
…आणि सुनील शेट्टीला पहिले फिल्मफेअर ॲवार्ड मिळाले!
“अंजली, मैं तुम्हे भूल जाऊ ये हो नही सकता हा तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नही दूँगा…” नव्वदच्या दशकाच्या अखेरीस आलेल्या ‘धडकन’ या चित्रपटातील सुनील शेट्टीचा (Sunil Shetty) हा डायलॉग आजदेखील समाज माध्यमावर अनेक मीम्स रूपात अवतारताना दिसतो. या डायलॉगने सुनील शेट्टीला खऱ्या अर्थाने आयडेंटिटी मिळाली. तो त्याचा सिग्नेचर डायलॉग बनला!

ओव्हर इमोशनल ड्रामा असलेला हा ‘धडकन’ चित्रपट धर्मेश दर्शन यांनी दिग्दर्शित केला होता. १९९५ साली प्रदर्शित झालेल्या राजा हिंदुस्तानी नंतर धर्मेश दर्शन यांच्याकडूनच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या. याच काळात व्हीनसच्या रतन जैन यांनी धर्मेश दर्शन यांच्याकडे ‘धडकन’ हा चित्रपट दिग्दर्शनासाठी सोपवला. हा सिनेमा एक हायली इमोशनल लव्ह स्टोरी होता. अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्या भूमिका फिक्स झाल्या होत्या. देव या कॅरेक्टरसाठी आता शोध सुरू झाला होता. सुनील शेट्टीच्या आधी या भूमिकेसाठी अभिनेता राजकुमार यांचे चिरंजीव पुरू राजकुमार यांची निवड झाली होती! कारण त्यावेळी पुरू राजकुमार एक नवीन चेहरा होता. (Sunil Shetty)
मातब्बर निर्माते दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी त्यांच्या ‘बालब्रह्मचारी’ या चित्रपटासाठी त्याची निवड केली होती. धर्मेश दर्शन जेव्हा ‘धडकन’ या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन पुरू राजकुमार यांना भेटायला गेले तेव्हा स्टोरी ऐकल्यानंतर पुरू राजकुमार तेवढा कम्फर्टेबल वाटला नाही. तो म्हणाला, ”माझं करिअर अजून सुरू व्हायचं आहे. त्यात ही निगेटिव्ह भूमिका कशाला?” यावर धर्मेश दर्शन म्हणाले, ”जर तू या भूमिकेबद्दल साशंक असशील डायलेमामध्ये असशील तर करू नकोस. मी दुसरा अभिनेता पाहतो!”

आता पुन्हा नवीन अभिनेत्याचा शोध सुरू झाला. आता धर्मेश यांच्यापुढे दोन पर्याय होते एक होता अजय देवगन आणि दुसरा होता सुनील शेट्टी(Sunil Shetty). अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांनी यापूर्वीही अनेक चित्रपटातून एकत्र कामे केले होते. अजय देवगन त्या काळात बऱ्यापैकी बिझी स्टार झाला होता. त्यामुळे सुनील शेट्टींकडे हे प्रपोजल गेलं. धर्मेश सुनील शेट्टी यांना म्हणाला की, ”हि भूमिका आणि चित्रपट तुझ्यासाठी परफेक्ट आहे. मला खात्री आहे ही भूमिका तू चांगल्या पद्धतीने करशील आणि मी गॅरंटी तुला देतो या चित्रपटाने तुला तुझे पहिले फिल्मफेअर देखील मिळेल!”
चित्रपट सुरू होण्यापूर्वीच दिग्दर्शकाला एवढा कॉन्फिडन्स पाहून सुनील शेट्टी (Sunil Shetty) देखील खूष झाला आणि त्याने ही भूमिका स्वीकारली! हा चित्रपट बनायला बराच कालावधी लागला. हा चित्रपट ओहर इमोशनल असल्यामुळे आज खूप बटबटीत वाटतो. पण त्या काळामध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले होते. हा चित्रपट हिट होण्याचे दुसरे कारण म्हणजे नदीम श्रवण यांचे मधुर संगीत. गीतकार समीर अंजन यांनी लिहिलेली या चित्रपटातील नऊ गाणी सुपरहिट ठरली.

तुम दिल की धडकन हो (अभिजित , अलका याज्ञिक) दिल ने ये कहा है दिलसे मुहोब्बत हो गई है तुमसे (उदित नारायण,अलका याज्ञिक आणि कुमार सानू) ना ना करते प्यार प्यार (उदित नारायण,अलका याज्ञिक) दुल्हे का सेहरा सुहाना लगता है (नुसरत फतेह अली), तुम दिल की धडकन हो(कुमार सानू) अक्सर इस दुनियामे (अलका याज्ञिक) चित्रपटाला नदीम श्रवण यांचे संगीत होते. सिनेमाचे म्युझिक प्रचंड लोकप्रिय ठरले. 2000 सालच्या च्या म्युझिक चार्ट लिस्ट मध्ये ‘धडकन’ हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर होता. पहिल्या क्रमांकावर अर्थातच ‘मोहब्बते’ होता. ‘धडकन’ या चित्रपटाच्या तब्बल ४५ लाख कॅसेटस अवघ्या तीन महिन्यात विकल्या गेल्या होत्या!
==========
हे देखील वाचा : धर्मेंद्रने गुरुदत्तच्या उपकाराची जाणीव कशी ठेवली?
==========
‘धडकन’ या सिनेमाला ४६ व्या फिल्मफेअर अवार्ड सेरेमनी मध्ये तब्बल आठ नामांकन मिळाली होती. त्यापैकी दोन पारितोषिक मिळाली. एक परितोषिक सुनील शेट्टीला सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून तर दुसरे फिल्म फेअर अलका याज्ञिक हिला (‘दिल ने ये कहा है दिलसे … या गाण्याकारीता) मिळाले. चित्रपट साईन करण्यापूर्वीच दिग्दर्शक धर्मेश दर्शन याने सुनील शेट्टी खात्री दिली होती की या सिनेमासाठी तुला पहिले फिल्म फेअर मिळेल आणि त्याची भविष्यवाणी १००% खरी ठरली!