महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
अप्पर स्टाॅलची तिकीटे लवकरच संपणारे असे थिएटर
मला शाळा काॅलेजमधील ‘पिक्चरचे दिवस ‘ आठवावेसे वाटले की मी सुपर थिएटरला (Super Theater)आवर्जून भेट देतो. मल्टीप्लेक्स आणि ओटीटीच्या युगात दक्षिण मुंबईतील जी अगदीच काही मोजकी जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहे सुरु आहेत, त्यात सुपर आहे. त्याचे आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होते आणि आजही आहे. गेटवरच दोन्ही बाजूच्या शो केसमध्ये रनिंग पिक्चरची शो कार्ड्स पाहायला मिळत. आत डाव्या हाताला तिकीट खिडकी. तर समोरच म्हणजे आपल्या उजवी बाजूला आगाऊ तिकीट विक्रीचा चार्ट. तो सतत हाऊसफुल्ल म्हणजे पिक्चर हिटचा थेट सिग्नल. जाळीचे दरवाजे, शो सुरु होताच ते लावतच काळे पडदे लावणे, आजूबाजूला आणि वर पंखे, आणि बसक्या सीटस. पण या कशा कशाचीही तक्रार न करता पडद्यावरच्या पिक्चरवर नजर खिळलेली. मी अनेकदा हा अनुभव घेतलाय. चित्रपट पाहणारे अगणित आहेत. मी थिएटरही अनुभवतो.
आजच्या डिजिटल युगातील चित्रपट रसिकांना हे सुपर थिएटर नेमके कुठे आहे याची कल्पना असण्याची शक्यता फारच कमी आहे. ग्रॅन्ट रोड रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला उतरुन चालत चालत भाजी आणि फिश मार्केट ओलांडून पुढे गेल्यावर डाव्या हाताला हे सुपर टाॅकीज आहे. छोट्या छोट्या दुकानातून मार्ग काढत काढत जायला हवे. सगळा भाग मिश्र वस्तीचा. प्रचंड गजबजलेला. जुन्या मुंबईच्या अनेक प्रकारच्या खाणाखुणा अभिमानाने दिसत असलेला हा विभाग. ग्रॅन्ट रोड, खेतवाडी, कुंभारवाडा, कामाठीपुरा, पिला हाऊस या सर्व बाजूना जोडणारे असेच हे थिएटर(Super Theater). आमच्या गिरगाव, प्रार्थना समाजपासून अगदीच जवळ. सत्तरच्या दशकात मधल्या खेतवाडीतून जाताना वाटेत क्रिकेट सामन्याच्या आकडेवारीचा मोठा फलक हमखास दिसे. महत्वाचे म्हणजे आपल्या क्रिकेट संघाचा सामना असल्यावर या फलकावर ‘ ताजा स्कोर ‘ पाहण्यासाठी हमखास गर्दी असेच. पण क्रिकेटच्या जगातील कोणतेही दोन संघ त्यांच्या देशात खेळत असले तरी येथे ‘ताजा स्कोर’ समजे. ते पाहून सुपरला सिनेमाला जायचो.
सुपरची (Super Theater) खासियत म्हणजे, डोक्याला कसलाही शाॅट नाहीच असा सर्व प्रकारच्या मनोरंजनाचा हुकमी मसाला भरलेला पिक्चर येथे प्रदर्शित होई. ज्याची भट्टी जमायची तो पिक्चर पब्लिक एन्जाॅय करायची आणि मग शंभर दिवसाचे अथवा पंचवीस आठवड्याचे रौप्यमहोत्सवी यश हमखास. तो मेन थिएटर संस्कृतीचा काळ होता आणि पिक्चरनुसार मेन थिएटर असावे अशीच व्यावसायिक रणनीती असे. प्रत्येक सिंगल स्क्रीन थिएटरचे आपले एक व्यक्तिमत्व असे, त्याचा आपला एक चेहरा असे. आम्हा पब्लिकचा माईंड सेट असे. कौटुंबिक पिक्चरची मेन थिएटर वेगळी ( प्रामुख्याने राॅक्सी, ऑपेरा हाऊस), इंग्लिश चित्रपटाची मेन थिएटर वेगळी ( विशेषत: रिगल, स्टर्लिंग, स्ट्रॅन्ड, श्री…. या थिएटर्सच्या आसपास जाण्याचा मला क्वचितच योग येई.), मराठी चित्रपटाची थिएटर्स वेगळी ( मॅजेस्टीक, सेन्ट्रल, भारतमाता, प्लाझा, कोहिनूर अर्थात आताचे नक्षत्र. संपूर्ण मुंबईत अशी मराठीसाठी हुकमी थिएटर्स होती. त्यांनी मराठी चित्रपटाचा इतिहास घडवला.), मुस्लिम सोशल चित्रपटाची वेगळी ( अलंकार, सुपर, मोती). तशीच टाळ्या शिट्यांचा अक्षरश: पाऊस पडणारी, हीरोच्या एन्ट्रीला हमखास थिएटर डोक्यावर घेणारी, पडद्यावरच्या पात्राला बसल्या जागेवरुन सल्ला देणारी असे पब्लिक असणारी थिएटर्स वेगळी. त्यातील एक सुपर.
हजार प्रेक्षकवर्ग असलेले हे अतिशय जुने आणि साधे थिएटर. बाल्कनीपेक्षा स्टाॅल, अप्पर स्टाॅलची तिकीटे लवकरच संपणारे असे थिएटर. मला आठवतय, सलिम जावेदची पटकथा संवाद असलेला प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘हाथ की सफाई ‘ ( १९७४) हा मी सुपरमध्ये पाहिलेला पहिला मसालेदार मनोरंजक चित्रपट. अप्पर स्टाॅलचे तिकीट दर दोन रुपये वीस पैसे असे होते . रणधीर कपूर, हेमा मालिनी, विनोद खन्ना, सिमी गरेवाल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा पिक्चर एकदम ऑल्सो रन आहे, लहानपणी हरवलेले दोन भाऊ मोठेपणी मिळतात आणि पिक्चर संपतो. तो सुपरला एन्जाॅय करण्यात वेगळा आनंद मिळायचा. चित्रपट ही आपण समूहातील एक होऊन चित्रपट एन्जाॅय करण्याची गोष्ट ही आपली परंपरा आणि संस्कृती सुपरसारख्या अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सनी रुजवली, वाढवली. मध्यंतरी मराठी चित्रपटाच्या एका दिग्दर्शकांने आपल्या रविवारच्या लेखात म्हटले होते, मध्यंतरनंतर आजूबाजूचे प्रेक्षक वेफर्स अथवा पाॅपकाॅर्न खाताना तोंडाचा अथवा वेफर्सचे पाकिट फोडताना जो आवाज करतात, त्याने माझं चित्रपटावरचे लक्ष विचलित होते. हे वाचत असतानाच माझ्या मनात आले, याने सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये पडद्यावर सिनेमा घडत असताना पब्लिकमध्ये कशा अनेक लहान लहान गोष्टी सुरु असतात हे अनुभवले नसावे.
सुपर (Super Theater) नेमके कधी सुरु झाले याची कुठेही नोंद सापडत नाही. आपल्या देशातील विविध भाषांतील चित्रपटांचा प्रवास थिएटर्समधून कशा पध्दतीने झाला हा अभ्यासासाठी चांगला विषय आहे. पण तो दुर्लक्षित राहिलाय. सुपर बहुतेक १९३०\३५ च्या आसपास म्हणजे इंग्रजांच्या काळात सुरु झाले असावे. विजय भट्ट दिग्दर्शित ‘रामराज्य ‘ ( १९४३) हा चित्रपट सुपरला रिलीज झाला आणि विशेष उल्लेखनीय गोष्ट अशी, याचा रोज एक खेळ मराठीत असे आणि दोन खेळ हिंदीत असत. आणि या चित्रपटाने सुपरला १०२ आठवडे मुक्काम केला. सुपरला प्रदर्शित झालेला हा एकमेव मराठी चित्रपट होय.
सुपर मेन थिएटर (Super Theater) संस्कृतीतील असल्याने अनेक हिट चित्रपट पंचवीस आठवडे ( रविकांत नगाईच दिग्दर्शित ‘द ट्रेन ‘ राज खोसला दिग्दर्शित ‘मेरा गाव मेरा देश, राजा ठाकूर दिग्दर्शित ‘जख्मी’ , एच. एस. रवैल दिग्दर्शित ‘लैला मजनू’ वगैरे), साधारण यशस्वी शंभर दिवस ( जोहर इन बाॅम्बे, बदतमीज, भाई हो तो ऐसा, प्राण जाए पर वचन न जाए, दस नंबरी, मुद्दत, दो चट्टाने, बिंदीया और बंदूक, सलाखे, हप्ता बंद ), आणि फ्लाॅप चित्रपट तीन अथवा सहा आठवडे ( परवाना, जलते बदन, मोन्टो, दफा ३०२, जीवन संग्राम, बंडलबाज, बडा कबूतर, रातों का राजा, बाॅक्सर, खून खराबा इत्यादी). काही मुस्लिम सोशल चित्रपटही येथे प्रदर्शित होत. ( नेक परवीन, दया रे मदिना वगैरे). विशेष आठवण म्हणजे ‘दस नंबरी’ ( १९७५. मनोजकुमार, हेमा मालिनी)ने येथेच शंभर दिवसाचे यश संपादून रौप्यमहोत्सवी आठवड्याकडे घौडदौड सुरु असतानाच आणीबाणीत या चित्रपटावर बंदी आली आणि चित्रपट उतरवावा लागला. अजय देवगणचा पहिला चित्रपट ‘फूल और कांटे’ याच सुपर थिएटरच्या परंपरेनुसार असल्याने तो फर्स्ट शोपासूनच हिट ठरला यात आश्चर्य नाही. आपल्याला पहिल्याच चित्रपटात ‘गुंडा हीरो ‘ अशी इमेज देणारे सुपर थिएटर अजय देवगणला माहित असेल का हो. पूर्वीच्या अनेक स्टार्सना आपला चित्रपट प्रदर्शित आणि हिट झाल्याचे मेन थिएटर माहित असायचे. अजय देवगणने काही वर्षातच देवगण एन्टरप्राईजेस अशी चित्रपट वितरण संस्था स्थापन करुन नाझमध्ये ऑफिस थाटल्याने त्याला सुपर थिएटर माहित झाले असेलच.
सुपरचा मॅटीनी शो कधी कधी सोनेरी संधी असे. जुने चित्रपट रोज सकाळी साडेअकरा वाजता हा मॅटीनी शोचा सही फंडा सुपरला अनेकदा हुकमी ठरे. साठच्या दशकातील अनेक सुमधूर संगीतमय कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट सुपरला मॅटीनी शोसाठी एक आठवड्यासाठी येत आणि ते दहा पंधरा आठवडे मुक्काम कधी करीत हे समजायचंच नाही. ‘१९५८ सालचा ‘फागून ‘ चित्रपट सत्तरच्या दशकात कधी तरी मॅटीनी शोला असाच प्रदर्शित झाला. भारत भूषण आणि मधुबाला हे नायक नायिका. एव्हाना रसिकांची एक पिढी मागे पडली होती. पण श्रवणीय लोकप्रिय संगीताने हा चित्रपट पुढील पिढीत पोहचला होता. एक परदेसी मेरा दिल ले गया, तुम रुठ के मत जाना… केवळ गाण्यांसाठी मागील आणि माझ्या पिढीने सुपरला मॅटीनी शोला धाव घेतली. तेव्हा जुनी गाणी पाहण्यासाठी दूरदर्शनवरचे छायागीत आणि शनिवारचा मराठी/रविवारचा हिंदी चित्रपट हाच मार्ग होता. त्यापेक्षा जुने चित्रपट रिपिट रन अथवा मॅटीनी शोला यायची आम्ही वाट पाहायचो आणि ती ओढ सुपर पूर्ण करीत असे. पुन्हा पुन्हा प्रदर्शित होऊनही ‘फागून’ने मॅटीनी शोला रौप्यमहोत्सवी यश संपादले. १९५६ चा ‘बसंत बहार ‘(नैन मिले चैन कहा, कर गया रे मुझपे जादू अशी हिट गाणी), १९५९ चा ‘गुंज उठी शहनाई ‘ ( दिल का खिलौना हाए टूट गया, कह दो कोई करे ना यहा प्यार अशी हिट गाणी) असे माझ्या जन्मापूर्वीचे चित्रपट सुपरमुळे मला मॅटीनी शोला पाहता आले. नंतरच्या काळातील काही जुने तर कधी एखादा जुना चित्रपट सुपरला मॅटीनीला येई.
=======
हे देखील वाचा : कुलाब्यातील स्ट्रॅन्ड आठवणीतच राहिले…
======
मल्टीप्लेक्स युगात अनेक जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सवर पडदा पडत गेला, मेन थिएटर संस्कृती कालबाह्य होत गेली. पुढील पिढीला मेन थिएटरला नवीन चित्रपट प्रदर्शित हा फंडा माहित नाही.सुपर थिएटरचे नाव सुपर प्लाझा असे करण्यात आले आहे. आणि आता बी आणि सी ग्रेड हिंदी चित्रपट आणि मसालेदार भोजपुरी चित्रपट प्रदर्शित होतात. मी मात्र माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन दिवसांतील ‘पिक्चरच्या वेडा’ची आठवण काढण्यासाठीच सुपरवर आवर्जून जातो. अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सचाही आपला एक फ्लॅशबॅक असतोच. सुपरचा तर तो वेगळाच आहे.
दिलीप ठाकूर
1 Comment
दिलीप ग्रांटरोड पूर्वेला आहे ना हे थिएटर?