मुन्नाभाईचा सर्किट
दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या पहिल्या वहिल्या सिनेमासाठी म्हणजेच मुन्नाभाई एमबीबीएस यासाठी शाहरुख खानची निवड केली होती. प्राथमिक चर्चा आणि स्क्रिप्ट रीडिंग सुद्धा झाल होतं, पण शाहरुखने शहाणपणा दाखवून हा सिनेमा सोडला आणि तो पडला संजय दत्तच्या पदरात. ईमॅजीन करा मुन्ना हे पात्र शाहरुख ने निभावलं असतं तर ते नेमकं कसं झालं असतं? कधी कधी काही गोष्टी चांगल्यासाठीच होतात म्हणतात ना ते अगदी तंतोतंत खरं आहे. संजू बाबा ने सिनेमा स्वीकारला शूटिंग झालं, सिनेमा रिलीज झाला, सुरुवात करताना स्पेशल थॅंक्स टू शाहरुख खान असं नमूद करत हिरानी यांचा सिनेमा चालू झाला आणि पुढचा संपूर्ण सिनेमा हा मुन्ना आणि सर्किटमय ठरला. सिनेमा प्रचंड मोठा हीट ठरला, राजकुमार हिरानी यांच्या रूपात भारतीय सिनेसृष्टीला एक हुशार लेखक, दिग्दर्शक आणि एडिटर मिळाला. संजय दत्तच्या बुडत्या करियरला आधार मिळाला. आणि याबरोबरच आणखीन एक नाव प्रेक्षकांच्या मनावर कोरलं गेलं ते म्हणजे सर्किट हे पात्र साकारणारा अर्शद वारसी याचं!
हे वाचलंत का: अंदाज अपना अपना.. फ्लॉप का हिट
खरंतर मुन्नाभाईच्या प्रवासात जितकं योगदान लेखकाचं आहे त्यापेक्षा कईक पटीने जास्त योगदान आहे ते म्हणजे सर्किट या पात्राच. कारण गावावरून पळून आलेल्या मुन्नाची बॅकस्टोरी ही फक्त काही प्रसंगातून रंगवली गेली आहे, पण तो पळून मुंबईत आल्यानंतर त्याच्या ह्या डॉक्टर ते भाई बनण्याच्या प्रवासात सर्वात जास्त साथ लाभलेलं सर्किट ही एकमेव पात्र आहे जे आपल्याला सिनेमाच्या प्रत्येक सीन किंवा डायलॉग मधून ठासून सांगितलं आहे, इथेच आपल्याला समजतं की सर्किटचं मुन्नाच्या आयुष्यातल स्थान किती अढळ आहे ते. सर्किट नसता तर मुन्ना हा मुन्नाभाई झालाच नसता असं सुद्धा या सगळ्यातून लेखक सांगू इच्छितो!
मुन्नाच्या प्रत्येक चांगल्या वाईट काळात सदैव त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा सर्किटच असतो. आई वडील नाव टाकतात, लग्न होता होता मोडत, वडिलांचा झालेला अपमान या सगळ्याचा बदला घेणारा मुन्ना आणि त्याचे विचार पाहून आपल्याला त्याची कीव करावीशी वाटते. पण त्याच्या ह्याच मानसुब्यांना अतिशय कॉमेडी पद्धतीने टॅकल करणाऱ्या सर्किटकडे बघून त्या सीरियस सीन मध्ये सुद्धा आपल्या चेहऱ्यावर हसू येतं. ही कमाल आहे ती केवळ लिखाणाची आणि ते पात्र उत्तमरीत्या सादर करणाऱ्या अभिनेत्याची!
मुन्नावर एका भावासारख प्रेम करणारा, पण गरज पडल्यास त्वरित त्याचे कान खेचणारा, त्याच्या प्रत्येक गोष्टीत साथ देणारा आणि सुख दुखात भागीदारी निभावणारा सर्किट आहे म्हणूनच मुन्ना आहे. सर्किटशिवाय मुन्नाचा आपण विचार सुद्धा करत नाही. म्हणून तर या सिनेमाच्या पुढच्या भागात प्लॉट, कथानक, पात्रं सगळंच बदललं पण एक गोष्ट मात्र कायम होती ती म्हणजे मुन्ना सर्किटची जोडी! कॉलेज मधलं रॅगिंग असो, डॉक्टर अस्थानाला त्रास द्यायचा असो, जहिरला हसवायचं असो किंवा पारशी बाबला ज्यूस पिऊन कोमातून बाहेर आणायचं असो सगळीकडे मुन्ना बरोबर सर्किट हवाच. कारण जे मुन्नाला सुचू शकत नाही ते सर्किटला लगेच सुचू शकतं!
आणि हे पात्र साकारलं आहे ते म्हणजे एक हरहुन्नरी कलाकार अर्शद वारसी याने. अर्शद वारसी कडे टॅलेंट प्रचंड आहे, पण आपल्या इंडस्ट्री मध्ये त्याचा वापर फारसा झालेला नाही. मुन्नाभाई मधल्या सर्किट ने त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली खरी पण नंतर त्याला अशाच प्रकारचे विनोदी सिनेमे आणि पात्रं मिळत गेली. त्याचं कॉमिक टायमिंग आणि सेन्स दोन्ही जबरदस्त आहे पण तो एक हाडाचा अभिनेता सुद्धा आहे ही त्याने जॉली एलएलबी सारख्या सिनेमातून आणि नुकत्याच आलेल्या असुर सारख्या वेबसिरीजमधून सिद्ध केलं आहे. पण त्याने कितीही विनोदी सिनेमे केले असोत त्याने साकारलेलं सर्किट ही पात्र लोकांच्या मनात कायमचं बसलंय. पुढे मुन्नाभाईचे भाग येतील की नाही माहीत नाही, पण त्यात इतर काही नसलं तरी सर्किट असणार आणि नेहमीप्रमाणेच तो आपल्याला एक वेगळाच आनंद देऊन जाणार ही मात्र नक्की. असं ही भन्नाट, सेकंड लिड पण अत्यंत महत्वाचं पात्र लिहिणाऱ्या राजकुमार हिरानी यांना आणि ते पात्र तितक्याच आत्मियतेने पडद्यावर साकारणाऱ्या अर्शद वारसीला सलाम!