आपल्या डॅनी डेन्झोपाबद्दल ह्या गोष्टी जाणून घेऊयात…
हिंदी सिनेमाच्या इतिहासात पूर्वांचल भागातून कुणी येवून अभिनयाच्या क्षेत्रात फारशी भरीव कामगिरी केल्याचे दिसत नाही. पण हा समज खोटा ठरविला, खलनायकीच्या रूपाने गेली ४० वर्षे तळपत राहून आपली स्वत:ची निराळी शैली निर्माण करणार्या डॅनी डेन्झोपा या अभिनेत्याने! बरं त्याचा चेहरा, त्याची संवाद उच्चारण्याची अदा, त्याचा आवाज या सर्व बाबी भारतीय सिनेमाच्या ठराविक चौकटीत फ़िट बसणार्या नव्हत्याच. चीनी, नेपाळी म्हणून पाण उतारा करून नाउमेद करणारे देखील काही कमी नव्हते. पण डॅनी ने हे ’चॅलेंज’ स्विकारले. सगळीकडून नकार घंटा येत असताना त्याने आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळविले.
डॅनीचा जन्म २५ मार्च १९४८ रोजी एका बौध्द धर्मिय कुटुंबात झाला. त्याचे ध्येय भारतीय लष्करात जावून देश सेवा करण्या्चे होते. त्याला एनसीसी त ’बेस्ट कॅडेट अॅवार्ड’ देखील मिळाले होते पण लंडनला जाण्यासाठी आयत्या वेळी डॅनी ला डावलून वशिल्याच्या जोरावर दुसर्याचीच निवड झाली. या प्रकाराने त्याला प्रचंड नैराश्य आले. त्याने आयुष्यातील महत्वाचा निर्णय घेतला. तो तडक पुण्याला गेला आणि एफटीआय मध्ये शिक्षणासाठी जॉईन झाला. हा काळ साधारणत: १९६७-६८ सालचा होता. जया भादुरी, नवीन निश्चल, शत्रुघ्न सिन्हा त्याच्या मागे पुढे होते. ’टोलींग पेन्टसो डेंग्झोपा’ हे अवघड नाव कुणालाही उच्चारता येत नव्हतं. मग जया भादुरीनेच त्याचे ’बारसे’ करून ’डॅनी’ हे सुटसुटीत नामकरण केले.
जेष्ठ निर्माते दिग्दर्शक बी आर चोप्रा त्यावेळी ’धुंद’ (१९७३) या सिनेमाची जुळवाजुळव करीत होते. अगास्था ख्रिस्ती यांच्या ’द अनएक्सपेक्टेड गेस्ट’ या कादंबरीवरील हा सिनेमा एक जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर होता. त्याच्या भूमिकेतील वैविध्य पहा. तो खलनायक म्हणून सामाजिक (अग्नीपथ), पोषाखी (खुदा गवाह), रहस्यमय(खून खून ), डाकूपट (काला सोना), ऐतिहासिक (लैला मजनू) अशा सर्व सिनेमात गाजला. त्याचा सूटाबूटातला खलनायक (रोबो) जसा गाजला तसाच क्रूर कर्मा डाकू (काला सोना) ही गाजला. धर्मात्मा (१९७५) करीता त्याने शोले तील गब्बरची भूमिका नाकारली, ’द बर्निंग ट्रेन’ (द टॉवरींग इन्फर्नो चा देशी अवतार), डायल एम फॉर मर्डर वर बेतलेल्या ’ऐतबार’ (१९८५) त्याच्या फ़िल्म करीयर मधील महत्वाचे सिनेमे. ’हम’ मधील त्याचा ‘बख्तावर’ एकदम टेरर होता. क्रौर्य, दादागिरी, पिळवणूक, छळ याची मक्तेगिरी घेवून डोळ्यांनी अंगार फेकणारा डॅनी खलनायकांच्या वरच्या पंक्तीत जावून बसला. त्याने लता सोबत ’मेरा नाम आओ मेरे पास आओ’ (ये गुलिस्ता हमारा) व आशा समवेत सुन सुन कसम से (काला सोना) ही गाणी गायलीत.
एक संपन्न आणि समृध्द अशी डॅनीची कामगिरी आहे. शोले तील गब्बर सिंगची लार्जर दॅन लाईफ हातातून गेल्याची त्याला अजिबात खंत वाटत नाही उलट तो म्हणतो ’जर मी शोले केला असता तर फ़िल्म इंडस्ट्री अमजद खान सारख्या गुणी कलावंताला मुकली असती’. ज्या जया भादुरी ने त्याचे बरसे केले तिच्या सोबत डॅनी ने एका सिनेमात चक्क नायकाची भूमिका केली होती. ‘अभी तो जी ले‘ नावाच्या या सुपरफ्लॉप सिनेमात एक गाणं मात्र नितांत सुंदर होतं. दोघांवर चित्रित ‘तू लाली है सवेरे वाली‘ हे गाणं आता तुम्ही पहा.