दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरणसिंगच्या ‘त्या’ फोटोने देशभर उडाला होता गोंधळ!
आजकालच्या बातम्यांचे मथळे पहिले तर, असं वाटतं की जो कलाकार उठतो तो बोल्ड फोटोशूट करतो की काय? अर्थात सोशल मीडियासारखं माध्यम उपलब्ध झालं आहे. त्यामुळे कलाकारांचे फोटो त्यांच्या फॅन्सना अगदी सहज बघायला मिळतात. पण पूर्वी असं नव्हतं. कलाकारांचे फोटो वर्तमानपत्रं किंवा मासिकांमध्येच प्रसिद्ध होत आणि त्यांचे चाहते यांमधून कात्रणं काढून जपून ठेवत असत. एखादा हॉट फोटो असेल, तर चर्चाही होत असे. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अर्चना पुरणसिंग यांच्या एका हॉट फोटोमुळे १९९२ साली मात्र मोठी खळबळ उडाली होती.
एका गुळगुळीत सिने मॅगझिनच्या मुखपृष्ठावर या दोघांचा फोटो झळकला होता. बिकिनीमधील अल्प वस्त्रातील अर्चना पुरणसिंह एका बीचवर अमिताभ सोबत या फोटोत दाखवली होती. सोबत या फोटोचे कॅप्शन दिले होते, “Amitabh and Archana Caught Red Handed in Love Nest.”
हे मॅगझीन स्टॉलवर आले आणि देशभर एकच मोठी खळबळ उडाली. अर्चना आणि अमिताभ यांच्यात काही चालू आहे का, इथपासून ते थेट अर्चना अमिताभला डेट करत आहे ही चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली. अमिताभच्या घरचा फोन सतत वाजत राहिला. शेवटी कंटाळून अमिताभने फोन डिस्कनेक्ट करून टाकला. अमिताभच्या चाहत्यांना हा फार मोठा ‘कल्चरल शॉक’ होता.
काय सत्य होतं या फोटोचं? खरंच अमिताभ आणि अर्चना त्या अवस्थेत बीचवर गेले होते का? याचं उत्तर अर्थातच ‘नाही’ असंच होतं. कारण या फोटोत जरी अमिताभ बच्चन दिसत असला तरी तो अमिताभ बच्चन नव्हताच! तो होता अमिताभ बच्चन यांचा हमशकल विजय सक्सेना.
मग सिने ब्लिट ने असा फोटो का छापला? असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला, त्यावेळी त्यांनी पुढच्या अंकात त्याचा खुलासा केला. सिने ब्लिटझ सांगितले हा अंक कुठल्या महिन्याचा आहे ते पहा ना! अंक एप्रिल १९९२ चा होता. सिने ब्लिटझ मासिकाने वाचकांना ‘एप्रिल फूल’ बनवले होते!!!
======
हे देखील वाचा – बॉलिवूडमध्ये रिमेक झालेले टॉप १० मराठी चित्रपट
======
अर्थात या सर्व प्रकाराची सिने ब्लिटझने महानायक अमिताभ बच्चन यांना आधीच कल्पना दिली होती. (फक्त सिने ब्लिटझ मासिकाने या फोटोचा खुलासा पुढच्या अंकात केला!) त्यांनी तशी रीतसर परवानगी घेतली होती.
सध्या एप्रिलचा महिना चालू आहे. आता एप्रिल फूल हा प्रकार कमी झालाय. पण त्या काळात माध्यमं कमी होती त्यामुळे अशा गमती जमती चालायच्या. अर्थात गॉसिप्सचा त्याकाळी मोठा बोलबाला होता. येनकेन प्रकारेन प्रसिद्धीचा झोत आपल्यावर यावा, आपले नाव कायम चर्चेत असावं, असं प्रत्येकाला वाटत असायचं त्यामुळे असले पब्लिसिटी स्टंट मीडियात कायम दिसायचे.