दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
या कारणासाठी दिलीप कुमारांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकून येरवडा जेलमध्ये स्थानबध्द केले होते
हिंदी सिनेमातील महान अभिनेता दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं हे शताब्दी वर्ष चालू आहे. अभिनयाची एक मोठी इनिंग त्यांनी रुपेरी पडद्यावर खेळली. प्रत्येक पिढीतील आघाडीच्या अभिनेत्यासोबत त्यांनी रुपेरी पडद्यावर मुकाबला केला. अशोक कुमार, बलराज सहानी, प्राण, संजीव कुमार, अमिताभ बच्चन या सोबत तोडीस तोड अभिनय करून त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
काही वर्षांपूर्वी त्यांचे आत्मचरित्र Dilip Kumar: Substance and shadow प्रसिद्ध झाले. या पुस्तकात त्यांनी रसिकाना अनभिज्ञ अशा बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. दिलीप कुमार यांना एकदा पुणे पोलिसांनी जेरबंद करून येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध केले होते. एक रात्र त्यांनी येरवडा जेल मध्ये काढली होती. पण या घटनेचा अभिमान त्याना आयुष्यभर वाटत होता. काय होता हा किस्सा?
दिलीप कुमार (Dilip Kumar) अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी चाळीसच्या दशकाच्या आरंभी, पुण्यात वायुदलाच्या कॅन्टीनमध्ये नोकरी करत होते. त्यापूर्वी दिलीप कुमार आणि त्यांचे कुटुंबिय नाशिकला देवळाली कॅम्पमध्ये फळांचा वापर करत होते. मोठे कुटुंब असल्यामुळे अर्थातच त्यांच्यावर जबाबदारी देखील मोठी होती. त्यामुळे लहानपणापासूनच ते अर्थार्जनासाठी घराच्या बाहेर पडत होते.
हा किस्सा स्वातंत्र्यपूर्व काळातला आहे. दिलीपचे उर्दू बोलणे समोरच्यावर छाप पडणारे होते. त्यांचे वत्कृत्व चांगले होते. याची जाणीव कॅन्टीनमधील त्यांच्या वरिष्ठांना होती. एकदा पुण्याच्या वायुदलाच्या कॅन्टीनमधील काही अधिकाऱ्यांनी दिलीप कुमार यांना “भारतातील स्वातंत्र्य चळवळ” यावर आपले विचार मांडायला सांगितले.
दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी उर्दू प्रचूर हिंदीमध्ये छान विचार मांडले. त्यात त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विस्तृत आढावा तर घेतलाच, शिवाय भारताला स्वातंत्र्य मिळणे किती गरजेचे आहे आहे हे देखील सांगितले. सर्व लष्करी अधिकाऱ्यांना त्यांचे भाषण खूप आवडलं आणि सर्वांनी त्यांचं खूप कौतुक केलं. परंतु दिलीपकुमार यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण काही क्षणच टिकला. कारण काही तासातच ब्रिटिश पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी दिलीपकुमार यांना चक्क बेड्या ठोकल्या व स्थानबध्द केले.
ब्रिटिश राजवटीविरुद्ध भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना हे सर्व नवीनच होतं. केलं काय आणि झालं काय? काय घडत आहे हे त्यांना कळलेच नाही. पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांना येरवडा जेल मध्ये आणले. ‘ये और एक गांधी वाला है’ असे म्हणत पोलिसांनी त्यांना जेलरच्या हवाली केलं. आपला उल्लेख ‘गांधीवाला’ का केला हे त्यांना सुरुवातीला कळलंच नाही. त्यांच्यावरील आरोप बघून तुरुंगातील इतर सत्याग्रही सोबत दिलीप कुमार यांना ठेवलं.
त्यावेळी ब्रिटीशांच्या विरुध्द महात्मा गांधी यांचा निर्वाणीचा मोठा लढा चालू होता. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाची सुरुवात होती. म.गांधीजींनी आमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील अनेक गांधीजींचे अनुयायी ब्रिटिशांच्या विरुध्द नारे देत आंदोलन करत होते. या सर्व सत्याग्रहींना येरवडा जेलमध्ये डांबलं जात होतं. त्या रात्री या सर्व सत्याग्रहींनी ‘अन्नत्याग’ करून जेलमधील जेवणावर बहिष्कार टाकला.
ते पाहून दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी देखील “मी आज अन्न ग्रहण करणार नाही”, असं सांगितलं. याच येरवडा जेलमध्ये त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल हे देखील आहेत आणि त्यांनी देखील उपोषण चालू केले आहे असे त्यांना कळले. अवघ्या विशीतील दिलीपकुमार यांना या सर्व प्रकाराने खूप आनंद वाटला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपला छोटा का होईना पण वाटा आहे, याचं समाधान वाटलं. रात्री जेवण न केल्यामुळे दिलीपकुमार यांना अजिबात झोप लागली नाही, पण त्यांनी इतर सत्याग्रहींसोबत संवाद साधला आणि देश आता ‘आजादी’च्या उंबरठ्यावर आहे, याची सुखद जाणीव त्यांना झाली.
=======
हे देखील वाचा – राजेश खन्ना जज समोर जाऊन का म्हणाले “मुझे गिरफ्तार करके जेल में डाल दो”!
=======
दुसऱ्या दिवशी सकाळी दिलीप कुमार (Dilip Kumar) काम करीत असलेल्या वायुदलाच्या कॅन्टीनमधील एक मेजर त्यांना सोडवण्यासाठी जेलमध्ये पोहोचले. त्यांनी दिलीपकुमार यांना जेलमधून बाहेर काढलं. एक रात्र स्वातंत्र्य सैनिकांसोबत जेलमध्ये काढल्यामुळे दिलीप कुमार यांची लोकप्रियता एका रात्रीत वाढली. कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर सर्वांनी घोळका करून दिलीप कुमार यांच्याशी संवाद साधला. अनपेक्षीतपणे एका रात्रीत दिलीप कुमार सर्वांचे हिरो बनले!