‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
अमिताभ बच्चन… चक्क थरथरलो होतो…..
आजही तो क्षण जसाच्या तसा आठवतोय, १९८९ च्या मध्यास कधीतरी समजले की, अमिताभ बच्चनने मिडियावरचा बॅन उठवलाय आणि आता तो मुलाखत देतोय. माझ्यासाठी एक मोठा दरवाजा जणू थोडासा उघडल्यासारखा झाला. त्या काळात मी झपाटल्यासारखं काम करायचो. या स्टुडिओपासून शूटिंगच्या त्या बंगल्यापर्यंत माझी भटकंती/निरीक्षण/लहान मोठ्या भेटीगाठी सुरु होत्या. स्टार लहान असो वा मोठा, तंत्रज्ञ नवा असो वा अनुभवी, कामगार तरुण असो अथवा वृध्द, कोणाशीही संवाद साधण्याचे मला जणू व्यसन लागले होते.
पण अमिताभ बच्चनची भेट होत नव्हती. तेव्हा तो एबी अथवा बीग बी अशा शॉर्टफॉर्मने ओळखला जात नव्हता. ‘अमिताभ बच्चन ‘ या नावातच बरेच बरेच काही येते यावर माझा विश्वास आहे, तुमचाही असावा. अमिताभचे सर्वप्रथम दर्शन मला घडले ते इम्पाच्या वतीने ( इम्पा म्हणजे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशन ही संस्था) १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत वैजयंतीमाला, सुनील दत्त व अमिताभ बच्चन हे विजयी होऊन लोकसभेत खासदार म्हणून गेले, त्यानिमीत्ताने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्या सोहळ्यात मी सर्वप्रथम अमिताभ बच्चन दर्शन घेतले. तत्क्षणी मी आपण नवशक्ती दैनिकाचे प्रतिनिधी म्हणून येथे हजर आहोत हे पूर्णपणे विसरुन गेलो होतो.
चांगली सिनेपत्रकारीता करताना आपण फॅन आहोत याची जाणीव ठेवली तरच चांगले काम होते यावर मी कायमच विश्वास ठेवला. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात अमिताभने मिडियावर ( खास करुन आम्ही सिनेपत्रकार) बॅन टाकला होता, पण त्याच्या अनेक चित्रपटांच्या मुहूर्ताचे आमंत्रण हाती आले रे आले की कधी एकदा तो दिवस उजडून धावत पळत जातोय असं व्हायचं. (पुन्हा तेच, आपण चाहते आहोत याचे फिल्म पत्रकारीतेत अधूनमधून भान असावेच.
पण अधेमधेच, बरं का?) मेहबूब स्टुडिओत अग्निपथ, हम, लव्ह कुश, रुद्र, नटराज स्टुडिओत बंधुआ, आर. के. स्टुडिओत शिनाख्त, गेईटी थिएटरमध्ये खुदा गवाह, जुहूच्या एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये आलिशान या त्याच्या चित्रपटाच्या मुहूर्ताना हजर राहून ‘पानभर रिपोर्टींग ‘ केले. यातील काही चित्रपट मुहूर्तालाच बंद पडले तो विषय वेगळा. पण पत्रकारीतेमधील खूपच मोठी संधी म्हणून साक्षात अमिताभच्या चित्रपटाच्या मुहूर्ताना मी हजर राहत होतो. पण प्रत्यक्ष भेटीचे काय? अखेर तो दिवस उजाडला.
कुलाबा येथील मुकेश मिलमध्ये ‘हम ‘चे शूटिंग सुरु असताना मी तेथे पोहचलो. अमिताभचे मेकअपमन दीपक सावंत काही वर्षे स्मिता पाटीलचे मेकअपमन होते, तेव्हा आमची खूप चांगली मैत्री झाली आणि त्यांनाच फोन करुन या दिवसाची सुरुवात झाली. दुपारच्या लंच ब्रेकनंतर अमितजी मेकअप रुपमधून बाहेर पडल्यावर समोरच्या पायरीवर बूटाची लेस बांधतील तेव्हा भेटा, अशी दीपक सावंतने महत्वाची टीप दिली आणि माझी धाकधूक वाढू लागली. आपले बम्बईया हिंदी मनात पुन्हा पुन्हा गिरवू लागलो.
आणि त्यातही चुका झाल्याने आणखीन दडपणाखाली आलो. ….. अगदी पटकथेनुसार म्हणावे तसा अमिताभ मेकअपरुमबाहेर आला, लेस बांधायला वाकला आणि मी कसाबसा पुढे जात म्हणालो, मै एक मराठी पत्रकार हू… एक दिवाली मॅगझिन के लिए साहित्य और सिनेमा इस सब्जेक्ट पर आपका इंटरव्हयू लेना चाहता हू…. त्याने ऐकले, माझ्यावर ‘एक नजर ‘ टाकली आणि म्हणाला, ठीक है, कल इसी वक्त आ जाना… अमिताभशी ‘पहिली भेट ‘ ही अशी, मी थरथरलो असल्याची! त्यात मला काहीही वावगे वाटले नाही.
ते मध्यमवर्गात वाढलेल्या कोणाहीसाठी अगदी स्वाभाविक आहे. अमिताभने दिलेले आश्वासन आणि वेळ यानुसार उद्या जायचं नक्की केले. तसा गेलो. थोडा वेळ थांबल्यावर त्याच मेकअप रूममध्ये मी बसताच त्यानेच म्हटले, साहित्य और सिनेमा इस पर आप सवाल करना चाहते हैं…. ठीक है, पुछो त्याने माझा विषय लक्षात ठेवला हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. आजही तो कायम आहे. ते दिवस वन टू वन भेटीचे होते.
म्हणजे आम्ही प्रत्येक पत्रकार स्वतंत्रपणे एकेका स्टारला भेटत असू. म्हणूनच मुलाखती रंगत. त्यानंतरही अमिताभच्या मुलाखतीचे काही योग आले. ‘खुदा गवाह’ साठी मोठा सेट लागला असता मेहबूब स्टुडिओच्या मेकअप रूममध्ये अमिताभची मुलाखत घेताना त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी माझा मित्र प्रदीप म्हापसेकर याला नेले (कालांतराने तो चांगला व्यंगचित्रकार म्हणून ओळखला गेला) तेव्हाचा एकूणच अनुभव त्याने आपल्या “ओला कॅनव्हास” या पुस्तकात सविस्तर लिहिलाय.
आणखीन अनेक वर्षांनी लोकसत्ता संपादकीय टीमच्या वतीने अमिताभच्या ‘जनक बंगल्या’त त्याच्याशी संवाद साधला गेला असता त्या सात जणांच्या टीममध्ये मीदेखिल होतो. एव्हाना तो बीग बी म्हणून एस्टॅब्लिज झाला होता. काही वेळाने बीग बी आमच्या समोर येताच ओळख करुन देणे सुरु झाले, तेव्हा माझ्याकडे पाहताच बीग बीने पटकन म्हटले, मै इनको जानता हू…. (मधल्या काळात मुलाखतीचे आलेले योग असे फळले होते. या टीममधील प्रभा कुडकेने ही बातमी नंतर लोकसत्तात सांगितली.) ….. अमिताभशी झालेली माझी पहिली भेट आठवली तरी आज आपण कसे थरथरलो होतो हेच डोळ्यासमोर येते आणि त्यात चूक काय? समोरची व्यक्तीच तेवढी ‘उंची ‘ होती…
दिलीप ठाकूर