणे रेकॉर्ड केले नाही किंवा गायलेले देखील नाही. तो आघात, ते दुःख आणि ती वेदना त्या गायिकेच्या गळ्याला कायमचं गोठवून गेली. कोण होती ती गायिका? काय दु:ख होतं ज्याने तिचा गाता गळा ‘म्युट’ करून टाकला?
ही गायिका होती चित्रा सिंग (Chitra Singh). प्रख्यात गझल गायक जगजीत सिंग यांची पत्नी! सत्तरच्या दशकामध्ये जगजित सिंग आणि चित्रा सिंग यांनी गझलच्या माध्यमातून जगभरातील रसिकांना वेडावून टाकले होते. या दोघांच्या म्युझिकल कॉन्सर्टमध्ये रसिक अगदी हरवून जात.
“अपनी आग को तो जिंदा रखना”, “सुना था की वो आयेंगे अंजुमन”, “दुनिया जिसे कहते है”, “मै भूल जाऊ सील सिले”, “मुझको यकीन है”, “बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी”, “कल चौधवी की रात” या त्यांच्या गजलांची जगभरात प्रचंड क्रेझ होती. जगभरात त्यांच्या मैफिलींना रसिकांची प्रचंड मोठी गर्दी होत असे.
ऐंशीच्या दशकामध्ये या दोघांनी भारतीय चित्रपटांमधून देखील गायला सुरुवात केली. प्रेम गीत, अर्थ, साथ साथ या चित्रपटातून जगजीत आणि चित्रा सिंग (Chitra Singh) यांचा आवाज रसिकांना ऐकायला मिळाला. तुमको देखा तो ये खयाल आया, ये तेरा घर ये मेरा घर ये घर बहुत हसीन है, वो कागज की कश्ती वो बारीश का पानी…. सारं कसं छान चालू होतं.
“जमाना बडे शौक से सून रहा था….” अशीच अवस्था होती. पण २७ जुलै १९९०च्या रात्री अशी घटना घडली की, त्यांच्या सुरील्या संगीताच्या मैफलींमध्ये अनाकलनीय असा भेसूर ब्रेक आला आणि ती काळ रात्र त्यांचे उभे आयुष्य काळोखात ढकलून गेली.
या रात्री त्यांचा १८ वर्षांचा मुलगा विवेक सिंग आपल्या दोन मित्रांसोबत लॉंग ड्राईव्हला गेला होता. रात्री दोन वाजता त्यांच्या कारने एका ट्रकला धडक दिली आणि हा अपघात इतका भयानक होता की, त्यामध्ये विवेक सिंगचा जागीच मृत्यू झाला. याच गाडीत त्याच्यासोबत त्याचा मित्र साईराज बहुतुले देखील होता. साईराज त्यावेळी नुकताच क्रिकेट खेळायला लागला होता. त्याला देखील या अपघातात मोठी दुखापत झाली. त्याच्या पायात रॉड टाकावा लागला. त्याचे क्रिकेट करियर संपते की काय असे वाटू लागले. पण नंतर त्याने स्वतःला सावरले आणि आणि पुढे भारतीय क्रिकेट संघात त्याचा समावेश झाला. या अपघाताच्या वेळी त्यांचा आणखी एक मित्र देखील या गाडीत होता तो देखील थोडक्यात बचावला.
जगजित सिंह आणि चित्रा सिंह यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू अशा पद्धतीने व्हावा हे मन मानायला तयारच होत नव्हतं. चित्रा सिंग तर पुरत्या खचून गेल्या. त्या क्षणापासून त्यांनी गाणे बंद केले. त्यानंतर गेल्या ३२ वर्षात त्यांनी एकही गाणे रेकॉर्ड केले नाही किंवा एकही गाणे सादर देखील केले नाही.
जगजित सिंह हे देखील एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पुरते खचून गेले होते. पण हळूहळू ते त्यातून बाहेर आले. काळ कुणासाठी थांबत नाही. काळजावर दगड ठेवून त्यांनी पुन्हा गायला सुरुवात केली. नव्वदच्या दशकानंतर त्यांच्या गळ्यात जो दर्द, जी वेदना, जो कातर स्वर आपल्याला जाणवतो त्याचे मूळ कुठेतरी विवेक सिंग यांच्या अपघाती मृत्यूमध्ये होते. चित्रा सिंग (Chitra Singh) यांचे जगजीत सिंग यांच्या सोबतचे हे दुसरे लग्न होते. त्यांना त्यांच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी मोनिका ही त्यावेळी तीस वर्षांची होती.
आपल्या भावाचा असा मृत्यू तिला देखील खूप वेदना देऊन गेल्या. मीडियामध्ये या अपघाताची नोंद सुरुवातीला ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अशा पद्धतीने झाली. ‘मोठ्या बापाचा बिघडलेला मुलगा’ अशीच इमेज त्यावेळच्या मीडियामध्ये रंगवली गेली. पण मोनिका सिंगने मोठ्या हिमतीने आपल्या भावाची बाजू मांडली.
चूक भावाची नसून त्या रस्त्यावर बेकायदेशीररित्या उभ्या असलेल्या वाहनाची होती, हे तिने सिद्ध केलं. आपल्या भावाच्या प्रेमापोटी तिने हा कायदेशीर लढा लढला. पुढे मुंबईतील त्या रस्त्याला विवेक सिंग यांचे नाव देखील दिले गेले.
चित्रा सिंग (Chitra Singh) यांच्या दुःखाची कहाणी इथेच थांबत नाही. २००९ साली त्यांच्या मुलीने म्हणजे मोनिका सिंगने आत्महत्या केली. मोनिकाने १९८८ साली पहिले लग्न केले होते. पुढे तिचा २००५ साली घटस्फोट झाला आणि लंडनस्थित एका व्यावसायिकासोबत तिने दुसरे लग्न केले. परंतु हे लग्न देखील टीकले नाही आणि यातूनच नैराश्यातून तिने स्वतःला संपवून टाकले. चित्रा सिंगवर हा दुसरा मोठा आघात होता.
==========
हे देखील वाचा – जेव्हा अभिनेत्री रेखाचा ‘लीपलॉक किसिंग शॉट’ लाईफ मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकला होता…
==========
त्यानंतर २०११ साली ब्रेन हॅमरेज झाल्या जगजित सिंह कोमामध्ये गेले आणि काही दिवसातच मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांचेही निधन झाले. एकापाठोपाठ एक अशा तीन मोठ्या दुःखांना सामोरं जाणाऱ्या चित्रा सिंग (Chitra Singh) आज वयाच्या ८२ व्या वर्षी कोलकाताला आपल्या नातवंडांसोबत आयुष्यातील अखेरचे दिवस मोजत आहेत.
अमीर, उमराव आणि इलाईट क्लास पुरती मर्यादित असलेली गजल मासेस पर्यंत पोचविण्याचे महान काम या जगजीत-चित्रा यांनी केले. त्यामुळेच रसिक त्यांना ‘King and Queen of gajals’ असेच प्रेमाने म्हणतात. रसिकांच्या आयुष्यात आपल्या स्वराने आनंदाचे कारंजे फुलणाऱ्या चित्रा सिंग यांचा स्वर मात्र मागच्या ३२ वर्षापासून मात्र मुका आहे!