‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
थोरामोठांना भुरळ घालणारे अलबत्या गलबत्या
मित्रांनो, तुम्ही आम्ही सर्वजण खरे तर सध्या सक्तीची सुट्टी अनुभवत आहोत. मे महिना जवळ आला की आपल्याला आठवण होते ती बालनाट्यांची
पुनरुज्जीवित नाटकात ज्या नाटकामुळे आपले बालदोस्त पुन्हा बालरंगभूमीकडे वळले, ते नाटक म्हणजे ‘अलबत्या गलबत्या’. रत्नाकर मतकरी लिखित हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आलं. नवीन संचातील नाटकाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर ने केले होते. या नाटकाला संगीत दिले आहे मयुरेश माडगावकर या संगीतकाराने. या नाटकाचे शीर्षकगीत ‘अलबत्या गलबत्या, अलबत्या गलबत्या’ हे तुफान लोकप्रिय झाले. या गीताची जन्मकथा जाणून घ्यावीशी वाटली, म्हणून संगीतकार मयुरेश माडगावकर बरोबर संपर्क साधला. त्याने सांगितलं की आमची या नाटकाची तालीम सुरु होती, तेव्हा दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर म्हणाला की या नाटकाला एखादे शीर्षक गीत असले पाहिजे आणि ते सोप्या शब्दात असले पाहिजे. मग हे गीत कोणाला लिहायला सांगायचे, अशी चर्चा सुरु झाली. पण दोन तीन दिवस तसेच गेले. मग पुन्हा तालमीच्या वेळी चिन्मय म्हणाला, “थांब, मीच लिहिण्याचा प्रयत्न करतो”. चिन्मयला शब्द सुचले होते ‘शाळा सुटता, पुस्तक मिटता, करूया आपण गमत्या जमत्या, मस्तीला या दोस्त नवा, अलबत्या गलबत्या’. हे शब्द जेव्हा चिन्मयने मला सांगितले, तेव्हा माझ्या डोक्यात सुद्धा चाल घोळू लागली, पण गंमत अशी की आधी मला एकाच ओळीची चाल सुचत होती. थोड्यावेळाने मला ‘अलबत्या गलबत्या’ या टॅग लाईन ची चाल सुचली.
मग पुन्हा तीन चार दिवस गॅप गेली आणि मग मला अचानक संपूर्ण चाल सुचली. तोपर्यंत चिन्मयकडून सुद्धा तीन कडव्याचे गाणे आले होते. लोकसंगीताच्या ढंगाने जाणारी ही चाल होती. या गीताच्या बाबतीत टीम वर्क खूप महत्वाचे होते. ‘शाळा सुटता, पुस्तक मिटता’ असे शब्द असल्याने राहुल खाडे याने सुचवले की आपण तिथे शाळेच्या घंटेचा शाळा सुटतानाचा जो आवाज असतो, तो ठेवूया. राहुलने या नाटकांचे संगीत संयोजन केले आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, या नाटकाचा पडदा उघडताना या गाण्याचे पहिले कडवे ऐकवले जाते. दुसऱ्या अंकाच्या सुरुवातीला पडदा उघडताना दुसरे कडवे तर अंक संपताना सर्व जण प्रत्यक्ष रंगभूमीवर त्या गाण्याच्या तालावर नाच करतात तेव्हा तिसरे कडवे ऐकवले जाते. हे गाणे गाणार कोण असे म्हटल्यावर सर्वांच्या मनात एकच नाव आले आणि अवधूत गुप्ते यांनी ते गाणे गावे असे ठरले. या गाण्यासाठी महिला संघ शाळेतील सहा मुलांनी सुद्धा कोरस गायले. या नाटकाची निर्मिती राहुल भंडारे, अद्वैत थिएटर्स यांची असून झी मराठी या नाटकाचे सादरकर्ते आहेत.
गणेश आचवल