दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
द बिग बुल: अभिषेक बच्चनचा जलवा
शेअर बाजार हा एकप्रकारे सरकारमान्य जुगार असल्याची वदंता समाजात रूढ आहे. ‘गुंतवणूक कमी आणि नफा जास्त’च्या आमिषाने कित्येक जण हा जुगार दररोज खेळत असतात. शेअर बाजार हा फक्त मोठमोठ्या व्यावसायिकांचा आणि धनिकांचा मक्ता नसून आपणही त्यात पैसे गुंतवू शकतो आणि नशिबाने साथ दिलीच तर भरभक्कम कमाईही करू शकतो, हा आत्मविश्वास मध्यमवर्गीयांना मिळवून दिला तो हर्षद मेहताने. ‘दलाल स्ट्रीटचा बच्चन’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या हर्षदने शेअर बाजाराचा जुगार मध्यमवर्गीयांसाठी खुला केला आणि त्याच हर्षदने तब्बल ५००० कोटींचा स्कॅम घडवून भारतीय अर्थव्यवस्थेला दणकाही दिला.
१९९२मध्ये ‘टाईम्स ऑफ इंडिया’ची पत्रकार सुचेता दलालने हा स्कॅम उघडकीस आणला आणि सरकारचे, बँकांचे आणि पर्यायाने शेअर बाजारात पैसे गुंतवलेल्या सगळ्यांचेच धाबे दणाणले. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला अंतर्बाह्य बदलून टाकणाऱ्या या स्कॅमवर सुचेता दलालने ‘द स्कॅम: व्हू वोन, व्हू लॉस्ट, व्हू गॉट अवे’ हे पुस्तक लिहलं. गेल्याच वर्षी दिग्दर्शक हंसल मेहतांनी ‘स्कॅम 1992’ या वेबसिरीजमधून हा इतिहास प्रेक्षकांसमोर मांडला. मूळ कथेची रंजक आणि तपशीलवार मांडणी असलेली ही वेबसिरीज प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. सामान्य माणसालाही कळेल अश्या भाषेत शेअर बाजारातल्या कठीण संकल्पना मांडल्याने ही सिरीज अल्पावधीतच लोकप्रिय झाली मात्र याचा फटका बसला तो नुकत्याच हॉटस्टारवर रिलीज झालेल्या कूकी गुलाटी दिग्दर्शित ‘द बिग बुल’ला.
१९९२च्या हर्षद मेहता स्कॅमवर आधारित असलेल्या या चित्रपटाची तुलना हंसल मेहतांच्या ‘स्कॅम 1992’ (Scam 1992) बरोबर होणे स्वाभाविक होते. वास्तविक पाहता, हा चित्रपट वेबसिरीज येण्याअगोदरच रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे पोस्ट प्रोडक्शन लांबलं आणि रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. कोरोनाच्या संभाव्य उद्रेकाचा धोका लक्षात घेता ‘द बिग बुल’ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला गेला. खऱ्या घटनेवर या चित्रपटाचं कथानक आधरित असूनही, पात्रांची नावे तीच न ठेवता जाणीवपूर्वक बदलली गेली आहेत, ज्यामुळे वास्तविकतेपेक्षा विसंगती जास्त जाणवत राहते. ‘स्कॅम 1992’च्या लोकप्रिय होण्याचं जितकं श्रेय तिच्या दिग्दर्शन आणि पटकथेला जातं, त्याहून जास्त मोलाचं योगदान सिरीजच्या संवादांचं आहे. ‘द बिग बुल’ (The Big Bull) मध्ये याच गोष्टीचा विचार करून प्रसंगानुसार बरेचसे खुमासदार संवाद कल्पकतेने पेरले गेले आहेत, ज्यामुळे हा चित्रपट वेबसिरीजची कॉपी न वाटता आपलं वेगळेपण सिद्ध करतो. त्याचबरोबर दहा एपिसोडमध्ये खुलवलेली कथा अडीच तासाच्या चित्रपटात बसवण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक आणि लेखक कूकी गुलाटी यांनी पटकथालेखक अर्जुन धवन आणि संवादलेखक रितेश शाह यांच्या साथीने लीलया पेललं आहे.
=====
हे देखील वाचा: द बिग बुल…अभिषेकच्या अभिनयाची कसोटी
=====
कालसाधर्म्य दर्शविण्यासाठी महाभारत मालिकेचा केलेला उल्लेख वगळता नव्वदीच्या दशकातील वातावरणनिर्मिती करण्यावर दिग्दर्शकाने फारसा भर दिला नसला, तरीही कामगार नेता राणा सावंत, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे चेअरमन मन्नू मालपाणी इत्यादींसोबत हेमंतच्या भेटीचे प्रसंग खुलवण्यात दिग्दर्शकाला यश आलेलं आहे. अभिनयाच्या बाबतीत सोहम शाह, इलियाना डिक्रुझ, निकिता दत्ता, सुप्रिया पाठक, सौरभ शुक्ला, कनन अरुणाचलम यांनी उत्तम कामगिरी बजावली असून महेश मांजरेकर, शिशिर शर्मा, राम कपूर, समीर सोनी इत्यादींनी त्यांना मिळालेल्या कमी लांबीच्या भूमिकांचं सोनं केलं आहे. सोहमने साकारलेला विरेन शाह आणि इलियानाने साकारलेली मीरा राव ही महत्त्वपूर्ण पात्रे त्यांच्या वाट्याला आलेल्या कमकुवत प्रसंगांमुळे उठून दिसत नाहीत.
हा पूर्ण चित्रपट अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) आपल्या अभिनयक्षमतेच्या जोरावर तारला असून, त्याने साकारलेला हेमंत शाह हा प्रतिक गांधीने साकारलेल्या हर्षद मेहतापेक्षा नक्कीच वेगळा ठरतो. बऱ्याच प्रसंगांमध्ये मणीरत्नमच्या ‘गुरु’मधला गुरुकांत देसाई प्रेक्षकांना हेमंतच्या देहबोलीतून डोकावताना दिसतो. प्रचंड महत्त्वाकांक्षी असलेल्या हेमंतची भूमिका साकारताना अभिषेकने संवादफेक आणि देहबोलीवर घेतलेली मेहनत पाहता गुजराती भाषेचा लहेजा पकडताना मध्येमध्ये त्याची होणारी दमछाक सहजासहजी लक्षात येत नाही. झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारा, करोडोंची समीकरणं जुळवत मानवी मेंदू आणि कॅल्क्युलेटरमधील फरक संपवू पाहणारा, शेअरबाजारातील स्पर्धात्मक वातावरणाचं नाव घेऊन मनातील पैशांच्या आणि सत्तेच्या वाढत्या लोभाला लपवू पाहणारा हेमंत शाह साकारताना अभिषेकने आपली संपूर्ण अभिनयक्षमता पणाला लावली आहे. अभिषेकच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट म्हणजे विशेष पर्वणी आहेच, त्याचबरोबर लांबलचक वेबसिरीज बघण्यात वेळ न दवडू इच्छिणाऱ्यांसाठीही ‘द बिग बुल’ हा निश्चितच चांगला पर्याय आहे.
=====
हे वाचलंत का: स्कॅम-1992 : हर्षद मेहता स्टोरी
=====