दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
गेला कलादर्पण कुणीकडे? संस्कृती कलादर्पण पुरस्कारावरून नवा वाद
मराठी मनोरंजनसृष्टीवर नजर टाकत जसे मागे मागे जाऊ तसतसे पुरस्कार सोहळे कमी होत जातात. कारण अलिकडे या पुरस्कारांचं प्रमाण वाढलं आहे. आता तर प्रत्येक चॅनलचा आपला असा पुरस्कार सोहळा असतो. पण खूप आधी म्हणजे साधारण २० वर्षांपूर्वी वगैरे इतके पुरस्कार सोहळे नव्हते.
त्यावेळी अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील तेवढेच पुरस्कार सोहळे होते. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो या चार पुरस्कारांचा. महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार.. झी गौरव पुरस्कार.. मटा सन्मान हा महाराष्ट्र टाइम्सद्वारे दिला जाणारे पुरस्कार आणि चौथा होता संस्कृती कलादर्पण पुरस्कार.
सध्या बाकी इतर सगळे पुरस्कार सोहळे ठरलेल्या नियोजनानुसार होताना दिसतायत. अपवाद आहे तो संस्कृती कलादर्पण या पुरस्काराचा. कारण, या पुरस्काराच्या नावाच्या मालकीवरून संस्कृती कलादर्पणचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे आणि संस्कृती कलादर्पणच्या विद्यमान अध्यक्षा अर्चना नेवरेकर यांच्यात वाद पेटला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे शीतयुद्ध चालू होतं. परंतु आता सांस्कृतिक कलादर्पण या पुरस्काराची नामांकनं जाहीर झाल्यानंतर हा वाद तीव्र झाला आहे.
संस्कृती कलादर्पण या पुरस्काराची सुरूवात चंद्रशेखर सांडवे यांनी १९९८ पासून केल्याचा दावा केला आहे. या पुरस्काराचे संस्थापक तेच होते. या पुरस्काराच्या आयोजनात अर्चना नेवरेकर यांनी सहभागी होण्याची इच्छा दर्शवली आणि २०१२ च्या आसपास अर्चना नेवरेकर या संस्कृती कलादर्पण या संस्थेत आल्या.
अर्चना नेवरेकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार आज संस्कृती कलादर्पणचे विश्वस्त म्हणून असलेल्या ९ सदस्यांपैकी ५ सदस्य नेवरेकर यांच्या बाजूचे आहेत, तर चार सदस्य सांडवे यांच्या बाजूचे आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सांडवे स्वत: संस्कृती कलादर्पणच्या ट्रस्टवर असताना त्यांनी सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार सुरू केले आहेत. इतकंच नव्हे, तर हे पुरस्कार सुरू केल्यानंतर त्याचं लेटरिंग संस्कृती कलादर्पण सारखंच असल्यानं लोकांचा संभ्रम होतो, असा दावा त्या करतात.
यासंदर्भात त्यांनी एक खुलासाही माध्यमांसाठी पाठवला आहे. या लेखाच्या शेवटी तो देतो आहेच. त्याचवेळी चंद्रशेखर सांडवे यांनीही आपल्या बाजूचा खुलासा माध्यमांना पाठवला आहे. हे दोन्ही खुलासे एकमेकांसमोर धरले असता या दोघांमध्ये काही कारणाने तयार झालेली मतभिन्नता या वादाला कारणीभूत असल्याचं दिसतं.
खरंतर, कोणताही पुरस्कार हा काळानुरूप मोठा होतो. संस्कृती कलादर्पण या पुरस्काराबद्दलही मराठी मनोरंजसृष्टीत निश्चित अशी मतं आहेत. मटा सन्मान, झी गौरव यांच्यासोबतच संस्कृती कलादर्पणने आपली अशी धोरणं या पुरस्काराबद्दल आखली होती. त्या धोरणांनिशी हा पुरस्कार वाटचाल करत होता. असं असताना या पुरस्काराचं नाव मनोरंजनसृष्टीत होणं हे स्वाभाविक होतं.
आता आपलं विशिष्ट नाव कमावल्यानंतर या पुरस्काराच्या नावावरून आयोजकांमध्ये होणाऱ्या वादामुळे या गोंधळात भर पडते आहे. एकिकडे आयोजक सांडवे आपला सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार हा २४ वर्षांचा असल्याचा दावा करतायत. वास्तविक संस्कृती कलादर्पण या नावाने हा पुरस्कार दिला जात असल्याने सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार कसा काय २४ वर्षांचा होतो, असा प्रश्न अर्चना नेवरेकर उपस्थित करतायत.
या सगळ्या प्रकारामुळे मराठी मनोरंजनसृष्टीत मात्र नव्या वादाची भर पडली आहे हे निश्चित आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सांडवे आणि नेवरेकर यांनी आमने सामने येऊन त्यातून मार्ग काढणं हेच त्या पुरस्काराच्या आणि ज्यांना आगामी काळात सांस्कृतिक कलादर्पण आणि संस्कृती कलादर्पण पुरस्कार मिळणार आहेत त्यांच्या भल्याचं असणार आहे. कारण, कोणताही पुरस्कार मिळणं ही निश्चितच अभिमानाची बाब असते. अशा वादांमुळे त्या वादात सापडलेले पुरस्कार काळवंडतात हे लक्षात घ्यायला हवं.
=====
हे देखील वाचा – सरकारनामा: सिस्टीममध्ये टिकून राहायचं असेल, तर सिस्टीम समजून घेणं आवश्यक आहे
=====
आता या पुरस्कारांच्या हक्कांबाबत अर्चना नेवरेकर आणि चंद्रशेखर सांडवे यांनी मांडलेल्या आपआपल्या बाजू जशा आल्यात तशा.. पाहू.
अभिनेत्री, निर्माती आणि संस्कृती कलादर्पणच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर यांनी या पुरस्कारांबाबत केलेला खुलासा असा,
नमस्कार, मी अर्चना नेवरेकर !
आपणा सगळ्यांना लोकांना कळवू इच्छिते की, सातत्याने मागील १२ वर्ष “संस्कृती कलादर्पण अवॉर्ड” हा “अर्चना नेवरेकर फाउंडेशन”च्या अंतर्गत होत आहे.
मात्र श्री. चंद्रशेखर सांडवे यांच्या व्यक्तिगत अडचणीमुळे त्यांनी स्वतःच्या निर्णयाने आम्हाला काहीही न कळवता, न सांगता “संस्कृतिक कला दर्पण” या नावाने पुरस्कार सुरू केला आणि संस्कृती कलादर्पण सारखेच नाव वापरून लोकांची दिशाभूल करत आहेत. आम्ही ट्रस्टी म्हणून याची लेखी तक्रार धर्मादाय आयुक्तांकडे रीतसर केली आहे .आणि ह्यावर कारवाई सुरू आहे याची कृपया नोंद घ्यावी .
आणि आपल्या संस्थेचे एकही अवॉर्ड झाले नसताना २४ वर्ष असे टाकून… लोकांना संभ्रमात टाकून खोटी प्रसिध्दी ते करत आहेत.
माझे या मनोरंजन इंडस्ट्रीचे खूप वर्षाचे नाते आहे! त्या प्रेमापोटी मी स्वतःचे फंडस वापरून हे अवॉर्ड करत आहे. कारण मी स्वतःला या कुटुंबाचा एक भाग मानते आणि नटेश्वराच्या आशीर्वादाने पुढील घोषणा करूच, आपले आशीर्वाद असू द्या.
– अध्यक्षा – संस्कृती कला दर्पण. कलादर्पण फाउंडेशन आणि अर्चना नेवरेकर फाउंडेशन
यावर चंद्रशेखर सांडवे यांनीही आपली बाजू सोशल माध्यमांमधून मांडली आहे, ती अशी,
जन पळ भर म्हणतील हाय हाय ..कोणा वाचून राहील काय ..( भा. रा. तांबे ) सांस्कृतिक कलादर्पणची काल नामांकने जाहीर झाली आणि आज पोटशूळ उठले आहे. असो… सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व संबंधित व्यक्तींना या पत्राद्वारे खुलासा वजा आवाहन आणि गैरसमज दूर करण्या संदर्भात लिहीत आहे. १९९८ साली मी सांस्कृतिक कलादर्पण नावाने संस्था चालू केली त्यानंतर रीतसर धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टरही केली. २००० साली त्याची नोंद केली पण त्यावेळी नाव बदलून सांस्कृतिकऐवजी संस्कृती कलादर्पण नावाने ही संस्था रजिस्टर केली. या संस्थेअंतर्गत शालेय, महाविद्यालयिन आणि व्यावसायिक नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका आणि मीडिया यांच्या स्पर्धेतून पुरस्कार देण्याचे काम चालू झाले. पण हे करीत असताना मी माझे स्वतःचे पैसे लावून आणि जाहिरातदाराकडून पुरस्कार सोहळे करीत होतो. पण मधल्या काळात २०१२ साली कोण एक व्यक्ती संपर्कात आली आणि संस्थेत दाखल झाली. संस्थेत घेण्या मागचा हेतू चांगला होता म्हणजे (कार्यक्रमाला ती व्यक्ती पैसे लावेंन या दृष्टीने) पण मात्र घडत वेगळेच होते. ती व्यक्ती २०१३ पासून कोणालाही न विचारता स्वतः अध्यक्ष आहे म्हणून सांगू लागली आणि प्रत्येक ठिकाणी छापू देखील लागली (तरी मी गप्प होतो. त्यांनंतर अनेक गोष्टीमुळे खटके उडू लागले तरी मी शांत डोक्याने काम करीत होतो. पण २०१९ मध्ये एक मोठा वाद झाला आणि माझ्यावर ×× ××× ×× तरी मी गप्प राहिलो कारण माझ्या कुटुंबातील लोकांनी समजावले म्हणून. त्या वादामध्ये असे ठरले की (मला सांगताना ) जर तुम्ही एकट्याने परत पुरस्कार सोहळा सुरू केला तर तो संस्कृती कलादर्पण नावाने करू नये आणि आम्ही पण करणार नाही. या निर्णयामुळे मी मूळ नावाचा पुरस्कार सुरू केला. त्यामुळे त्रास काय ते पण करीत आहेत ‘कलादर्पण’ नावाने मी काही बोललो का? दोन वर्षांपूर्वी मी फॉर्म सुद्धा सांस्कृतिक कलादर्पण नावाने काढले. आता त्रास हा होतो आहे की मी २४ वर्षं असे का लावले कारण मी २४ वर्षे पुरस्कर सोहळा करतोय त्यामुळे मी २४ लावले तर बिघडले कुठे आणि पाहिले वर्ष लिहले तरी माझा पुरस्कार देण्याचा हेतू थोडाच बदलणार आहे. कारण तो मी मनापासून करत आहे. दोन वर्षांपूर्वी सुद्धा बदनामी केली. आता आज ही केली आहे आणि आता जर तिसऱ्या वेळी जर केली तर मला माझी झाकली मूठ खोलावी लागेल आणि इन कॅमेरा चौकशी लावू शकतो. मुळात मीच या सर्व प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी धर्मदायमध्ये तक्रार केलेली आहे. मी मिरवत नाही एवढंच खर संस्थेचा मूळ प्रमाणपत्रावर अध्यक्ष आणि संस्थपक मीच आहे आणि अजूनही कायदेशीर अध्यक्ष आहे. हवं तर RTI टाकून पाहू शकता. अजून बरचं काही आहे आता फक्त 1% बोलो आहे नाहीतर …..!!!!
– चंद्रशेखर सांडवे (सांस्कृतिक कलादर्पण- अध्यक्ष-संस्थापक/संस्कृती कलादर्पण अध्यक्ष-संस्थापक)