
दिग्दर्शक Chandra Barot; ‘डाॅन’ चित्रपट त्यांची हुकमी ओळख
दिग्दर्शक चंद्रा बारोट यांच्या निधनाचे वृत्त समजताच देश विदेशातील चित्रपट रसिकांना लगेचच १९७८ सालचा ‘डाॅन’ हा चित्रपट आठवला यातच त्यांचे दिग्दर्शक म्हणून मोठे यश. पण ‘डाॅन’च्या रौप्य महोत्सवी यशाच्या आगेमागे चंद्रा बारोट यांच्या कारकिर्दीची पटकथा अनेक चढ उतारांची आहे. ‘डाॅन’ जबरदस्त टर्न व ट्विस्ट यांनी रंगलेला क्राईम थ्रिलर वेगवान रंगतदार चित्रपट. वयाच्या ८६ व्या वर्षी चंद्रा बारोट यांचे मुंबईत एका इस्पितळात निधन झाले. सात वर्षांपासून चंद्रा बारोट हे आजाराशी सामना करीत होते.

चंद्रा बारोट यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवेश ही एक योगायोगाची गोष्ट. चंद्रा बारोट यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील. उच्च शिक्षणानंतर इंग्लंडमध्ये स्थानिक होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. तत्पूर्वी मुंबईत येऊन आपली पार्श्वगायिका बहिण कमल बारोटची भेट घ्यावी म्हणून ते मुंबईत आले. मुंबईत ते एका मिनी चित्रपटगृहात मनोजकुमार दिग्दर्शित ‘उपकार’च्या ट्रायल खेळास उपस्थित राहिले. या खेळास चित्रपटसृष्टीतील काही मान्यवर उपस्थित होते. चंद्रा बारोट यांनी ‘उपकार’बद्दल केलेल्या भाष्याने मनोजकुमार प्रभावित झाले. आणि आपला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या सोबत काम करण्याचे सुचवले. या कामाची कल्पना यावी म्हणून मनोजकुमार व नूतन यांची भूमिका असलेल्या एस. राम शर्मा दिग्दर्शित ‘यादगार’ या चित्रपटाच्या एका चित्रीकरण सत्रात चंद्रा बारोटना सहभागी होण्यास सांगितले.

याच वेळेस नूतन यांच्याकडून काही चांगले अनुभव आल्याचे चंद्रा बारोट कधीच विसरले नाहीत. आपण मुंबईतच राहण्याचे व मनोजकुमार दिग्दर्शित चित्रपटांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याचे त्यांनी ठरवले. मनोज कुमार यांनी त्यांना आपल्या व्ही. आय. पी. इंटरनॅशनल या निर्मिती संस्थेत महिना साडेचारशे रुपये पगार निश्चित केला. साधारण पंचावन्न वर्षांपूर्वीची ही गोष्ट. त्या काळात मासिक साडेचारशे पगार चांगला मानला जात असे. ‘पूरब और पश्चिम’ या चित्रपटापासून चंद्रा बारोट यांनी मनोजकुमार यांचा सहाव्या क्रमांकाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरु केले.
================================
हे देखील वाचा: Sholay : स्पर्धेत टिकले कोण? गळपटले कोण
=================================
मनोजकुमार आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटात स्वतःच नायक असत, संकलकही असत. आपल्या प्रत्येक चित्रपटांच्या पटकथा व संवाद आणि गीत संगीत व नृत्य यावर त्यांचे विशेष लक्ष असे. चंद्रा बारोट यांना यात भरपूर शिकता आले. ‘शोर’ च्या वेळेस चंद्रा बारोट यांना मनोजकुमार यांनी बढती दिली. ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटाच्या वेळेस चंद्रा बारोट मनोजकुमारचे प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करु लागले. ( श्रेयनामावलीत तसे स्थान दिले) त्यामुळे या चित्रपटातील कलाकार शशी कपूर, झीनत अमान, अमिताभ बच्चन, मौशमी चटर्जी, प्रेमनाथ यांच्याशी तसेच छायाचित्रणकार नरीमन इराणी यांच्याशी चंद्रा बारोट यांचा अतिशय जवळचा संबंध आला. याच चित्रपटाच्या सेटवर चंद्रा बारोट यांना आपण स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकावे हे आले.

‘जिंदगी जिंदगी’ (दिग्दर्शक तपन सिन्हा. कलाकार सुनील दत्त व वहिदा रेहमान) च्या निर्मितीत हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरल्याने नरीमन इराणी यांना आर्थिक नुकसान झाले होते. ते कर्जबाजारी झाले होते. पण अमिताभ बच्चन व झीनत अमान यांच्यांशी निर्माण झालेल्या उत्तम संबंधातून आपण एका चित्रपटाची निर्मिती करावी असे त्यांच्या मनात आले. चंद्रा बारोट यांनाही स्वतंत्र दिग्दर्शनाची संधी हवीच होती. पण पटकथा व संवाद कोणाकडून घेणार? प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ (१९७३) , प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘हाथ की सफाई’ (१९७४), रवि टंडन दिग्दर्शित ‘मजबूर’ (१९७४) यांच्या सुपरहिट यशाने सलीम जावेद या जोडीच्या नावाला वजन आले होते. त्यांच्याच पटकथेवरील यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’ व रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ निर्मितीवस्थेत होते. त्यांच्याकडे एक पटकथा आहे हे चंद्रा बारोट व नरीमन इराणी यांना माहित झाले.
चित्रपटसृष्टीच्या आतल्याआत वर्तुळात अशा गोष्टी माहित असतातच. ही पटकथा देव आनंद, जितेंद्र, प्रकाश मेहरा यांनी नाकारल्याची चर्चा होती. त्यांना त्यात काहीच विशेष वाटले नाही. कदाचित कथेचा प्लाॅट आवडला नसावा. पण ही पटकथा मिळणार कशी? नरीमन इराणी यांची पत्नी वहिदा रेहमान यांची हेअर ड्रेसर्स होती. आणि वहिदा रेहमान सलीम खान यांच्याकडून ही पटकथा मिळवून देऊ शकतात असा नरीमन इराणी यांना विश्वास होता.

तसेच झाले. चंद्रा बारोट यांनी चित्रपटाचे नाव ‘डाॅन’ असे ठेवले आणि १९७४ सालच्या डिसेंबर मध्ये जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधील हाॅलमध्ये ‘ये मेरा दिल प्यार का दीवाना’ या गाण्याच्या चित्रीकरणाने पहिले पाऊल टाकले. पण ‘डाॅन’ पडद्यावर यायला १९७८ साल उजाडले. दरम्यान अमिताभ, झीनत अमान अन्य चित्रपटात कमालीचे बिझी झाले. चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच नरीमन इराणी यांचे निधन झाले. सर्व कलाकार व तंत्रज्ञानी अतिशय सामंजस्याने चित्रपट पूर्ण केला. चंद्रा बारोट यांनी मनोजकुमार यांना पहिली ट्रायल दाखवली. मनोजकुमार यांनी दोन सुचना केल्या. चित्रपटाचे नाव ‘डाॅन’ बदलून ‘मिस्टर डाॅन’ असे सुचवले. त्याच सुमारास DOWN या नावाच्या अंतर्वस्त्राची जाहिरात प्रसिद्ध होती. त्याच्याशी साम्य वाटेल अशी त्यांना शक्यता वाटत होती. चंद्रा बारोटने ‘डाॅन’ हेच नाव योग्य असे म्हटले. मनोजकुमार यांची दुसरी सूचना त्यांनी स्वीकारली.
चित्रपटात मध्यंतरानंतर आणखी रंगत यावी, प्रेक्षकांना रिलीफ मिळावा यासाठी एक गाणे समाविष्ट करायला सांगितले. चित्रपटात दुहेरी भूमिकेतील एक अमिताभ हा पानवाला आहे, त्यावर एक गाणे चित्रीत करता येईल असे त्याला वाटले. आता तसे गाणे तर हवे. ‘डाॅन’चे संगीतकार कल्याणजी आनंदजी यांजकडे असे एक गाणे तयार होते. गाण्याचे बोल होते, ‘खायके पान बनारसवाला…’ देव आनंदची दुहेरी भूमिका असलेल्या शंकर मुखर्जी दिग्दर्शित ‘बनारसी बाबू’ (१९७३) साठी ते लिहिले गेले होते पण त्या चित्रपटात ते वापरले नव्हते. तेच गाणे अमिताभ, झीनत व ज्युनियर डान्सरवर चित्रीत करण्यात आले.

‘डाॅन’ हा चित्रपट आपली सर्वोत्कृष्ट पटकथा आहे असे सलीम खान यांचे मत होते. प्रेक्षकांच्या अपेक्षांना चकमा देत देत चित्रपट रंगतो असे त्यांचे मत. आणि डायलॉग तर हमखास टाळ्या वसूल करणारे. मुंबईत ‘डाॅन’ चित्रपट १२ मे १९७८ रोजी प्रदर्शित झाला. मुख्य चित्रपटगृह गंगा होते. पहिले दोन आठवडे चित्रपटाला जेमतेम प्रतिसाद होता. त्यानंतर चित्रपटाने अशी काही लोकप्रियता संपादली की चित्रपट रौप्य महोत्सवी यशस्वी ठरला. चित्रपटाच्या जगात यश हेच चलनी नाणे या अलिखित नियमानुसार चंद्रा बारोट यांना चित्रपट दिग्दर्शनासाठी अनेक ऑफर आल्या. पण गणित सतत बिघडत राहिले. दिलीपकुमार व सायरा बानो या जोडीला घेऊन ‘मास्टर’ नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले. पण काही महिन्यांतच हा चित्रपट बंद पडला. सारीकाला मध्यवर्ती भूमिका देत ‘तितली’ चे चित्रीकरण सुरु केले. तोही चित्रपट बंद पडला. निर्माती सत्ती शौरी यांनी आपल्या अतिशय महत्वाकांक्षी व बहुखर्चिक अशा मल्टी स्टार कास्ट ‘लाॅर्ड कृष्ण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रा बारोटना दिले. याची जोरदार मुहूर्तासह पार्टीही झाली. पण हाही चित्रपट काहीच प्रगती करु शकला नाही.

फिरोज खान, झीनत अमान व कबीर बेदी यांना घेऊन ‘बाॅस’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवले. पण गाडी पुढे सरकेनाच. मग विनोद खन्ना, जयाप्रदा व डॅनी यांना घेऊन ‘बाॅस’चे चित्रीकरण सुरु होताच विनोद खन्ना रजनीश भक्तीमय झाला. चित्रपट थांबला. तो काही वर्षांनी परतल्यावर अनेक अडथळ्यांवर मात करीत चित्रपट पूर्ण करेपर्यंत २००३ साल उजाडले.. चित्रपट सेन्सॉर संमतही झाला. पण प्रदर्शित झालाच नाही. या वाटचालीत चंद्रा बारोटनी तनुजा दिग्दर्शित ‘आश्रिता’ हा बंगाली चित्रपट दिग्दर्शित केला. तसेच ‘प्यार भरा दिल’ (१९९१) व ‘हम बाजा बजा देंगे’ (२०१५) हे चित्रपट दिग्दर्शित केले. ते प्रदर्शित झाले इतकेच. दिग्दर्शक फरहान अख्तरने ‘डाॅन’ची अतिशय स्टायलिश रिमेक (साल २००६) केलेल्या पार्टीत या चित्रपटातील शाहरुख खान व प्रियांचा चोप्रा चंद्रा बारोट यांना भेटताच चंद्रा बारोट म्हणाले, “रिमेक बहुत ही अच्छी बनाई है. लॅव्हीश है”. यावर शाहरुख आपल्या नेहमीच्या शैलीत म्हणाला, “सर ओरिजिनल तो ओरिजिनल होता है”. चंद्रा बारोट या अनुभवाने सुखावले. पण त्यांना नशीबाची साथ असती तर त्यांच्या यशाची पटकथा अधिकाधिक गुणांची नक्कीच असती.
================================
हे देखील वाचा : Shole : ‘शोले’ १९५३ सालीही पडद्यावर आला होता…
=================================
अमिताभ बच्चन यांनी आपल्या या मित्राला अतिशय भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. ‘डाॅन’चा प्रवास सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृह ते व्हिडिओ, मनोरंजन उपग्रह वाहिनी, यू ट्यूब व ओटीटी असा सुरु राहताना त्यासह दिग्दर्शक चंद्रा बारोट हेही नाव कायम राहिले. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीसमोर त्यांचा ‘डाॅन’ व त्याचे रिमेक व सिक्वेल असे चित्रपट आहेत. एक कुतुहल म्हणून ते तीनही चित्रपट पाहायला हवेत. अनेक वर्ष त्यांचे ताडदेव येथील एअर कंडिशन मार्केट येथे कार्यालय होते. तेथेच त्यांच्या भेटीचा योग आला असता ते एक कायमच लक्षात राहिल असे वाक्य मला म्हणाले, दिग्दर्शक के. असिफ यांनी आयुष्यात काही चित्रपट दिग्दर्शित केले पण ते कायमच लक्षात राहिले, ‘मुगल ए आझम’ या चित्रपटाने! तसेच माझे… चंद्रा बारोट यांना म्हणायचे होते, एक ‘डाॅन’ चित्रपट माझी कायमची ओळख आहे. आणि ते खरेच आहे. एक महत्वाचे, ‘डाॅन’ चित्रपटाचे कितीही कौतुक असले तरी या चित्रपटातील मध्यवर्ती कथासूत्र शक्ती सामंता दिग्दर्शित ‘चायना टाऊन’ (१९६२) या चित्रपटावर बेतले होते हेही जाता जाता सांगायलाच हवे. पटकथाकार सलिम जावेद यांची तशी खुबी होतीच म्हणा…