‘आभाळमाया’च्या लोकप्रिय शीर्षकगीतामागचा खटाटोप
ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना ‘जिंगल्सचा बादशाह’ म्हटले जाते. त्यांनी संगीत दिलेल्या गाण्याच्या गोष्टींचा एक कार्यक्रम देखील ते स्वतः सादर करतात. चित्रपटांचं संगीत असो, जाहिरातीला दिलेलं संगीत असो किंवा कायम मनात घर करणारी शीर्षकगीत असोत, अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचे आपण मोठे चाहते आहोत.
झी मराठी जेव्हा आधी अल्फा मराठी होतं, तेव्हाचा किस्सा आहे. अल्फा मराठी वाहिनी सुरु होणार होती आणि त्या वाहिनीवर ‘आभाळमाया’ नावाची एक दैनंदिन मालिका सुरु होणार होती. विनय आपटे यांनी अशोक पत्की यांना फोन केला. त्या मालिकेच्या शीर्षकगीताला चाल द्यायची होती. विनय आपटे यांनी अशोक पत्की यांना गीत पाठवले होते. अशोक पत्की यांनी नोटेशन्स करून ठेवली, पण त्यांनी सुरुवातीला केलेली पहिली चाल त्यांना स्वतःलाच विशेष आवडली नव्हती. दुसरी चाल केली, तरी त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही.
रेकॉर्डिंगच्या आदल्या दिवशी पहाटे अचानक साडे तीनच्या सुमारास त्यांना जाग आली, त्यांनी चाल केली. पण रेकॉर्डिंगच्या आधी अशोक पत्की यांनी आणखी एक चाल या गीतासाठी केली. ही त्या शीर्षकगीतासाठी केलेली चौथी चाल होती. रेकॉर्डिंगच्या दिवशी गायिका देवकी पंडित दुपारी रेकॉर्डिंगला येणार होत्या. आजीवसन स्टुडिओत तेव्हा आधी दुसऱ्या एका गीताचे रेकॉर्डिंग सुरु होते. तिथे अशोक पत्की यांनी सर्व वादक कलाकारांना ती चाल ऐकवली.
‘जडतो तो जीव’ हे शब्द उत्तम होते आणि चालही उत्तम होती. देवकी पंडित यांना चाल आवडली. पण मालिकेच्या निर्मात्यांना ती चाल विशेष आवडली नव्हती. विनय आपटे हे अशोक पत्की यांना म्हणाले, की तुम्हाला चाल आवडली आहे ना, मग काहीही हरकत नाही. अशोक पत्की यांनी दिलेली चाल तशीच ठेवण्यात आली. गाण्याचे रेकॉर्डिंग देवकीताईंच्या स्वरात झाले. गीताचे शब्द होते मंगेश कुलकर्णी यांचे.
शब्द होते,
“जडतो तो जीव, लागते ती आस
बुडतो तो सूर्य, उरे तो आभास
कळे तोच अर्थ, उडे तोच रंग
ढळतो तो अश्रू, सुटतो तो संग
दाटते ती माया, सरे तो काळ
ज्याला नाही ठाव, ते तर आभाळ घननीळा डोह, पोटी गूढ माया
आभाळमाया”
‘आभाळमाया’ मालिका आणि हे शीर्षकगीत एवढे लोकप्रिय झाले, की पुढे वाद्यवृंदात देखील हे गीत सादर होऊ लागले. देवकीताई कुठे मुलाखतीसाठी किंवा कार्यक्रमासाठी गेल्या, तर त्यांनी हे गीत गावे, अशी प्रेमळ विनंती त्यांना केली जायची. आजही त्या गाण्याची लोकप्रियता टिकून आहे.