‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केलं ‘असं’ कृत्य की त्याचा त्यांना झाला पश्चात्ताप
कधी कधी कळत नकळतपणे हातून झालेली चूक आपल्याला आयुष्यभर सलत राहते. ही सल वेदनादायक तर असतेच, पण त्याहून अधिक अपराधीपणाची भावना मनाला गडद करणारी असते. दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या बाबतीतला हा किस्सा हीच भावना अधोरेखित करणारा होता. अशी कोणती चूक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्याकडून झाली होती की, त्या चुकीचा सल त्यांना पुढे अनेक दिवस मनाला छळत राहिली?
१९७१ साली राज खोसला यांचा सुपरहिट ‘मेरा गाव मेरा देश’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अभिनेता विनोद खन्ना यांनी रंगवलेला खलनायक जब्बार सिंग जबरदस्त होता. याच सिनेमाचा मोठा इम्पॅक्ट रमेश सिप्पी यांच्यावर ‘शोले’ चित्रपटाच्या वेळी होता, असे म्हणतात.
‘मेरा गाव मेरा देश’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राज खोसला यांचे सहाय्यक म्हणून महेश भट्ट काम करत होते. या चित्रपटाच्या सेटवर महेश भट्ट आणि अभिनेता विनोद खन्ना यांची चांगली मैत्री झाली. त्यावेळी दोघांचा तो उमेदीचा आणि संघर्षाचा कालखंड होता. काळ पुढे गेला. पुढच्या पाच-सात वर्षात विनोद खन्ना अभिनयाच्या क्षेत्रात सुपरस्टार पदापर्यंत जाऊन पोहोचले. सत्तरच्या दशकात सुरुवातीला महेश भट्ट यांचे ‘मंजिले और भी है’, ‘विश्वास घात’ आणि ‘नया दौर’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट प्रदर्शित झाले. परंतु या चित्रपटाना व्यवसायिक यश अजिबात मिळाले नाही.
याच काळात महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांचं लग्न झालं. त्यांना एक मुलगीदेखील झाली (पूजा भट्ट). घरातील खर्च वाढत गेले, पण महेश भट्ट यांचे आर्थिक उत्पन्न मात्र दिवसेंदिवस कमी होत गेलं. फ्लॉपचा शिक्का माथ्यावर बसल्याने त्यांना चित्रपट मिळणं देखील कमी झालं. ही बातमी त्यांचे मित्र विनोद खन्ना यांना समजली.
आपल्या जुन्या मित्राला म्हणजेच महेश भट्ट यांना मदत करायला पाहिजे या जाणिवेतून त्यांनी अनेक निर्मात्यांची संपर्क साधला. याच काळात त्यांची भेट निर्माता सिरू दरयानानी यांच्या सोबत झाली. ते एक चित्रपट विनोद खन्नाला घेऊन बनवणार होते. विनोद खन्नादेखील त्यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाले. फक्त त्यांनी त्यासाठी दोन अटी घातल्या. पहिली अट या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट करतील आणि दुसरी अट माझ्यामुळे महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांना चित्रपट दिग्दर्शनासाठी मिळाला हे त्यांना अजिबात कळता कामा नये!
निर्मात्याने अर्थातच दोन्ही अटी मान्य केल्या आणि चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं. चित्रीकरणादरम्यान एका प्रसंगाच्या वेळी विनोद खन्ना आणि महेश भट्ट यांच्यात मतभेद झाले. (याच काळात विनोद खन्ना यांच्या आईचे निधन झाल्यामुळे ते थोडे डिस्टर्ब होते!) या मतभेदांमुळे दोघांमध्ये ‘तू तू मै मै’ सुरू झाली. शेवटी दिग्दर्शक महेश भट्ट यांनी निर्मात्याला बोलावून विनोद खन्नाला चित्रपटातून काढून टाका अशी मागणी केली, नाहीतर ‘मी सिनेमाचे दिग्दर्शन सोडतो’ अशी धमकीच दिली.
निर्माते सिरू दरयानानी यांनी महेश भट्ट यांना विनंती केली, “भट साब, आप ऐसा मत किजीये विनोद बहुत अच्छा कलाकार है.” परंतु महेश भट्ट ऐकायला तयारच नव्हते. त्यांनी विनोद खन्नाला सिनेमातून काढून टाका हा हट्ट कायम ठेवला. शेवटी निर्माते सिरू दरयानानी यांना विनोद खन्नाने घातलेली दुसरी अट नाईलाजाने मोडावी लागली आणि त्यांनी त्या सेटवरच महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांना सांगितलं, “भट साब, शायद आप ये बात नही जानते… आपको ये फिल्म सिर्फ विनोद खन्ना की सिफारिश पर मिली है और आप उनको ही फिल्म से निकलवाना चाहते है?”
============
हे देखील वाचा – जेव्हा पाकिस्तानी राष्ट्राध्याक्षांकडून फिरोज खान यांच्या सिनेमांवर बंदी घातली गेली!
============
हे ऐकताच महेश भट्ट यांचे डोळे खाडकन उघडले. ते भानावर आले. मागच्या सात आठ वर्षातील अपयश, बेरोजगारी त्यांच्या डोळ्यापुढे आली. कुणालाही कळू न देता मित्र म्हणून विनोद खन्नाने केलेली मदत त्यांचे काळीज पाणी पाणी करून गेली. स्वत:च्या कृतघ्नपणाची त्याना लाज वाटली. “अरे यार मुझसे बहुत बडी गलती हो गयी”, असं म्हणत ते विनोद खन्नाच्या गळ्यात पडून गलबलून रडायला लागले. विनोद खन्नाने त्यांचं सांत्वन केलं, पण महेश भट्ट यांना ही गोष्ट कायम सलत राहीली.पुढे विनोद खन्नाला ओशोकडे नेण्याचे कामही महेश भट्ट यांनीच केलं होतं.