बॅकस्टेज आर्टिस्ट ते सुपरस्टार “लक्ष्या” चा लक्षात राहणारा प्रवास…
सकाळी लवकर फोनची/मोबाईलची रिंग वाजली की धस्स होतं. कोणाच्या बरे निधनाची बातमी असेल??? असा प्रश्न मनात येतोच. एकाद्या चॅनलचा फोन असेल, तर आलेल्या त्याच फोनवर लगोलग श्रद्धांजली वाहण्याची अर्थात त्या व्यक्तीबाबत काही आठवणी सांगण्याची मानसिक तयारी मी ठेवलीय. तरी ‘कोण बरे’ ही धाकधूक असतेच.
१६ डिसेंबर २००४ रोजी सकाळी साडेपाच वाजता वाजलेला फोन अशाच एखाद्या वाईट बातमीचाच असणार याची कल्पना येतच उचलला. पलिकडून विजय कदम इतकेच म्हणाला, दिलीप आपला लक्ष्या गेला……
बोरिवलीहून अंधेरीच्या यारी रोडवरील लक्ष्याचे निवासस्थान कृष्णा कॉम्प्लेक्स येईपर्यंत लक्ष्याचा बॅकस्टेज आर्टिस्ट ते मराठीतील सुपर स्टार आणि मग हिंदी चित्रपटाच्या सेटवरही भेटलेला लक्ष्या आठवत होता. योगायोगाने आम्ही दोघेही मुळचे अस्सल गिरगावकर. तेथील मध्यमवर्गीय संस्कार आणि सण-संस्कृतीत लहानाचे मोठे झालेलो. त्यामुळे आमचा संवाद अगदी पहिल्याच भेटीत जमला तो अगदी अखेरपर्यंत. तो आणि मी गिरगाव गावदेवीतील भवन्स कॉलेजचे विद्यार्थी. अर्थात तो मला बराच सिनियर. कॉलेजमध्ये असताना त्याने रमेश पवार लिखित ‘द ग्रेटेस्ट सॉव्हरिन’ या एकांकिकेत राजन बनेसोबत भाग घेतला, तेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिले.
तेव्हा तो साहित्य संघ मंदिरमध्ये रंगमंचामागे धडपडत होता. शक्य तेव्हा एखाद्या नाटकात भूमिका साकारायचा. मी मिडियात आल्यावर ‘धाकटी सून’ (१९८३) च्या पार्टीत लक्ष्याची झालेली पहिलीच भेट आमचे मैत्रीचे नाते घट्ट करणारी ठरली याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, दोघेही आमच्या गिरगावातील मध्यमवर्गीय मराठी माणसाचे प्रतिनिधित्व करत जगत होतो. गिरगावातीलच मॅजेस्टिक सिनेमा, सेन्ट्रल, रॉक्सी, ऑपेरा हाऊस या थिएटरमध्ये ‘पिक्चरचा आनंद’ घेतलेला. एकेकाळी गणेशोत्सवात तर प्रार्थना समाज ते ऑपेरा हाऊस असा तो चांगली कच्चीबाजा ऐकून पुन्हा पुन्हा नाचायचा.
अशातच बातमी समजली की महेश कोठारेने लक्ष्या नाट्यसृष्टीत धडपडत असतानाच त्याच्यातील कलागुण आणि मेहनती वृत्ती पाहून सव्वा रुपया देऊन त्याला आपल्या पहिल्या चित्रपटासाठी साईन केले होते. तो चित्रपट होता ‘धूम धडाका’ (१९८५). हा चित्रपट पडद्यावर आला तोच ‘लक्ष्मीकांत बेर्डे ‘ला सुपर स्टार करण्यासाठी! यावरुन महेशच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो.
हे देखील वाचा: स्मिता पाटीलच्या त्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं…
लक्ष्या झपाटल्यासारखा मराठी चित्रपट आणि नाटकातून भूमिका साकारत असतानाच आमची सतत भेट होताना लक्ष्याची काही वैशिष्ट्ये कायमच त्याच्या सोबत असल्याचे जाणवले. तो आपल्या जुन्या दिवसांच्या आठवणीत रमायचा (तेव्हा तो गिरगावातील कुंभारवाड्यात राहायचा. मी खोताची वाडीत), आपल्या हलक्याफुलक्या विनोदाने सेटवरचे वातावरण नॉर्मल ठेवायचा, एखाद्या भूमिकेसाठी कोण योग्य कलाकार आहे हे तो आवर्जून निर्माता आणि दिग्दर्शकाला सुचवायचा, एकाच वेळेस अनेक नवीन निर्माते त्याला साईन करण्यासाठी प्रचंड उत्सुक असतानाच तो त्याना या माध्यम व व्यवसाय या दोन्हीची कल्पना देई. पण त्यांना ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ ची अफाट लोकप्रियता कॅश करण्यात रस असे. ते लक्ष्याच्या तारखा मिळेपर्यंत थांबायला तयार असत. लक्ष्या महेश कोठारेच्या प्रत्येक चित्रपटासाठी आवर्जून तत्पर असणे स्वाभाविक होते.
राजकमल कलामंदिर (युथ विंग) च्या किरण शांताराम निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’, पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘हमाल दे धमाल’, डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘एक होता विदूषक’, सतिश रणदिवे दिग्दर्शित ‘मुंबई ते मॉरिशस’
लक्ष्याच्या चित्रपटांची नावे सांगावीत तेवढी थोडीच. क्रिकेट सिझनमध्ये लक्ष्या सेटवर आवर्जून टीव्हीवरची मॅच एन्जॉय करताना दिसे आणि त्यातून मिळालेल्या एनर्जीतून तो दुप्पट आनंदाने दृश्य देताना हमखास दिसे. कलाकार केवळ कॅमेरासमोरच घडतो असे नव्हे तर त्याच्या आवडी निवडीच्या अशा सपोर्ट सिस्टीम पूरक ठरत असतात.
लक्ष्याचे क्रिकेट वेड, वानखेडे स्टेडियमवर जाऊन मॅच एन्जॉय करणे, एकदा वांद्र्याच्या एमआयजी क्लॅबवर सचिन तेंडुलकरची भेट होताच त्याने आपला आवडता चित्रपट म्हणून अशी ही बनवाबनवीचे नाव घेणे, लक्ष्याच्या विनोदाच्या टायमिंगचे कौतुक करणं यावर एक मुलाखतही केली होती. लक्ष्यात एक लहान मूल दडलयं याचा त्याच्या आनंदातून कायमच प्रत्यय येई आणि काही बाबतीत तो भाबडा आहे हेही जाणवे. कामाच्या झपाट्यात त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला त्याला वेळ मिळत नसावा असे मला सतत वाटायचे. अशोक सराफ आणि तो एकत्र असलेल्या एखाद्या चित्रपटाच्या शूटिंग रिपोर्टींगसाठी कोल्हापूरला जाणे झाले की दोघांचे जमलेले ट्युनिंग आणि काही किस्से, गोष्टी यांचा खुराक हमखासच.
अशातच एकदा त्याला राजश्री प्रोडक्शनच्या प्रभादेवी ऑफिसमधून फोन आला, आमच्या आगामी हिंदी चित्रपटात एक भूमिका आहे, येऊन भेट… लक्ष्याला वाटले आपण नेहमीच आवाज बदलून इतरांची मस्करी करतो, तशीच आज आपली कोणीतरी खेचली. चार पाच वेळा फोन आल्यावर मात्र त्याला ते खरे वाटले आणि तो तसा भेटायला गेल्यावर त्याला ‘मैने प्यार किया’ मधील भूमिका मिळाली. लक्ष्या असे अनुभव खुलवून रंगवून सांगे.
लक्ष्यासोबतच त्याचा मेकअपमन मोहन पाठारे आणि अर्थातच त्याची पत्नी प्रिया अरुण यांच्याशीही चांगले संबंध प्रस्थापित होणं स्वाभाविक होतेच. आजही ते कायम आहेत. लक्ष्याने ऐंशीच्या दशकातच गिरगावातून अंधेरी पूर्वला झेप घेतली (आणि तेव्हा आम्हा चित्रपट व नाटक समिक्षकांना ‘मला तुम्ही सतत चांगली साथ देता’ असे म्हणतच आवर्जून पार्टी दिली.) तेथूनच तो अंधेरी पश्चिमेला आंबोली विभागात राहायला गेला. तेव्हा तो आणि अशोक सराफ एकाच सोसायटीत राहत. तेथून लक्ष्या यारी रोडवरील नवीन घरात रहायला गेला तेव्हा मला म्हणाला, यारी रोड बसने दुसरा लेफ्ट घेतल्यावर स्टॉपवर उतर आणि राणी मुखर्जी कुठे राहते ते विचार. त्याच सोसायटीत मी राहतो. मी त्याला म्हटलं, त्यापेक्षा तुझ्या नावाने पत्ता विचारला तर तुझे घर नक्कीच सापडेल…
हे देखील वाचा: रंगभूमी गाजवलेलं सदाबहार नाटक ‘मोरूची मावशी’ ह्याचे काही रंगतदार किस्से तुमच्यासाठी
…… असा विचार करत करत आता मी निपचित पडलेल्या लक्ष्याकडे पाहत होतो. वयाच्या अवघ्या पन्नाशीत त्याचा ‘अभिनय थांबावा’ हे पचवणे अवघड होते. त्याच वर्षी लक्ष्याकडे मी गणपती पाहायला गेलो होतो. त्याने माझ्या ‘तारांगण’ या पुस्तकाला प्रस्तावना दिली आणि त्याने म्हटले, दिलीप तू माझे करियर खूप जवळून पाहिलं आहेस. तू माझे चरित्र लिही. चार्ली चॅप्लिनच्या चरित्रासारखे ते हवे. आजच्या एखाद्या गोष्टीतून जुन्या आठवणी येतात…. लक्ष्याच्या इच्छेप्रमाणे आमचे काम सुरु झाले. अंधेरीतील एका इस्पितळात तो दाखल झाला असता तेथे टीव्हीवर त्याचाच एक चित्रपट सुरू होता. तेच सूत्र पकडून मी काही पाने लिहिली. पण तेथेच लक्ष्याचा प्रवास थांबला……
सोळा वर्षांत मला लक्ष्याची विविध कारणासाठी आठवण येतेच, विशेषतः प्रिया आणि लक्ष्याची मुलं अभिनय आणि स्वानंदी भेटल्यावर तर हमखासच येते. अभिनयचा जन्म ( ३ नोव्हेंबर १९९७) झाल्यावर लक्ष्या रमेश साळगावकर दिग्दर्शित ‘सत्वपरीक्षा’ च्या शूटिंगसाठी गडहिंग्लजला गेला असता मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकाराना तेथे शूटिंग रिपोर्टीगसाठी नेण्यात आले असता रेशम, स्मिता जयकर, उदय टीकेकर, माधवी गोगटे इत्यादींसोबत शूटिंगमध्ये बिझी होता तेव्हा त्याला मला काही सांगायचेय हे लक्षात येत होते. ती संधी त्याला रात्री पार्टी रंगात आली असता मिळाली. त्याने मला खुणेनेच टॉयलेटमध्ये बोलावून दरवाजा आठवणीने बंद करत म्हटले, मी तुला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची गोष्ट सांगणार आहे. अरे, मी बाप झालो. प्रियाला मुलगा झाला…. लक्ष्याला इतका प्रचंड आनंदी खूप दिवसांनी पाहिलं होतं… आजही तो क्षण माझ्या लक्षात आहे.
‘लक्ष्या’त राहिलच असाच हा बेर्डे. कायमच मध्यमवर्गीय संस्कारातच वावरला, भेटला, लक्षात राहिलाय…