… आणि विवेक ओबेरॉय झोपडपट्टीत राहायला लागला.
इंडियन गँगस्टर ट्रायलॉजीमधील सत्या, कंपनी आणि डी या राम गोपाल वर्मा दिग्दर्शित फिल्म्स सर्वांनी पाहिल्या असतीलच. या प्रत्येक फिल्ममधून अतिशय गुणी ऍक्टर्स बॉलीवूडला मिळाले. यातील प्रत्येकाने त्या त्या फिल्ममधील गॅंगस्टर्स अतिशय बारकाईने पडद्यावर जिवंत साकारले. या ऍक्टर्सचे रियल लाइफ पाहिले तर कोणीच या गुन्हेगारी विश्वाच्या दूरदूरपर्यंत सुद्धा जगले नव्हते ना कधी संबंध आला होता पण तरीही आपल्या अभिनयाच्या जोरावर आपल्याला या काल्पनिक पात्रांवर विश्वास करायला भाग पाडले. (Vivek Oberoi)
विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याचा ‘कंपनी’ हा पहिलाच चित्रपट होता आणि या चित्रपटाने त्याला कमर्शियल सक्सेस सोबत एक चांगला ऍक्टर म्हणून प्रस्थापित केले. पण त्याला हा चित्रपट कसा मिळला याची कथा खूपच रंजक आहे. मिठीबाई कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केल्यानंतर विवेक ओबेरॉयने लंडनमधून एक एक्टिंगचा छोटासा वर्कशॉप केला होता आणि तिथे न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या डिरेक्टरची नजर त्याच्यावर पडली आणि त्याला एक्टिंगमध्ये मास्टर्ससाठी युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन दिले तिथे मास्टर्स डिग्री पूर्ण करून विवेक ओबेरॉय बॉलिवूडमध्ये काम शोधण्यासाठी मुंबईला परत आला आणि त्याचा स्ट्रगल सुरु झाला.
जवळपास एक वर्ष त्याचा स्ट्रगल चालूच होता त्या दरम्यान खूप वेळा रिजेक्शन, अपमान सहन करावा लागला होता, काही प्रोड्युसर्स किंवा डिरेकटर्स तर त्याला एक्टिंग करू नकोस, तुझ्यात टॅलेंट नाहीये असं देखील बोलायचे तेव्हा त्याने या सर्वांच्या सल्ल्याची आणि नावाची लीस्ट बनवली होती. त्याचे असं म्हणणं होत की, जेव्हा माझी पहिली फिल्म हिट होईल तेव्हा हीच लोक जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन येतील तेव्हा माझ्यात टॅलेंट आहे हे त्यांना कळेल एवढा विश्वास त्याला स्वतःवर होता. एकीकडे वर्षभर स्ट्रगल करून त्याला टेन्शन येऊ लागले होते.
त्याच दरम्यान विवेकला राम गोपाल वर्मा कंपनी नावाची फिल्म बनवत आहेत असे त्याला कळाले. तो आपले सर्व फोटोग्राफ्स घेऊन राम गोपाल वर्माच्या ऑफिसमध्ये पोहचला आणि त्यांची भेट घेतली. त्या चर्चेदरम्यान विवेक ओबेरॉयची पार्श्वभूमी ऐकून रामूचे असे मत बनले की, हा परदेशातून एक्टिंगचे प्रशिक्षण घेऊन आलेला आहे आणि कंपनी फिल्ममधील चंदूचे पात्र झोपडपट्टीत राहणारे, त्याचे एकंदर वागणे बोलणे किंवा दिसणे हे रफ अँड टफ आहे. हा गोरागोमटा हँडसम मुलगा या पात्राला योग्य न्याय देऊ शकणार नाही म्हणून रामूने विवेकला नकार सांगितला पण विवेकला हा रोल खूपच आवडला होता आणि त्याला काही करून हा रोल मिळवायचाच होता त्याने खूप विनंती करून रामूकडून २ आठवड्यांची मुदत मागितली आणि त्यानंतरची एक अपॉइंटमेंट सुद्धा घेऊन ठेवली.(Vivek Oberoi)
विवेकसमोर आता करो वा मरोची स्थिती आली होती. त्याने मग एका झोपडपट्टीत २ आठवड्यांसाठी एक खोली भाड्याने घेतली. झोपडपट्टीतील एकूणच जीवनशैली आणि तिथे राहणाऱ्या लोकांची भाषा, कपडे घालण्याची पद्धत, त्यांचे जेवण, तिथले रोजचे रुटीन हे सर्व विवेक २ आठवड्यात शिकला. त्याने आपल्या एका फोटोग्राफर मित्राला विनंती करून त्या परिसरात स्वतःचे टपोरी लूकमध्ये फोटो काढून एक अल्बम बनवला आणि मग पुन्हा २ आठवडयांनी रामूला भेटायला गेला आणि जाताना तो टपोरी अवतारात ऑफिसमध्ये पोहचला.(Vivek Oberoi)
तिथे गेल्यावर तिथल्या वॉचमनने त्याला हटकले आणि जाण्यास सांगितले पण ऑलरेडी अपॉईनमेंट घेतली असल्यामुळे त्याला कसेबसे आत जाऊन देण्यात आले, विवेकला जाणवले की, आपला गेटअप थोडा यशस्वी झाला आहे. विवेक ज्यावेळी रामूच्या केबिनमध्ये जात होता तेव्हा काचेच्या त्या भिंतीत त्याने स्वतःला पहिले आणि त्याला काहीतरी कमी जाणवली म्हणून मग त्याने तिथेच असलेल्या कुंडीतील थोडीशी माती घेऊन तोंडाला लावली आणि मग त्याने रामूच्या केबिनमध्ये एक जळती बिडी तोंडात ठेवून कडक एंट्री मारली. (Vivek Oberoi)
अल्बम रामूच्या टेबलवर फेकून त्याने समोरच्या खुर्चीत बैठक मारली आणि दोन्ही पाय रामूच्या टेबलावरती ठेवले, आता हा सर्व प्रकार रामू पाहत होता. विवेकचा चेहरा आठवायचा प्रयत्न करत होता. त्याला विवेक एकदाच भेटला होता त्यामुळे त्याला आठवेना, विवेकने मग डायलॉग मारला “मुह क्या देख रहा है फोटो देख और बता मैं कंपनी मै काम कर सकता है की नही” मग रामूला विवकेची ओळख पटली. रामू या सर्व प्रकाराने चांगलाच इम्प्रेस झाला त्याने अशा पद्धतीची ऑडिशन कधीच पहिली नव्हती.
===========
हे देखील वाचा : मुंबईतील डबल डेकर बस आणि सिनेमा
===========
विवेकची (Vivek Oberoi) रोलसाठीची डेडिकेशन पाहून त्याने त्याला चंदूच्या रोलसाठी निवडले. विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) मग रामूला तो सुरेश ओबेरॉयचा मुलगा असल्याचे सांगितले, रामूला याचे खूप आश्चर्य वाटले आणि विचारले की आधीच का नाही सांगितलं? त्यावर विवेकने सांगितले की, त्याला हे काम स्वतःच्या हिंमतीवर मिळवायचे होते. विवेकने रामूला एक विनंती केली की, तुम्ही माझ्या वडिलांना फोन करून माझी निवड केली आहे, याची बातमी द्या. रामूने मग विवेकला घेऊन त्याचेच घर गाठले आणि तिथे सुरेश ओबेरॉय शॉर्ट्स मध्ये बागेला पाणी देत होते. रामूला आपल्या घरी पाहून त्यांना आनंद झाला मग जुजबी औपचारिक बोलणं झाल्यावर रामूने विवेकाच्या निवडीची बातमी दिली. सुरेश ओबेरॉयच्या चेहऱ्यावर त्यावेळी खूप अभिमान दाटून आला. त्यावेळी रामूने अचानक सुरेश ओबेरॉयना तुमच्या खिशात किती पैसे आहेत? असे विचारले त्यावेळी त्यांच्या खिशात फक्त १० रुपये होते रामूने ते घेतले आणि विवेकला दिले आणि सांगितले की, ही तुझी साइनिंग अमाऊंट आहे. विवेकने ते १० रुपये अजून जपून ठेवले आहेत.