दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सोशल मीडियाने आणली बौद्धिक दिवाळखोरी चव्हाट्यावर
गेल्या काही दिवसांपासून मी घडलंय बिघडलंय हे सदर सुरू केलं आहे. इंडस्ट्रीत घडणाऱ्या ताज्या घडामोडींचं बिंब-प्रतिबिंब आपण या लेखांमध्ये पाहात असतो. गेल्या दोन दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला उधाण आलं आहे. तो आहे पवारांवरच्या पोस्टचा. (Social media post against Sharad Pawar)
या प्रकरणात कळंबोली इथे राहणारी ‘माजी अभिनेत्री’ सहभागी असल्यामुळे हा विषय मनोरंजन इंडस्ट्रीशी संबंधित आहे, असं काहींना वाटतं. पण हा विषय निव्वळ राजकीय आहे. ज्या पोस्टवरून सध्या वादळ उठलं आहे, ती पोस्ट केवळ राजकीय नेत्याशी संबंधित आहे. या पोस्टचं आणि त्यात वापरलेल्या भाषेचं समर्थन करता येणारं नाहीच. पण पुन्हा मुद्दा असा येतो की, ते तिचं व्यक्तीगत मत आहे. त्यामुळे त्यात संपूर्ण इंडस्ट्रीला गोवणं कितपत योग्य आहे, हाही प्रश्न आहे.
मुद्दा असा की, घडलंय बिघडलंय या सदरात पवारांबद्दलची पोस्ट आणि एकूणच मनोरंजनसृष्टी असा विषय घेणं हे काही फार पटत नव्हतं. पण या पोस्टमुळे आणि त्यानंतर उठलेल्या चर्चेतून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या मात्र यानिमित्ताने वाचकांसमोर ठेवणं गरजेचं वाटतं.
व्हायरल झालेली पवारांबद्दलची पोस्ट.. त्यानंतर झालेली अटक.. मग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेले निषेध.. इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी याबद्दल नोंदवलेली मतं.. हे सगळं एकिकडे. खरंतर या सगळ्या प्रकरणात कोर्ट न्याय निवाडा करेलच. पण ज्या पोस्टमुळे हे वादळ सुरू झालं.. ती पोस्ट ॲड. नितीन भावे यांनी लिहिलेली दिसते. ती पोस्ट शेअरही त्याच नावाने झाली.
कोण आहेत ते नितीन भावे? ती पोस्ट शेअर केल्याबद्दल कळंबोली गाठून पोलिसांनी संबंधित अभिनेत्रीला अटक केली तेही योग्य. पण मुळात ही पोस्ट ज्यांनी लिहिली त्यांच्याबद्दल अजून कुणीच काही फार बोललेलं नाही. ना त्यांना अद्याप अटक झालेली बातमी कानावर आलेली आहे, असं का? (Social media post against Sharad Pawar)
खरंतर या प्रकरणाचा मनोरंजनसृष्टीशी दुरान्वयेही संबंध नाही. पण यात एक गोष्ट आवर्जून नमूद करावी वाटते की, या गोष्टी मनोरंजनसृष्टीला नव्या नाहीत. मराठी सिनेमा, मालिका, टीव्ही इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांना, दिग्दर्शकांना वारंवार ट्रोल केलं जातं.. वारंवार अपमानास्पद भाषा वापरली जाते. आत्ता विषय शरद पवार यांच्यावरच्या पोस्टचा चालू आहे. पण यापेक्षा कितीतरी खालची पातळी गाठून वेगवेगळे आयटी सेल कलाकारांना ट्रोल करत असतात. फेक अकाऊंट्स काढून.. खोटी नावं घेऊन.. ही मंंडळी ठरवून एकेकाला टार्गेट करत असतात. कलाकारांची व्यक्तिगत आयुष्य ओरबाडून ओरबाडून काढत असतात. त्यावेळी आज दिसते आहे तशी चपळाई कुणीच दाखवत नाही. असं का? (Social media post against Sharad Pawar)
सोशल मीडियाचा वापर मुक्त हस्ताने करता यावा म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाने आपआपले आयटी सेल्स कार्यान्वित केले. आता तर हे उघड गुपित झालं आहे. या काळ्या फौजा पोसण्यासाठी लाखो रुपयांची तजवीज केली जातेय. आता हे विष आपल्या समाजात पुरतं पसरलं आहे. केलेली पोस्ट आक्षेपार्ह आहे असं आज आपण कितीही गळा रेकून सांगत असलो तरी ज्या पोस्टवरून वादळ उठलं आहे त्या पोस्टला हजारोंनी लाईक्स आणि तितकेच शेअर्स आहेत याचं आपण काय करायचं? याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय. असं का ?
प्रश्न फक्त एका पोस्टचा नाहीये. यापूर्वी इतरही अनेक राजकीय बड्या नेत्यांची चेष्टा-मस्करी झालेली आहे. याची सुरूवात कुणी केली? मोठमोठ्या सभांमध्ये विरोधकांना हस्यास्पद पातळीवर नेऊन ठेवणे.. त्यांची मिमिक्री करणे.. त्यांना बेगडी उपमा देणे.. काही सभांमध्ये अनेक महत्वाच्या विषयांची खिल्ली उडवणे, हा सगळा प्रकार राज्यातल्या जवळपास सर्वच नेत्यांनी केलेला आहे. तोच प्रकार उद्या त्यांचे कार्यकर्ते फॉलो करणार आहे हे आपल्या लक्षात येत नाहीये. एखाादी भूमिका घेणं आणि भूमिका घेताना मुद्दा सोडून संबंधित व्यक्तीला दूषण देणं, हे लक्षण आपल्याला अराजकाकडे नेणारं आहे. (Social media post against Sharad Pawar)
आपण एक लक्षात घ्यायला हवं. या एका थुकरट पोस्टमुळे पवारांच्या ताकदीत आणि त्यांच्या आगामी व्यूहरचनेत तसूभरही फरक पडणार नाही. तसा तो इतरही नेत्यांबाबत पडणारा नाही. कारण, हा सगळा सोशल मीडियावरचा खेळ आहे. पण पवारांना बोल लावले म्हणून संबंधित व्यक्तीला अटक होणार असेल, तर तोच न्याय इतर क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची मानहानी करणाऱ्यांना पण असायला हवा.
आज आपण ज्या महाराष्ट्रात राहातो तिथलं राजकीय वातावरण पुरतं गढूळ झालेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. याला बहुत करून तीन वर्षांपूर्वी तुटलेली युती कारणीभूत आहे, हे नाकारून चालणार नाही. यात तेव्हाही सामान्य माणसाच्या भावनांचीच होरपळ झाली होती. आपआपल्या तत्वांना मुरड घालून तडजोडीचं राजकारण सुरू झालं तेव्हाच इथून पुढची पाच वर्ष राज्यात ‘साम दाम दंड भेद’ यांचा राजकीय पातळीवर उगम होणार, हे उघड होतं. तसंच होतं आहे. यात तेल ओतण्याचं काम सोशल मीडिया आणि त्यातल्या व्हायरल पोस्ट करताना दिसतायत. (Social media post against Sharad Pawar)
कर्म धर्म संयोगाने आता यात कलाकार मंडळीही उडी ठोकू लागले आहेत. कारण, आज आपण कुणाचीच बाजू न घेता उभे राहिलो, तर उद्या आपल्यावर काही प्रसंग गुदरला तर आपल्या पाठिशीही कोणीच उभं राहणारं नाहीये हे कदाचित त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळेच अनेक मराठी कलाकार आता या सगळ्या प्रकाराला उघड पाठिंबा देताना दिसतायत. राजीकय नेत्यांना.. वृत्तवाहिन्यांना.. बातम्यांना तेच हवंय. (Social media post against Sharad Pawar)
==========
हे देखील वाचा – मायानगरीचे स्थलांतर – ये अंदर की बात है!
==========
पवारांवर केलेल्या पोस्टबद्दल अटक केल्यानंतर ज्या लोकांना केलेल्या कृत्यात काहीच आक्षेपार्ह वाटत नाही… ज्यांच्या चेहऱ्यावरचा ‘माज’ या कृत्याने कैक पटीने वाढलेला दिसतो तेव्हा आपण हे लक्षात घ्यायला हवं की काहीतरी पाठिशी असल्याशिवाय कुणीच इतकी मोठी जबाबदारी स्वीकारत नाही. मग ती कंगना असो किंवा दिपाली सय्यद. प्रत्येकाने आपआपले पाठिराखे जमवले आहेत. त्या पाठिराख्यांनी त्यांना वाचवण्याचा चंग बांधलेला आहे. हे जर आपल्याला समजत असूनही आपण गप्प बसत असू, तर आपण एकच प्रश्न स्वत:ला विचारायला हवा.. असं का?