अभिनेता गोविंदाच्या उत्तराने संगीतकार नौशाद यांच्या डोळ्यात पाणी का आले?
संगीतकार नौशाद (Naushad Ali) यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पासष्ट वर्षांहून अधिक कालावधी व्यतीत केला. (प्रेमनगर-१९४० ते ताजमहल-२००५) या पासष्ट वर्षाच्या काळात त्यांनी ६४ चित्रपटांना संगीत दिले. यातील जवळपास पन्नास चित्रपट सुपरहिट ठरले. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताला तसेच लोकसंगीताला प्रामुख्याने आपल्या चित्रपट संगीतात आणून नौशाद यांनी हिंदी चित्रपट संगीताचे दालन आणखी समृद्ध केले.
१९८२ साली त्यांनी संगीत दिलेला ‘धरम कांटा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर १९८५ साली त्यांचा चित्रपट ‘लव अँड गॉड’ प्रदर्शित झाला. हा वस्तुत: रखडलेला चित्रपट होता. त्याचे संगीत वीस वर्षापूर्वीच बनले होते. यानंतर मात्र नौशाद यांना चित्रपट मिळेनासे झाले.
हिंदी चित्रपट संगीताचा ट्रेंड बदलला होता. नौशाद यांच्या संगीतात गुणवत्ता होती पण त्या गुणवत्तेला पारखी नजरेने पाहणारा प्रेक्षक वर्ग आता उरला नव्हता. साधारणत १९९०च्या सुमारास नौशाद यांना आपल्या दोन्ही मुलांच्या करिअरचा प्रश्नदेखील भेडसावत होता. एक मुलगा राजू नौशाद (Naushad Ali) त्यांचा सहाय्यक होता, तर दुसरा रहमान नौशाद हा चित्रपट दिग्दर्शन करण्यासाठी उत्सुक होता. त्याच्यासाठी चांगला चित्रपट मिळावा, यासाठी नौशाद स्वतः प्रयत्न करत होते. आपल्या दोन्ही मुलांचे करिअर मार्गी लागावे यासाठी ते स्वत: प्रयत्नशील होते.
नौशाद यांचे एक चाहते होते प्रेम ललवाणी! त्यांनी एक चित्रपट निर्माण करायचे ठरवले. तसे त्यांनी नौशाद यांच्या कानावर घातले. त्यांनी लगेच त्यांना स्वत:ची एक कथा ऐकवली. या कथेत संगीत/नृत्याला खूप मोठा वाव होता. नौशाद यांच्या याच कथेवर चित्रपट बनवण्याचे प्रेम ललवाणी यांनी ठरवले. या चित्रपटाला संगीत नौशाद (Naushad Ali) यांचे असणार होते, तर दिग्दर्शन नौशाद यांचे सुपुत्र रहमान नौशाद करणार होते.
चित्रपटातील कलाकारांचा शोध सुरू झाला. चित्रपटाची नायिका नृत्य निपुण असणे गरजेचे होते. त्यामुळे मीनाक्षी शेषाद्रीची निवड करण्यात आली. आता नायक कुणाला घ्यायचे याचा शोध सुरू झाला. मीनाक्षी आणि जॅकी श्रॉफ ही जोडी लोकप्रिय असल्याने जॅकी श्रॉफला विचारण्यात आले, पण बिझी शेड्युलमुळे त्यांनी नकार दिला.
आपल्या सिनेमात आमिर खान यांनी भूमिका करावी आणि म्हणून नौशाद (Naushad Ali यांनी स्वत: त्याचे वडील ताहीर हुसेन यांना फोन केला, पण त्यांनी देखील विनंतीला सकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही. सनीला विचारले तर त्याच्याकडूनही नकार घंटा ऐकू आली. आपल्या मुलाच्या पहिल्याच चित्रपटाच्या दिग्दर्शनात अशा अनंत अडचणी येत होत्या. चित्रपटाला नायकच मिळत नव्हता.
नौशाद अली यांनी श्री दिलीप कुमार यांना, अनिल कपूर यांनी आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी सांगावे, अशी विनंती केली. यावर दिलीप कुमार यांनी नौशाद यांना सांगितले, “मी अनिल कपूरशी नाही, पण त्यांच्या वडिलांशी म्हणजेच सुरेंद्र कपूर यांच्याशी बोलतो.” परंतु दिलीप कुमार त्यांच्या ‘सौदागर’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर गेल्याने संपर्क झालाच नाही आणि अनिल कपूर देखील चित्रपटात आला नाही.
सगळी कडून नकारघंटा येत असल्याने नौशाद (Naushad Ali) आणि त्यांचे सुपुत्र रहमान खूप नाराज झाले. शेवटी नौशाद यांनी अभिनेता गोविंदाच्या आईला म्हणजे गायिका निर्मलादेवी यांना फोन लावला आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. निर्मलादेवी त्यांना म्हणाल्या “नौशाद साब आपने मुझे फोन करके याद किया यही मेरे लिये बहुत कुछ है. मै कल ही मेरे बेटे को लेकर आपके ऑफिस आती हूं.”
त्याकाळात निर्मलादेवी यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना पाठदुखीचा प्रचंड त्रास होत होता. तशा अवस्थेत त्या दुसऱ्या दिवशी गोविंदाला घेऊन नौशाद यांच्या ऑफिसमध्ये गेल्या. तिथे जाऊन त्यांनी गोविंदाला सांगितले, “ये रहमान नौशाद तुम्हारे बडे भाई जैसा है और तुम्हे इनकी फिल्म काम करना है.”
गोविंदा आपल्या आईच्या शब्दाबाहेर नव्हता. त्याने तिथल्या तिथे होकार दिला. त्याने स्टोरी ऐकली नाही किंवा कोण अभिनेत्री त्याच्यासोबत काम करणार हे देखील विचारले नाही. नौशाद यांनी मानधनाविषयी विचारले, त्यावेळी गोविंदा म्हणाला “बडे भाई से छोटा भाई कैसे पैसे ले सकता है?” हे उत्तर ऐकून नौशाद यांच्या डोळ्यात पाणी आले.
निर्मलादेवीच्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या संगीताने जादू निर्माण करणाऱ्या नौशाद यांना मागच्या काही दिवसांमध्ये अतिशय कटू अनुभव येत होते. अशा परिस्थितीत त्यांना गोविंदाकडून अनपेक्षित आणि सुखद अनुभव मिळाला.
======
हे देखील वाचा – जेव्हा हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गेअर आणि शिल्पा शेट्टीची ‘किसिंग स्टोरी’ कोर्टात पोचली!
======
पुढे हा चित्रपट तयार झाला. यातील गाणी खूप चांगली होती. लता मंगेशकर खूप वर्षांनी त्यांच्याकडे गायल्या. पण हा सिनेमा चुकीच्या काळात आला होता.आधी म्हटल्यासारखे नौशाद यांच्या गाण्याची पारख करणारा प्रेक्षक वर्ग आता राहिला नव्हता. त्यामुळे हा चित्रपट फ्लॉप गेला. या चित्रपटाचे नाव होते ‘तेरी पायल मेरे गीत’.