नाना पाटेकर – आपला माणूस
१९९४ चा श्रीगणेश चतुर्थीचा दिवस… अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दुपारी चार वाजता बिंदा ठाकरे निर्मित आणि पार्थो घोष दिग्दर्शित “अग्निसाक्षी” चा बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मुहूर्त असे आमंत्रण हाती येताच मनात दोन प्रश्न आले, गिरगावातील खोताची वाडीतील आपल्या घरी दीड दिवसाचा गणपती असताना या मुहूर्ताला कसे जायचे आणि दुसरा प्रश्न असा की, खुद्द नाना माहिमच्या आपल्या घरच्या गणपतीची आरास तो स्वतः करतो तर त्याचीही घाई असेलच… काही असले तरी हा मुहूर्त खूप महत्वाचा होता (त्या काळात अशा मुहूर्तांचे खूप मोठे प्रस्थही होते. ते एक वेगळे फिल्मी कल्चर होते.)
मुहुर्ताच्यावेळी नानाच्या मनाची तगमग…
प्रत्यक्षात गेलो तेव्हा अतिशय प्रसन्न वातावरणात मुहूर्त होत आहे हे लक्षात आलं. तरी नानाची अस्वस्थता लपत नव्हती. त्याला घरी जायचे वेध लागले होते आणि बाळासाहेबांच्या शुभ हस्ते मुहूर्ताचा क्लॅप दिला गेल्यावर नाना आणि जॅकी श्रॉफने मुहूर्त दृश्यात भाग घेतला आणि ते होताच बाळासाहेबांचे आशीर्वाद घेत नाना निघणार तेवढ्यात धर्मेंद्र आला. अर्थात, त्यामुळे थोडासा वेळ जाणारच याची नानाला कल्पना आली. घरी जाऊन गणपतीची पूजा करायचीय हे त्याच्या देहबोलीत लपत नव्हते. अशातच मी म्हणालो, ‘नाना “क्रांतीवीर” हिटवर लोकसत्ताच्या रंगतरंग पुरवणीसाठी पूर्ण पान मुलाखत करायची’. कधी फोन करून भेटू??? यावर निघता निघता तो म्हणाला, घरी गणपतीला ये मग बघू…..
नाना म्हणजे…
नाना पाटेकर अतिशय स्पष्टवक्ता, मूडी, लहरी अशी काही इमेज एस्टॅब्लिश झाली असली, तरी हे त्याचे रुप अगदी वेगळे होते. ती मुलाखत त्याच्या लोखंडवाला संकुलातील घरी रंगली. जीन्स व शर्ट मधील नानाच्या मोठ्या फोटोसह ती प्रसिद्ध झाली. असेच त्याचे वेगळे रुप तत्पूर्वी दिसले होते ते एन. चंद्रा दिग्दर्शित “अंकुश” (१९८६) च्या न्यू एक्सलसियरच्या मिनी थिएटरमधील प्रेस शोच्या वेळी…! आपली फिल् अशा भावनेने त्याने या चित्रपटाच्या निमित्ताने फोकस्ड मुलाखती देताना वांद्र्याच्या कार्टर रोडवरील शूटिंगच्या वेळचे अनुभव, वातावरण यावर भर देत या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली होती आणि त्यानंतर तो आम्हा सिनेपत्रकारांच्या प्रेस शोच्या मध्यांतरमध्ये आला. त्याला समिक्षकांकडून जाणून घ्यायचे होते की, फिल्म कशी वाटली??? त्याच्या त्या वेळच्या देहबोलीत मला जाणवलं ते, “अंकुश” प्रेक्षकांपर्यंत समिक्षकांच्या माध्यमातून व्यवस्थित जावा आणि सिनेमाला यश लाभावे. नानाच्या इच्छेप्रमाणे हे घडले. एन. चंद्रा यांच्या “प्रतिघात” (१९८७) च्या नाशिकच्या सेटवरचा नाना यापेक्षाही वेगळा. तेव्हाचे नाशिक अगदी छोटेसे शहर अथवा मोठे गाव होते. नानाने चंद्रांकडून पूर्ण दृश्य समजून घेऊन मग भरपूर रिहर्सल केली आणि मग आपले आणि चंद्रा यांचे समाधान होईपर्यंत टेक/रिटेक सुरु राहिले. नाना आपल्या चित्रपटाच्या पटकथेत आणि व्यक्तिरेखेत पूर्णपणे गुंतत जातो याची ही छोटीशी झलकच होती.
हे देखील वाचा: टॅलेंट आणि ग्लॅमरच समीकरण म्हणजे सोनाली बेंद्रे…
नाना आणि कॉंट्रोव्हर्सी…
फिल्मी मिडियाला नानाचे तिरपागडे किस्से हवे असत. (अंक विकला जायला हवा. आजच्या काळात टीआरपी हवा अथवा भरपूर लाईक्स हव्यात) तसेही काही प्रसिद्ध झाले. त्यात तथ्य किती हे ‘नाना जाणे’ . असाच एक भारी किस्सा त्याच्या आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या भेटीचा…! रमेश सिप्पी नानाला एका चित्रपटाच्या संदर्भात तीन चारदा त्याच्या माहिम येथील घरी जाऊन भेटला. पण मानधनावरुन फिसकटले. यावर नाना ताडकन म्हणाला (म्हणे), ‘तुझी शोलेमुळे किंमत वाढली असली, तरी माझीही किंमत कमी होत नाही…. हा किस्सा खूप गाजला. तर “परदेस” च्या निमित्ताने दिग्दर्शक सुभाष घईच्या मोठ्या मुलाखतीचा योग आला असता (त्या काळात आम्ही पत्रकार आणि सिनेमावाले बराच वेळ काढून सविस्तर मुलाखत करीत असू. तेव्हा मुलाखत घ्यायला रांग लावावी लागत नसे. अर्थात, बदल होतच असतो) त्यानेही एक ‘नाना किस्सा’ सांगितला. “सौदागर” (१९९१) च्या यशानंतर सुभाष घईने नाना पाटेकरला घेऊन एक “अंकुश” सारखाच पण नानाभोवती असा “खलनायक” निर्माण करायचे ठरवले. आपण एखादा वेगळा चित्रपट निर्माण करावा असा त्या मागचा हेतू होता. पण चार पाच सिटींगनंतर सुभाष घईच्या लक्षात आले की, बहुतेक नानाच दिग्दर्शन करेल आणि आपण सेटबाहेर बसू. म्हणून त्याने नानाचा नाद सोडला आणि पटकथेत मनोरंजनाचा भरपूर मिक्स मसाला टाकला आणि संजय दत्तला हीरो करीत “खलनायक” बनवला.
दोन बडे स्टार जेव्हा एकत्र येतात…
बी.आर.चोप्रा दिग्दर्शित “आवाम” च्या निमित्ताने नाना पाटेकरला राजेश खन्नासोबत भूमिका करायला मिळेल, या संधीतही नानाने आपला स्पष्टवक्तेपणा दाखवलाच. तो राजेश खन्नाला म्हणाला, “काका, तुझा खरा अभिनय पाहण्यासाठी “खामोशी”, “आनंद”, “इत्तेफाक”, “बहारो के सपने”, “आराधना”, “अमर प्रेम”, “बावर्ची” हे चित्रपट कितीही वेळा पाहायची माझी तयारी आहे. पण त्यानंतर मात्र, तो क्लास दिसला नाही…. हा किस्सा त्या काळातील मराठीत अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाला. अशा गोष्टीतून नानाची एक वेगळी इमेज आकाराला आली. कोणाला त्यावरुन राजकुमारची आठवण येई. एकदा त्या काळात दिग्दर्शक मेहुलकुमार यांचे प्रसिद्धी प्रमुख गजा आणि अरुण यांनी एक सुखद अनुभवाची संधी दिली. “तिरंगा” या चित्रपटातील ‘पी ले पी ले, ओ मोरे राजा या गाण्याचे वांद्र्याच्या बॅण्ड स्टॅण्डवरील एका बंगल्यात शूटिंग आहे, राजकुमार आणि नाना पाटेकर आहेत, अवश्य ये असा निरोप मिळाला . मिडियात असल्याने असे सोनेरी चंदेरी योग आले असता ते दवडायचे नसतात म्हणून आवर्जून गेलो (तो बंगलानंतर शाहरूख खानने घेऊन त्याचे नाव मन्नत ठेवले). एकाच वेळेस दोन तिरकस म्हणून ओळखले जाणारे बडे स्टार सेटवर आहेत हे तेव्हा वातावरणात जाणवले. जानी राजकुमार असल्याचा कोणताही दबाव नानाने घ्यावाच का??? तसे दोघेही नृत्यासाठी अजिबात ओळखले न जाणारे (ही देखील दोघांची कॉमन खासियत) त्यामुळेच तर शूटिंग सुरळीत पार पडले असावे. लंच ब्रेकमध्ये राजकुमार आपल्या जणू नियमानुसार एक तासासाठी आपल्या रूममध्ये गेला तर नानाने आम्हा सिनेपत्रकारांशी छान गप्पा केल्या. तेव्हा प्रकर्षाने जाणवले ते त्याचे खरेपण. तो तुसडा, लहरी म्हणून तेव्हा ओळखला जाई हे कितीही खरे असले, तरी इतरांच्या वागण्यावरची ती प्रतिक्रिया असे. ते वागणेच जर ठीक नसेल तर???
नानांमधला दिग्दर्शक…
नानाने दिग्दर्शित केलेल्या “प्रहार” या चित्रपटाच्या शूटिंग रिपोर्टींगसाठी आम्हा सिनेपत्रकाराना निर्माता सुधाकर बोकाडे यांनी फिल्मालय स्टुडिओमध्ये आमंत्रित केले होते. येथे बरेच दिवस शूटिंग होत होते आणि नाना अतिशय उत्तम रितीने व शिस्तबद्धतेने काम करतोय हे सेटवर पाऊल टाकताच माझ्या लक्षात आले. डिंपल आणि माधुरी दिक्षित काही दृश्ये चित्रीत होत असताना नानाला जराही अनावश्यक बडबड, आवाज मान्य नव्हता. तसे त्याने स्पष्टपणे सांगितलेही. नाना पूर्ण तयारीनिशी चित्रपट दिग्दर्शनात उतरला आहे हे प्रकर्षाने जाणवले. एकदा का आपण काम स्वीकारले की त्याला अधिकाधिक न्याय द्यायचा ही त्याची वृत्ती यावेळी अनुभवली.
हे वाचलंत का: बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे हरहुन्नरी कादर खान !
… आणि नाना नटसम्राट झाले…
नानाभोवती एक गूढ प्रतिमा तयार झाल्यानेच महेश मांजरेकर दिग्दर्शित “नटसम्राट” (२०१६) नाना साकारणार या बातमीने सगळे अवाक झाले. महेशही रोखठोक उत्तर देणारा आणि अपेक्षित परफॉर्म मिळवणारा. नाना तो देईलच, पण सेटवर नेमके कोण कोणाचे ऐकणार??? नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे “नटसम्राट” च्या मुहूर्तासाठी मुंबईचे आम्ही पत्रकार गेलो होतो. तेव्हा दिवसभरात नाना पाटेकर आणि महेश मांजरेकर यांना एकमेकांबरोबर काम करण्यास काही प्राॅब्लेम असल्याचे जाणवले नाही. पण आपणास अशा अर्थाचे प्रश्न अनेक जण आडून अथवा उघडपणे केला जातो हे दोघांच्याही बोलण्यात आले (हे अर्थात दोघांच्याही प्रतिमेतून लक्षात आले). विशेष म्हणजे, पूर्वनियोजित वेळापत्रकापेक्षा कमी दिवसात हा चित्रपट पूर्ण करुन दोघांनीही फिल्म इंडस्ट्री आणि मिडिया अशा दोघांचेही अंदाज/अपेक्षा फोल ठरवल्या. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने नानाने प्रिन्ट, चॅनल, डिजिटल अशा सर्वच माध्यमात भरपूर मुलाखती दिल्या, आपण साकारलेल्या “नटसम्राट” च्या तो खूपच प्रेमात पडलाय हे लक्षात आले, तसेच हिच त्याच्यातील बदलाचीही सुरुवात आहे असे माझ्या लक्षात आले. (हाच नाना “परिंदा” , “खामोशी द म्युझिकल” या चित्रपटांच्या काळात सहजासहजी मुलाखत देत नसे. त्याच्या घरी लॅण्डलाईनवर फोन केल्यावर तो स्वतःच फोन उचलून आवाज बदलत सांगायचा, ‘नाना घरी नाही’. ते लॅण्डलाइनचे दिवस होते तसेच आपला चित्रपट पाहून मग काय ते प्रश्न करा ही नानाची अगदी योग्य भावना असे. कधी कधी मुलाखतीसाठी हो बोलण्यापूर्वी तोच चार पाच प्रश्न करत पत्रकाराचा अंदाज घेई. पण त्याचा नेमका ‘उलटा अर्थ’ काढला जाई.)
नानामधला आपला माणूस…
जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये “आपला माणूस” (२०१८) च्या फस्ट लूकच्या वेळी नानातील बदल मोठ्या प्रमाणावर लक्षात आला. आपल्या चित्रपटावर, सहकारी कलाकारांवर बोलता बोलता तो आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीवरही भरभरून बोलला. नाना पाटेकरचा अभिनय प्रवास चाळीसपेक्षा जास्त वर्षांचा आहे. पण तरीही तो सहज समजेल असा नाही. त्याच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही आणि हेच त्याचे वेगळेपण आहे. आपण इतरांपेक्षा वेगळे असावे हा त्याचा कळत नकळत असा ध्यास आहे, त्यात तो यशस्वी ठरला हे महत्वाचे. त्याला आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देताना त्याचे तेच वेगळेपण कौतुकाचे वाटते.