ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
बॉलिवूडचं ग्लॅमर अनुभवूनसुद्धा मराठी इंडस्ट्रीशी नातं कधीच न तोडणाऱ्या श्रेयसची यशोगाथा!
आपल्याकडे मुख्यत्वे २ इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा तुलना होते. मराठी फिल्म इंडस्ट्री आणि हिंदी फिल्म इंडस्ट्री ज्याला बॉलिवूड असंही म्हणतात. आपल्या मराठी इंडस्ट्रीवर बऱ्याचदा हिंदीची कॉपी करण्याचा आरोपही लागला आहे, त्यात कितपत तथ्य आहे कोणास ठाऊक! पण दोन्ही इंडस्ट्रीनी इतके कसदार कलाकार आपल्याला दिले आहेत की काही विचारू नका. त्यातून नाना पाटेकर, महेश मांजरेकर, मोहन जोशी, जितेंद्र जोशी, सदाशिव आमरापुरकर, अशा अनेक दिग्गजांनी हिंदी मध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं ते वेगळंच.
या मांदियाळीत बसणारा आणखीन एक गोंडस कलाकार म्हणजे श्रेयस तळपदे (Shreyas Talpade). शून्यातून विश्व उभारणं म्हणजे नेमकं काय हे श्रेयसच्या करियर ग्राफ कडे बघून तुम्हाला समजेल. स्टेज शो, टेलिव्हिजन सिरियल पासून सुरुवात करून आज बॉलिवूड मध्ये स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारा आणि एक निर्माता म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण करू पाहणाऱ्या या कसदार अभिनेत्याला म्हणावं तसं एक्सपोजर मिळालं नाही हे देखील तितकंच खरं!
हे देखील वाचा: शाहरुख खान : एक अभिनेता, एक प्राॅडक्ट
मुंबईच्या मातीत जन्मलेला आणि वाढलेल्या श्रेयसचं शालेय शिक्षण श्रीराम वेलफेअर सोसायटी हाय स्कूल मध्ये झालं. त्याची मावशी ही जरी इंडस्ट्रीमध्ये काम करत असली तरी श्रेयसचं फिल्मी दुनियेशी कोणतच थेट कनेक्शन नव्हतं. नंतर मिठिबाई कॉलेज मध्ये त्याने त्याचं उर्वरित शिक्षण पूर्ण केलं. बरोबरीने स्टेज शोज आणि टेलिव्हिजन वरच्या “वो” या मालिकेतून श्रेयस त्याचं करियर बिल्ड करत होता.
“दामिनी” या सिरियल मधल्या तेजस आणि “आभाळमाया” मधल्या निशांत या २ भूमिकांमुळे श्रेयस घराघरात पोहोचला आणि या गोड चेहऱ्याच्या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान मिळवलं. दरम्यान एका कॉलेज मध्ये प्रमुख पाहुणा म्हणून त्याला बोलावलं गेलं तेंव्हा त्या कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी असणाऱ्या दीप्तीच्या प्रेमात तो पडला आणि २००४ मध्ये ते लग्नबंधनात अडकले सुद्धा!
श्रेयसला पहिला वहिला हिंदी सिनेमात ब्रेक मिळाला तो विपुल शहा यांच्या “आंखे” या चित्रपटात. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, परेश रावल, अर्जुन रामपाल, सुश्मिता सेन अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या सिनेमात काही सेकंदासाठी एका चहा वाल्याचा रोल श्रेयसला मिळाला, पण त्यातही त्याने त्याची छाप सोडलीच. पण हिंदीत बस्तान बसवत असताना त्याने मराठी इंडस्ट्रीकडे कधीच पाठ फिरवली नाही. पछाडलेला, सावरखेड एक गाव, अशा भन्नाट हीट सिनेमातून श्रेयस मराठीतसुद्धा त्याच हिरीरीने काम करत राहीला.
२००५ साली आलेल्या नागेश कुकनूर दिग्दर्शित “इकबाल” (Iqbal) या सिनेमातून हा मराठमोळा चेहरा हिंदीत झळकला तो एक मेन लिड ॲक्टर म्हणून. त्यातली मुकबाधिर तरुण क्रिकेटपटूची भूमिका श्रेयसने ज्या सहजतेने साकारली त्यासाठी त्याला बेस्ट डेब्यू म्हणून पुरस्कृत सुद्धा करण्यात आलं. नासिरुद्दीन सारख्या कसलेल्या आणि आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कलाकारासमोर श्रेयसने ज्या पद्धतीने काम केलं ते पाहताना आजही त्याच्या डोळ्यातली अभिनयाची भूक जाणवते. आजही इकबालचा शेवटचा सीन मंत्रमुग्ध करतो.
हे वाचलंत का: अमृता खानविलकर…. हिंदीचं ग्लॅमर, मराठी ठसका
नंतर डोर, अपना सपना मनी मनी, दिल दोस्ती etc, अशा सिनेमातून श्रेयस वेगवेगळे प्रयोग करत राहिला. २००७ साली फराह खान हिने श्रेयसला थेट शाहरुखच्या बिग बजेट “ओम शांती ओम” (Om Shanti Om) मध्ये कास्ट केलं आणि त्याने त्या सिनेमात काही काही सीन्स मध्ये शाहरुखला सुद्धा मात दिली.
हिंदीत काम मिळतंय म्हणून त्याने कधीच कसलाच बडेजाव केला नाही. उलट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी त्याने मराठीसृष्टिलाच प्राधान्य दिलं आणि “सनई चौघडे” (Sanai Choughade) सारखा एक आगळा वेगळा सिनेमा लोकांच्या भेटीला आणला. याबरोबरच त्याने पेईंग गेस्ट, रोहित शेट्टीचा गोलमाल, जोकर, मिर्च, क्लिक, हाऊसफुल २ सारख्या सिनेमातून विनोदी तसेच भयपट अशा दोन्ही सिनेमात वेगवेगळे प्रयोग सुरू ठेवले.
रोहित शेट्टी, फराह खान सारख्या तद्दन कमर्शियल चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांसोबत काम करणारा श्रेयस श्याम बेनेगल सारख्या प्रतिभवान दिग्दर्शकांसोबत सुद्धा तितक्याच सहजतेने काम करू लागला. श्याम बेनेगल यांच्या बरोबर त्याने केलेला “वेलकम टू सज्जनपूर” (Welcome to Sajjanpur) हा सिनेमा आजही त्याने केलेल्या उत्तम कामांपैकी एक आहे. यात त्याने उत्तर भारतीय माणसाचे पात्र आणि त्याची बोलीभाषा हे ज्या बारकाईने मांडलं आहे त्यावरून श्रेयस आपल्या पात्रावर कीती मेहनत घेतो हे दिसून येईल!
मराठी इंडस्ट्री मध्ये मैलाचा दगड ठरलेल्या आणि खुद्द धर्मेंद्र आणि त्याच्या २ मुलांना भुरळ पाडणारा “पोस्टर बोईज” (Poster Boys) हा सिनेमा प्रोड्यूस करून श्रेयसने हे दाखवून दिलं की स्टार पॉवर पेक्षा कंटेंट हा कीती महत्वाचा असतो ते! मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक ही काही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही पण इतक्या गंभीर विषयावर सिनेमा काढताना तो प्रथम मराठीतच काढावा असं श्रेयसला वाटणं हीच खरंतर खूप मोठी गोष्ट आहे. बाजी नावाच्या सिनेमातून त्याने एक वेगळा प्रयोग केला खरा पण लोकांनी त्या सिनेमाला म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही! तर अशा या हिंदीत स्थिरावलेल्या पण आपल्या मराठी मातीशी नातं कधीच न तोडणाऱ्या हॅंड्सम मराठमोळ्या हीरो श्रेयस तळपदेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
– अखिलेश नेरलेकर