या सुपरहिट सिनेमांमधील नायकाच्या भूमिकेसाठी राजेश खन्ना First Choice नव्हता!
आपल्याकडे समाजात पुरुषसत्ताक पध्दती सर्वमान्य असल्याने कदाचित हिंदी सिनेमामध्ये सुरुवातीपासूनच नायकाचं महत्व अधिक आहे. खरंतर सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम असतं, पण आपल्याकडे ‘हिरो ओरिएंटेड सिनेमा’ असल्याने आणि तसाच प्रेक्षकवर्ग तयार झाल्यामुळे कायम आपण सिनेमाकडे नायकाचा सिनेमा म्हणूनच पाहतो.
अर्थात चित्रपटाच्या नायक पदी कोणाची वर्णी लागेल आणि कोणाचा पत्ता कधी कट होईल हे सांगता येत नाही. बऱ्याचदा नायकाची चलती असेल, तर त्याच्याकडे भूमिकांचा पाऊस पडतो. पण कधीकधी परिस्थिती उलट देखील असू शकते. सुपरस्टार राजेश खन्ना याने सलग १७ सुपरहिट सिनेमा देण्याचा विक्रम केला आहे जो आजवर दुसऱ्या कुणालाही मोडता आला नाही.
याच राजेश खन्नाच्या बाबतीत अनेक किस्से आजही चवीने सांगितले जातात. आज आपण अशाच एका वेगळ्या पैलू वर नजर टाकणार आहोत. या लेखात समाविष्ट झालेल्या सर्व सिनेमांचा नायक राजेश खन्ना आहे. पण हे सिनेमा निर्मिती अवस्थेत असताना या चित्रपटाचा नायक हा दुसराच कोणीतरी होता. याचाच अर्थ या सिनेमांची पहिली पसंती (First Choice) राजेश खन्ना नव्हता.
त्याकाळी हरेक निर्माता राजेश खन्नाला आपल्या सिनेमात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा, पण त्याचे मानधन, त्याच्या तारखा या साऱ्याचा मेळ बसायचा नाही. त्यावेळी गंमतीनं म्हटलं जायचं ‘उपर आका नीचे काका!’.
त्याकाळात प्रसिध्द झालेल्या सिने नियतकालिकातून या सर्व बातम्यांचा खुलासा व्हायचा. अर्थात बरीच मासिकं ही ‘गॉसिप’ टाईप होती. त्यामुळे सत्यता तपासणं तसं कठीणच. पण आज चाळीस-पन्नास वर्षानंतर आपण जेव्हा ही मासिकं पाहतो, वाचतो त्यावेळी या बातम्या वाचून आश्चर्य वाटतं, करमणूकही होते आणि मनात मग “असं झालं असतं तर?” असे प्रश्न येवून आपण कल्पना रंजन करू लागतो.
इत्तफाक आणि दो रास्ते
या सिनेमांचा आपण जेव्हा शोध घेऊ लागतो त्यात पहिल्यांदा डोळ्यापुढे येतो १९६९ साली प्रदर्शित झालेला बी आर चोप्रा यांचा ‘इत्तफाक’. या चित्रपटात राजेश खन्नाने एका मनोरुग्णाची भूमिका केली आहे, ज्याच्यावर त्याच्या पत्नीच्या खुनाचा आरोप आहे. हा सिनेमा १९६५ साली आलेल्या ‘साईन पोस्ट टू मर्डर’ या अमेरिकन मूव्हीवर बेतला होता. याच कथानकावर आपल्याकडे श ना नवरे यांनी ‘धुम्मस’ हे नाटक लिहिले होते.
या सिनेमासाठी सुरुवातीला बी आर चोप्रा यांची पहिली पसंती ‘राजकुमार’ होता. परंतु राजकुमार या वेळी चेतन आनंद यांच्या ‘हिर रांझा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने त्यांनी नकार दिला. नंतर चोप्रांनी शत्रुघ्न सिन्हा यांना या भूमिकेसाठी विचारले. परंतु, त्यांनीदेखील या भूमिकाला पसंती दिली नाही. यानंतर ते राजेश खन्नाकडे आले. तो या भूमिकेच्या प्रेमातच पडला आणि चटकन होकार दिला. त्याने ती भूमिका परफेक्ट निभावलीही.
या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान त्याचे ‘दो रास्ते’ चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. ‘इत्तफाक’ हा सिनेमा अवघ्या महिनाभरात पूर्ण करायचे ध्येय बी आर चोप्रा यांनी ठरवले होते. या संपूर्ण सिनेमात राजेश खन्ना दाढीत दाखवला आहे. याच दरम्यान ‘दो रास्ते’ मधील ‘ये रेशमी जुल्फे ये शरबती आंखे’ गाण्याचे चित्रीकरण करायचे होते. ‘इत्तफाक’ मधील भूमिकेमध्ये कंटिन्युटीचा अडथळा येऊ नये म्हणून त्याने ‘दो रास्ते’ मधील या गाण्यात आपला ‘इत्तफाक’ चा ‘लूक’ तसाच ठेवला आणि गाणे चित्रीत केले.
तुम्ही पहा ‘दो रास्ते’ या सिनेमामध्ये फक्त या गाण्यातच राजेश खन्नाला दाढी आहे. (तो ‘इत्तफाक’च्या सेट वरून तसाचा आला होता!). याच वर्षी राजेश खन्नाचा राज खोसला दिग्दर्शित ‘दो रास्ते’ हा सिनेमा देखील प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात खरं तर राजेश खन्नाच्या जागी खोसला यांनी संजय खानला घेतले होते. पण संजय खान याने मानधनाची रक्कम जास्त सांगितल्याने त्याचा पत्ता कट होऊन तिथे राजेश खन्नाची वर्णी लागली.
‘सच्चा झूठा‘
१९७० साली मनमोहन देसाई यांच्या ‘सच्चा झूठा’ या चित्रपटात राजेश खन्नाचा ‘डबल रोल’ होता. या सिनेमाच्या निर्मितीच्या वेळी मनमोहन देसाई यांच्या नजरेसमोर आधी शशी कपूर यांचे नाव होते. परंतु शशी कपूरला ज्यावेळी या सिनेमाची नायिका मुमताज आहे हे कळले त्या वेळी त्याने नकार दिला. कारण तेव्हा मुमताजवर बी आणि सी ग्रेडच्या सिनेमाची नायिका असा शिक्का होता. गंमत म्हणजे मुमताज स्टार बनल्यानंतर शशि कपूरने तिच्या सोबत काही भूमिका केल्या (प्रेम कहानी, चोर मचाये शोर). आज राजेश खन्ना शिवाय दुसऱ्या कुणाचा विचार आपण ‘सच्चा झूठा’ मधील चित्रपटासाठी करू शकत नाही.
मेहबूब की मेहंदी
१९७१ साली एच एस रवैल यांचा ‘मेहबूब की मेहंदी’ हा मुस्लीम सोशल सिनेमा आला होता. हा सिनेमा सात-आठ वर्षांपूर्वीपासून निर्मिती अवस्थेत होता. सुरुवातीला त्यावेळी या सिनेमाचा नायक प्रदीप कुमार होता पण पुढे काही काळ सिनेमा डब्यात गेला. पुन्हा नव्याने सुरुवात झाली त्या वेळी या सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट बदलली गेली. आता नायक म्हणून राजेश खन्ना, तर नायिका म्हणून लीना चंदावरकरचा समावेश झाला. तर, प्रदीप कुमार या सिनेमात चरित्र अभिनेते म्हणून झळकले.
आनंद
ऋषिकेश मुखर्जी यांचा ऑल टाईम ग्रेट सिनेमा म्हणजे ‘आनंद’. या सिनेमात खरंतर आधी राज कपूर प्रमुख भूमिकेमध्ये असणार होते. परंतु नंतर त्यांनी स्वतः या सिनेमात काम करायला नकार दिला. त्यानंतर किशोर कुमार, धर्मेंद्र, उत्तम कुमार, शशि कपूर यांच्या नावाचा देखील विचार झाला होता. पण म्हणतात ना ‘दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम’ ही भूमिका राजेश खन्नाचीच होती आणि त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम अभिनयाचा आविष्कार त्याने या सिनेमातून दाखवून दिला.
हाथी मेरे साथी
याच वर्षी राजेश खन्नाचा आणखी एक सिनेमा आला होता, या सिनेमाने राजेश खन्ना बच्चे कंपनीचा लाडका हिरो ठरला. हा सिनेमा होता ‘हाथी मेरे साथी’ दैवर चिन्नापा देवर यांनी सुरुवातीला खरंतर संजय खान यांना घेण्याचे ठरवले होते. पण पुढे चक्र फिरली आणि या सिनेमात राजेश खन्ना यांचा समावेश झाला.
१९७२ साली शक्ती सामंत यांचा ‘अमरप्रेम’ हा अप्रतिम सिनेमा आला होता. या सिनेमामध्ये सुरुवातीला राजकुमार यांना घेण्याचे शक्ती सामंत यांनी ठरवले होते. पण ज्यावेळी राजेश खन्नाला ही बातमी कळली त्यावेळी तो शक्ती सामंत यांना म्हणाला “आराधना आणि कटी पतंग हे दोन सिनेमा मी आपल्या सोबत केले आहेत. मग ‘अमरप्रेम’ सारख्या महत्त्वाच्या सिनेमात तुम्ही माझ्या नावाचा विचार का करत नाही?” त्यावेळी शक्ती सामंत यांनी राजेश खन्नाला सांगितले “जरा तुम्ही तुमची डायरी बघून सांगा पुढच्या सहा महिन्यात तुमच्याकडे एक तरी तारीख शिल्लक आहे का?”
राजेश खन्नाने त्याच्या सेक्रेटरीला बोलावून डायरी चेक केली. त्यावेळी त्यांना शक्ती सामंत यांचे बोलणे पटले. परंतु ‘अमर प्रेम’ सारखा चांगला सिनेमा हातातून सोडणं त्यांना योग्य वाटलं नाही. त्यांनी शक्ती सामंत यांना प्रॉमिस केलं की, पुढचे सहा महिने रोज चार तास मी या सिनेमाच्या शूटिंगसाठी देईल. राजेश खन्नाने आपलं बोलणं खरं केलं आणि ही अप्रतिम कलाकृती आपण राजेशच्या रुपात पाहू शकलो.
अपना देश
१९७२ सालीच ‘अपना देश’ या दाक्षिणात्य सिनेमात देखील राजेश खन्ना चमकला होता. ही भूमिका देखील आधी राजेंद्र कुमार यांना ऑफर झाली होती परंतु त्यांनी या भूमिकेसाठी अधिक मानधन सांगितल्यामुळे ही भूमिका राजेश खन्नाच्या वाट्याला आली.
रोटी
१९७४ साली मनमोहन देसाई यांच्या ‘रोटी’ या चित्रपटात राजेश खन्नाची भूमिका होती. ही भूमिका खरंतर आधी शत्रुघ्न सिन्हा यांना मिळणार होती. एका फिल्मी मॅगझिनमध्ये त्यांनी याचा खुलासा केला होता. ‘रामपूर का लक्ष्मण’ या सिनेमाचे शूटिंग चालू असताना, मनमोहन देसाई यांनी शत्रुघ्न सिन्हाला प्रॉमिस केले होते की, त्यांच्या पुढच्या सिनेमात ते प्रमुख नायक असतील. परंतु ज्यावेळी ‘रोटी’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले त्या वेळी राजेश खन्ना प्रमुख नायक होता.
याचे कारण मनमोहन देसाई यांनी असे सांगितले की, त्यावेळी डिस्ट्रीब्युटर्स यांनी मनमोहन देसाई यांच्यावर मोठा दबाव आणला होता आणि जर सिनेमाचा नायक राजेश खन्ना नसेल, तर सिनेमाची खरेदी होणार नाही इतपत त्यांनी बोल सुनावले होते. त्यामुळे मनमोहन देसाई यांना राजेश खन्नाचा विचार करावा लागला.
बंडलबाज
१९७६ साली शम्मी कपूर दिग्दर्शित ‘बंडलबाज’ या सिनेमात देखील राजेश खन्नाच्या जागी आधी अमिताभ बच्चन यांचा विचार झाला होता. परंतु अमिताभ बच्चन त्यावेळी ‘बिझी स्टार’ असल्यामुळे ते डेट्स देऊ शकले नाहीत आणि तिथे राजेश खन्नाची वर्णी लागली.
जनता हवालदार
१९७९ साली प्रदर्शित झालेल्या ‘जनता हवालदार’ या सिनेमासाठी देखील मेहमूदला अमिताभ बच्चन हेच नायक म्हणून हवे होते. परंतु त्यावेळी देखील तारखांचा प्रॉब्लेम आल्यामुळे राजेश खन्नाला या सिनेमात नायक म्हणून घेण्यात आलं.
फिर वही रात
१९८० साली ली डॅनी डेंझोग्पा दिग्दर्शित ‘फिर वही रात’ या सस्पेन्स सिनेमासाठी आधी शशी कपूर यांचा विचार झाला होता. परंतु त्यावेळी ते होम प्रॉडक्शनमध्ये बिझी असल्यामुळे राजेश खन्ना या चित्रपटात आले.
धनवान
१९८१ साली सोहनलाल कंवर यांचा ‘धनवान’ हा सिनेमा आला होता. या सिनेमात खरं तर सोहनलाल कंवर यांना त्यांचे लाडके अभिनेते मनोज कुमार यांना घ्यायचे होते. कारण मनोज कुमारसोबत त्यांनी पहचान, संन्यासी, दस नंबरी असे हिट सिनेमे दिले होते. पण सिनेमाचे लेखक मिर्झा ब्रदर्स यांनी आवर्जून राजेश खन्नाला यामध्ये भूमिका दिली.
निशान
१९८४ साली दिग्दर्शक सुरेंद्र मोहन यांचा ‘निशान’ हा सिनेमा आला होता. यामध्ये आधीची स्टारकास्ट सुनील दत्त आणि रीना रॉय अशी होती. परंतु पुन्हा एकदा डिस्ट्रीब्यूटरच्या आग्रहामुळे राजेश खन्नाला घ्यावं लागलं आणि राजेश खन्ना सोबत पूनम धिल्लन हिची या सिनेमात एन्ट्री झाली झाली.
पापी पेट का सवाल है
१९८४ सालीच आलेल्या सोहनलाल कंवर यांच्या ‘पापी पेट का सवाल है’ या सामाजिक सिनेमामध्ये आधीची स्टारकास्ट मनोज कुमार, राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा अशी होती. परंतु मनोज कुमार याने हा सिनेमा सोडल्याने ती भूमिका राजेश खन्नाला देण्यात आली आणि राजेश खन्नाची भूमिका शत्रुघ्न सिन्हाला देण्यात आली. तर शत्रुघ्न सिन्हाची भूमिका कमलजीत या अभिनेत्याला देण्यात आली.
आज का एम एल ए राम अवतार
याच वर्षी म्हणजे १९८४ साली एक दाक्षिणात्य सिनेमा आला होता ‘आज का एम एल ए राम अवतार’. या सिनेमासाठी आधी दिलीप कुमार आणि नंतर अमिताभ बच्चन यांना विचारले गेले आणि दोघांच्या नकारानंतर ही भूमिका राजेश खन्ना यांना मिळाली.
आवाज
शक्ती सामंत यांचा १९८५ साली प्रदर्शित झालेल्या ‘आवाज’ या सिनेमासाठी आधी दिलीप कुमार आणि मनोज कुमार यांना विचारले होते. परंतु दोघांनी नकार दिल्यानंतर त्या जागी राजेश खन्ना आणि राकेश रोशन यांची वर्णी लागली.
मास्टरजी
१९८६ साली आलेल्या ‘मास्टरजी’ या साउथ इंडियन सिनेमासाठी निर्मात्याची पहिली पसंती होती अमिताभ बच्चन. परंतु अमिताभ बच्चन त्याकाळात राजकारणात असल्याने त्यांनी भूमिका नाकारली आणि ती राजेश खन्नाला मिळाली.
नसीहत
१९८६ सालीच ‘नसीहत’ हा सिनेमा देखील आला होता. या सिनेमामध्ये सुरुवातीला शशि कपूर आणि शबाना आजमी अशी स्टारकास्ट होती. परंतु शशी कपूरने शबाना सोबत काम करायला नकार दिला आणि तिच्या ऐवजी दुसरी नायिका घेण्याचा सल्ला दिला. परंतु निर्मात्याने शशी कपूर यांनाच वगळले आणि तिथे राजेश खन्नाला घेण्यात आलं.
==========
हे देखील वाचा – अभिनेता गोविंदाच्या उत्तराने संगीतकार नौशाद यांच्या डोळ्यात पाणी का आले?
==========
जय शिवशंकर
राजेश खन्नाचा अप्रदर्शित सिनेमा ‘जय शिवशंकर’ म्हणजे त्याचा होम प्रॉडक्शन सिनेमा होता. या सिनेमामध्ये सुरुवातीला राजेश खन्ना काम करणार नव्हता. तिथे विनोद खन्ना, मिथुन चक्रवर्ती आणि जॅकी श्रॉफ अशी स्टारकास्ट होती. पण पुढे सिनेमा रेंगाळला आणि समीकरणे बदलली. आता तिथे राजेश खन्ना, जितेंद्र आणि चंकी पांडे यांची वर्णी लागली. हा सिनेमा पूर्ण होऊन देखील आजवर प्रदर्शित झालेला नाही.
सिनेमा निर्मिती मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया असते. इथे उल्लेख केलेल्या सर्व घटना अशाच घडल्या असतील याची सुतराम शक्यता नाही. पण जुनी फिल्मी मासिके चाळली की त्यातून अशी मनोरंजक माहिती हाती येते.