हवाहवासा भुलभुलैया!
भारतीय सिनेमात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच हॉरर चित्रपट यशस्वी झाले आहेत. त्यातील हॉरर कॉमेडी वर्गातला भुलभुलैया (Bhool Bhulaiyaa) अनेकांचा आवडता चित्रपट. टिपीकल हिरो हिरोईन कथानक नसूनही त्यातल्या विविध पैलूंमुळे हा चित्रपट लक्षात राहतो.
१९९३ सारी प्रदर्शित मल्याळम चित्रपट ‘मनीचित्रथाजू’वरून भुलभुलैया प्रेरीत आहे. मनीचित्रासाठी प्रियदर्शन यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. मनीचित्रथाजूचं कथानक तसं अनेक वेळा वापरण्यात आलं आहे. तामिळमध्ये चंद्रमुखी, कन्नडमध्ये अपयामित्र, बंगालीत राजमहोल हे चित्रपट म्हणजे याच कथानकावरुन झालेत. तरी प्रियदर्शन यांना हे कथानक त्यांच्या स्टाईलमध्ये हिंदीत आजमावसं वाटलं.
या चित्रपटातील नायिकेच्या मध्यवर्ती भूमिकेसाठी सुरुवातीला ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ यांचा विचार झाला होता मात्र त्यांनी नकार दिल्याने ही भूमिका विद्या बालनकडे (Vidya Balan) आली. या भूमिकेला विद्याने उत्तम न्याय दिला. या भूमिकेसाठी तिने शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले. विद्याच्या नव-याची भूमिका अभिषेक बच्चनने नाकारल्याने तिथे शायनी आहुजाची वर्णी लागली. या पात्रांमध्ये सगळ्यात भाव खाणारी भूमिका अक्षयकुमारची होती. गंमत म्हणजे चित्रपटाच्या जाहिरातीपासून नामावलीपर्यंत अक्षयचं (Akshay Kumar) नाव अग्रक्रमाने असताना चित्रपटात त्याची एंट्री तासाभराने होते. अर्थात त्याचा अक्षयच्या भूमिकेच्या प्रभावावर काडीमात्र परिणाम होत नाही.
चित्रपटाच्या कथानकातील महाल हा या चित्रपटाचा महत्वाचा घटक. या चित्रपटाचे शुटींग राजस्थानमधल्या चोमू महालात झाले. आज हा महाल लक्झरी हॉटेलमध्ये रुपांतरीत झाला आहे. आणि पर्यटक चित्रपटाच्या कथानकाला आठवत इथे राहण्यास उत्सुक असतात. या चित्रपटातील गाजलेलं गाणं म्हणजे ‘तेरी आंखे भुलभुलैया’ हे गाणं फक्त चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बनवण्यात आलं होतं पण गाण्याला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे ते चित्रपटात समाविष्ट करण्यात आलं. हे गाणं कोरीयन के पॉप बॅण्डच्या एका ट्युनवरून प्रेरीत आहे.
१२ ऑक्टोबर २००७ रोजी प्रदर्शित या चित्रपटाला उत्तम यश मिळालं. या चित्रपटाने हॉरर कॉमेडीचा (चित्रपटात भूत नसतानाही) एक प्रवाह निर्माण केला. या चित्रपटात विद्या बालन वगळता कुणालाच पूर्ण लांबीची भूमिका नाही. तरी ह्या चित्रपटातील प्रत्येक पात्र अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून लक्षात राहतं. प्रियदर्शन (Priyadarshan) आपल्या प्रत्येक पात्राला कसं खुलवतात याचा हा चित्रपट नमूना आहे. या चित्रपटाच्या नावासह आपल्या चेहऱ्यावर येणारी हास्याची आडवी रेषा हेच भुलभुलैयाचे यश म्हणता येईल.
=====
हे देखील वाचा: विद्या बालन सगळ्यांपेक्षा वेगळी, म्हणूनच यशस्वी.
=====
हे नक्की वाचा: यावर्षी संपूर्ण बॉलिवूडला कोरोनाचा फटका बसला असतांना अक्षय कुमार मात्र यशाच्या नव्या शिखरावर पोहचलेला आहे.