अमिताभ बच्चन आणि सुभाष घई आजवर एकत्र आले नाहीत ?
सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील सुपरहिट दिग्दर्शक सुभाष घई यांनी अनेक चित्रपट तारे तारकांना खऱ्या अर्थाने ‘स्टार’ बनवले. जॅकी श्रॉफ, मीनाक्षी शेषाद्री, अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा हे त्यातलेच काही उदाहरणे. पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा करून खरं तर सुभाष घई चित्रपटांमध्ये अभिनेता बनण्यासाठी आले. सुरुवातीला काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले की, अभिनयापेक्षा आपण दिग्दर्शन चांगल्या पद्धतीने करू शकतो. ते दिग्दर्शक बनले! कालीचरण, विश्वनाथ, गौतम गोविंदा, कर्ज, हिरो, विधाता हे त्यांचे सुरुवातीचे गाजलेले सिनेमे. त्यांच्या चित्रपटातून नवीन अभिनेत्यांच्या सोबतच संजीव कुमार, दिलीप कुमार, राजकुमार, नूतन हे बुजुर्ग कलाकार देखील झळकत होते. सुभाष घई यांच्यासाठी ऐंशीचे दशक अतिशय लकी असे होते. या दशकात त्यांचे अनेक सिनेमे गोल्डन जुबली होत होते. एवढ्या साऱ्या कलावंतांच्या सोबत त्यांनी काम केले असले तरी एक नाव मात्र कायम रसिकांना आठवत असते ते म्हणजे अमिताभ बच्चन ! सुभाष घई आणि अमिताभ बच्चन यांनी आजवर एकाही चित्रपटात काम केलेले नाही. असे का ? याचे कारण नेमके काय? (Amitabh)
खरं तर या दोघांनी एकत्र काम करण्याचा योग ऐंशीच्या दशकामध्ये आला होता. १९८७ मध्ये सुभाष घई यांनी त्यांच्या मेगा स्टाईलमध्ये एका चित्रपटाचा शानदार मुहूर्त केला होता. ज्याचा नायक अमिताभ बच्चन होता. या चित्रपटाचे नाव होते ‘देवा’. या सिनेमाचा मोठा मुहूर्त पार पडला होता. यावेळी अमिताभ एका डाकूच्या वेशात होता, हातात मशाल होती आणि त्याने काही डायलॉग बोलून चित्रपटाचा मुहूर्त पार पडला होता. या सिनेमाच्या ‘मोहरत’ ला आख्ख बॉलीवूड लोटलं होतं. दिलीप कुमार यांनी क्लॅप दिली होती. या चित्रपटात अमिताभसोबत मीनाक्षी शेषाद्री, राजकुमार, शम्मी कपूर यांच्या देखील भूमिका होत्या. बॉलीवूडमध्ये सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा होत होती ; कारण पहिल्यांदाच दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन आणि सुपरहिट दिग्दर्शक सुभाष भाई एकत्र येत होते. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच यशस्वी होणार याची प्रत्येकाला खात्री होती. काही काळानंतर या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले. परंतु काही दिवसातच एक ब्रेकिंग न्यूज आली. सुभाष घई यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी ‘देवा’ हा चित्रपट मी बंद करत आहे असे सांगितले. पत्रकारांनी त्यांना खोदून खोदून प्रश्न विचारल्यानंतर सुभाष घई यांनी” अमिताभ बच्चन आणि माझ्यात काही क्रिएटिव्ह डिफरन्स निर्माण झाले त्यामुळे आम्ही हा चित्रपट बंद करत आहोत.” असे सांगितले. अमिताभ आणि सुभाष घई हे दोघेही मोठे कलाकार त्यामुळे त्यांचे इगो देखील मोठे आणि ह्या इगोमुळेच हा चित्रपट बंद पडला होता. (Amitabh)
झालं असं होतं ; चित्रपटाचा शूटिंग सुरू झाले. तीन-चार दिवस शूटिंग झालं त्यानंतर एक दिवस अमिताभ स्क्रिप्ट वाचत असताना त्याला त्याबद्दल काही चर्चा करायची होती म्हणून त्याने त्याच्या असिस्टंटला सांगितले” सुभाष घई यांना बोलावून घे. मला त्यांच्याशी स्क्रिप्ट बाबत काही चर्चा करायची आहे.” त्या पद्धतीने त्यांचा असिस्टंट सुभाष घई यांच्याकडे गेला आणि म्हणाला,” अमिताभ सरांनी तुम्हाला बोलावले आहे. त्यांना काही डिस्कशन करायचे आहे.” इथे सुभाष घई यांचा इगो आडवा आला. त्यांना वाटले डायरेक्टर हा सिनेमाचा कॅप्टन असतो. मी अमिताभ बच्चनकडे का जायचे ? सुभाष घई यांनी त्या असिस्टंटला सांगितले,” अमिताभ बच्चन (Amitabh) यांना सांगा. जर त्यांना काही डिस्कशन करायचे असेल तर ते माझ्याकडे केव्हाही येऊ शकतात.” हा जसाच्या तसा निरोप अमिताभ बच्चन यांना देण्यात आला. अमिताभ बच्चन यांना त्यांचा हा अपमान वाटला. कारण त्यावेळी ते सुपरस्टार होते. त्यांनी लगेच मेकअप उतरवला आणि घई यांना न सांगता ते सेटवरून निघून गेले. दुसऱ्या दिवशी पासून अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाच्या शूटिंगला येणे बंद केले. सुभाष घई यांनी देखील त्यांना याबाबत काहीही विचारले नाही. काही दिवसांनी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हा चित्रपट बंद केल्याचे सांगितले. दोघांच्या इगो पायी एक चांगला चित्रपट डब्यात गेला.
=========
हे देखील वाचा : काय आहे राज कपूर व गायक सुरेश वाडकर यांचं नातं…
=========
पुढे बऱ्याच वर्षांनी सुभाष घई यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी सांगितले ,”तेव्हा त्याकाळी मी तरुण होतो. गरम डोक्याचा होतो आणि थोडा इन पेशंट होतो. मी जर समजूतीने काही गोष्टी केल्या असत्या तर कदाचित तो चित्रपट बनला असता. पण आता इलाज नाही !” अर्थात सुभाष घई आणि अमिताभ बच्चन (Amitabh) हे दोघेही व्यावसायिक कलाकार. त्या दोघांनी या घटनेचा फारसा इश्यू केला नाही दोघांमधील मैत्रीच्या संबंध चांगलेच राहिले !