नवख्यांचे स्टार्स चमकवणाऱ्या ‘अर्जुन’ चित्रपटाविषयी आपल्याला हे माहित आहे का?
सनी देओल, डिंपल कपाडीया, राज किरण, अनुपम खेर, परेश रावल, शफी इनामदार यांसारख्या त्या काळच्या नवख्या आणि आत्ताच्या तगड्या कलाकार मंडळींचा हा सन १९८५ मधला चित्रपट प्रेक्षकांना एका जागी खिळवून ठेवतो. क्राईम, ॲक्शन आणि ड्रामा यांची मेजवानी असलेल्या या चित्रपटाची कथादेखील त्या काळाशी अनुरूप आहे. राहुल रवैल दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, संवाद आणि पटकथेचे लेखन जावेद अख्तर यांचे होते. आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या एकूण चार गाण्यांचा यात समावेश असून आजही ही गाणी प्रेक्षकांना भुरळ पाडतात. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा आवाज या चित्रपटातील गाण्यांना आहे. यातील ‘ममीया केरो केरो मामा’ या गाण्यावर नंतरच्या काळातही अनेक प्रयोग करण्यात आले.
तसे पाहता चित्रपट निर्मितीचा एकूण खर्च आणि यातून मिळालेला नफा याचा ठोस उल्लेख कुठेही नाही. मात्र त्या काळात सर्वोत्कृष्ट ठरलेला आणि सर्वाधिक लोकप्रियता मिळवणारा हा चित्रपट आहे. त्या काळात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या १० चित्रपटांमध्ये ‘अर्जुन’ (Arjun) चा समावेश होतो. ‘अर्जुन’चं यश पाहून त्याचे ‘सत्या’ (तमिळ), ‘भारताम्लो अर्जुनुडू’ (तेलुगू) आणि ‘संग्राम’ (कन्नड) असे तीन रिमेक बनवले गेले. चला तर जाणून घेऊयात, ‘अर्जुन’बद्दल आणखी काही रंजक बाबी…
असा मिळाला सनीला ‘ऍक्शन हिरो’चा किताब!
‘बेताब’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या देखण्या सनीला सुरुवातीच्या काही चित्रपटांमध्ये प्रेमवीराची, शांत आणि सुस्वभावी स्वभावाच्या नायकाची भूमिका देण्यात आली. ‘अर्जुन’मध्ये मात्र सनीचा वेगळाच अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. अन्यायाविरुद्ध लढणारा हा मध्यमवर्गीय छोकरा अर्जुन प्रेक्षकांना विशेष भावला. प्रत्येक मध्यमवर्गीय माणूस अर्जुनमध्ये स्वतःला पाहू लागला. अर्जुनची फायटिंग बघताना स्वतःच्या नैराश्याला दूर फेकून देऊ लागला आणि अश्या रीतीने बॉलीवूडला नव्या दमाचा ‘ऍक्शन हिरो’ मिळाला.
‘गीता’साठी भांडल्या डिंपल – अमृता सिंग – पद्मिनी कोल्हापुरे!
सुरूवातीला चित्रपटाची नायिका ‘गीता’च्या निवडीबाबत अनेक मतभेद होते. अर्जुन चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रवैल यांनी यापूर्वी ‘बेताब’चं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाने त्या वेळेस मोठे यश कमवले होते. ‘बेताब’मध्ये प्रमुख भूमिकेत सनी देओल आणि अमृता सिंग यांनाच प्रेक्षकांनी सोबत पाहिले होते, त्यामुळेच ‘अर्जुन’साठीही हीच जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस येईल असे रवैल यांचे मत होते. मात्र सनीला नायिका म्हणून डिंपल कपाडीयाची निवड व्हावी असे वाटत होते. गीताच्या भूमिकेवरून डिंपल कपाडीया आणि अमृता सिंग या दोघीमध्ये अनेक वाद निर्माण झाले. त्या काळात सनी देओल आणि डिंपल यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा होत. चित्रपटासाठी डिंपल यांची निवड झाल्यावर सनी देओल यांचे वडील धर्मेंद्र यांना हि बाब खटकली. या चित्रपटात नायिकेच्या पात्रासाठी पद्मिनी कोल्हापुरे यांना घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र सनीने जोरदार विरोध करून अखेर डिंपललाच नायिका म्हणून घोषित केले. यानंतर पद्मिनीने कधीही सनीसोबत काम केले नाही.
आगळावेगळा क्लायमॅक्स असलेला ‘अर्जुन’!
नायिकेच्या निवडीनंतर चित्रपटाचा शेवट खास करण्याचे निश्चित झाले. दिग्दर्शक रवैल यांना ‘अर्जुन’चा शेवट इतर चित्रपटांच्या शेवटाप्रमाणे करायचा नव्हता. त्यावेळी शक्यतो नायक आणि नायिका एकत्र येऊन चित्रपटांचा शेवट होत असे. हीच बाब लक्षात घेवून त्यांनी शेवट वेगळा करण्याचे ठरवले. रवैल यांनी सनी आणि पोलिसाच्या भूमिकेत असलेल्या राज किरण यांना एकत्र दाखवून चित्रपटाचा शेवट केला.
अनुपम खेर, परेश रावल आणि शफी इनामदार यांचा पहिलाच सुपरहिट सिनेमा!
चित्रपटातील सहकलाकार परेश रावल यांचा हा पहिला चित्रपट होता तर अनुपम खेर आणि शफी इनामदार हेही या नवख्या क्षेत्रात अपेक्षित यश मिळवण्यासाठी धडपडत होते. ‘अर्जुन’च्या निमित्ताने हे कलाकार रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचले. या चित्रपटात अनुपम खेर शिवकुमारच्या भूमिकेत दिसले होते तर परेश रावल यांनी अनुप लाल या शिवकुमारच्या हस्तकाची भूमिका साकारली होती. शफी इनामदार यांना आनंद पाटकरची भूमिका मिळाली होती.
गुरीला फिल्ममेकिंगचा प्रभावी वापर!
जेव्हा कधीही कुठेही चित्रपटांचे चित्रीकरण होत असते, त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमणं स्वाभाविक आहे. बघ्यांच्या गर्दीमुळे चित्रीकरणामध्ये कायमच अडथळा निर्माण होत असतो. दिग्दर्शकांना मूळ घटना चित्रपटात दाखवणं अवघड जात असतं. मात्र ‘अर्जुन’च्या बाबतीत काही वेगळंच घडलं. अडचणी लक्षात घेऊन दिग्दर्शक रवैल यांनी अशाप्रकारे शुटिंग केले की कोणालाही शुटिंग सुरु असल्याचा अंदाज आला नाही. त्यासाठी त्यांनी ‘गुरीला फिल्ममेकिंग’च्या तंत्राचा हुशारीने वापर केला. कथेला अनुसरून सनी देओल खलनायकाचा पाठलाग करत असतात, मात्र भर रस्त्यात याचे चित्रिकरण होत असताना याची सामान्यांना कल्पनादेखील नव्हती.
असा मिळाला सनीला ‘घायल’, ‘घातक’ आणि ‘दामिनी’!
असा हा ३६ वर्षांपूर्वी रिलीज झालेला ‘अर्जुन’ सनीचे सिनेसृष्टीत नशिब पालाटणारा ठरला. याच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक राज कुमार संतोषी यांनी सनीला एक भावनिक प्रसंग साकारताना पाहिले आणि त्यावर प्रभावित होऊन एकदातरी सनी सोबत काम करण्याचे त्यांनी मनाशी ठरवले. पुढे जाऊन सनीसोबत त्यांना ‘घायल’, ‘घातक’ आणि ‘दामिनी’ मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि यानंतर सनी देओलचे स्टार्स चमकले, ते कायमचेच!!
शब्दांकन – शामल भंडारे.