Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
नुकताच जागतिक दूरचित्रवाणी दिवस साजरा झाला. टेलिव्हिजनचे महत्व, त्याची पोहोच आदी अनेक गोष्टी टीव्ही अधोरेखित करतो. टेलिव्हिजनमुळे जगभर मोठी क्रांती घडून आली. आजही टीव्ही प्रसारणाचे, माहितीचे, मनोरंजनाचे मोठे माध्यम आहे. याच टीव्हीचे महत्व स्पष्ट करण्यासाठी आणि त्याची महती अधिकच प्रभावी पद्धतीने लोकांना सांगण्यासाठी जागतिक दूरचित्रवाणी दिवस साजरा केला जातो.
आज मनोरंजनविश्वासाठी टीव्ही हे सर्वात मोठे माध्यम आहे. टीव्हीमुळे अनेक कलाकरांना ओळख मिळाली, अनेकांचा उदरनिर्वाह टीव्हीमुळे होतो, प्रेक्षकांना उत्तम कलाकार मिळाले, उत्तम कलाकृती पाहायला मिळतात. या टीव्हीने अनेक कलाकारांच्या आयुष्याला मोठी कलाटणी दिली आणि त्यांना करियरची दिशा दिली. त्यामुळे टीव्हीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक कलाकारांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आणि टीव्हीचे त्यांच्या जीवनातील महत्व अधोरेखित करत पोस्ट शेअर केली. अशातच अभिनेत्री विशाखा सुभेदाराने देखील जागतिक दूरचित्रवाणी दिनाचे औचित्य साधत एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या कमालीचे व्हायरल होत आहे.
विशाखाने तिच्या पोस्टमधून टीव्हीला धन्यवाद म्हणताना तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. विशाखाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “तु मला सगळं काही दिलंस..! ओळख, नाव, पैसे, प्रसिद्धी, आणि वेगवेगळ्या भूमिका. तुझ्याबरोबरचा प्रवास हा कायमच मी ‘मला’ शोधण्यात घालवते. फक्त ‘नजरेने’ काय करता येईल..? वाक्य कशी फेकावी म्हणजे तुझ्या समोर बसलेला प्रेक्षक ‘वाह’ म्हणेल. हा खेळ आम्हा कलाकारांचा कायमच सुरु असतो. तुझी मेमरी म्हणे शॉर्ट टर्म असते पण खरं सांगू,
मी तुझ्या साक्षीने अनेक वर्षांपूर्वी मारलेली cartwheel अजून लोकांच्या ध्यानात आहे. माझ्याकडून साकारल्या गेलेल्या ‘फु बाई फु’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील विविध व्यक्ती रेखा, ‘शेजारी शेजारी’ मधील ‘लज्जो’, ‘आंबट गोड’ मधली ‘दया’ असो किंवा ‘का रे दुरावा’ मधली ‘नंदिनी’ असो अजून अनेकांच्या स्मरणात आहे आणि आता ‘शुभविवाह’ मधली ‘रागिणी’ किती खेळ खेळले आहेत आणि आजही खेळतेय मी तुझ्या साक्षीने!
Tv बाबा, तु आहेस म्हणून आम्ही आहोत. आमच्या असण्याला, जगण्याला तूझा आधार आहे. आजवर ह्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला हा प्रवास साधण्याची संधी दिली त्या त्या सगळ्यां निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, सहप्रवश्यांना मनापासून खुप खुप धन्यवाद..! आणि तुझ्यावर प्रचंड प्रेम होतं आहे आणि यापुढेही तसच राहील, जागतिक दूरचित्रवाणी दिवसाच्या म्हणजेच वर्ल्ड टेलिव्हिजन डे च्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा!”
एकूणच काय तर विशाखाने तिच्या या पोस्टमधून तिचा आजवरचा अभिनय प्रवास उलगडला आहे. यात अगदी तिच्या पहिल्या कामापासून ते आतापर्यंतच्या सर्वच भूमिकांबद्दल तिने लिहिले आहे. सोबतच तिच्या भूमिकांचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.
विशाखा एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती उत्तम पद्धतीने व्यक्त देखील होते. ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती सतत विविध पोस्ट करताना दिसते. तिच्या पोस्ट चर्चेचा विषय बनतात, सोबतच तिच्या लिखाणाबद्दल देखील चर्चा होतात आणि त्याचे कौतुक देखील होते. दरम्यान विशाखाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सध्या ती स्टार प्रवाहच्या ‘शुभविवाह’ या मालिकेत रागिणी ही नकारात्मक भूमिका साकारत आहे.