या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी दिली होती प्रत्यक्ष वाघाशी फाईट!
माणसाच्या आयुष्यामध्ये काही तारखा अगदी परफेक्ट लक्षात राहणाऱ्या असतात. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासाठी एक तारीख अशीच कायम लक्षात राहणारी होती. त्या दिवशी अमिताभच्या आयुष्यात दोन चांगल्या गोष्टी घडल्या होत्या. त्या दिवशी अमिताभ बच्चन यांनी एका वाघासोबत फायटिंग सीन दिला होता आणि हा सीन संपल्यानंतर काही तासातच अमिताभ बच्चन यांच्या घरून एक आनंदाची बातमी आली होती. पुत्र अभिषेक बच्चन यांचा जन्म त्याच दिवशी झाला होता. त्यामुळे अमिताभला या दोन गोष्टी कायम लक्षात राहिल्या होत्या. कोणता होता चित्रपट आणि काय होती ती तारीख?
दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांचे सहाय्यक राकेश कुमार यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा होता. चित्रपट होता १९७७ सालचा ‘खून पसीना’. या चित्रपटात अमिताभ बच्चन, रेखा, विनोद खन्ना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांना एका वाघासोबत फाईट सीन द्यायचा होता. या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग काश्मीरमध्ये झाले होते पण वाघासोबतचा फाईट सीन मुंबईच्या चांदिवलीमध्ये स्टुडिओमध्ये शूट केला होता. ऍक्च्युली तो वाघ नव्हता. ती वाघीण होती. तिचं नाव भारती होतं. ती एक ट्रेंड ॲनिमल होती.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सर्व फाईट शूट तिच्यासोबत केले नाही. क्लोज अपमध्ये फक्त अमिताभ बच्चन यांचे काही शॉट्स घेतले गेले. बाकी सर्व फाईट सीन्स अमिताभ बच्चन यांचे डबल अर्थात डुप्लीकेट कलाकाराने केले. हा डमी कलाकार त्या वाघिणीसोबत खूप फ्रेंडली होता. त्यामुळे ही फाईट खूप नॅचरल वाटते. आज हा चित्रपट आपण जेव्हा काळजीपूर्वक बघतो त्यावेळी आपल्या सहज लक्षात येते. फक्त क्लोज अपमध्ये आणि पाठमोरा अमिताभ बच्चन आपल्याला दिसतो. बाकी वाघिणी सोबतची फाईट त्या बॉडी डबल डुप्लिकेटने केली होती. अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एका वाघिणीसोबत फाईट सीन करत होते त्यामुळे ते खूप काळजीत होते. त्या दिवशी ते आणखी एका कारणासाठी खूप काळजीत होते कारण पत्नी जया भादुरी गर्भवती होती आणि ती हॉस्पिटलमध्ये गेली होती!
मुंबईच्या चांदवली स्टुडिओमध्ये दिवसभर या फाईट सीनचे शूट झाले आणि त्यानंतर काही वेळातच अमिताभ बच्चन यांना हॉस्पिटलमधून फोन आला आणि पुत्ररत्न प्राप्त झाल्याची गोड बातमी त्याला मिळाली. अमिताभ यांनी आपल्या लगेच सेटवर हा आनंदोत्सव साजरा केला आणि तो ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गेला. तो दिवस होता ५ फेब्रुवारी १९७६ ज्या दिवशी त्यांना पुत्ररत्न झाले.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासाठी त्यामुळे ‘खून पसीना’ मधील टायगर फाईट आणि अभिषेक बच्चन यांचा जन्म पक्के लक्षात राहिले होते. अमिताभ बच्चन यांनी यानंतर राकेश कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या १९७९ सालच्या ‘मिस्टर नटवरलाल’ या चित्रपटात देखील टायगर फाईट सीन केला होता. योगायोगाने या सिनेमात देखील तीच भारती वाघीण वापरली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी बऱ्याच वर्षांनी ‘अजूबा’ या चित्रपटांमध्ये टायगर फाईट सीन दिला होता.
==========
हे देखील वाचा : गिरीशमुळे नसीरुद्दीन शाहांना मिळाला पहिला ब्रेक
==========
या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नायिका रेखा होती हा या जोडीचा दुसरा चित्रपट या दोघांनी एकत्रित नऊ चित्रपट केले. दो अंजाने, खून पसीना, आलाप, गंगा की सौगंध, मुकद्दर का सिकंदर, मिस्टर नटवरलाल, सुहाग, राम बलराम आणि सिलसिला. २१ जानेवारी १९७७ या दिवशी प्रदर्शित झालेला ‘खून पसीना’ सुपरहिट सिनेमा ठरला. अमिताभ आणि रेखा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचे नाव शिवा आणि टायगर असे होते.
योगायोगाने या ‘खून पसीना’ या चित्रपटाचा रिमेक दक्षिणेत तेलगू आणि तमिळ भाषेत बनला. १९७९ साली तेलगूमध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या रिमेकचे नाव होते शिवा आणि यात अमिताभची भूमिका एन टी रामराव यांनी साकारली होती. १९८९ साली ‘खून पसीना’चा रिमेक तमिळमध्ये बनला होता. त्याचे नाव होते ‘टायगर’ आणि यातील अमिताभची भूमिका रजनीकांतने साकारली होती !