‘आतिषबाजीने’ रंगली मधुरा वेलणकर-साटमची दिवाळी
नुकताच अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिला माननीय राज्यपाल यांच्या हस्ते कोव्हीड योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने आणि तिच्या ‘आतिषबाजी’ या दिवाळी अंकाच्या निमित्ताने तिच्याशी साधलेला संवाद.
१) मधुरा, ही दिवाळी तुझ्यासाठी स्पेशल का असणार आहे?
मधुरा – “खरे तर या लॉकडाऊन नंतर आपल्या प्रत्येकासाठी ही दिवाळी स्पेशल असणार आहे. हा लॉकडाऊनचा काळ खूप वेगळा होता. कलाकारांसाठी सुद्धा हा खूप आव्हानात्मक काळ होता. नाटक, मालिका, चित्रपट सर्वच माध्यमातील काम मुळात बंद, शूटिंग कधी सुरु होणार माहित नाही आणि त्यामुळे आर्थिक गणितं बिघडली होती. नैराश्याचा काळ होता, पण निराशेवर मात करणे महत्वाचे होते. त्यातून मी आणि माझा नवरा अभिजित साटम आम्ही दोघांनी फेसबुकवर ‘मधुरव’ नावाचा एक कार्यक्रम सुरु केला. खरे तर एक सोशल मीडियावरील कार्यक्रम एवढीच त्याची सुरुवात होती, पण नंतर तो कार्यक्रम छान आकार घेत गेला. अनेक मंडळींवर त्याचा प्रभाव वेगळ्या अर्थाने पडला. खूप जण त्यांच्या आयुष्यातील निराशेतून बाहेर आले, लोक व्यक्त होऊ लागले, लिहिते झाले, वाचू लागले. हा कार्यक्रम फक्त कार्यक्रम न राहता या कार्यक्रमाचा एक ब्रँड तयार झाला. ‘मधुरव’ चे दोन सीझन्स झाले. या दोन्ही सिझन मध्ये ज्यांचे लिखाण आम्ही वाचले, त्या लिखाणाचा समावेश होईल असे ‘आतिषबाजी’ हे पुस्तक आम्ही दिवाळीच्या निमित्ताने प्रकाशित केले आणि अभिजीतने टीमपूल डॉट कॉम या माध्यमातून हे पुस्तक सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहे. अभिजीतने या काळात ही वेबसाईट विकसित केली. सहा सात महिन्यांत आम्ही घरातील कामे करता करता देखील असा उपक्रम केल्याने आज ‘मधुरव’ आणि ‘आतिषबाजी’ च्या निमित्ताने आम्हाला खूप समाधान मिळाले. ‘मधुरव’ या उपक्रमाची माननीय राज्यपालांनी दखल घेऊन मला ‘कोव्हीड योद्धा’ पुरस्कार जाहीर केला आणि आपण केलेला हा उपक्रम आम्हाला देखील ऊर्जा देणारा ठरला”.
२) ‘आतिषबाजी’ ची नेमकी संकल्पना काय होती?
मधुरा – “जेव्हा ‘मधुरव’ सीजन पहिला चालू होता, तेव्हा कोणीतरी असं म्हटलं की हे सगळे लिखाण एकत्रित करून प्रकाशित करता आले, तर किती मजा येईल! वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळ्या लोकांनी विविध विषय मांडले होते. प्रत्येकाची शैली वेगळी होती. सुरुवातीला दिवाळी अंकाचाही विचार आला, पण मग एक पुस्तकच तयार झाले. दिवाळी अंकापेक्षा पुस्तक करून त्यात शंभर जणांच्या लिखाणाचा समावेश करता आला. माझं स्वतः चे ‘मधुरव’ पुस्तक गेल्यावर्षी प्रकाशित झाले होते. आणि या काळातील ‘मधुरव’ कार्यक्रम यशस्वी झाला होता. मधुरव प्रस्तुत ‘आतिषबाजी’ हा ग्रंथ आम्ही प्रकाशित करण्याचे ठरवले. आतिषबाजी कसली तर ‘आतिषबाजी कल्पनेची, शब्दांची आणि सृजनशीलतेची’ अशी टॅग लाईन घेऊन हा ग्रंथ प्रकाशित झाला”.
हे वाचलंत का: हेमंत – क्षिती खूप उत्साहात साजरी करतायत घरगुती दिवाळी
३) कोव्हीड योध्दा पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली का?
मधुरा –“मी माझं काम करतच होते आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय ते करत होते. सुरुवातीला जेव्हा हा पुरस्कार मला जाहीर झाला, तेव्हा मला वाटलं की अरे एवढी मोठी मोठी कामे केलेली माणसे आहेत, तर मग आपण कुठे यामध्ये? मात्र राज्यपाल स्वतः भाषणात म्हणाले की कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. तुमची भावना महत्वाची असते आणि तुम्ही केलेल्या कामाचा पडलेला प्रभाव महत्वाचा असतो. अनेकांना माझ्या कार्यक्रमातून आत्मविश्वास मिळाला. मला एक पत्र आलं होतं. त्या व्यक्तीची नोकरी गेली होती आणि त्याला काय करावं असं सुचत नव्हतं, पण ‘मधुरव’ या कार्यक्रमाने त्या व्यक्तीला तारलं, असं त्या व्यक्तीने पत्रात म्हटलं. तेव्हा मला पुन्हा राज्यपालांचे शब्द आठवले. आज माझ्या या कार्यक्रमामुळे काही जणांचं आयुष्य सुकर झालं असेल, कोणाला प्रेरणा मिळाली असेल, त्यांना उमेद मिळाली असेल, तर नक्कीच माझा कार्यक्रम प्रभावी झाला असेल आणि म्हणूनच मला हा पुरस्कार मिळाला असेल. पुरस्कार मिळाल्यावर चर्चा होते. पण त्यानंतर तुम्हाला पुढे तुमचे काम निरपेक्ष वृत्तीने करतच राहायचे असते. पुरस्कार हे आपल्याला प्रोत्साहन देत असतात. आपले काम अव्याहतपणे आपण चालूच ठेवले पाहिजे”.
४) आठवणीतील एखादी दिवाळी
मधुरा –“कोणत्या दिवाळीविषयी सांगू? एक सांगते, आम्हाला सलग पाच वर्षे काही घटनांमुळे दिवाळीच साजरी करता आली नव्हती आणि त्यानंतर जी दिवाळी आमच्या आयुष्यात आली, ती खूप विचित्र भावनेची दिवाळी होती. कारण पाच वर्षे दिवाळी न साजरी केल्यामुळे त्यावर्षी मस्त उत्साहात दिवाळी साजरी करण्याचा विचार होता. पण दिवाळी साजरी करण्याची सवय गेली होती. फटाके फोडायची सवय गेली होती, आईने फराळ तर केला होता, पण थोडासा फराळ खाल्ल्यावर आता नको खायला फराळ असे वाटायचे. पण त्या वेळी ही दिवाळी साजरी करताना एक भान आले होते. तेव्हा मी अकरावीत होते. त्या दिवाळीने मला आपल्या माणसांचे महत्व कळले. कसा खर्च करावा, खरा आनंद कशातून शोधावा हे समजत गेले. पुढच्या आयुष्यातील अनेक दिवाळी अनेक आठवणी घेऊन आल्या. मग ती लग्नानंतरची दिवाळी असेल, मुलाच्या जन्मानंतरची दिवाळी असेल किंवा अजून कोणती दिवाळी! पण ती दिवाळी माझ्या अजूनही लक्षात आहे.
५) तुझे आगामी प्रोजेक्ट्स कोणते ?
मधुरा – नुकतीच गिरीश कुलकर्णी आणि मी जयपूर येथे एका हिंदी शॉर्ट फिल्मचे शूटिंग केले. ही फिल्म काही फेस्टिव्हल्स मध्ये पाठवली जाईल. मी आणि अभिजित आम्ही एक मराठी चित्रपट निर्माण करत आहोत. त्याचे शूटिंग डिसेंबर पासून सुरु होईल. आणि आम्ही दोघे त्यात कामही करत आहोत. अजून दोन चित्रपटात मी काम करत आहे. नवीन लिखाण देखील करणारच आहे.