दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
छोट्या शहरातून आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेणारा गुणी कलावंत: निशांत रॉय बोम्बार्डे
मुंबईत ‘दारवठा’चं स्क्रीनिंग झालं. नंतर कित्येक प्रेक्षक निशांतजवळ आले. हातात हात धरून त्याचं भरभरून कौतुक करू लागले. एक चौदा वर्षांची मुलगी ती गर्दी ओसरायची वाट पाहात होती. प्रेक्षक हळूहळू पांगले अन् ती मुलगी निशांतजवळ गेली. खूप गहिवरली होती ती. म्हणाली, “ही फिल्म मी रोजही पाहू शकते आणि पाहीन.” निशांत भरून पावला होता. आतापर्यंत मिळालेल्या अवॉर्ड्सपेक्षाही त्याला ही दाद अधिक मोलाची वाटली होती. त्या क्षणी परिश्रमाचं चीज झाल्यासारखं वाटलं त्याला.
निशांत रॉय बोम्बार्डे (Nishant Roy Bombarde)! वेगळ्या धाटणीच्या कलाकृती साकारणारा आणि त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारा संवेदनशील कलावंत. एरवी, स्थैर्य देणारी नोकरी सोडण्याची हिंमत कुणी करणार नाही. मात्र, कला सादरीकरणासाठी झपाटलेल्या निशांतनं ते केलं. सध्या तो फक्त चांगल्या कलाकृती लिहिण्यात, त्या निर्मित करण्याच्या कामात गुंतलेला आहे. विदर्भातील गोंदिया येथील मूळ रहिवासी निशांतनं आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडली आहे. त्यामागे त्याची गहिरी इच्छाशक्ती आणि कठोर मेहनत आहे.
निशांतचे वडील हेमंत बोम्बार्डे जलसंपदा विभागात कार्यरत होते, तर आई ललिता बोम्बार्डे या सेवानिवृत्त शिक्षिका. बालपणापासूनच निशांत वेगळ्या वाटेने चालणारा, क्रिएटिव्ह. गोंदियात बारावीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर जळगावला त्यानं केमिकल इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. मात्र, मनात ओतप्रोत भरलेली कला त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. (Success story of Nishant Roy Bombarde)
सिनेमा तंत्राची प्रचंड आवड होती. दिल्लीला एक फिल्म फेस्टिव्हल होता. तिथं त्याच्या मित्रांच्या फिल्म्स होत्या. त्यांना मदत म्हणून निशांत तिथं गेला. त्यादरम्यान विविध राष्ट्रीय, जागतिक सिनेमे पाहता आले. ते पाहून निशांत अधिक प्रभावित झाला. आता याच क्षेत्रात जायचं, असं त्यानं ठरवलं.
पहिल्यांदा त्यानं ओशियन (OSIAN) फिल्म फेस्टिव्हल अटेंड केला. प्रगल्भ विचार देणारे सिनेमे त्यावेळी अनुभवता आले. तो फिल्ममेकर्सच्या भेटी घेऊ लागला. सिनेमा म्हणजे नेमकं काय, दिग्दर्शन काय असतं, या तंत्रांचे धडे गिरवू लागला. यादरम्यान तो ‘दुष्यंतप्रिय’ हे नाटकही करीत होता. त्यादरम्यान तो पुण्यात आला, मास कम्युनिकेशनला प्रवेश घेतला.
‘झी’कडून कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू झाला. सहज म्हणून निशांतनं इंटरव्ह्यू दिला, तो सीलेक्टही झाला. झी टीव्हीच्या हिंदी वाहिनीत तो एक्झ्युकेटिव्ह प्रोड्युसर म्हणून रुजू झाला. त्यादरम्यान, ‘किल्ला’, ‘एलिझाबेथ एकादशी’, फॅन्ड्री, ‘सैराट’ आदी चित्रपटांचं त्यानं डिजिटल प्रमोशन केलं. (Success story of Nishant Roy Bombarde)
एका कार्यक्रमानिमित्तानं त्याला ‘झी’चे चेअरमन सुभाष गोएंका यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी निशांतमधील गुण हेरले होते. गोएंकांनी निशांतशी संवाद साधला. चॅनेलसाठी आणखी काय करता येईल, याबाबत मत विचारलं. झीची एक सिनेनिर्मिती कंपनी बंद पडली होती, ती पुन्हा सुरू करावी, अशी अपेक्षा निशांतनं त्यांच्याकडे व्यक्त केली.
“आपण एस्सेल व्हिजन कंपनी सुरू करतोय, तिथं जाशील का”, असं गोएंका यांनी विचारताच निशांतनं होकार दिला. लगेच एचआरमधून कॉलही आला. निशांत एस्सेल व्हिजनला गेला. तेव्हा तिथं नितीन केणी, निखिल साने होते. “मी मराठी सिनेमात अधिक रमतो. वेगळ्या धाटणीचा सिनेमा मला करायचाय’, असं त्यानं नितीन केणींना सांगितलं.” त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू झाले होते.
असा घडला ‘दारवठा’…
‘झी’मध्ये काम करत असताना २०१५च्या दरम्यान निशांतला ‘दारवठा’ची कथा सुचली. एका रात्रीत त्यानं ती लिहूनही काढली. आपल्या सहकाऱ्यांना ती वाचायला दिली. ती वाचून सगळेच भावूक झाले होते. त्यांच्या मनाला ही कथा भिडली म्हणजे नक्कीच जमली असणार, याचा विश्वास निशांतला होता.
आता या कथेला आकार द्यायचा त्यानं ठरवलं. टीम जुळवली. कलाकारांची निवड सुरू झाली. वीणा जामकरला विचारणा केली. तिला कथा आवडली होती. मात्र, इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्यानं तिला ते शक्य झालं नाही. राजश्री सचदेवचंही तसंच झालं. अखेर, नंदिता पाटकर तयार झाली. भूमिकेसाठी एका चांगल्या कथेची निवड तिनं केली होती.
ही फिल्म वऱ्हाडी भाषेतच आणि तीही आपल्या गावात-गोंदियातच चित्रीत करायची, हा निशांतचा अट्टाहास होता. कारण, सगळं वास्तववादी हवं होतं. मध्यवर्ती भूमिकेसाठी निशांत भावसार या मुलाची निवड झाली. त्यानं सर्वकाही लवकर आत्मसात केलं. गोंदियात चित्रीकरणाची तयारी झाली. इतर कलावंत चंद्रपूर, ब्रह्मपुरी या भागांतील होते, तर तांत्रिक टीम नागपूरची होती. कॅमेरा हैदराबादहून मागविला होता.
फेब्रुवारी २०१५ला चित्रीकरण पूर्ण झालं. सिनेमा बनून तयार झाला. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलचे संचालक असीम छाबरा यांना हा सिनेमा खूप आवडला. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलसह अंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ लॉस एन्जेल्स (IFFLA) येथेही ‘दारवठा’ सिनेमा गाजला. एवढंच नव्हे, तर ‘बेस्ट डेब्यू फिल्म ऑफ डायरेक्टर’ हा राष्ट्रीय पुरस्कारही त्याला मिळाला. त्यानंतर अन्य महोत्सवांमध्येही फिल्मची मागणी वाढू लागली. आताही वेगवेगळ्या ठिकाणी या फिल्मचं स्क्रीनिंग सुरू आहे. “वेगळ्या धाटणीची बोल्ड फिल्म’, अशा शब्दांत निखिल साने व अन्य मान्यवरांनी केलेलं कौतुक अधिक बळ देऊन गेलं”, असं निशांत सांगतो.
‘गैर’चंही होतंय कौतुक…
‘दारवठा’चा धागा पकडूनच निशांतनं नंतर ‘गैर’ लिहिली. या दोन्ही फिल्म्स एलजीबीटी समुदायाच्या भावना मांडणाऱ्या आहेत. त्यांच्या मनातली अस्वस्थता निशांतनं विविध प्रतीकांचा आधार घेत प्रभावीरीत्या मांडली आहे.
मुंबईत कशिश फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘गैर’ची निवड झालीय. विशेष म्हणजे न्यूयॉर्कला वर्ल्ड प्रीमियरची संधीही या फिल्मला मिळाली. वेगवेगळ्या जातीतील दोन मुलांचं प्रेम तरलपणे यात दाखवण्यात आलं आहे. काही समजांना छेद देणारी ही कथा आहे. तन्मय धनानिया (Tanmay Dhanania) आणि साहिल मेहता (Sahil Mehta) यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.
ओटीटीनं मोडली मक्तेदारी…
नाटक, सिनेमा, मालिका, शॉर्टफिल्म्स, वेबसीरिज ही सगळीच माध्यमं आपापल्या ठिकाणी सक्षम आहेत. प्रत्येकाचा प्रेक्षकवर्गही वेगळा आहे. कुठल्याच माध्यमापासून कुठल्या विशिष्ट माध्यमाला धोका नाहीये. फरक एवढाच की, वेबसीरिज माध्यमानं पारंपरिक मक्तेदारी मोडीत काढल्याचं दिसतं. यात कित्येक कलावंतांना संधी मिळाली. आज तुम्ही केलेली कलाकृती कुणी स्वीकारत नसेल, तर ती निर्माण करणारे सरळ ऑनलाइनवर टाकून मोकळे होतात, जेणेकरून, ती कलाकृती काहीही करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतेच. हा आजच्या काळातला बदल आहे, असं ३९वर्षीय निशांतचं मत आहे. (Success story of Nishant Roy Bombarde)
संघर्ष पावलोपावली, मेहनत सोडू नका…
निशांत सध्या लिखाणात व्यस्त आहे. एका निर्मात्यासाठी तो हिंदी बायोपिक लिहित आहे. यासह स्वत:च्या एका हिंदी आणि एका मराठी चित्रपटावर त्याचं काम सुरू आहे. आजच्या नात्यांची गोष्ट तो मांडतो आहे. कथा प्रभावीपणे सांगण्यावर त्याचा भर आहे.
======
हे देखील वाचा – मराठी चित्रपटांविषयी प्रेक्षकांमध्ये एवढी अनास्था का आहे?
=====
सत्यजित रे, दिबाकर बॅनर्जी, नागराज मंजुळे हे निशांतचे आवडते दिग्दर्शक आहेत. तर श्रीदेवी त्याला कमालीची आवडते. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना तो सांगतो, “संघर्ष पावलोपावली असतो, प्रत्येकच क्षेत्रात असतो. म्हणून मेहनत सोडू नका. कम्फर्ट झोनमधून आपण स्वत:ला बाहेर काढत नाही, तोवर स्वप्नपूर्ती करता येत नाही. जर तुमच्यात गुणवत्ता आहे, तर झेप घ्यायलाच हवी. आहे तिथंच अडकून पडू नका.” (Success story of Nishant Roy Bombarde)
छोट्या शहरातून आलेल्या या पोरानं आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घ्यावी, हा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी असाच आहे. भविष्यात त्याच्या आणखी चांगल्या कलाकृतींची अनुभूती प्रेक्षकांना घेता येईल, यात शंकाच नाही. लगे रहो निशांत!