मुगल ए आझम – एका अजरामर प्रेमकथेची साठी
‘मुगल ए आझम’ असे म्हणताक्षणीच डोळ्यासमोर येते ते अतिशय भव्य कॅनव्हासवरील उर्दूमिश्रित संवाद, गीत, संगीत, नृत्य, यांनी उत्तरोत्तर रंगलेली ‘प्रेम कथा’. हिंदी तर झालेच पण एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा एक माईल स्टोन चित्रपट आहे. प्रत्येक काळात असे मैलाचे दगड ठरणारे चित्रपट असतातच. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘ (१९७५), सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’ ( १९९४), आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ ( १९९५) हे देखील असेच माईल स्टोन चित्रपट, एका पिढीतील हे चित्रपट पुढील अनेक पिढ्या ओलांडूनही हिट असतात, चर्चेत असतात. आजच्या ग्लोबल युगातील पिढीने कदाचित २००३ साली ‘रिपिट रनला’ आलेला पूर्णपणे रंगीत स्वरूपातील ‘मुगल ए आझम’ पाहिला असेल, पण मूळ चित्रपट कृष्ण धवल रुपातील असून त्याचा ‘रंग’ कधीही फिका पडणार नाही.
के. असिफ निर्मित आणि दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’ची वैशिष्ट्ये सांगावीत तितकी थोडी आहेत. त्या काळात असे भव्य महत्वाकांक्षी चित्रपट पडद्यावर आणायचे तर वेळ, पैसा, शक्ती किती खर्च होईल याची अजिबात मोजदाद होत नसे. अशा चित्रपटांसाठी फिल्म मेकर खूपच मोठी स्वप्ने पाहत आणि मग ते पडद्यावर आणण्याचा प्रचंड मोठा ध्यास धरत. के. असिफ यांनी असेच या चित्रपटाच्या निर्मीतीचे शिव्यधनुष्य उचलले.
‘अनारकली’वर भव्य चित्रपट निर्माण करण्याचे के. असिफ यांचे स्वप्न होते. खरं तर फिल्मीस्थानच्या शशधर मुखर्जी यांनी १९५३ साली ‘अनारकली’वरचा आपला चित्रपट पडद्यावर आणला. नंदलाल जसवंतलाल दिग्दर्शित या चित्रपटात अनारकलीच्या भूमिकेत बीना राॅय तर राजपुत्र सलिमच्या भूमिकेत प्रदीपकुमार होते. सी. रामचंद्र यांचे मधाळ संगीत हे या चित्रपटाचे मोठे वैशिष्ट्य. लता मंगेशकर यांनी गायलेले ‘ये जिंदगी उसीकी है’ हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी अजिबात कंटाळा येत नाही.
‘अनारकली ‘ पडद्यावर आला तरी के. असिफ यांना ‘मुगल ए आझम’ पडद्यावर आणायचे होते. त्यासाठी त्यांनी अतिशय आस्ते कदम वाटचाल सुरु ठेवली. आपल्या मनाजोगतं काम होईपर्यंत त्यांचे अजिबात समाधान होत नसे आणि म्हणूनच तर ‘मुगल ए आझम’च्या रुपाने भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील सर्वोत्कृष्ट पहिल्या दहा चित्रपटात या चित्रपटाचा आवर्जून समावेश होतो.
‘मुगल ए आझम’च्या निर्मितीत अनेक आव्हाने, अडचणी, अडथळे आले ते दूर सारत, त्यातून मार्ग काढत काढत हा चित्रपट पडद्यावर आला आणि जणू वेगळ्या प्रकारे कायमचा राहिला. अकबरची भूमिका साकारत असलेल्या चंद्रमोहन यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी पृथ्वीराज कपूर यांची निवड केली. सुरुवातीला दिलीपकुमारचा सलिमच्या भूमिकेसाठी होकार नव्हताच. खास लंडनवरुन आणलेला वीग त्याला शोभला आणि त्याने होकार देताच, नर्गिसने नकार दिल्याने मधुबालाची निवड झाली, तर तेव्हा दिलीपकुमार आणि मधुबाला यांची खरीखुरी प्रेम कथा सुरु होती, पण ती तुटली तरी तिने या चित्रपटातील प्रेम दृश्यात कुठेही कमतरता येऊ दिली नाही. त्यामुळे असे म्हटले जाते की, या चित्रपटातील दिलीपकुमार आणि मधुबाला यांच्यावरील प्रेम दृश्ये अभिनय आहे की वास्तव?
अकबराच्या दरबारात गोकुळाष्टमीच्या वेळी अनारकलीच राधा बनते. नृत्य दिग्दर्शिक लक्ष्मण महाराज यांनी मधुबालावर ‘मोहे पनघट पे नंदलाल छोड गयो रे ‘ हे नृत्य गीत बसवून घेतलं, तेव्हा सलिम अनारकलीला पहिल्यांदा पाहतो. तर या कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटात ‘प्यार किया तो डरना क्या’ हे अनारकलीचे एकमेव नृत्य गीत रंगीत होते. हा भव्य शीशमहल तयार करण्यासाठी बेल्जियममधून खास तंत्रज्ञ मागवण्यात आले. हा शीशमहल ५० फूट उंच, ८० फूट रुंद, ५० फूट लांब असा प्रचंड मोठा आहे, तब्बल दोन वर्ष हा सेट उभा राहत होता, आणि त्याचा रिझल्ट पडद्यावर पाह्यला मिळाला. फिल्मचे बाह्यचित्रीकरण जयपूरच्या प्रशस्त अशा मैदानात करण्यात आले. येथे यातील युध्द दृश्ये चित्रीत करण्यासाठी तात्कालिक संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांची मदत झाली. त्यांनी भारतीय लष्करातील दोनशे जवान मदतीला दिले. फक्त याच शूटिंगचा खर्च पंधरा लाख रुपये झाला. साठ वर्षांपूर्वी ही रक्कम आजच्या अनेक कोटींवर जाते. पण त्या काळात ‘पिक्चर दिल से बनती है, पैसे से नही ‘ असा रोखठोक बाणा असल्याने असे खर्च कधीच बातमीचे विषय ठरले नाहीत.
‘मुगल ए आझम ‘ ही सलिम आणि अनारकली यांची हळूहळू एकमेकांत गुंतत जाणारी उत्कट प्रेम कथा आणि त्याला असलेला अकबरचे माता पिता, अर्थात जोधा ( दुर्गा खोटे) आणि अकबर ( पृथ्वीराज कपूर) यांचा असलेला तीव्र विरोध अशी आहे. के. असिफने अक्षरशः झपाटून जाऊन या चित्रपटावर प्रचंड मेहनत घेतली आणि त्याला त्याच प्रकारे प्रेक्षकांनाही झपाटून टाकायचे होते. त्यासाठी ५ ऑगस्ट १९६० ही प्रदर्शनाची तारीख निश्चित केली. मुंबईत मेन थिएटर मराठा मंदिर येथे १ ऑगस्टला आगाऊ तिकीट विक्री सुरु होण्याच्या दिवशी पहाटेपासूनच प्रचंड रांग लागली, त्यात धक्काबुक्की, पोलीसांचा लाठीमार झालाच. पण कुणी तरी उत्साही प्रेक्षकांने चाकूही काढल्याची बातमी पसरली. हा भव्य चित्रपट असल्याने तिकीट दरात वाढ करुन दीड रुपयाचे तिकीट दोन रुपये असे करण्यात आले ( साठ वर्षांपूर्वी शहरी मध्यमवर्गीय मराठी माणसाला मासिक शंभर रुपये पगारही खूप मोठा वाटे, हवं तर नात्यातील वरिष्ठांना आवर्जून विचारा) गुरुवारी रात्रीचा भव्य प्रीमियर तर अतिशय देखणा आणि बरेच दिवस चर्चेत राहिल असाच झाला. पिक्चरच तसे भारी होते हो. शुक्रवारी मिरवणूक काढून मराठा मंदिर चित्रपटगृहात हत्तीवरुन या चित्रपटाची प्रिन्ट आणण्यात आली ( तोपर्यंत मार्केटिंग शब्द या चित्रपटसृष्टीच्या आसपासही नव्हता. पण जे काही करायचं ते भारावून जाऊन करायचे एवढेच माहित होतं).
‘मुगल ए आझम ‘ सुपर हिट होताना त्यातील संवादांच्या आतषबाजीनेही हमखास टाळ्या शिट्ट्यांनी थिएटर डोक्यावर घेतले जाई. सलिम आपल्या पिताजीना सुनावतो, “तकदीरे बदल जाती है, जमाना बदल जाता है, मुल्लो की तारीख, इतिहास बदल जाता है, शहेनशहा बदल जाते है, मगर बदलती हुई दुनिया में मुहब्बत जिसका दामन थाम लेती है, वह इन्सान नहीं बदलता…” इतरही अनेक लहान मोठे संवाद लोकप्रिय झाले. त्या काळात पब्लिकलाही ‘क्या डायलॉग मारा यार’ अशी उत्फूर्त दाद द्यायला आवडे. पब्लिक फक्त सिनेमा पाह्यला जात नव्हता तर ऐकायलाही जात असे. “जब्त मै करु, जिसकी सारी दुनिया वीरान कर दी गई है और जब्त वो न करे जिसे सिर्फ शौक ए बादशहा को टेस लगी है, क्या मुहब्बत के लिए भी इजाजत और हुक्म का फर्मान चाहिए…”
विशेष म्हणजे या चित्रपटाचे मराठा मंदिर चित्रपटगृहावर केलेले ऐतिहासिक दृश्यांचे भव्य डेकोरेशन पाह्यलाही रसिकांची प्रचंड गर्दी होई. भले या चित्रपटाचे तिकीट इतक्यात मिळणार नाही, पण मग थिएटर डेकोरेशन पाह्रचा तर आनंद घेऊयात अशी भावना होती. या चित्रपटाने अशा पध्दतीने समाजमन प्रचंड व्यापून टाकले होते आणि हेच आपल्याकडच्या चित्रपट प्रेमींचे वैशिष्ट्य आहे.
या चित्रपटाची गीते शकील बदायुनी यांची असून संगीत नौशाद यांचे आहे. एकूण दहा गाणी या चित्रपटात आहेत. प्यार किया तो डरना क्या तर ऑल टाईम हिट आहे. मोहब्बत की झूठी कहानी पे रोये, तेरी मेहफिल मे किस्मत आजमाकर वगैरे वगैरे गाणी आजही लोकप्रिय आहेत.
या चित्रपटाची सतत चर्चा होत राहिली, साठ आणि सत्तरच्या दशकात हा चित्रपट सतत रिपिट रन आणि मॅटीनी शोला रिलीज होत राहिला. आणि तो सतत फोकसमध्ये तर राहिलाच पण पुढील पिढीलाही माहिती होत राहिला. मी स्वतः सत्तरच्या दशकात असाच हा चित्रपट रिपिट रनला प्रदर्शित झाला असताना आवर्जून पाहिला. जुन्या चित्रपटाचे शौकिनांना या चित्रपटावर लिहायला, बोलायला, ऐकायला, सांगायला नेहमीच आवडते. अनेकांनी तर हा चित्रपट अगणित वेळा पाहिलाय. सिंगल स्क्रीनच्या काळातील ही भव्य कलाकृती त्यानंतर दूरचित्रवाणी, व्हिडिओ, व्हिडिओ थिएटर्स, चॅनलचे जग, मल्टीप्लेक्स, लॅपटॉप, मोबाईल स्क्रीन, ओटीटी प्लॅटफॉर्म अर्थात तिसरा पडदा असा एकूणच बदलता प्रवास अनुभवत आपले अस्तित्व टिकवून आहे. याला दर्जेदार कलाकृतीचा इम्पॅक्ट म्हणतात.
२००४ साली एके दिवशी बातमी आली की, ‘मुगल ए आझम ‘ पूर्ण रंगीत स्वरूपात रिलीज होत आहे. त्यानिमीत्ताने अंधेरीतील द क्लब येथे झालेल्या पार्टीला आवर्जून हजर राहिलो. तेव्हा या चित्रपटाशी संबंधित हयात असणारे असे काही मोजकेच जण हजर होते. संगीतकार नौशाद हजर होते पण दिलीपकुमारची अनुपस्थिती जाणवली. ऐन दिवाळीत हा आता ‘पूर्ण रंगात न्हायलेला’ चित्रपट अतिशय थाटात रिलीज करण्याचे ठरले. १९६० साली या चित्रपटाची माऊथ टू माऊथ पब्लिसिटी झाली आता मिडिया वाढला होता, छोट्या छोट्या गोष्टींच्या बातम्या होत होत्या. यावेळी चर्चगेटच्या इराॅस थिएटरमध्ये अतिशय थाटात हा चित्रपट रिलीज करताना पहिल्याप्रमाणेच हत्तीवरुन या चित्रपटाची प्रिन्ट आणण्यात येत असल्याचा स्वानुभव घेतला. आम्हा सिनेपत्रकाराना आवर्जून फस्ट डे फर्स्ट शोलाच आमंत्रित केले होते, नवीन शतकाच्या पहिल्या दशकातील प्रेक्षकांसोबत ही महान कलाकृती अनुभवणे एक वेगळी आठवण झाली…
तब्बल साठ वर्षे आपले वैशिष्ट्य कायम अधोरेखित करण्यात यशस्वी ठरलेला हा चित्रपट एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील माईल स्टोन आहे!
दिलीप ठाकूर