‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
मराठी चित्रपटांविषयी प्रेक्षकांमध्ये एवढी अनास्था का आहे?
सध्याच्या काळात मराठीमध्ये उत्तमोत्तम चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तसं बघायला गेलं, तर अगदी फार पूर्वीपासून मराठीमध्ये चांगल्या कंटेंटची कमी अजिबात नव्हती. तरीही मराठी चित्रपटांना म्हणावं तसं यश मिळत नाही ही शोकांतिका आहे. अर्थात अलीकडच्या काही चित्रपटांमुळे ही समीकरणं बदलत आहेत, तरीही हे पुरेसं नाही.
मराठी चित्रपटसृष्टीचा विचार केला तर साधारणतः ६० ते ८० हा कालावधी ‘गोल्डन एरा’ समजला जातो. कारण या काळात मराठीमध्ये अनेक चित्रपट तयार झाले आणि ते सुपरहिटही झाले. यापैकी ६० ते ७० च्या दशकामध्ये तमाशापटांचा जमाना होता. तर ७० ते ८० च्या दशकावर दादा कोंडकेंनी अधिराज्य गाजवलं. त्यानंतरचं दशक अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, सचिन या कलाकारांच्या विनोदी चित्रपटांनी गाजवलं. (Marathi film industry vs bollywood)
१९९१ साली ‘माहेरची साडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला मिळालेल्या यशाने मराठी चित्रपटांमध्ये पुन्हा कौटुंबिक चित्रपटांचं युग आलं. परंतु यानंतर ५/ ६ वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीची झालेली घसरण लक्षात यायला लागली होती. हिंदीमध्ये तेव्हा ‘खान’ नावाची तीन पर्व उदयास येत होती. महाराष्ट्रामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीचं वेड प्रमाणाबाहेर वाढू लागलं होतं.
एकीकडे तीनही खान बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत होते. देशातील समस्त तरुणाईला त्यांनी वेड लावलं होतं, तर दुसरीकडे मराठी चित्रपट मात्र चाचपडत होते. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, सचिन यांचं पर्व संपल्यातच जमा होतं. त्यामुळे मराठीमध्ये ज्यांच्या नावावर चित्रपट चालतील असा कुठलाच कलाकार उरला नव्हता. असं नव्हतं की, यादरम्यान चांगले मराठी चित्रपट निर्माण झाले नाहीत. उलट या काळात मराठीमध्ये कित्येक चांगले चित्रपट बनले, पण बॉलिवूडच्या झगमटामागे ते झाकोळले गेले. (Marathi film industry vs bollywood)
याच सुमारास झालेल्या केबल टीव्हीच्या खास करून मराठी वाहिन्यांच्या आगमनामुळे चित्रपटांच्या व्यवसायावर थोडाफार परिणाम झालाच. कितीही नाकारलं तरी हे सत्यच आहे. कारण या दरम्यान मराठी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग म्हणजे महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय फारफार तर उच्च मध्यमवर्गीय असं एक अलिखित समीकरण तयार झालं होतं. नव्याने सुरु झालेल्या मराठी वाहिन्यांवर ‘विकेंडला’ मराठी चित्रपट दाखवले जात असत. त्यामुळे थिएटरमध्ये रिलीज झालेला चित्रपट चार/पाच महिन्यात कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर लागेल, असा विचार करून हा प्रेक्षकवर्ग थिएटरमध्ये चित्रपट बघणं टाळू लागला. याशिवाय केबलवर ‘पायरेटेड’ सीडीद्वारे अनेक चित्रपट दाखवले जात असत, हा मुद्दा विसरून चालणार नाही. (Marathi film industry vs bollywood)
याच दरम्यान तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने झाला आणि ग्लोबलाझेशनला सुरुवात झाली. यामुळे महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये ‘कॉर्पोरेट कल्चर’ वाढीस लागलं आणि मोठ्या प्रमाणावर अमराठी लोक शिक्षण, नोकरी आदी कारणांसाठी महाराष्ट्रात येऊ लागले आणि स्थायिकही झाले. NCERT च्या अभ्यासक्रमानुसार भारतामध्ये परराज्यामधून सर्वात जास्त नागरिक महाराष्ट्रामध्ये येतात. (Marathi film industry vs bollywood)
अमराठी लोकांमुळे दैनंदिन आयुष्यात मराठी कमी आणि हिंदी, इंग्रजी भाषेचा वापर वाढू लागला. अनेक ठिकाणी आज मराठी बोलणं कमीपणाचं समजलं जातं. महानगरांमध्ये रुजणाऱ्या संस्कृतीचं वेड पार छोट्या शहरांपर्यंत पसरलं आणि हळूहळू मराठीचं महत्त्व कमी होत गेलं. इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढू लागल्या आणि इंग्रजी बोलणं ‘स्टेटस सिम्बॉल’ बनत गेलं. याचा परिणाम चित्रपट बघण्याच्या रुचीवरही झाला.
एकुणातच मराठी चित्रपसृष्टीमध्ये असणारा ‘ग्लॅमर’चा अभाव हे या चित्रपटसृष्टीबद्दल प्रेक्षकांना असणाऱ्या अनास्थेचं महत्त्वाचं कारण आहे. मराठी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कंटेंट असतो, पण मुळात चित्रपट बनविण्यासाठीचं बजेट कमी असतं, तर त्याचं मार्केटिंग करण्यासाठी पैसा कुठून आणणार? दुनिया झगमगाटाला भुलते आणि मराठी चित्रपट यामध्येच कमी पडतात. (Marathi film industry vs bollywood)
दुसरा मुद्दा दाक्षिणात्य चित्रपसृष्टीचा. महाराष्ट्रामध्येही दाक्षिणात्य चित्रपटांचा खास असा प्रेक्षकवर्ग आहे. पण मुळात हे चित्रपट हिंदी भाषेत डब केले जातात. त्यामुळे ते देशभर बघितले जातात. कदाचित यामुळेच दाक्षिणात्य चित्रपटांचा खास असा प्रेक्षकवर्ग तयार झाला. मात्र हे मराठी चित्रपटांच्या बाबतीत झालं नाही / होतही नाही. आता मराठी चित्रपट का डब केले जात नाहीत, त्यामधल्या तांत्रिक गोष्टी काय आहेत, याबद्दल मला फारशी माहिती नाही, पण जर मराठी चित्रपट हिंदीत डब केले तर अमराठी लोकही ते बघू शकतील नव्हे बघतीलच! कारण तेवढा उत्तम कंटेंट मराठीमध्ये नक्कीच आहे. आणि असाच मराठी चित्रपटसृष्टीचा प्रसार होत जाईल.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकरांना जेवढी लोकप्रियता मिळते तेवढी भारतातील कोणत्याही चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मिळत नाही. याचा फायदा घेत तिथल्या कित्येक कलाकारांनी राजकारणामध्ये आपलं करिअर घडवलं आहे. अर्थात तो या लेखाचा मुद्दा नाही. पण याउलट परिस्थिती मराठीमध्ये आहे. मराठीमधल्या कलाकरांना प्रेक्षकांच्या प्रेमापेक्षा जास्त ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
दाक्षिणात्य चित्रपसृष्टीकडे भरपूर पैसा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिथल्या लोकांचं आपल्या भाषेवर नितांत प्रेम आहे. बरोबर उलट परिस्थिती महाराष्ट्रात आहे. दक्षिणेत सगळंच भव्यदिव्य असतं, मग ती मंदिरे असोत वा चित्रपट. तिकडे चित्रपटांचा फर्स्ट-डे-फर्स्ट शो पाहणं म्हणजे ‘स्टेटस सिम्बॉल’ समजलं जातं. चित्रपटांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अथवा अन्य गोष्टींसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करताना तिथला निर्माता कचरत नाही कारण तिथली जनता प्रचंड चित्रपटप्रेमी आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे कलाकारांचे ‘फॅन क्लब’. आपल्या आवडत्या कलाकारासाठी कितीही पैसे खर्च करून कलाकाराचे फॅन्स चित्रपटगृहात येणार याची खात्री निर्मात्याला असते. इथे मुद्दा पुन्हा कलाकारांचा आहे. मराठीमध्ये आजच्या घडीला स्वतःच्या नावावर गर्दी खेचू शकेल असा एकही कलाकार नाही. अर्थात तीच गत आता हिंदीमध्येही होऊ लागली आहे. हिंदीमध्ये नावावर गर्दी खेचू शकेल असे कलाकार आता जवळपास नाहीतच. असो. आपला मुद्दा मराठी चित्रपटांचा आहे.
सध्या मराठीमध्ये चांगले चित्रपट बनत आहेत. अलीकडेच बातमी वाचली ‘धर्मवीर…मुक्काम पोष्ट ठाणे’ या चित्रपटासाठी रितेश देशमुखने आपल्या ‘अदृश्य’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकललं. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. इंडस्ट्रीमध्ये एकमेकांना सपोर्ट करून पुढं जाणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस येतील अशी आशा मनात जागरूक होत असताना पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टी आपल्या जुन्या एकाच पठडीतले चित्रपट काढण्याच्या ‘स्टाईल’कडे परत जाताना दिसतेय.
======
हे देखील वाचा – डर: चित्रपटाच्या निर्मितीमध्ये हृतिक रोशनने निभावली होती महत्वाची भूमिका
=====
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर एकाचवेळी अनेक चित्रपट बनू लागले आहेत. हे टाळायला हवं. एकाने केलं म्हणून दुसऱ्यानेही करायचं; मी अधिक चांगलं करू शकतो किंवा मलाही तेच करायचं आहे, ही विचारसरणी बदलायला हवी. कारण आता स्पर्धा फक्त बॉलिवूडशी नाहीये तर, दाक्षिणात्य चित्रपटांशीही आहे. शिवाय हॉलिवूडचे चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सही स्पर्धेत आहेत. तेव्हा स्पर्धेत टिकायचं असेल तर, मराठी इंडस्ट्रीने स्वतःला बदलायला हवं तरच प्रेक्षकांची विचारसरणी बदलेल. अन्यथा या लाटेत मराठी चित्रपट कुठे हरवून जातील ते कळणारही नाही.