अग्निहोत्र
स्टार प्रवाहवर डिसेंबर पासून सुरु झालेली अग्निहोत्र मालिका थांबली आणि प्रेक्षकांचा रात्री दहाचा कॉलटाईम चुकला…अग्निहोत्र…शरद पोंक्षे यांच्यासह अनेक मराठी मान्यवर….दबंग कलाकारांच्या अभिनयाने सजलेली मालिका…दहा वर्षापूर्वी आलेल्या या मालिकेनं मराठी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं…आता काय होईल…पुढच्या भागात गणपती सापडतील का…वाड्याचं रहस्य उलगडेल का…विहरीत काय सापडेल…वाड्याखालच्या भुयारात काय सापडेल…ते गणपती कोणाकडे असतील…असे एक ना दोन अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात सोडून मालिकेचा भाग संपायचा…मग पुन्हा दुस-या दिवसाची प्रतीक्षा…अग्निहोत्र मालिकेच्या पहिल्या भागाचं नाव दर्जेदार मालिकांच्या पंक्तिंत पहिल्या क्रमांकावर होतं…सहासष्ठ भागांची ही मालिका संपली तेव्हा अनेकांना चुटपूट लागली…आता बरोब्बर दहा वर्षानंतर पुन्हा ही अग्निहोत्र मालिका आली दुस-या भागात…नव्या कलाकारांच्या उत्साहात…कथेला थोडा व्टिस्ट देत…दोन डिसेंबर पासून मालिका सुरु झाली…नाशिकच्या अग्निहोत्रींच्या वाड्याचं दार पुन्हा उघडलं…पहिल्या भागातील शरद पोंक्षेंचा दमदार अभिनय या पुढच्या पर्वातही पहायला मिळणार म्हणून प्रेक्षक वर्गातही उत्सुकता होती…
त्यासोबत आता वाड्यात कुठले नवीन रहस्य दडले आहे…सोन्यांच्या मोहरांची काय भानगड आहे…अग्निहोत्राचा रक्षक कोण…नाशिक ते गोवा काय कनेक्शन…असे प्रश्न पडायला सुरुवात झाली तोच मालिकेत क्रमशः असा बोर्ड आल्याने प्रेक्षक गोंधळून गेले आहेत. आता स्टार प्रवाहवर अग्निहोत्रच्या जागी वैजू नंबर वन ही नवी मालिका सुरु झाली…मात्र अग्निहोत्रचा हा क्रमशः बोर्ड कधी पर्यंत असेल याची कल्पना प्रेक्षकांना नसल्याने नेमकं काय झालं याचीच चर्चा अधिक आहे. अग्निहोत्रच्या पहिल्या भागात मोहन आगाशे, विनय आपटे, ईला भाटे, मोहन जोशी, सुहास जोशी, गिरीश ओक आणि शरद पोंक्षे अशा दादा मंडळींसोबत मुक्ता बर्वे, ओम बुधकर, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे या कलाकारांच्या भूमिकाही दमदार होत्या…आता भाग दोन मध्ये शरद पोंक्षे त्याच महादेव अग्निहोत्रींच्या भूमिकेत अधिक तापट झाल्याचे दाखवण्यात आले होते. अग्निहोत्राची…वाड्याची जबाबदारी एकट्याने सांभाळणारे महादेव काका वाड्याला सतत प्रश्न विचारत असतात…आणि त्याच वेळा अक्षरा अग्निहोत्रीची एन्ट्री होते..ही नव्या पिढीची प्रतिनिधी..इथून खरंतर मालिकेला वेग मिळाला होता…अक्षराच्या भूमिकेत रष्मी अनपट हिने दोन वर्षाच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं…तिच्या सोबत राजन भिसे, विद्याधर उर्फ बाप्पा जोशी, अनुराधा राजाध्यक्ष, स्तवन शिंदे, कौमुदी वलवकर, प्रतिक्षा मुणगेकर, शैलेश दातार, पल्लवी पाटील, सिद्धेश प्रभाकर, अव्दैत केंडे, मृणाल देशपांडे या कलाकारांचीही चांगली टीम तयार झालेली होती. पहिल्या भागात रोहीणीची भूमिका करणा-या शुभांगी गोखलेही या भागात दिसल्या…पण त्या पाहुण्या कलाकारासारख्याच…तेव्हाच काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते…कुठेतरी मालिकेचा ताळमेळ बसत नाही आहे, हे जाणवत होते…मोहन जोशीही दुस-या भागात आले. पण पाहुणे कलाकार आहेत की काय अशी भूमिका त्यांच्या वाट्याला आली…आणि ते गायब झाले… दहा वर्षापूर्वीची अग्निहोत्र मालिका अद्याप प्रेक्षकांच्या मनात आहे. त्याच भूमिकेतून या मालिकेच्या पुढच्या पर्वाकडे बघण्यात आले. पहिल्या काही भागांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसली…पण नंतर काहीतरी चुकतंय याची जाणीव होऊ लागली…त्यातूनच अवघ्या दोन महिन्यात क्रमशः बोर्ड लावण्यात आला…आता वाड्याचे रहस्य काय…मोहरा कोणाकडे आहेत…त्या सात मोहरांच्या ख-या अधिकारी महिला कोण…अक्षराचे बाबा बरे होतील का…ती सोन्याची मुर्ती कोणाकडे आहे….तो वाड्यात कधीही घुंघरु लावलेली काठी घेऊन फिरणारा बाबा कोण…या प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नात हा क्रमशः बोर्ड कधी जाणार या नव्या प्रश्नाची भर टाकली आहे, हे नक्की….
सई बने
फोटो सौजन्य- गुगल (Google)