Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

दिलीपकुमार आणि Amitabh Bachchan यांचा ‘हा’ सिनेमा ऋषिकेश मुखर्जी का पूर्ण करू शकले नाहीत?
मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीला आकार देणारा तिसरा दिग्दर्शक म्हणजे ऋषिकेश मुखर्जी! खरंतर ऋषिदा यांच्या चित्रपटांचा जॉनर हा आधीच्या दोन दिग्दर्शकांच्या चित्रपटांपेक्षा सर्वस्वी वेगळा होता. परंतु अमिताभ बच्चन यांनी ऋषिकेश मुखर्जी यांच्या सिनेमात विविध भूमिका करून आपल्या अभिनयाची वेगळी शैली प्रेक्षकांच्या पुढे आणली. ऋषिकेश मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांनी ‘आनंद’, ‘नमक हराम’, ‘अभिमान’, ‘चुपके चुपके’, ‘जुर्माना’, ‘आलाप’, ‘मिली’, ‘बेमिसाल’… हे चित्रपट एकत्र केले.

यातील सर्वच सिनेमे काही यशस्वी झाले नाहीत. परंतु या सर्व चित्रपटातील अमिताभ हा त्याच्या नेहमीच्या अँग्री यंग मॅन शैलीपेक्षा वेगळा, अधिक परिपक्व, अधिक उत्कट आणि अधिक प्रगल्भ वाटला हे नक्कीच. हरिवंशराय बच्चन कायम ऋषिकेश मुखर्जी यांना अमिताभ बच्चन यांच्यातील खऱ्या अभिनेत्याला तुम्ही प्रेक्षकांपुढे आणा असे अपील करत असायचे. ऋषिकेश मुखर्जी स्वतः अमिताभ बच्चन यांच्या प्रतिभेबाबत खूप आशावादी होते त्यांच्या मते अमिताभ बच्चन यांच्यातील फक्त १५ टक्के अभिनयच दिग्दर्शक बाहेर काढू शकले बाकी दिग्दर्शकांनी अमिताभला स्पायडरमॅन करून टाकले आहे!

अमिताभ बच्चन आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्यातील हे नातं खूप वेगळ्या पातळीवरचं होतं. ऋषिकेश मुखर्जी यांना आयुष्यभर एक दुःख मात्र कायम वाटत राहिलं की अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांना घेऊन त्यांना एक चित्रपट बनवायचा होता जो त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वकांक्षी असा चित्रपट होता. ज्यातून या दोन महान अभिनेत्यांच्या अभिनयाचा खरा कस लागणार होता.पण तो चित्रपट मात्र ते पूर्ण करू शकले नाहीत. सौमित्र बंदोपाध्याय यांनी अमिताभ बच्चनवर लिहीलेल्या चरित्रामध्ये ऋषिकेश मुखर्जी यांनी ही खंत बोलून दाखवली. कोणता होता तो चित्रपट? आणि काय कारण होते तो चित्रपट न बनू शकण्याचे?
सत्तरच्या दशकाची मराठी लेखक अनिल बर्वे यांनी ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ हे एक नाटक लिहिले होते. नाटक अतिशय जबरदस्त होते. कथानक प्रचंड सशक्त होते. एक ब्रिटिश कालीन तुरुंगाधिकारी आणि त्याच्या तुरुंगात असलेला एक कम्युनिस्ट नक्षलवादी या दोघांमधील भावनिक संघर्ष अतिशय वरच्या लेव्हलला या नाटकातून दाखवला होता. नाटकाचे कथानक अतिशय जबरदस्त होतं. मराठीमध्ये प्रभाकर पणशीकर यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले होते. यात जेलरच्या भूमिकेमध्ये स्वतः प्रभाकर पणशीकर आणि कम्युनिस्ट नक्षलवाद्यांच भूमिकेमध्ये बाळ धुरी यांनी अभिनय केला होता. ऋषिकेश मुखर्जी यांना हे कथानक प्रचंड आवडले होते. त्यांनी त्यावर काम देखील सुरू केले. जेलरच्या भूमिकेत दिलीपकुमार आणि कम्युनिस्ट नक्षलवादी अमिताभ बच्चन अशी पात्र रचना त्यांच्या डोक्यात फिट झाली होती.

अमिताभ आणि दिलीपकुमार या दोघांनाही भेटून त्यांनी त्यांच्या भूमिका सांगितल्या होत्या. दोघांनाही या भूमिका खूप आवडल्या होत्या आणि दोघांनीही या चित्रपटात काम करण्याची सहमती दाखवली होती. परंतु याच काळात अशा काही घटना घडल्या की हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. एक तर ऐंशीच्याच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन सिनेमांमध्ये प्रचंड बिझी होता त्याच्याकडे अनेक मोठमोठे प्रोजेक्ट होते. १९८२ साली रमेश सिप्पी यांच्या ‘शक्ती’ या चित्रपटात दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करत होते. याच काळात २६ जुलै १९८२ या दिवशी अमिताभ बच्चन यांचा ‘कुली’ च्या सेटवर एक मोठा अपघात झाला आणि अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला ब्रेक लागला.

या काळात ‘शक्ती’ या चित्रपटाचे एडिटिंग चालू होते. अमिताभ बच्चन यांच्या मते ‘या एडिटिंग मध्ये अमिताभ बच्चन यांच्या अनेक शॉट्सवर कात्री चालवली गेली आणि दिलीप कुमारची प्रतिमा जास्त मोठी आणि उजळ होईल असा प्रयत्न केला गेला!’ अर्थात रमेश सिप्पी आणि सलीम जावेद यांनी हा असला काही प्रकार झाला नाही असे सांगितले. पण अमिताभ बच्चन यांच्या मनात मात्र ही सल कायम होती. यामुळेच अमिताभ बच्चन यांनी दिलीप कुमार सोबत पुन्हा कधीही काम करायचे नाही असा निर्णय परस्पर घेऊन टाकला. या सर्व गदारोळात ऋषिकेश मुखर्जी यांचा ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ हा सिनेमा तयार होण्याच्या आधीच बंद पडला!
================================
हे देखील वाचा : एका सिनेमातून अमिताभ बच्चनने तर दुसऱ्या सिनेमातून Dharmendra ने का एक्झिट केली?
================================
खरंतर ‘बेमिसाल’ हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन आणि ऋषिकेश मुखर्जी यांचा हा शेवटचा एकत्रित सिनेमा ठरला. जर दिलीप आणि अमिताभ पुन्हा एकत्र ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ मध्ये आले असते तर अभिनयाचा वेगळा अविष्कार ऋषिकेश मुखर्जी यांच्या दिग्दर्शनात आपल्याला बघायला मिळाला असता पण आपल्या रसिकांचे दुर्दैव असे की हा चित्रपट बनलाच नाही!