महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
अजून एका जुन्या मुंबईची ओळख पडद्याआड…
कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सत्तरच्या दशकात सुपर स्टार राजेश खन्ना आणि मग अॅन्ग्री यंग मॅन अमिताभ बच्चनची जबरा क्रेझ असतानाच्या काळात दक्षिण मुंबईतील आम्हा चित्रपट रसिकांना काही सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहे कायमच कुठे तरी ती आपल्या मध्यमवर्गीयांसाठी नव्हेत अथवा नाहीत असेच बराच काळ वाटले.
न्यू एम्पायर (New Empire Theater) अगदी असेच होते. खरं तर आजूबाजूलाच कॅपिटॉल, स्टर्लिंग, न्यू एक्सलसियर असताना न्यू एम्पायर सवयीचे व्हायला हवे होते. पण त्या काळात न्यू एम्पायरला रिलीज झालेले काही चित्रपट त्याबरोबरच गिरगाव ग्रॅन्ट रोडला जवळपास प्रदर्शित झाल्याने तसे झाले असावे. उदाहरणार्थ चोर चोर ( न्यू एम्पायरसह सेन्ट्रललाही), मोन्टो ( सुपर), चरित्र ( ड्रीमलॅन्ड) या चित्रपटांबाबत म्हणता येईल. ‘जीवन संग्राम ‘ याच न्यू एम्पायरवरुन (New Empire Theater) दोनच आठवड्यात सुपरला आला. मात्र तेव्हाचे न्यू एम्पायरचे काही चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण होते. देव आनंद दिग्दर्शित ‘हीरा पन्ना’ या चित्रपटाला बरेच दिवस वितरक मिळत नाही अशी चर्चा होती. म्युझिक हिट असूनही तसे झाले. अखेर नवकेतन फिल्मनेच हा चित्रपट वितरित केला. नवकेतन फिल्मची ही दुर्लक्षित राहिलेली व्यावसायिक गोष्ट यानिमित्त सांगायलाच हवी. महेश भट्ट दिग्दर्शित पहिला चित्रपट ‘मंजिले और भी है’ हा सेन्सॉरच्या कचाट्यात बरेच दिवस सापडला. त्यावर बरेच लिहून आल्याचे वाचले. त्याला बरेच कटस सुचवले गेले. अखेर त्याला ‘फक्त प्रौढांसाठी’ असे प्रमाणपत्र देण्यात आले आणि तो याच न्यू एम्पायरला प्रदर्शित झाला. असाच एक बोल्ड थीमवरचा ‘बाजार बंद करो’ येथेच झळकला. तो वेगळ्याच कारणास्तव गाजला हे वेगळे सांगायलाच नको.
न्यू एम्पायर (New Empire Theater) हे मूळचे इंग्रजी चित्रपटाचे हुकमी थिएटर. रुबाबही तसाच. आणि आसपास अनेक प्रकारची ऑफिसेस आणि काॅलेज असल्याने येथे इंग्रजी चित्रपटाना भरपूर स्कोप. बरं, येथील पिक्चर संपल्यावर एका बाजूला अनेक वर्षे अतिशय देखणे असे इराणी हाॅटेल होते. कितीही वेळ बसून गप्पा मारता येत होत्या. आता मॅकडोनाल्ड आलयं. दुसर्या बाजूला भेळपुरीवाला होता. तात्पर्य, या थिएटरचा स्पाॅट एकदम परफेक्ट. मूळात येथे इंग्रजाच्या काळात म्हणजे १९०८ साली एम्पायर हे थिएटर बांधले गेले. तेव्हा काही शाॅर्टस विदेशी मूकपट आपल्या देशात अल्प प्रमाणात येत होते. आणि यात मनोरंजनाचे अन्य कार्यक्रम (वाद्यवृंद, जादूचे प्रयोग असे काही) होत. तेही फक्त शनिवार व रविवार असत. तेव्हाची मुंबई व मनोरंजनाची साधने यानुसार ते होते. १९३० साली तेथे ‘Vagabond King’ हा विदेशी चित्रपट प्रदर्शित झाल्याचा तपशील मिळतो. १९३५ साली केकी मोदी हे याचे मालक झाले. मूळ इमारत पाडून त्या जागी १९४८ ला नवीन भव्य व वातानुकूलित थिएटर उभे राहिले. ते म्हणजे, न्यू एम्पायर. तीच त्याची ओळख. ब्रिटिश आर्टीटेक्ट एम. ए. रिड्डुली यांनी ते अतिशय स्टाईलीश, देखणे, पाॅलिश्ड असे केले. ते व्हीक्टोरियन कल्चर व बॅरोक स्टाईलचे असल्याचे विशेष कौतुक झाले. आर्थर पायने, ओ काॅन्नार व गेरॅड यांची ही करामत, कौशल्य असल्याचे संदर्भ सापडतो. १९५५ साली ट्वेन्थी सेन्चुरी फाॅक्स कार्पोरेशनने या थिएटरमध्ये आपले विदेशी चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली. ते अनेक वर्षे होत होते. आता पारंपरिक मराठी व मसालेदार मनोरंजक हिंदी चित्रपटावर वाढत असलेल्या मला अशा इंग्रजाळलेल्या थिएटरबद्दल ओढ अथवा आवड कशी निर्माण होईल? त्यासाठी सत्तरच्या दशकात येथे हिंदी चित्रपट प्रदर्शित व्हायची वाट पहावी लागली. आणि तशी ती आवर्जून पाहिली.
=======
हे देखील वाचा : नाॅव्हेल्टी…कधी बिग हिट तर कधी बिग फ्लाॅप
=======
कालांतराने ‘स्वामी दादा’, ‘एक रिश्ता बाॅण्ड ऑफ लव्ह’ असे अनेक चित्रपट मी न्यू एम्पायरमधील (New Empire Theater)बाल्कनीतून एन्जाॅय केले तेव्हा या प्रशस्त थिएटरची संस्कृती अनुभवली. प्रत्येक सिंगल स्क्रीन थिएटरची आपली एक ओळख असते, व्यक्तिमत्व असतेच, संस्कृती असते. मला या वेगळेपणाचे विशेष आकर्षण आहे. आपण फक्त चित्रपट पाहून थिएटरबाहेर पडणे ही माझी सवय आणि गरज कधीच नव्हती. प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहचवणारी वास्तू कशी ‘लाईव्ह ‘ अनुभव देते. रसिक तेथे बसून पिक्चर कसा ‘लाईक ‘ करतात हादेखील एक विषय आहे, अनुभव असतो. आपल्या देशातील फिल्म दीवाने आवडलेला पिक्चर पडद्यावरच ठेवून बाहेर पडत नाही, तो चित्रपट आपल्या डोक्यातही ठेवतो.
असे न्यू एम्पायरमधील (New Empire Theater)चित्रपट अखेर २१ मार्च २०१४ पासून थांबला. तेथील खेळ शांत झाला. आता न्यू एम्पायरला जाणे झालेच तर तेथील शांतता भयावह वाटते..पूर्वीचा तो डौल, झगमगाट, ती गर्दी आणि आता नसलेली शो कार्ड्स हे सगळेच हरवल्याचे जाणवते. जुन्या मुंबईची ही देखील ओळख हळूहळू निशब्द होत चाललीय. जशी अनेक जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सची झाली.
दिलीप ठाकूर