दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
एकेकाळी परकं वाटणाऱ्या इराॅस थिएटरशी असं जुळलं जवळचं नातं
लहानपणी पालकांसोबत फिरायला गेल्यावर एखादं चित्रपटगृह दिसलं की कुतूहल वाढायचं. गिरगावात लहानाचा मोठा होताना चर्चगेट, नरिमन पाॅईंट, हुतात्मा चौक या परिसरात गेल्यावर हमखास दिसायचे ते इराॅस! (Eros Theater Mumbai)
सत्तरच्या दशकापर्यंत चर्चगेट स्टेशनची रचना थोडी वेगळी होती. आजचा अंडरग्राऊंड रस्ता नव्हता. स्टेशनबाहेर येताच समोर रस्ता क्राॅस करताना एक नजर हमखासपणे इराॅस थिएटरवर पडे. अनेकदा तिथे इंग्रजी चित्रपट रिलीज झालेले दिसत आणि मनात परकेपणाची भावना निर्माण होई. कारण शालेय जीवनात मराठी व हिंदी चित्रपट हाच आपला हुकमी मनोरंजनाचा एक्का एवढंच माहित होतं. हाय सोसायटीतील माणसंच फक्त इंग्रजी चित्रपट पाहतात, त्यांनाच तो समजतो हे मनावर चांगले बिंबलं होतं आणि पलीकडच्या फुटपाथवरुनही इराॅसचा साहेबी थाट पाहताना “हे आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबाचं थिएटर नाही”, असं मनात येई.
काॅलेजमध्ये असताना माझा मित्र राजेन्द्र खांडेकर आणि त्याचा भाऊ अनिल यांच्यासोबत ‘एन्टर द ड्रॅगन’ हा इंग्रजी चित्रपट पाहायला जाताना खरंच कसंसंच होत होते. (अनिल खांडेकर कालांतराने मराठी चित्रपटसृष्टीत कॅमेरामन झाला.) आपण तेथील ‘पब्लिक संस्कृती’त नक्की शोभून दिसतोय ना, हा प्रश्न चित्रपट संपून बाहेर आलो तरी मनात होता.
मी मिडियात आल्यावर इराॅस थिएटरशी नातं जुळत गेलं. एक म्हणजे नवशक्ती ऑफिसमध्ये जा ये करण्यासाठी इराॅसच्या खालीच शेअर टॅक्सी होती. इराॅसच्या मिनी थिएटरमध्ये आम्हा सिनेपत्रकारांसाठी अनेक मराठी व हिंदी चित्रपटाचे प्रेस शो आयोजित करण्यात येत. मिनी थिएटरमधील वेतीच्या काठीच्या ऐसपैस खुर्च्या कंटाळलेल्या चित्रपटातही आरामदायक वाटत. मोजून तीसेक असतील. मिनी थिएटरची खरी ओळख हीच! (Eros Theater Mumbai)
काही वेळा असा स्वतंत्रपणे एखादा चित्रपट आम्हाला न दाखवता इराॅसच्या मुख्य हाॅलचे तिकीट दिले जाई आणि या रुबाबदार वातानुकूलित थिएटरमध्ये चित्रपट पाहणे विलक्षण आनंददायी असे. या सगळ्यातून एकेकाळी परकं वाटलेलं थिएटर अगदी जवळचं आणि सवयीचं कधी आणि कसं झालं, ते समजलंच नाही.
ही वास्तू इंग्रजकालीन वास्तुशास्त्राचा अतिशय उत्तम प्रत्यय देणारी. अधिक माहिती मिळवताना समजलं की, १९३८ साली हे चित्रपटगृह सुरु झालं. आर्टिटेक्ट शोराबजी भेडवार यानी ही ‘Art deco style’ ची भव्य देखणी इमारत उभारली. या बिल्डिंगचे स्वरुप ‘Streamline Moderne’ असं आहे. या चित्रपटगृहात स्टाॅल, अप्पर स्टाॅल आणि बाल्कनी अशी मिळून १,२४० आसनक्षमता होती. शो हाऊसफुल्ल असला की, आपल्या अवतीभवती एवढे लोक आहेत, ही भावनाच सुखावणारी असे. (Eros Theater Mumbai)
इराॅस हे प्रामुख्याने इंग्रजी चित्रपटांचे थिएटर अशी याची मूळ ओळख. मला आजही आठवतेय, ब्रूस लीचा ‘एन्टर द ड्रॅगन’ हा चित्रपट पाहिला तेव्हा तेथे अप्पर स्टाॅलचा तिकीट दर चार रुपये चाळीस पैसे होता.
प्रेस शोच्या काही आठवणी सांगायला हव्यात. ‘काफिला’ नावाच्या चित्रपटात असलेला उदय टीकेकर शो संपताच आम्हा सिनेपत्रकाराना भेटायला आल्याचे मला आजही आठवतंय. सतीश कुलकर्णी निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘गंमत जमंत’च्या प्रेस शोला वर्षा उसगावकर हजर होती. ‘वंडरगर्ल’ अशी तिला त्याच वेळी उपाधी दिल्याने तिची उपस्थिती लक्षवेधक ठरली. आपल्या आईसोबत तेव्हा ती आल्याचे स्पष्टपणे आठवतंय. ‘ब्रह्मचारी’ या नाटकातील तिचा उत्फूर्त परफॉर्मन्स आणि नाटकाचे यश यामुळे ती ‘स्टार’ होती. (Eros Theater Mumbai)
‘वास्तव’ चित्रपटाचा प्रेस शो संपल्यावर आम्हा समिक्षकांचे मत जाणून घेण्यास दिग्दर्शक महेश मांजरेकर आला होता. राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘घायल’चित्रपटाच्या प्रेस शोच्या मध्यंतरामध्ये हळूच निरोप मिळाला, “सिनेमा संपल्यावर सनी देओलने काही निवडक समिक्षकांसाठी मागच्याच तारांकित हॉटेलमध्ये पार्टी ठेवली आहे तेव्हा थांब.” असं थांबल्याने सनी देओलची भेट घेता आली. तोच यजमान असल्याने आम्हा प्रत्येकाला भेटला. चित्रपट कसा वाटला वगैरे त्याने आवर्जून विचारलं तेव्हा त्याला सांगितलं, “एका सुपर हिट चित्रपटाची असलेली गरज ‘घायल’ने पूर्ण केली.
उर्मिला मातोंडकरला स्टार केलेल्या ‘रंगीला’चे मेन थिएटर इराॅसच होतं आणि पहिल्या दिवशीचे (६ सप्टेंबर १९९४ अनंत चतुदर्शीचा दिवस होता) आम्हा सिनेपत्रकाराना तिकीट दिले असता काॅमन मॅनसोबत असा काही चित्रपट एन्जाॅय केला की, आपण समिक्षक आहोत हेच मी विसरून गेलो. म्हणूनच ‘रंगीला’ जास्त आवडला. (Eros Theater Mumbai)
माझ्या शेजारीच बसलेल्या कमलाकर नाडकर्णी यांनी महाराष्ट्र टाईम्समध्ये या चित्रपटाचे ‘रंगरंगवून’ कौतुक केलं. आणि मी घरी येताच उर्मिला मातोंडकरला फोन केला ( तेव्हा लँडलाईनचा काळ होता) तेव्हा तिच्या आईने सांगितलं, ‘रंगीला’ चित्रपटाचं उत्फूर्त स्वागत झालं म्हणून आज पहिल्याच दिवशी युनिटसाठी पार्टी ठेवलीय, तिकडे ती गेली आहे. रामगोपाल वर्माचा आपल्या चित्रपटाच्या यशाबाबतचा आत्मविश्वास थक्क करुन टाकणारा होता.
गेले ते दिवस! आज चित्रपट थिएटरमधून उतरायची वेळ आली तरी नवनवीन गणितं मांडून चित्रपट हिट आहे, असं सांगण्याची काही जणांवर वेळ येते. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘विरासत’, इंद्रकुमार दिग्दर्शित ‘मन’, विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘राज’, मधुर भंडारकर दिग्दर्शित ‘कार्पोरेट’ हे चित्रपट इराॅसच्या मेन थिएटरमध्ये ऑडियन्ससोबत आम्हा समिक्षकांना दाखवले. याशिवाय बरेच चित्रपट इराॅसला रिलीज होत राहिले (पण त्याचे प्रेस शो राजकमल कलामंदिर स्टुडिओ अथवा चित्रनगरीतील मिनी थिएटरमध्ये आम्ही पाहिले).
इराॅसमध्ये रिलीज झालेल्या काही चित्रपटात चित्रपती व्ही शांताराम दिग्दर्शित ‘चानी’ हा चित्रपट विशेष उल्लेखनीय आहे. व्ही शांताराम आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनात मेन थिएटरबाबत विलक्षण जागरुक असत. त्याशिवाय शक्ती सामंता दिग्दर्शित अनुराग, शम्मी कपूर दिग्दर्शित ‘मनोरंजन’, अरुणा विकास दिग्दर्शित ‘शक’, एन. चंद्रा दिग्दर्शित ‘वजूद’, मल्लिका शेरावतचा ‘मर्डर’, रामगोपाल वर्माचे ‘मस्ती’, ‘सत्या’ आणि ‘जंगल’, आशुतोष गोवारीकरचा ‘लगान’ (पहिल्याच आठवड्यात दिलीप वेंगसरकर याच इराॅसमध्ये ‘लगान’ पाहायला आला होता. त्याची मोठी बातमी झाली होती. इराॅसबाहेर एका इंग्रजी वृत्तवाहिनीची भली मोठी व्हॅन उभी होती.), कमल हसनचा ‘हिन्दुस्तानी’, जे. पी. दत्ताचा ‘एलओसी कारगील’, संजय दत्तचा ‘दाग द फायर’, ह्रतिक रोशनचा पहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है’ (कधीही इराॅसवरुन जावे तर ॲडव्हास बुकिंगचा चार्ट फुल्ल असे).
शबाना आझमी आणि नंदिता दास यांच्या भूमिका असलेला ‘फायर’ या चित्रपटांचे मेन थिएटर इराॅसच होते. तेव्हा शिवसेनेने आंदोलन करुन हा चित्रपट बंद पाडला होता. तसंच कामशास्र, फंदा, ऐलान हे चित्रपट येथेच रिलीज झाले. ‘रंगीला’, ‘लगान’ येथे हाऊसफुल्ल गर्दीत सुरु असताना त्यातूनच वाट काढत आत शिरायचं आणि लिफ्टकडे जायचं यात रोमांचकता असे. बाकीचे पब्लिक बाहेर उभे आहे आणि आपण आत मिनी थिएटरमध्ये जातोय हे मनाला सुखावणारं असे.
याच मिनी थिएटरमध्ये कधी सकाळी इंग्रजी चित्रपटाचे प्रेस शो असत, तर कधी सेन्सॉरसाठीचेही शो होत. म्हणजे याचा कार्यविस्तार खूप होता. महेश कोठारे दिग्दर्शित ‘चिमणी पाखरं’ या यशस्वी मराठी चित्रपटाचा एक खास खेळ नियमित शोला आयोजित करण्यात आला होता. (Eros Theatre, Mumbai)
==========
हे देखील वाचा – बायस्कोप (Bioscope Memories) – सत्तरच्या दशकातील गल्ली चित्रपटाच्या धमाल आठवणी
==========
आज चर्चगेटला जाताच सवयीनुसार इराॅस थिएटरकडे नजर पडते तेव्हा मुख्य दरवाजा कव्हर करुन तेथे काम सुरु असल्याचे दिसतं. अंतर्गत रचना बदलण्याची प्रक्रिया सुरु आहे एवढंच तेथे गेल्यावर समजतं. ती रचना नेमकी कशी असेल? त्यात मल्टीप्लेक्सचा फिल कसा असेल? उर्वरित जागी काय असेल? या प्रश्नांच्या उत्तरासाठी थांबावं लागेल. एकूणच चित्रपटगृहावर प्रेम करणंही आपल्या चित्रपटवेड्या संस्कृतीत छान मुरलयं.