दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
नितीन केणी: मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देणारे निर्माते
नितीन केणी! (Nitin Keni) भारतीय चित्रपटसृष्टीमधलं एक मोठं नाव. मुंबई युनिव्हर्सिटीच्या व्हीजेटीआय कॉलेजमधून इंजिनिअरिंग आणि नंतर आयआयएम (कलकत्ता) मधून ‘एमबीए’चं शिक्षण पूर्ण करूनही त्यांचं मन मात्र सिनेसृष्टीकडेच वेड घेत होतं. म्हणूनच एमबीए पूर्ण झाल्यावर त्यांनी एनएफडीसी (NFDC) च्या मार्केटिंग डिव्हिजनला निवड केली.
कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना मनोरंजनाची सृष्टी खुणावत होती. विद्यार्थी दशेत असताना ते नाटकं लिहायचे, दिग्दर्शनही करायचे. याच दरम्यान त्यांनी मराठी व हिंदी दोन्ही भाषेतील प्रायोगिक नाटकांमध्ये काम केलं आहे. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावरही त्यांनी आपली आवड जपली ती ‘एनएफडीसी’च्या माध्यमातून!
एनएफडीसीमधल्या अनुभवांबद्दल बोलताना नितीनजी सांगतात, “तिथे मला अतिशय सुंदर, ग्रेट असा अनुभव मिळाला. यामध्ये जरी फिल्म मेकींगचा अनुभव मिळाला नसला तरी मी फिल्म फेस्टिवलसाठी फिल्म्स घेऊन जायचो.” सन १९८४-८५ मध्ये ‘घरे बैरे’ हा चित्रपट ‘कान्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’साठी त्यांनी नेलेला पहिला चित्रपट. त्यांनतर सलाम बॉम्बे, पिरवी असे अनेक चित्रपट त्यांनी कान्स व इतर आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये नेले. त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी होती. यानंतर मात्र त्यांनी आपलं संपूर्ण लक्ष मनोरंजनाच्या दुनियेवर केंद्रित केलं.
यानंतर त्यांनी बासू भट्टाचार्य यांच्या ‘गृहप्रवेश’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यांनतर १९९१ साली त्यांची सुभाषचंद्र गोयल यांच्याशी भेट झाली. त्यावेळी गोयल खाजगी वाहिनी सुरु करण्याचा विचार करत होते. त्यांनी नितीनजींशी याबाबत चर्चा करून, यासाठी काम करणार का, म्हणून विचारलं आणि नितीनजींनीही (Nitin Keni) लगेच होकार दिला.
त्यावेळी दूरदर्शनचा सर्वत्र गवगवा होता अशा परिस्थितीत खाजगी वाहिनी कितपत चालेल या शंकेवर नितीनजींनी सांगितलं, “नक्की चालेल, नाट्यक्षेत्रातील कितीतरी मंडळींना या निमित्ताने चांगलं व्यासपीठ मिळेल आणि प्रेक्षकवर्गाला मनोरंजनाचं अजून एक द्वार खुलं होईल.” त्यांचा हा विश्वास पुढे अर्थातच सार्थ ठरला.
नितीनजी भारतातील पहिल्या वाहिल्या खासगी वाहिनीचे म्हणजेच झी टीव्हीचे ‘फाउंडर आणि प्रेसिडंट’ होते. ऑक्टोबर १९९२ रोजी ही वाहिनी सुरु झाली. अवघ्या १० ते ११ महिन्यात झी पब्लिक कंपनी’ झाली आणि नावारूपाला आली. परंतु नितीनजींचं (Nitin Keni) मन टीव्हीकडे नाही, तर चित्रपटांकडे ओढ घेत होतं. यासंदर्भात ते गोयल यांच्याशी बोलले आणि त्यांनीही होकार दिला. या काळात त्यांनी, फिर तेरी कहानी याद आयी, ऐसी भी क्या जल्दी है, फरेब, दिल का डॉक्टर अशा अनेक चित्रपटांसाठी एग्झिक्युटीव्ह प्रोड्युसर व प्रोड्युसर म्हणून काम पहिले. हे चालू असतानाच त्यांनी झी सिनेमाची निर्मिती केली.
यानंतर नितीनजींना चित्रपट निर्मितीचे क्षेत्र खुणावू लागले. म्हणून मग त्यांनी झी ला रामराम करून त्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केली. अर्थात या कामात त्यांना थोडाफार स्ट्रगल करावा लागलाच, पण म्हणतात ना ‘ध्येय निश्चित असलं की दिशा आपोआप सापडत जाते’, अगदी तसंच झालं. या दरम्यान त्यांना ‘गदर’ची कथा मिळाली. ती त्यांना आवडली. ही कथा घेऊन ते गोएंका यांच्याकडे गेले आणि त्यांनी गदरची निर्मिती करायचं निश्चित केलं.
नितीनजींच्या (Nitin Keni) या चित्रपटाने कमाल केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमावणारा भारतातील पहिला चित्रपट ठरला, ते ही मल्टिप्लेक्सच्या जमान्याचा आधी! इतकंच नव्हे तर हा चित्रपट भारतामधील ‘फर्स्ट व्हाईट फिल्म’ समजला जातो. कारण या चित्रपटासाठी करण्यात आलेला प्रत्येक खर्च, देण्यात आलेलं मानधन चेकमध्ये देण्यात आलं होतं. यानंतरच चित्रपटसृष्टीमध्ये इंश्युरन्स ही संकल्पना रुजू लागली.
याच दरम्यान त्यांनी ‘एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन’ची निर्मिती केली. त्याच नाव बदलून पुढे झी स्टुडिओ करण्यात आलं. मराठी चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणं हा झी स्टुडिओ निर्मितीचा मुख्य हेतू होता. महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांची दुरावस्था होत असतानाच त्यांना संजीवनी देण्याचं काम झी स्टुडिओने केलं.
झी स्टुडिओने सुरुवातीच्या काळात काही प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती केली. यानंतर २०११ मध्ये ‘काकस्पर्श’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीनंतर मात्र मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस आले. २०११ ते २०१६ हा काळ मराठी चित्रपसृष्टीसाठी ‘सुवर्णकाळ’ ठरला. या काळामध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती झी स्टुडिओकडून करण्यात आली. टाईमपास, टाईमपास २, लै भारी, दुनियादारी, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, प्रकाश बाबा आमटे, सैराट अशा एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपटांची रांगच लागली. सैराट तर बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमवणारा मराठीमधील पहिला ब्लॉकबस्टर हिट चित्रपट ठरला. काकस्पर्शच्या ७.५ कोटी रुपयांच्या कमाईपासून १०० कोटी रुपयांच्या गल्ल्यापर्यंतचा हा प्रवास अवघ्या ६ वर्षात पूर्ण झाला होता.
अर्थात, हे सर्व करत असताना नितीनजींनी जजबा, लंच बॉक्स, डी डे, रुस्तम अशा हिंदी चित्रपटांचीही निर्मितीही केली. परंतु त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं, मराठी चित्रपटांची निर्मिती. याबद्दल सांगताना नितीनजी (Nitin Keni) म्हणतात, “प्रादेशिक भाषांमधून चित्रपटांची मांडणी म्हणजे ‘रिच वे ऑफ एक्स्प्रेसिंग’. यामधल्या कंटेंटशी एक सांस्कृतिक नाळ जोडलेली असते.”
मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या निर्मितीबद्दल बोलताना नितीनजी सांगतात, “हिंदीमध्ये निर्मिती करताना धोका जास्त असतो. तसंच हिंदी प्रमाणेच तामिळ, तेलगू चित्रपटांनाही निर्मिती आणि प्रमोशनचा खर्च जास्त असतो. मराठी व इतर प्रादेशिक भाषांमध्ये कमी खर्चात, कमी धोका पत्करून जास्त नफा शक्य होतो. अर्थात निर्मिती म्हटलं की, ते मोठं जोखमीचं काम आहे. निर्मात्यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो.
चित्रपट निर्मितीसोबत डिस्ट्रिब्युशन, सिंडिकेशन आणि ॲक्विझिशन या संकल्पनाही महत्त्वाच्या असतात. केवळ डिस्ट्रिब्युशन करून भागत नाही. ओव्हरसीज, म्युझिक सेल, ओटीटी किंवा टीव्हीवर कधी पब्लिश करायची हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची आवश्यकता असते. अर्थात माझ्या सुरुवातीच्या काळात मी हे सर्व स्वतः केलं आहे आणि त्यामधून मला खूप मोठा अनुभव मिळाला.”
मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही, प्राईम टाइम मिळत नाही शिवाय कोणताही सपोर्ट मिळत नाही हा अनुभव नित्याचाच आहे, असं सांगताना नितीनजींनी एकूणच सामाजिक आणि राजकीय गोष्टीबाबत नाराजी व्यक्त केली.
सध्याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल बोलताना नितीनजी सांगतात, “याबद्दल आत्ताच काही निश्चित सांगता येणार नाही. सध्याचा विचार केला तर, मध्यमवयीन व ज्येष्ठ नागरिक टीव्हीला प्राधान्य देतात, तर तरुणाई ओटीटीला प्राधान्य देतेय. यामध्ये अजूनही बदल होऊ शकतो. परंतु जेव्हा प्रादेशिक भाषेतील ओटीटी प्लॅटफॉर्म्स जोर धरू लागतील तेव्हा मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकवर्ग याकडे आकृष्ट होऊ शकेल. याची सुरुवात झाली आहेच, पण अजूनही बराच पल्ला गाठावा लागणार आहे. कदाचित पुढे ‘ओटीटी’च्या पुढेही काही ना काही येईल.” ओटीटी बद्दल बोलताना त्यांनी सध्याच्या टीव्ही वाहिन्यांवर प्रक्षेपित होणाऱ्या कार्यकमांच्या दर्जावर परिणाम झाल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
नितीनजींनी एक पाऊल पुढे टाकत ‘मुंबई मुव्ही स्टुडिओ’ची निर्मिती केली आहे. हा भारतातील पहिला रिजनल स्टुडिओ आहे. या माध्यमातूम मराठीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती केली जाणार आहे. तसंच निवडक दर्जेदार हिंदी चित्रपटांची निर्मिती करण्याचाही विचार आहे. प्रादेशिकमध्ये मराठी, गुजरात, बंगाली, पंजाबी आणि मल्याळम चित्रपटांची निर्मिती करण्यात येईल. या स्टुडिओच्या माध्यमातून दरवर्षी ५ ते ६ मराठी चित्रपटांची निर्मिती करायचंही त्यांनी ठरवलं आहे.
चित्रपटनिर्मितीचा विचार करताना किएटिव्हिटी आणि व्यावसायिक दृष्टिकोन दोन्ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या आहेत. चित्रपट बनवताना लोकांना काय आवडेल, हा विचार करून तो परिपूर्ण होईल हा प्रयत्न जास्त महत्त्वाचा आहे. मुंबई मुव्ही स्टुडिओबद्दल बोलताना नितीनजींनी सांगितलं, “या माध्यमातून केवळ चित्रपट निर्मिती होईल आणि चित्रपट थिएटरवरच प्रदर्शित केले जातील.”
मुंबई मुव्ही स्टुडिओला फिल्म मेकर्सनी कसा संपर्क करायचा याबद्दल बोलताना ते म्हणाले, “लेखक, दिग्दर्शकानीं त्यांची एक ते दोन पानी कथा, स्क्रिप्ट किंवा नरेशन स्टुडिओमध्ये पाठवावं. जर कथा/स्क्रिप्ट चांगली असेल, तर त्याचा नक्कीच विचार केला जाईल.”
=========
हे देखील वाचा – दिग्पाल लांजेकर सांगतायत शेर शिवराज चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानचे भन्नाट किस्से
=========
सध्या मुंबई मुव्ही स्टुडिओच्या माध्यमातून एक मल्याळम चित्रपट रिलीज झाला आहे, तर दुसरा रिलीज व्हायच्या मार्गावर आहे. याशिवाय १ पंजाबी चित्रपट ‘हॉटेल प्यासा’ व रवींद्रनाथ टागोरांच्या ‘फर्स्ट लव्ह’ या कथेवर आधारित एका बंगाली चित्रपटाची निर्मितीही या स्टुडिओच्या माध्यमातून होणार आहे.
चित्रपट निर्मितीवर नितांत प्रेम करणारे नितीनजी म्हणतात, “मी हे प्रोफेशन निवडलं कारण हे माझं पॅशन आहे. आणि मी माझं काम प्रामाणिकपणे करतो. मनोरंजनाचे कितीही पर्याय उपलब्ध झाले तरी “Cinema is the mother of this industry.”