‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अमिताभचा ‘सौदागर’ पन्नाशीचा झाला…
अमिताभ बच्चन कदापि न संपणारा विषय. बरं आपल्या ‘उंची’ अभिनय कारकिर्दीत अमिताभ बच्चनने ‘पहिल्या डावापेक्षा दुसऱ्या डावात खूपच वेगळ्या व्यक्तिरेखा साकारत आपल्या अष्टपैलूत्वाचा ‘क्लास’ सिध्द केलाय हे वारंवार स्पष्ट होतेय. म्हणून तर त्याच्यावर सातत्याने ‘फोकस’ टाकायला हवा. आजच्या ग्लोबल युगात त्याने चित्रपट निवडीत खूपच सखोलता ठेवलीय हे स्पष्ट होतेय. हा माणूस इतकी एनर्जी आणतो कुठून याचे कायमच कौतक आणि कुतूहल आहे, पण त्याच्या सकारात्मक दृष्टिकोनातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. विशेषतः आर. बाल्की दिग्दर्शित ‘पा’ (२००९) पासूनचा बीग बीचा ग्राफ काही वेगळाच आहे. आजच्या पिढीतील दिग्दर्शकांच्या चित्रपटात भूमिका साकारत बीग बीने पूर्वीच्या तुलनेत अधिकाधिक सशक्त व्यक्तिरेखा साकारतोय. रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘रण’, आर. बल्की दिग्दर्शित ‘शमीताभ’, सुरजीत सिरकार दिग्दर्शित ‘पिकू’, बिजाॅय नंबियार दिग्दर्शित ‘वझिर’ अनिरुद्ध राॅय चौधरी दिग्दर्शित ‘पिकू’ उमेश शुक्ला दिग्दर्शित ‘102 नाॅट आऊट’, सुजाॅय घोष दिग्दर्शित ‘बदला ‘, नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’, मिलिंद लेले दिग्दर्शित ‘एबी आणि सीडी ‘ (मराठी), रुमी जाफरी दिग्दर्शित ‘चेहरे’, शूरजित सिरकार दिग्दर्शित ‘गुलाबो सिताबो ‘किती नावे घ्यायची ? (Saudagar Movie)
सत्तरच्या दशकात अमिताभने मिनिंगफूल चित्रपटात भूमिका साकारावी अशी खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा व्यक्त केली जात होती. विशेषतः त्या काळातील समांतर अथवा नवप्रवाहातील चित्रपटात त्याने अभिनय केल्यास ते चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल असा त्यामागचा उद्देश होता. पण तेव्हा अमिताभ प्रामुख्याने मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा,यश चोप्रा, ह्रषिकेश मुखर्जी आणि रमेश सिप्पी यांच्या चित्रपटात अधिक प्रमाणात भूमिका साकारत होता. त्यातही विविधता होती आणि त्यातूनही अमिताभचे अष्टपैलूत्व अधोरेखित होत होतेच. पण हा तद्दन पलायनवादी चित्रपट आहे (अपवाद ह्रषिकेश मुखर्जींचा चित्रपट) अशी प्रतिमा निर्माण झाली होती. त्या काळात अमिताभ रमेश बहेल, राकेशकुमार, एस. रामनाथन, रवि टंडन, दुलाल गुहा या दिग्दर्शकांच्या चित्रपटातून अमिताभची लोकप्रियता आणि या चित्रपटांचे यश विस्तारत होती. असे चित्रपट हे प्रामुख्याने प्रेक्षकांचा कल लक्षात घेऊन आणि देशातील विविध भागांतील वितरकांची मागणी हे लक्षात घेऊन निर्माण होत. आणि त्यात काहीही गैर नव्हते. कोणताही व्यवसाय वाढण्यासाठी यशाचे टाॅनिक खूपच महत्वाचे असते. चित्रपटाच्या जगात तर ‘हाऊसफुल्ल चित्रपट’ आणि रौप्यमहोत्सवी, सुवर्ण महोत्सवी आठवड्याचे खणखणीत यश जास्त महत्वाचे ( आजच्या काळात एकाद्या चित्रपटाने शंभर, दोनशे, पाचशे कोटी कमावले, तो शंभर देशात प्रदर्शित झाला, चिनी भाषेत तो डब करण्यात आला या गोष्टी ‘ब्रेकिंग न्यूज’ झाल्या आहेत. यशाची परिभाषा बदलली इतकेच. पण त्यात महत्वाचे आहे ते यश आणि यशच.) (Saudagar Movie)
सत्तरच्या दशकातही अमिताभने काही हटके चित्रपटात भूमिका साकारलीय. असाच एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे राजश्री प्राॅडक्सन्सचा ‘सौदागर’ (रिलीज २६ ऑक्टोबर १९७३). अर्थात पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. मुळचे कला दिग्दर्शक असलेल्या सुधेन्दु राॅय यांचे या ‘सौदागर’ची पटकथा आणि दिग्दर्शन आहे. तर संवाद पी. एल. संतोषी यांचे आहेत. साठ आणि सत्तरच्या दशकात बंगालकडून आलेल्या अनेक दिग्दर्शकांनी ग्रामीण भागातील एकादी सकस गोष्ट पडद्यावर आणलीय. कसदार कथा, त्याला गीत संगीताची उत्तम साथ आणि दर्जेदार अभिनय यांची त्यात सांगड दिसते. मूळात चांगली गोष्ट हवी हे ठळक वैशिष्ट्य जाणवते.
‘सौदागर’मध्ये (Saudagar Movie) कळत नकळतपणे एक वेगळ्या प्रकारचा सौदा आहे. एका गावात गुळ विक्रीत अग्रेसर असलेला मोती (अमिताभ) च्या नजरेत चंचल फुलबानो (पद्मा खन्ना) भरते. या आकर्षणात त्याचे आपल्या पत्नीकडे म्हणजे महजबीकडे (नूतन) दुर्लक्ष होत जातेच पण आपण महजबीपासून तलाक घेऊन फुलबानोशी निकाह केल्यास आयुष्याचा भरपूर आनंद घेऊ शकू असेही त्याला वाटते. फुलबानोचा पिता अब्बा शेखसाहब (रझा मुराद) मोतीकडे जास्त पैशाची मागणी करतो. तेवढे कमवायचे तर आपल्याला बाजारात मोठ्या प्रमाणात गुळ विकता यायला हवा असे त्याला वाटते. महजबी उत्तम प्रतीचा गुळ बनवते म्हणूनच मोतीकडचा गूळ मोठ्या प्रमाणात विकला जात असतो. महजबीला आपल्या अंतस्थ हेतूचा अजिबात थांगपत्ता येऊ न देता मोती तिच्याकडून जास्त प्रमाणात गूळ तयार करुन घेतो. महजबीचे मोतीवर उत्कट प्रेम आहे आणि ती सुखी संसाराची स्वप्ने रंगवतेय आणि अशातच तिला मोतीचा खरा हेतू समजतो आणि तिला आश्चर्याचा मोठाच धक्का बसतो.
मोती महजबीला तलाक देऊन फुलबानोशी लग्न करतो. महजबी हे गाव सोडून जाते आणि तीन मुले असलेल्या एका मच्छी व्यापारी तिच्याशी लग्न करतो.फुलबानो आता मोतीसाठी गूळ बनवू लागते. पण त्याला महजबीच्या गुळाची चव नाही आणि मूळात तिचे लक्ष सजण्याधजण्याकडे जास्त आहे. त्यामुळे तिचे कामाकडे दुर्लक्ष होतेय आणि या सगळ्याचा दुष्परिणाम म्हणजे मोतीचा गूळ आता विकला जात नाही. त्याची पत आणि विश्वासार्हता घसरते. यातून सावरायचा मार्ग एकच. तो म्हणजे, महजबीला विनंती करणे की फुलबानोला चांगल्या प्रतीचा गुळ बनवायला शिकव.
एका वेगळ्याच टप्प्यावर ही गोष्ट येते. आपण महजबीपासून तलाक घेऊन फुलबानोशी निकाह केल्याची चूक त्याच्या लक्षात येते.या गोष्टीतील मर्म म्हणजे, आपल्या समजूतदार पत्नीशी एकनिष्ठ न राहता, तिच्या प्रामाणिक भावना लक्षात न घेता अधिक लोभापायी उगाच एकाद्या लोभी युवतीत गुरफटत जाऊन पत्नीला घटस्फोट देऊन या युवतीशी लग्न करण्याचे चुकीचे पाऊल टाकणे रवींद्र जैन यांच्या श्रवणीय गीत संगीतातून ही पटकथा आकार घेते. तेरा मेरा साथ रहे (पाश्वगायिका लता मंगेशकर), क्यों लायो संईय्या पान (आशा भोसले), मै हू फूल बानो (लता मंगेशकर), दूर है किनारा (मन्ना डे), हर हसीं चीज का…(किशोरकुमार), सजना है मुझे सजना के लिए (आशा भोसले)… चित्रपटातील तीनही प्रमुख व्यक्तिरेखांची ओळख या गाण्यांतून होते हे लक्षात आले असेलच आणि अशीच गाणी चित्रपटाला आकार देतात.(Saudagar Movie)
या चित्रपटात रझा मुराद, लीला मिश्रा, त्रिलोक कपूर, सी. एस. दुबे यांच्याही भूमिका आहेत. नूतनच्या कारकिर्दीतील ही एक महत्त्वाची भूमिका ठरलीय. करियरच्या या टप्प्यावर नूतन चरित्र भूमिकेकडे वळत होती आणि अशा वेळी तिला ही अतिशय उत्तम भूमिका मिळाली. नूतनने आपले अभिनय श्रेष्ठत्व तत्पूर्वीच बंदिनी, सुजाता, सीमा, मिलन, तेरे घर के सामने, खानदान, अनाडी, छलिया इत्यादी चित्रपटातून सिध्द केले होतेच. पद्मा खन्ना ही कधी डान्सर तर कधी सेक्स सिम्बल अशाच भूमिकेत अडकली. तिला क्वचितच चांगल्या अथवा स्वतंत्र व्यक्तिरेखा साकारायला संधी मिळाली. या चित्रपटात तिला ते मिळाले. एक प्रकारची ती अमिताभची या चित्रपटातील ‘दुसरी नायिका’ आहे आणि त्यात तिने उच्छखृंल भूमिकेत रंग भरलाय. (Saudagar Movie)
अमिताभची ही एक वेगळीच भूमिका आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत त्याची अॅन्ग्री यंग मॅनची पाॅवरफुल इमेज प्राप्त झाली होतीच. प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ अतिशय जोरात होता आणि ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘नमक हराम’ लवकरच प्रदर्शित होत होता, अशातच ‘सौदागर’ रिलीज झाला. राजश्री प्राॅडक्शन त्या काळात आपल्या चित्रपटाच्या रिलीजबाबत काही व्यावसायिक डावपेच आखत. ‘सौदागर’ त्यांनी मुंबईत मेन थिएटर राॅक्सीला मॅटीनी शो ला रिलीज केला. चित्रपटाला साधारण स्वरूपाचे यश लाभले, पण असा वेगळा अमिताभ पाहण्यास प्रेक्षक फारसे उत्सुक नव्हते.
==========
हे देखील वाचा : अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ अंडररेटेड पण ग्रेट सिनेमा
==========
अमिताभचा एक वेगळा चित्रपट म्हणून ‘सौदागर’चा खास उल्लेख हवाच. दिग्दर्शक सुधेन्दु राॅय यांच्या तत्पूर्वी ‘उपहार’ (१९७१, प्रमुख भूमिकेत जया भादुरी आणि स्वरुप दत्त) या चित्रपटाने ऑपेरा हाऊस थिएटरमध्ये रौप्यमहोत्सवी आठवड्याचे यश संपादले होते हे विशेष. तर उत्तम कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपला उत्तम ठसा उमटवला होता. मधुमती (१९५९), सुजाता (५९), बंदिनी (६३), मेरे मेहबूब (६४) हे त्यांचे उत्तम कला दिग्दर्शनाचे महत्वाचे चित्रपट आहेत. यावरून त्यांच्या कामाचे महत्व आणि दृश्य माध्यमाची जाण लक्षात येते. उत्तम कला दिग्दर्शक चांगला दिग्दर्शकही बनू शकतो हे त्यांनी सिध्द केले. तर अमिताभने आपल्या संपूर्ण करियरमध्ये राजश्री पाॅडक्शन्सच्या उंचाई या चित्रपटात अलिकडेच अमिताभ बच्चनने भूमिका साकारलीय,हे आवर्जून सांगावेसे वाटते. अमिताभने काही वेगळ्या भूमिका साकाराव्या असे कायमच म्हटले गेले, त्यात ही नक्कीच आहे. आज पन्नास वर्षांनंतरही या चित्रपटाचा आशय, अभिनय व गीत संगीत आपला क्लास राखून आहेत हे विशेषच. हर हंसी चीज का… कधीही गुणगुणावे. आणि फ्रेश व्हावे.