‘या’मुळे अमोल पालेकर यांनी गमावला पहिला सिनेमा
सत्तरच्या दशकामध्ये जेव्हा ॲक्शन फिल्म बॉलीवूडमध्ये प्रचंड मोठा हंगामा करत होते; ‘शोले’ सारखा चित्रपट अख्या बॉलिवूडला व्यापून टाकत होता; त्याच काळामध्ये समांतर सिनेमा आणि मध्यममार्गी सिनेमा आपला प्रेक्षक वर्ग वाढवत होता. बासू चटर्जी, गुलजार, ऋषिकेश मुखर्जी, बासू भट्टाचार्य हे असे दिग्दर्शक होते ज्यांचे चित्रपट त्याकाळाशी अजिबात सुसंगत नव्हते. परंतु या चित्रपटातून सामान्य माणसाच्या सुखदुःखाचे दर्शन घडत होते. विनाकारणाच्या मारामाऱ्या, हिंसाचार यात नसायचा. सहज सुलभ मनाला भिडणारं कथानक, सुरीलं संगीत त्यामुळेच सर्वसामान्य प्रेक्षक या चित्रपटाला पसंत करत होते. अमोल पालेकर (Amol Palekar) या टाईपच्या सिनेमाचा खऱ्या अर्थाने सुपरस्टार होता. रजनीगंधा, चितचोर, छोटी सी बात, बातो बातो में हे त्याचे पहिले चार चित्रपट ओळीने सुपरहिट ठरले होते. लो बजेट असलेल्या या सिनेमांनी बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांवर मोठी छाप टाकली होती. एक वेगळा प्रेक्षक वर्ग एक वेगळा जॉनर यातून निर्माण होत गेला. अमोल पालेकर यांनी नंतर गोलमाल, अपने पराये हे सुपरहिट सिनेमे दिले. पण तुम्हाला माहित आहे का अमोल पालेकरचे पहिल्याच चित्रपट च्या वेळी दिग्दर्शका सोबत मतभेद झाले आणि त्याच्या हातातून सिनेमा गेला! त्याला त्या सिनेमातून चक्क काढून टाकण्यात आले. काय होता हा किस्सा? कोण होते दिग्दर्शक ?
अलीकडेच अमोल पालेकरने (Amol Palekar) दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये ही कहानी सांगितली आहे. अमोल पालेकर तसं बघितलं तर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स विद्यार्थी. खरंतर त्यांना करिअर आर्ट मध्येच करायचं होतं. तो चांगला चित्रकार होता. जे जे मधून त्याने डबल ग्रॅज्युएशन केले होते. त्याच्याकडून भरपूर अपेक्षा त्याच्या मित्रांना आणि गुरुजनांना होत्या. ख्यातनाम चित्रकार एम एफ हुसेन कायम त्याला त्याच्या डिग्रीची आठवण करून देत आणि चित्रपट वगैरे ठीक आहे पण तुझी मूळ शैली, मूळ आवड कुठे गेली असे विचारत!
जे जे मधून डिग्री घेतल्यानंतर अमोल मराठी आणि हिंदी नाटकांकडे वळले. सत्यदेव दुबे यांच्या ग्रुपमधून ते नाटकातून कामे करत होते. याच काळात त्याचा संबंध आला फिल्म फोरम या फिल्म सोसायटीसोबत. इथे जगातील उत्तमोत्तम चित्रपट दाखवले जात. हॉलीवुड सोबतच युरोपियन सिनेमे, इटालियन, जापनीज सिनेमा देखील दाखवले जात. यातून अमोल पालेकर यांना या नव्या विश्वाची जाणीव आणि व्याप्ती लक्षात आली. या फिल्म फोरममध्ये बासू चटर्जी देखील येत असत. तेव्हा बासू चटर्जी एका सिनेमावर काम करत होते. चित्रपट होता ‘पिया का घर’. व पु काळे यांच्या ‘मुंबईचा जावई’ या कथानकावर हा चित्रपट बणणार होता. चित्रपटाची नायिका होती जया भादुरी.
नायक म्हणून बासू चटर्जी यांना अमोल पालेकरला (Amol Palekar) घ्यायचे होते. तसे त्यांनी त्याला विचारले. अमोल पालेकर यांनी देखील होकार दिला. नंतर बासुदांनी त्याला चित्रपटाचे निर्माते राजश्री प्रॉडक्शनचे ताराचंद बडजात्या यांना भेटायला जा असे सांगितले. त्यावर अमोल पालेकर यांनी सरळ नकार दिला. तो म्हणाला “या चित्रपटाचे दिग्दर्शक तुम्ही आहात. तुम्ही स्वतः माझी या चित्रपटाचा नायक म्हणून निवड केली आहे. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे.असे असताना तुम्ही मला निर्मात्याकडे का पाठवत आहात? राजश्री प्रॉडक्शनच्या कुणालाही मी ओळखत नाही. तिथे अनेक स्ट्रगलर्स बाहेर उभे असतील.
========
हे देखील वाचा : एका हिंदी सिनेमाच्या गाण्याने झाला या गार्डनचा कम्प्लीट मेक ओव्हर!
========
त्या रांगेत तुम्ही मला उभे करू इच्छिता कां ? मी अजिबात त्यांना भेटायला जाणार नाही. जर जायचेच असेल तर तुम्ही स्वत: माझ्या सोबत या!” बासू चटर्जी यांना अमोल पालेकर (Amol Palekar) यांचे ते उत्तर आवडले नाही. त्यांना त्याच्या बोलण्यातून अहंकाराचा दर्प आला. त्यांनी अमोल पालेकर यांना सांगितले “अजून तुझा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. असे असताना तुला हा एटीट्यूड बरोबर नाही.” त्यावर अमोल पालेकर म्हणाला,”मी आहे तो असा आहे.” साहजिकच बासू चटर्जी यांनी अमोल पालेकरला (Amol Palekar) या चित्रपटातून काढून टाकले आणि त्याच्या जागी अनिल धवन ची निवड झाली. अर्थात नंतर बसू चटर्जी यांनी विचार केला एक कलावंत म्हणून त्याचे काहीही चुकीचे नाही आणि कलावंता कडे हा एटीट्यूड असतोच. पुढे त्यांच्यातील मतभेद मिटले आणि बासुदांनी लगेच त्याला आपल्या पुढच्या चित्रपटासाठी साईन केले. चित्रपट होता रजनी गंधा. पण आपल्या ॲटीट्यूडमुळे अमोल पालेकर ला बासू चटर्जी यांनी आपल्या ‘पिया का घर’ मधून काढून टाकले होते हे नक्की !