अभिनेत्री तसेच नृत्यांगना आकांक्षा गाडे
सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन‘ ही मालिका चर्चेचा विषय ठरत आहे. यात रिया प्रभाकर ही व्यक्तिरेखा गेल्या काही भागात लोकप्रिय झाली आहे. रियाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे आकांक्षा गाडे. ती पार्ले टिळक शाळेची विद्यार्थिनी. लहानपणी आई बाबांच्या प्रोत्साहनामुळे आकांक्षा काही नाट्यशिबिरांना जात होती. तसेच गुरु डॉक्टर गौरी पोंक्षे यांच्याकडे भरतनाट्यम देखील शिकत होती. तिने साठ्ये कॉलेजमध्ये कॉमर्सला प्रवेश घेतला आणि कॉलेजची पाच वर्षे तिला खूप काही मिळवून देणारी ठरली.
अनेक एकांकिका तिने केल्या, त्यात बक्षिसे मिळवली. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात तिने माईम (मूक अभिनय) मध्ये भाग घेतला होता. त्यातही त्यांच्या गटाला बक्षीस मिळाले. ‘मराठी पाऊल पडते पुढे’साठी आकांक्षा आणि तिच्या गटाने तेजस मालप दिग्दर्शित एक माईम परफॉर्मन्स सादर केला. परीक्षक होते मकरंद देशपांडे. त्यांनी तो परफॉर्मन्स लक्षात ठेवून ‘व्हॉट अ लोटा’ या नाटकासाठी आकांक्षाला संधी दिली. पृथ्वी थिएटर शी तिचं नातं जुळू लागलं.
पृथ्वी थिएटर निर्मित अनेक नाटकात हळूहळू ती काम करू लागली. मकरंद देशपांडे यांचं व्यक्तिमत्व तिला प्रभावित करणारं ठरलं. पृथ्वी थिएटरच्या वातावरणात, त्या संस्कारात ती घडू लागली. मकरंद सरांनी पृथ्वी फेस्टिवलमध्ये नऊ वेगवेगळ्या संहितांचे केलेले अठरा प्रयोग पाहून ती भारावून गेली. हे असं एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत शिरणं किती भारी आहे, असं तिला वाटू लागलं.
एपिक गडबड, शेक्सपिअरचा म्हातारा, पिताजी प्लिज आणि काही लहान मुलांकरिता असलेल्या नाटकात देखील तिने भूमिका केल्या. आकांक्षाने ‘शांघाय’ या चित्रपटाकरिता सहाय्यक नृत्यदिग्दर्शिका म्हणून देखील काम केले. मानसी अग्रवाल या प्रमुख नृत्य दिग्दर्शिका होत्या. चित्रपटाच्या आणि खास करून हिंदी चित्रपटाच्या मागची प्रोसेस किती वेगळी आहे, हे तिला तिथे शिकायला मिळालं. मानसी अग्रवाल यांच्या काही प्रोजेक्ट्साठी तिने सहाय्यक नृत्य दिग्दर्शन केले होते. ‘असं सासर सुरेख बाई’ या मालिकेत तिने बहिणीची भूमिका केली. ‘सारे तुझ्याचसाठी’ ही सुद्धा तिने भूमिका केलेली आणखी एक मालिका. ‘डिअर जिंदगी’ या आलिया भट अभिनित चित्रपटात सुद्धा आकांक्षाला चांगली भूमिका मिळाली.
हे देखील वाचा: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘यश’ची भूमिका साकारणार्या अभिषेकचा आर्किटेक्ट ते अभिनेता हा प्रवास…
नुकतीच झी मराठीवरील ‘लाडाची मी लेक गं’ मध्ये सिंधूची भूमिका तिने केली आणि त्याकरिता तिचे बक्षिसासाठी नामांकन देखील झाले आहे. ‘शुभमंगल ऑनलाईन’ मधील ‘रिया प्रभाकर’ ही तिला स्वतःला आवडलेली भूमिका आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट या सर्व माध्यमात तिला काम करायला आवडते. आता ‘सर, प्रेमाचं काय करायचं?’ या नाटकात ती काम करत आहे. तिचे अरंगेत्रम झाले असून आजही गुरु डॉक्टर गौरी पोंक्षे यांचे मार्गदर्शन तिला प्रेरणा देत असते.