‘गुलाबी साडी’ फेम गायक संजू राठोडने रचला इतिहास; सनबर्न एरेना,
‘ऐतराज’ला २० वर्ष पूर्ण
एकदा नव्हे, दोनदा झाले, चित्रपट पाहत असताना लक्षात आले, या चित्रपटाच्या पटकथेच्या केन्द्रस्थानी त्यातील व्हॅम्प आहे….. बी. आर. चोप्रा दिग्दर्शित “दास्तान” (१९७२) आणि अब्बास मुस्तान दिग्दर्शित “ऐतराज” (Aitraaz) (२००४) मी पहिल्यांदा पाहतानाच लक्षात आले, यात नायिकेपेक्षा व्हॅम्प (तिला खलनायिकाही म्हणतात) जास्त प्रभावित करतेय, म्हणून मी हेच चित्रपट दुसर्यांदा पाहताना त्यातील व्हॅम्प केन्द्रस्थानी ठेवून पाहिले….चित्रपट असाही बघावा का?
“दास्तान” ही चोप्रासाहेबांनी आपल्याच “अफसाना” (१९५१) या लोकप्रिय चित्रपटाची रिमेक केली. त्यामुळे दिलीप कुमारची नायिका बनण्याची शर्मिला टागोरची इच्छा पूर्ण झाली देखील. मात्र दुहेरी भूमिकेतील दिलीप कुमारची चंचल, छचोर, बदफैली पत्नी म्हणून बिंदू छा गई. चित्रपट फ्लाॅप गेल्याने बिंदूची अदाकारी जास्त रसिकांपर्यंत पोहचली नाही. प्रेम चोप्रा तिला नादाला लावतो.
“ऐतराज” (Aitraaz) मात्र सुपरहिट. १२ नोव्हेंबर २००४ रोजी प्रदर्शित झाला. वीस वर्ष कधी हो झाली? मला आठवतय, या चित्रपटातील काही दृश्ये व गाणी आम्हा सिनेपत्रकारांना दाखवली तेव्हाचा प्रियांका चोप्राचा आत्मविश्वासपूर्ण वावरच सांगत होता, तिच्या कारकिर्दीतील हा महत्वाचा चित्रपट ठरणार. सुभाष घई यांनी आपल्या मुक्ता आर्ट्स या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली.
दिग्दर्शक अब्बास मुस्तान धाडसी कथानकासाठी ओळखले जात. “खिलाडी“( १९९२)च्या यशाने त्यांना ही ओळख मिळाली. (हा चित्रपट रवि टंडन दिग्दर्शित “खेल खेल मे” या चित्रपटाची जमलेली रिमेक होती.), बाजीगर (१९९३), दरार (१९९६), सोल्जर (१९९८), बादशाह (१९९९), चोरी चोरी चुपके चुपके (२००१), अजनबी (२००१) असे करत करत ते “ऐतराज” (Aitraaz) पर्यंत आले. यातील “बाजीगर” जास्त इंटरेस्टिंग व इम्पेसिव्ह. “दरार” पूर्णपणे फसला. कारण त्याच थीमवरील पार्थो घोष दिग्दर्शित “अग्निसाक्षी” (१९९५) अगोदर रिलीज होवून हिट देखील झाला. त्यामुळेच “दरार” मध्ये करावे लागलेले फेरफार मारक ठरले.
हे जवळपास सर्वच चित्रपट कोणत्या न कोणत्या विदेशी चित्रपटावर बेतलेले. “ऐतराज” (Aitraaz) हा “Disclosure” (१९९४) या चित्रपटावर बेतलेला. पटकथालेखन श्याम गोयल आणि शिराज अहमद यांचे. पटकथेत नाट्य पुरेपूर होते. छायाचित्रण रवि यादव यांचे तर संकलन हुसैन ए. बर्मावाला यांचे. चित्रपटाची पूर्वप्रसिध्दी अतिशय फोकस्ड याचे आश्चर्य वाटले नाही. अहो, सुभाष घई या चित्रपटाचे निर्माते होते.
चित्रपट धाडसी कथानकावर बेतलेला. हॅण्डसम राज (अक्षय कुमार) याच्यावर त्याची कार्यालयीन बाॅस ग्लॅमरस सोनिया राॅय (प्रियांका चोप्रा) त्याने आपल्यावर जबरदस्ती, शारीरिक लगट (सेक्सुअल हरॅसमेंट) केल्याचा आरोप करते या धक्कादायक सुत्राभोवती हा चित्रपट आहे. यात एक फ्लॅशबॅकही आहे आणि तरुण सोनियाने श्रीमंतीच्या हव्यासात साठीपार उद्योगपती रणजीत राॅय (अमरीश पुरी) याच्याशी लग्न केलेय. तिने राजला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात (खरं तर विळखाच म्हणायला हवा) ओढण्यात एक रहस्य आहे. तर त्यातून त्याला सहीसलामत बाहेर काढण्यासाठी त्याची पत्नीच प्रिया सक्सेना (करिना कपूर) जोरदार प्रयत्न करते.
मूळ कथेत असलेला धाडसीपणा हिंदीत थोडा मवाळ केलाय. बहुतेक त्या काळातील चित्रपट रसिक जास्त धाडसी कथानक पाहणार नाहीत असे निर्माता व दिग्दर्शकांस वाटले असेल. अब्बास मुस्तान यांच्या मुलाखतीचे योग अनेक आले. अतिशय गप्पिष्ट जोडी. “ऐतराज” (Aitraaz)च्या निमित्त ते म्हणाले, सहकुटुंब सहपरीवार प्रेक्षकांनी हा चित्रपट एन्जॉय करावा याचे भान ठेवून मांडणी केली आहे. त्यांच्या बोलण्यातील तत्थ पडद्यावर दिसते. आज वीस वर्षांनंतर “ऐतराज“ची रिमेक नायक दुय्यम ठरुन नायिका व व्हॅम्प यांच्यातील तीव्र संघर्षाची ठरेल. व्हॅम्पचे पूर्वायुष्य अधिकच धाडसी, धक्कादायक असेल. मल्टीप्लेक्स व ओटीटी युगात हिंदीत अधिक मोकळेपण, धाडसीपण आले आहे. रसिकही ते एन्जाॅय करतेय.
प्रियांका चोप्राने सोनिया राॅय साकारताना आपले सौंदर्य, फॅशन स्टाईल, बोल्ड लूक, मधाळ दिसणे, लाघवी बोलणे, मादक नजर या सगळ्याच शस्त्रांचा पुरेपूर वापर केलाय. करिना कपूर एकदमच फिकी पडली. त्यात नुसते चांगले दिसणे होते. व्हॅम्प साकारली तर आपण तशाच भूमिकेत अडकून जावू अशी प्रियांका चोप्राने भीती बाळगली नाही म्हणून ती जास्त लक्षवेधक ठरली.
याच चित्रपटाची “Indira Vizda” या नावाने तमिळमध्ये रिमेक करण्यात आली. के. राजशेखर दिग्दर्शित या चित्रपटात श्रीकांथ, श्रृती मराठे (नायिका) व नमिथा (व्हॅम्प) यांच्या भूमिका आहेत. श्रृती मराठेने त्या दिवसात मला एका मुलाखतीत सांगितले, हाच चित्रपट आता मला ऑफर झाला तर मी मूळ चित्रपटातील प्रियांका चोप्राने साकारलेली निगेटिव्ह शेडची भूमिका अधिकच प्रभावीपणे साकारेन. श्रृतीच्या आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोनाला मी दाद दिली. अशा भूमिकेचे आव्हान स्वीकारण्याचे धाडस हवे. श्रृतीकडे ते नक्कीच आहे.
============
हे देखील वाचा : अरोरा चित्रपटगृहाची स्वतंत्र ओळख होती….
============
“ऐतराज” (Aitraaz) चा मूळ क्लायमॅक्स वेगळाच होता. सोनिया राॅयला (प्रियांका चोप्रा) आपल्या वागण्याचा पश्चाताप होतो आणि ती आपल्या कार्पोरेट कार्यालयातील गच्चीत जावून उडी मारुन आयुष्य संपवते. त्याच वेळेस संवाद आहे, जब आदमी जिंदगी मे बहुत तेजी से उपर जाता है, तो वो सोचता है की उसे अलग किस्म की कामयाबी मिलेगी, लेकिन उसको तब पता चलता है की उसके आसपास के उसके जितने भी लोग है वो कितने दूर हो गये… चित्रपटाचा शेवट असा नको असा विचार केला गेला.
“ऐतराज” (Aitraaz)ला चक्क वीस वर्ष कधी झाले ते समजलेच नाही. जुने चित्रपट आता पुन्हा प्रदर्शित करण्याच्या ट्रेण्डमध्ये “ऐतराज” पुन्हा प्रदर्शित करायला हरकत नाही. हे तीनही प्रमुख कलाकार आजही आपले स्टारपण टिच्चून टिकवून आहेत हे कौतुकास्पद.